In this Article
पचनसंस्थेच्या काही समस्यांवर उपचार करण्यासाठी किंवा पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी काही स्त्रिया बडीशेपचे तेल वापरत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. बडीशेपचे फायदे बर्याच काळापासून ज्ञात आहेत. परंतु लहान बाळांसाठी बडीशेपचा वापर करताना पालक अजूनही विचार करतात. बडीशेप बाळासाठी सुरक्षित आहे की नाही ह्याची त्यांना चिंता वाटते.
बडीशेप लहान बाळांसाठी सुरक्षित आहे का?
आपल्या लहान बाळाला थोड्या प्रमाणात बडीशेप देणे पूर्णपणे सुरक्षित आहे. बडीशेपेचे पाणी बाळाला देणे हा लहान बाळांना बडीशेप देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु बाळाला बडीशेप देण्यासाठी ह्याशिवाय इतर पद्धती देखील आहेत. बाळाला बडीशेपेचे दाणे देण्याची शिफारस केली जात नाही.
बडीशेपचे पष्टिक मूल्य
बडीशेपचे फायदे बरेच आहेत. १०० ग्रॅम बडीशेप मध्ये खालील प्रमाणे पौष्टिक मूल्य असते.
पोषक | प्रमाण |
व्हिटॅमिन ए | १३६ आययू |
व्हिटॅमिन बी ६ | ०.५ मिग्रॅ |
नियासिन | ६ मिग्रॅ |
रिबोफ्लेविन | ०.३५ मिग्रॅ |
थायमिन | 0.४ मिग्रॅ |
थायमिन | २१.५ मिग्रॅ |
झिंक | ३.५ मिग्रॅ |
सोडियम | ८७ मिग्रॅ |
पोटॅशियम | १.७ ग्रॅम |
स्फुरद | ४९० मिग्रॅ |
मॅग्नेशियम | ३९० मिग्रॅ |
लोह | १८.५ मिग्रॅ |
कॅल्शियम | १.२ ग्रॅम |
फायबर | ४० ग्रॅम |
कर्बोदके | ५२ ग्रॅम |
लिपिड्स | १५ ग्रॅम |
प्रथिने | १६ ग्रॅम |
ऊर्जा | ३४६ किलोकॅलरी |
पाणी | ९ ग्रॅम |
लहान बाळांसाठी बडीशेपचे आरोग्यविषयक फायदे
तुम्हाला कदाचित बडीशेपच्या चहाचे लहान बाळांना होणारे फायदे माहिती असतील. सर्वसाधारणपणे,लहान बाळांसाठी बडीशेपचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत.
१. सूक्ष्मजीवांपासून संरक्षण
लहान बाळांना नेहमी वेगवेगळ्या जीवाणू आणि बुरशीच्या संसर्गाचा धोका असतो. बडीशेपमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. त्यामुळे बाळाचे संसर्गापासून रक्षण होते आणि बाळाला निरोगी ठेवण्यास मदत होते.
२. पचनसंस्थेच्या विकारांवर उपचार करणे
तुमच्या बाळाचे पोट सतत फुगलेले असेल किंवा बाळाला वायूचा त्रास होत असेल तर पचनसंस्था नीट काम करत नसल्याचे ते लक्षण आहे. कोणत्याही औषधाचा पर्याय निवडण्याऐवजी, तुमच्या बाळाला बडीशेपचे पाणी द्या. हे पाणी तयार करण्यासाठी बडीशेपच्या बिया पाण्यात उकळवून गाळून घ्या. परिणाम तात्काळ आणि प्रभावी आहेत.
३. कोणत्याही पोटशूळ समस्यांवर उपाय करणे
पोटात वायू राहिल्यास बाळाला वेदनादायक पेटके येऊ शकतात. जर बाळाला वायू पास करता येत नसेल, तर बाळ रडू लागते. अशा परिस्थितीत, बडीशेपचे पाणी किंवा बडीशेप तेल, अशा समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
४. स्तनपान आणि अप्रत्यक्ष फायदे
ज्या मातांना आपल्या बाळाला बडीशेप आहे तशी देण्याबद्दल काळजी वाटते त्यांनी बाळाला बडीशेपचे फायदे बाळाला मिळावेत म्हणून बडीशेपचे पाणी प्यावे किंवा बडीशेप स्वतः खावी. बाळाला स्तनपानातून बडीशेपचे फायदे मिळू शकतील. शिवाय बडीशेप खाल्ल्यास आईला दूध येण्यास सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो.
लहान बाळांना बडीशेपचा चहा देताना घ्यावयाची काळजी
लहान बाळांसाठी बडीशेपच्या चहाचे काही फायदे असू शकतात, परंतु कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
१. बाळाला बडीशेपची ऍलर्जी आहे का ते तपासून पहा
इतर कोणत्याही खाद्यपदार्थाप्रमाणेच, तुम्ही बाळाला बडीशेपची ओळख करून देऊ शकता. परंतु त्याआधी बाळाला बडीशेपची काही ऍलर्जी तर नाही ना हे तपासून पाहणे गरजेचे आहे. सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात सुरुवात करा. ऍलर्जीची कोणतीही चिन्हे जसे की त्वचेला सूज येणे किंवा रॅशेस आहेत का हे तपासण्यासाठी दोन दिवस वाट पहा. जर सगळं ठीक असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला बडीशेप तेल अथवा चहाच्या स्वरूपात देऊ शकता.
२. बडीशेपचे पाणी योग्य पद्धतीने तयार करा
बडीशेपचे पाणी तयार करताना, बडीशेप पाण्यात चांगली उकळून घ्या. परंतु तापमान जास्त गरम नसावे. मोठ्या आचेवर उकळल्याने बडीशेपमधील अँटिऑक्सिडंट्स नष्ट होऊ शकतात. मंद आच ठेवा आणि पाणी हळूहळू उकळू द्या.
३. बडीशेप कधीही तशीच देऊ नका
तुमच्या मुलाला बडीशेप देण्याने कोणतेही थेट नुकसान होत नसले तरी, बडीशेप गिळताना तुमचे बाळ गुदमरण्याची शक्यता असते. म्हणून, बडीशेपचा चहा किंवा पाणी देणे उत्तम असते. बडीशेपचा चहा किंवा पाणी करताना बडीशेप बारीक करून घेणे उत्तम असते.
लहान बाळांसाठी बडीशेपच्या रेसिपी
तुमच्या लहान बाळाला बडीशेपचे फायदे मिळण्यासाठी बडीशेपच्या काही सोप्या पाककृती तुम्ही करून पाहू शकता. ह्या पाककृती लहान बाळांसाठीअनुकूल आहेत.
१. बडीशेपचा चहा
साहित्य:
- मध – १ टीस्पून
- डॅनडेलिअनची पाने –१ टीस्पून
- पाणी – १ कप
- बडीशेप – १ टीस्पून
प्रक्रिया:
लहान बाळांसाठी बडीशेपचा चहा योग्य प्रकारे कसा बनवायचा ते येथे दिलेले आहे.
- एक कप पाणी घेऊन ते चांगले उकळवा.
- डॅनडेलिअनची पाने आणि बडीशेप ठेचून एकत्र करा आणि त्यात हे पाणी घाला. हे मिश्रण सुमारे १० मिनिटे गरम होऊ द्या.
- हे मिश्रण गाळून घ्या आणि चवीसाठी मध घाला.
२. बडीशेपचे पाणी
पोटशूळ असलेल्या मुलांसाठी बडीशेपच्या पाण्याची शिफारस केली जाते कारण त्यामुळे वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. बडीशेपचे पाणी तयार करणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी गरम पाण्यात रात्रभर बडीशेप भिजत घाला. बडीशेपचे पाणी बाजारात सुद्धा उपलब्ध असते.
बडीशेपचा चहा, पाणी आणि तेलामुळे लहान बाळाच्या अनेक समस्या कमी होतात आणि बाळाचे आरोग्य सुधारू शकते. अर्थात तुमच्या बाळासाठी कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
आणखी वाचा:
ओवा आणि ओव्याच्या पाण्याचे बाळांसाठी फायदे आणि उपयोग
बाळांसाठी आरारूट: बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी एक उत्तम पदार्थ