Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

सूजी किंवा रव्याचे पदार्थ आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखले जातात. पचायला सोपा असलेला बारीक रवा तुमच्या बाळाला पहिल्या घनपदार्थाची चव घेण्यास आणि त्याचा आनंद घेण्यास मदत करू शकतो. रव्याचे पॅनकेक्स, फळे घालून झटपट केलेले गोड पदार्थ अतिशय स्वादिष्ट असतात. रोगप्रतिकारक शक्तीला उत्कृष्ट चालना देणाऱ्या तसेच पचनास सुलभ असलेल्या रव्यापासून खाद्यपदार्थ बनवणे हा एक चांगला पर्याय आहे.

आपल्या बाळाला रव्याची ओळख कधी करून द्यावी?

तुमचे बाळ ७ महिन्यांचे झाल्यावर बाळाच्या आहारात तुम्ही रव्याचा समावेश करू शकता. बाळाला रव्याचे पदार्थ खायला घातल्यावर ऍलर्जिक प्रतिक्रिया तर नाहीत ना हे पाहण्यासाठी ३ दिवस वाट पहा. बाळाला ग्लूटेनची ऍलर्जी असल्यास बाळासाठी तो योग्य पर्याय नाही. रव्याची लापशी हा बाळाला रव्याची ओळख करून देण्यासाठी सोपा पदार्थ आहे.

बाळांसाठी रव्याचे आरोग्यविषयक फायदे

बाळासाठी रव्याची शिफारस का केली जाते असा जर तुम्ही विचार करीत असाल तर इथे रव्याचे काही आरोग्यविषयक फायदे दिलेले आहेत.

  • लोह आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत असलेला रवा, शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतो आणि हृदयाला मजबूत ठेवतो.
  • कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सह रव्यामध्ये असलेल्या प्रथिनांमुळे हा अष्टपैलू पदार्थ एक पौष्टिक पर्याय आहे.
  • खाण्यास आणि पचनासाठी रवा सोपा असल्याने बाळामध्ये बद्धकोष्ठतेसंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
  • ह्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि सोडियमची मात्रा कमी प्रमाणात असल्यामुळे प्रौढांसाठी देखील तो एक निरोगी खाद्य पदार्थ आहे.

लहान मुलांसाठी रव्याचे अनेक फायदे आहेत आणि तो अत्यंत उपयुक्त आहे

बाळांसाठी रव्याचे आरोग्यविषयक फायदे

बाळांसाठी रव्याची निवड करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

रवा किंवा सूजी आपल्या बाळाला देण्यासाठी एक उत्तम आहार आहे, परंतु बाळासाठी त्याची निवड करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या बाळासाठी पदार्थ करण्यासाठी रवा खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  • रव्यामध्ये बरेच पोषक घटक असले तरी इतर धान्यांच्या तुलनेत पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी आहे. म्हणूनच, पौष्टिक पदार्थांचा स्थिर आणि निरंतर पुरवठा करण्यासाठी इतर भाज्या, फळे आणि दुधासोबत रवा देणे जास्त चांगले असते.
  • रव्याची सुसंगतता, पाण्याची आवश्यकता आणि ते शिजवण्यासाठी किती वेळ लागतो हे रवा बारीक आहे की जाड ह्यावर अवलंबून असते.
  • जर परवडणारे असेल तर, विशेषतः मुलांसाठी सेंद्रीय रवा विकत घेण्याची शिफारस केली जाते.

बाळांसाठी रव्याच्या झटपट पाककृती

बाळांसाठी रव्याचे पदार्थ कसे करायचे हा विचार असलेल्या मातांसाठी आम्ही ३ सोप्या पाककृती इथे देत आहोत ज्या तुम्ही पटकन करून बघू शकता.

. मुलांसाठी रव्याचा उपमा

लहान मुलांसाठी रव्याचा उपमा पटकन होतो त्याची कृती खालीलप्रमाणे:

मुलांसाठी रव्याचा उपमा

लागणारे साहित्य:

  • रवा
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • तूप
  • मीठ
  • गरम पाणी

कृती:

  1. एक कढई घ्या आणि त्यात थोडे तूप घाला. ते गरम करून त्यात थोडे जिरे, मोहरी घाला.

कढईमध्ये ते चांगले तडतडू द्या.

  1. त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून संपूर्ण मिश्रण उकळू द्या.
  2. हे उकळत असताना, मिश्रण ढवळत रहा आणि हळूहळू त्यामध्ये रवा घाला. त्यात कोणत्याही गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या.
  3. एकदा झाल्यावर कढईत हळद, हिंग आणि मीठ घाला.
  4. आता झाकणाने झाकून ठेवा, गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि सुमारे पाच मिनिटे शिजू द्या.
  5. झाकण काढून रव्याचा उपमा खायला द्या.

. बाळांसाठी रव्याची खीर

जर तुमच्या बाळाला गोड आवडत असेल तर त्याच्यासाठी रव्याची खीर हा खरोखरीच चांगला पर्याय आहे.

बाळांसाठी रव्याची खीर

लागणारे साहित्य:

  • रवा
  • ड्राय फ्रूट पावडर
  • वेलची पूड
  • तूप
  • पाणी

कृती:

  • एक कढई घ्या आणि त्यात थोडा रवा घाला. गरम करुन भाजून घ्या.
  • आणखी एक पॅन घ्या आणि त्यात पाणी घाला. उकळी आणा.
  • उकळल्यावर हळूहळू त्यात थोडा भाजलेला रवा घाला. त्यात कोणत्याही गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या.
  • एकदा सर्व रवा घालून झाल्यावर मिश्रण शिजले की त्यात तूप घाला.
  • संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि गॅस बंद करा. थोडीशी वेलची पावडर आणि ड्राय फ्रूट्स पावडर घाला.
  • खीर पातळ करण्यासाठी आईचे दुध किंवा फॉर्मुला घाला. जर आपले मूल मोठे असेल तर तुम्ही आणखी थोडा सुकामेवा त्यात घालू शकता. लहान मुलांसाठी रव्याची खीर तयार आहे.

. मुलांसाठी रव्याचा स्वादिष्ट शिरा

रव्याचा शिरा बाळासाठी पौष्टिक आहे तसेच तो चविष्ट सुद्धा आहे

मुलांसाठी रव्याचा स्वादिष्ट शिरा

लागणारे साहित्य:

  • रवा
  • गूळ
  • लवंग
  • वेलची पूड
  • मनुका
  • काजू
  • दूध
  • तूप

कृती:

  • काजूचे छोटे तुकडे करून सुरुवात करा. कारण मुले स्वतःचे स्वतः काजू खाऊ शकत नसल्यामुळे ते गरजेचे आहे.
  • एका भांड्यात थोडेसे पाणी घ्या आणि त्यात गूळ घाला. गॅस वर भांडे ठेवा आणि त्यास एक मिनिट उकळी येऊ द्या. ढवळत राहा.
  • अजून एक कढई घ्या आणि त्यात तूप घाला. कढई गरम करून त्यात काजू घाला.
  • काजू किंचित तपकिरी होईपर्यंत पॅनमध्ये एकत्र भाजून घ्या. एकदा भाजून झाले की कढई बाजूला काढून ठेवा.
  • त्याच कढईमध्ये रवा घाला आणि काही मिनिटे चांगले भाजून घ्या. एकदा रव्याचा रंग बदलला की त्यात थोडे तूप घाला. रवा जळू नये म्हणून सतत नीट ढवळत रहा.
  • आणखी काही मिनिटे भाजून घ्या. ते मिश्रण तपकिरी होऊ लागले की, त्यात हळूहळू थोडे दूध घाला.
  • त्यानंतर वेलची पूड आणि काजू घाला. या टप्प्यावर, जर तुमचे बाळ घन पदार्थ चावून खाण्यास सक्षम असेल तर तुम्ही मनुके सुद्धा त्यामध्ये घालू शकता.
  • शिऱ्यासारखी सुसंगतता येईपर्यंत मिश्रण ढवळत रहा. लहान मुलांसाठी, थोडेसे पाणी घालून शिरा सरसरीत करा.
  • एकदा हे झाल्यावर तयार केलेला गुळाचा पाक शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळा. चांगले एकत्र केल्यावर गॅसवरून कढई बाजूला काढून ठेवा.
  • जर आपले मूल मोठे असेल तर तुम्ही ह्या शिऱ्यामध्ये आणखी काही ड्राय फ्रुटस घालू शकता.
  • लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे गुळाचा पाक करण्याऐवजी गूळ पावडर वापरता येते. शिरा झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात गूळ पावडर घाला. पुन्हा शिजवू नका नाही तर त्यातील दूध खराब होईल.

ऍलर्जीबाबत सावधानता

सामान्यत:, जरी रवा बाळांना खाण्यासाठी सुरक्षित असला तरीसुद्धा काही मुलांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून येतात किंवा ऍलर्जी होऊ शकते. तुम्ही लहान मुलाच्या आहारात रव्याची ओळख करून देताना येथे काही प्रतिबंधात्मक उपाय आम्ही दिले आहेत.

) ३ दिवसाचा नियम

रवा किंवा कुठल्याही नवीन खाद्यपदार्थाची बाळाला ओळख करून देताना तीन दिवसांची ऍलर्जी चाचणी करणे आवश्यक आहे. एका वेळी एकच पदार्थ बाळाला द्या. किमान तीन दिवस असे करा. तुम्हाला ऍलर्जी प्रतिक्रिया न मिळाल्यास तुम्ही त्यास तो पदार्थ देणे सुरू ठेवू शकता.

) गहू किंवा ग्लूटेन संवेदनशीलता

आपल्या बाळाला रवा देण्यापूर्वी त्याला गहू किंवा ग्लूटेनची ऍलर्जी असल्यास आपल्या डॉक्टरांचे मत घ्या. जर तुमचे मूल गहू किंवा ग्लूटेनच्या बाबतीत संवेदनशील असेल तर, रवा खाल्ल्यावर ओटीपोटात वेदना होणे , सूज येणे, अतिसार, डोकेदुखी, श्वासोच्छवासाच्या समस्या, पोटात मळमळणे इत्यादी विशिष्ट दुष्परिणाम होऊ शकतात. जर तुमच्या मुलामध्ये पुरळ उठणे, श्वासोच्छवासाच्या समस्या किंवा इतर कोणत्याही प्रतिकूल समस्या आढळल्या तर तुम्ही त्यास जवळच्या रुग्णालयात न्या.

रवा वापरुन बनवलेल्या पाककृती पौष्टिक चवदार असतात. चवदार शिऱ्यापासून ते रव्याच्या उपम्यापर्यंत सगळ्याच पाककृती मुलांना घनपदार्थंची ओळख करून देण्यासाठी सोप्या आणि झटपट करता येण्याजोग्या आहेत. तुम्ही ह्या पाककृती स्वतःसाठी सुद्धा करून पहा कारण तुम्ही ह्या चविष्ट पदार्थांपासून स्वतःला जास्त काळ दूर ठेऊ शकणार नाही!

आणखी वाचा:

बाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती
बाळांसाठी साबुदाणा – फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article