In this Article
- रताळी तुमच्या लहान बाळांसाठी चांगली असतात का?
- तुम्ही तुमच्या बाळाला रताळे खायला द्यायला केव्हा सुरुवात करू शकता?
- रताळ्याचे पौष्टिक मूल्य
- रताळे – लहान मुलांसाठी फायदे
- रताळ्यामुळे लहान मुलांना ऍलर्जी होऊ शकते का?
- रताळी कशी निवडावीत आणि साठवावीत?
- लहान बाळांसाठी रताळे कसे शिजवायचे?
- लहान बाळांसाठी रताळ्याच्या झटपट पाककृती
बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ चविष्ट करणे हा पर्याय असतो. तुम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून जात असल्यास तुम्ही तुमच्या बाळाला रताळे खायला देऊ शकता. विशेषतः ज्या बाळांनी नुकतेच घन पदार्थ खाण्यास सुरुवात केलेली आहे अश्या बाळांसाठी रताळे म्हणजे अन्नपदार्थांचा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
रताळी तुमच्या लहान बाळांसाठी चांगली असतात का?
रताळी अत्यंत पौष्टिक असतात. ती चवदार असतात असे म्हणायला हरकत नाही. तुमच्या बाळासाठी रताळी म्हणजे एक परिपूर्ण अन्न होऊ शकते. रताळी योग्य प्रकारे शिजवल्यावर मॅश करून किंवा त्याची प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यामुळे त्याचा सुंदर क्रीमयुक्त पोत तयार होतो आणि बाळांना तो गिळायला आणि पचायला सोपा जातो. सौम्य गोड चवीमुळे लहान मुलांसाठी ते आवडते खाद्य बनते.
तुम्ही तुमच्या बाळाला रताळे खायला द्यायला केव्हा सुरुवात करू शकता?
तुमचे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला रताळे खायला द्यायला सुरुवात करू शकता. त्याचे दूध सोडवताना तुम्ही त्याला रताळ्यासारखा घनपदार्थ देऊ शकता. सुरुवातीला, तुम्ही त्याला रताळ्याची प्युरी करून देऊ शकता कारण त्यामुळे बाळाला ते पचनास सोपे जाईल. दोन महिन्यांनंतर, जेव्हा बाळ आठ महिन्यांचे होईल, तेव्हा त्याला रताळे मॅश करून दिल्यास बाळ ते खाऊ शकेल. रताळ्याचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी तांदूळ किंवा ओट्स यांसारख्या इतर पदार्थांसोबत देखील रताळे एकत्र करून दिले जाऊ शकते
रताळ्याचे पौष्टिक मूल्य
प्रति १०० ग्रॅम | पोषण मूल्य |
प्रथिने | १.६ ग्रॅम |
ओमेगा ६ | ०.०१ ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | ३ ग्रॅम |
कर्बोदके | २०.१ ग्रॅम |
कॅलरीज | ८६ |
स्रोत: https://www.healthline.com/nutrition/foods/sweet-potatoes#section1
रताळे – लहान मुलांसाठी फायदे
रताळ्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात ज्यामुळे ते लहान मुलांसाठी एक पौष्टिक अन्न असते, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे (सुमारे ७७%) आणि चरबीचे प्रमाण कमी आहे. अशा प्रकारे, रताळे तुमच्या बाळासाठी योग्य आहेत.
हे अन्न त्याच्या/तिच्या नियमित आहाराचा भाग झाल्यानंतर तुमच्या बाळाला मिळणारे काही आरोग्य विषयक फायदे येथे दिलेले आहेत:
१. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
रताळे फायबरचा चांगला स्रोत आहेत. १०० ग्रॅम रताळ्यामधून सुमारे ३ ग्रॅम फायबर मिळते आणि ते बद्धकोष्ठता टाळण्यास आणि निरोगी पाचन तंत्र राखण्यास मदत करते.
२. बीटा–कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए
रताळे हे बीटा कॅरोटीनने समृद्ध असतात. आणि एकदा आपल्या शरीरात गेल्यावर त्याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. अशा प्रकारे, त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी किंवा राखण्यासाठी प्रत्येक बाळाच्या आहारामध्ये रताळ्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
३. प्रतिकारशक्ती वाढवते
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास रताळ्याची मदत होते. ही जीवनसत्त्वे तुमच्या बाळाची सामान्य सर्दी आणि लहान मुलांना होणा–या संसर्गाशी लढण्यास मदत करतील. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी देखील रताळे एक उत्तम अन्न आहे.
४. चांगल्या कॅलरीज
१०० ग्रॅम रताळ्यामध्ये फक्त ०.१ ग्रॅम फॅट सामग्री आणि ८६ कॅलरीज असतात. लहान मुलांसाठी हा अन्नपदार्थांचा एक पौष्टिक पर्याय आहे, विशेषतः जर बाळाचे वजन कमी असेल तर बाळाला रताळे दिलेले चांगले. रताळ्यातील उच्च–कॅलरी पातळी मुलांचे वजन वाढण्यास आणि शारीरिक विकासास मदत होते.
५. अशक्तपणा कमी होऊन हाडे मजबूत होतात
रताळे कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असतात. कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक बाळांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. लोह अशक्तपणा टाळण्यास मदत करते, तर कॅल्शियम हाडे मजबूत करते. पहिल्यांदाच पालक झालेल्या मंडळींना, बाळांना रताळ्याची ऍलर्जी असू शकते का? असा प्रश्न पडू शकतो. त्याबाबत चर्चा करूयात.
रताळ्यामुळे लहान मुलांना ऍलर्जी होऊ शकते का?
साधारणपणे, रताळ्यांमुळे लहान मुलांना ऍलर्जी होत नाही. परंतु, रताळ्याचे काही साइड इफेक्ट्स असू शकतात आणि ते सहसा सौम्य आणि नियंत्रणात असतात. म्हणूनच तुमच्या बाळाचे दूध सोडावताना आणि घन पदार्थांची सुरुवात करताना रताळ्याची शिफारस केली जाते. परंतु, काही बाळांना खरोखरच रताळ्याची ऍलर्जी असू शकते, म्हणून उलट्या, पुरळ आणि अतिसाराच्या लक्षणांकडे लक्ष द्या. अपचनामुळे सूज येणे आणि पोटात गॅस होणे ही ऍलर्जीची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. लहान मुले, कधीकधी, दूध बाहेर थुंकतात. काही वेळा, बाळांना गुदद्वाराभोवती पुरळ देखील येऊ शकते. कधीकधी, रताळ्यावर असलेली घाण पोटात गेल्याने उलट्या आणि अतिसार यांसारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
तुमच्या बाळाला रताळ्यांमधून उत्तम प्रकारचे पोषण मिळते ह्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही रताळी योग्यरित्या निवडून साठवली पाहिजेत.
रताळी कशी निवडावीत आणि साठवावीत?
तुम्ही योग्य रताळी निवडलीत तर ती शिजवायच्या आधी जास्त काळ टिकतात. रताळी निवडण्यासाठी आणि साठवण्यासाठी येथे काही उपयुक्त टिप्स आहेत.
१. रताळे निवडणे
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या खरेदी करणे केव्हाही चांगले. त्यामुळे तुम्हाला कीटकनाशकांची काळजी करण्याची गरज नाही. रताळी मध्यम आकाराची असावीत रताळ्याचे साल घट्ट व गुळगुळीत असावे. जर तुम्हाला मध्यम आकाराचे रताळे सापडत नसतील तर लहान रताळे घ्या कारण मोठ्या रताळ्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. मऊ किंवा तपकिरी डाग असलेले, छिद्रे किंवा द्रव बाहेर वाहणारे रताळे घेणे टाळा कारण ते दूषित किंवा कुजलेले असू शकतात. लक्षात ठेवा, रताळ्याचा रंग जितका गडद असेल तितके ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
२. रताळे साठवणे
रेफ्रिजरेटरमध्ये रताळी साठवणे आवश्यक नाही; रताळी खोलीच्या तपमानावर पॅन्ट्रीमध्ये किंवा स्वयंपाकघरातील कोरड्या जागेत साठवली जाऊ शकतात. जर तुम्ही रताळी सामान्य तापमानाला साठवली तर ती आठवड्याभरात वापरून टाका. जर तुम्ही त्यांना तळघर किंवा गडद आणि थंड पेंट्रीसारख्या ठिकाणी साठवले तर रताळी दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. रताळी दोन आठवड्यांहून अधिक काळ तशीच पडून असल्यास, ती पुरेशी टणक आहेत का आणि ती कुजली तर नाहीत ना ह्याची खात्री करा. जर रताळी मऊ होऊ लागली, किंवा त्यांचा टोन असमान असेल, तपकिरी ठिपके असतील आणि विचित्र वास येत असेल तर त्यांचा वापर न करणे चांगले.
रताळे निवडताना आणि साठवताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे आता तुम्हाला माहीत आहे, तेव्हा तुम्ही ते तुमच्या बाळासाठी कसे शिजवू शकता ते पाहू या. आम्ही काही स्वादिष्ट पाककृती देखील दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी बनवू शकता.
लहान बाळांसाठी रताळे कसे शिजवायचे?
तुमच्या बाळासाठी स्वयंपाक करताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे फळे आणि भाज्या निवडण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी त्यांना चांगले स्वच्छ धुवून घ्यावे. रताळ्यासाठीही ही प्रक्रिया फारशी वेगळी नाही. रताळ्यावरील घाण काढून टाकण्यासाठी रताळी स्वच्छ धुवून घ्या. आतील मऊ गर काढण्यासाठी रताळ्याचे साल काढून घ्या. तुमच्या बाळासाठी रताळ्याची डिश तयार करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स वापरू शकता.
- बेकिंग: ओव्हन २२० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करा. रताळे चिरून घ्या आणि बेकिंग ट्रेवर ठेवा. ४५ मिनिटे बेक करा, थंड करा आणि साल काढून घ्या.
- उकडणे: तुम्ही रताळे सोलून कापून घेऊ शकता आणि नंतर ते मऊ होईपर्यंत उकडून घेऊ शकता.
- प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेणे: रताळे सोलून, चिरून आणि मऊ होईपर्यंत (१ ते २ शिट्ट्या) प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.
- वाफवून घेणे: बटाटे सोलून कापून घ्या आणि ते मऊ होईपर्यंत स्टीमर वापरून वाफवून घ्या.
- मायक्रोवेव्ह: सोलल्यानंतर रताळ्याचे लहान तुकडे करा आणि सर्व बाजूंनी छिद्र करा. त्यानंतर, त्यांना मायक्रोवेव्ह मध्ये सुमारे १० मिनिटे ‘उच्च‘ सेटिंगमध्ये ठेवा.
लहान बाळांसाठी रताळ्याच्या झटपट पाककृती
आता आपण रताळे शिजवण्यासाठी वापरल्या जाणार्या विविध पद्धती पाहिल्या आहेत, आम्ही तुमच्या बाळाच्या जेवणाची चव आणखी चांगली करण्यासाठी काही सोप्या पाककृती देत आहोत:
१. रताळे आणि गाजर प्युरी
रताळ्यामध्ये गाजर घातल्याने ही डिश व्हिटॅमिन ए समृद्ध होते आणि त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते. ही पाककृती ज्या बाळांनी (७ महिने आणि त्याहून अधिकवयाची बाळे ) घनपदार्थ खाण्यास सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी योग्य आहे.
लागणारे साहित्य:
- १ मध्यम आकाराचे रताळे
- १ कप पाणी / व्हेजिटेबल स्टॉक
- १ मध्यम आकाराचे गाजर
कृती:
- गाजर किसून घ्या आणि रताळ्याचे लहान तुकडे करा.
- ते मऊ होईपर्यंत पाण्यात एकत्र शिजवा. थंड होऊ द्या.
- मऊ क्रीमी प्युरीमध्ये मिश्रण मिसळा.
२. मॅश केलेले रताळे
ज्या बाळांना घन पदार्थांची ओळख झाली आहे त्यांच्यासाठी गोड मॅश केलेले रताळे उत्तम आहे. हे मॅश केलेले रताळे गुळगुळीत आणि मलईदार आहे, आणि ते बाळांना खाण्यासाठी अत्यंत सोपे आहे. जर बाळ गिळण्याआधी अन्नपदार्थ चावून खाण्याइतपत मोठे झालेले असेल तर तुम्ही बाळाला रताळ्याचे घास देऊ शकता.
लागणारे साहित्य:
- १ मध्यम आकाराचे रताळे
- १ कप पाणी / व्हेजिटेबल स्टॉक
कृती:
- रताळी बेक करून किंवा वाफवून शिजवा.
- रताळी कोमट असतानाच मॅश करा.
- अर्धा कप पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घाला आणि फेटून घ्या किंवा चांगले एकत्र करून घ्या.
- उरलेले पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घालून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. बाळ गिळू शकेल इतके ते सरसरीत करून घ्या.
३. रताळे आणि चिकन सूप
ह्या डिशमध्ये प्रोटीनने भरलेला पौष्टिक मटनाचा रस्सा आहे आणि तुमच्या बाळाच्या शरीराच्या विकासात ह्याची मदत होते. ज्या बाळांना मांसाहारी खाद्यपदार्थांची ओळख झालेली आहे अश्या बाळांसाठी रताळे आणि चिकन सूप योग्य आहे.
लागणारे साहित्य:
- १०० ग्रॅम किसलेले चिकन
- ५ कप पाणी
- १ कप शिजवलेले रताळे
कृती:
- एका भांड्यात थोडे पाणी घालून चिकन शिजवा.
- शिजवलेले रताळे ब्लेंडरमध्ये ठेवा आणि त्यामध्ये शिजवलेले चिकन आणि चिकन ब्रॉथ घाला.
- एक गुळगुळीत मिश्रण मिळेपर्यंत ब्लेंडर मध्ये फिरवून घ्या.
- सुसंगतता समायोजित करण्यासाठी किंवा सूप पातळ करण्यासाठी तुम्ही थोडे उकळलेले पाणी घालू शकता.
४. रताळे आणि दूध भात
ह्या रेसिपीमध्ये फायबर भरपूर आहे, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी त्याची मदत होते. लहान बाळांसाठी साखर न घालता हा एकदम पौष्टिक पदार्थ तयार करता येतो.
लागणारे साहित्य:
- १ कप तांदूळ
- ४ मध्यम आकाराचे रताळे (सोललेली आणि बारीक चिरलेली)
- ३ कप पाणी
- १ कप दूध/आईचे दूध
कृती:
- चिरलेले रताळे आणि तांदूळ एका सॉसपॅनमध्ये घालून थोड्या पाण्यात उकडून घ्या.
- अर्धे शिजल्यावर त्यात दूध घालून ढवळून घ्या.
- सुमारे १०–१५ मिनिटे उकळू द्या.
- एकदा चांगले शिजले की, बाळाला खायला देण्यापूर्वी थंड होऊ द्या.
५. रताळे आणि प्लांटेन सूप
केळं हे आणखी एक पौष्टिक अन्न आहे आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. केळं आणि रताळे असलेली ही सूप रेसिपी तुमच्या लहान बाळाचा निरोगी विकास घडवून आणण्यास मदत करेल.
लागणारे साहित्य:
- १ माध्यम आकाराचे सोलून कापलेले रताळे
- सोलून कापलेले १ हिरवे केळं
- १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
- १ छोटा कांदा, बारीक चिरलेला
- लसूण पाकळी१, ठेचून
- १ कप चिकन/व्हेजिटेबल स्टॉक
- १ तमालपत्र
- १/२ कप दूध/आईचे दूध
कृती:
- कांदे आणि लसूण घालून सोनेरी मऊ होईपर्यंत परतावे.
- केळी घालून ते तपकिरी होईपर्यंत परतावे.
- चिकन स्टॉक आणि तमालपत्र घाला.
- रताळे घालून गॅस कमी करा. कमीतकमी २०–२५ मिनिटे किंवा ते शिजेपर्यंत उकळू द्या.
- मिश्रण थंड होऊ द्या.
- मिश्रणातून तमालपत्र काढा.
- एक गुळगुळीत मिश्रण होईपर्यंत रताळे आणि चिकन स्टॉकमध्ये घालून एकत्र करा .
- ते पुन्हा सॉसपॅनमध्ये घाला आणि गॅस स्टोव्हवर गरम करा.
- दूध घालून मिक्स करा.
- दहा मिनिटे उकळवा.
- थंड झाल्यावर सर्व्ह करा.
६. मटार आणि फ्लॉवर घालून तयार केलेली रताळ्याची पाककृती
७ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी ही आणखी एक उत्तम पाककृती आहे. त्यामध्ये रताळे, वाटाणे आणि फ्लॉवर या तीन भाज्यांचे पौष्टिक गुणधर्म आहेत.
लागणारे साहित्य:
- १ मध्यम आकाराचे रताळे, सोलून आणि बारीक चिरून
- १/२ कप फ्लॉवर
- १/४ वाटी मटार
- ३ ते ५ कप पाणी
कृती:
- भाज्या पाण्यात उकळून घ्या आणि शिजवण्यासाठी आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला.
- मिश्रण थोडं थंड होऊ द्या.
- गुळगुळीत पेस्ट तयार करण्यासाठी ते .ब्लेंड करून घ्या.
वर सांगितलेले रताळ्याचे पदार्थ गोठवले जाऊ शकतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही हे पदार्थ आधीच तयार करून ठेऊ शकता आणि तुमच्या मुलाला खायला घालण्यापूर्वी ते गरम करू शकता. परंतु, नेहमी आपल्या बाळाला ताजे बनवलेले पदार्थ खायला घालण्याचा प्रयत्न करा कारण नंतर तुम्ही तुमच्या लहान बाळाला जास्तीत जास्त पोषक तत्वे ह्या पदार्थांच्या माध्यमातून द्याल.
रताळे हे तुमच्या बाळाला देण्यासारखे पहिले अन्न आहे. रताळ्याचे पदार्थ म्हणजे एक नैसर्गिक मल्टीविटामिन आणि अँटिऑक्सिडंट आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. रताळे आणि सफरचंद प्युरी, रताळे आणि बटरनट स्क्वॅश इत्यादीसारख्या बेबी फूड रेसिपीज तुम्ही रताळे वापरून बनवू शकता. म्हणूनच, तुमच्या लहान बाळासाठी रताळ्याचे पदार्थ बनवण्यासाठी अजिबात संकोच करू नका. बाळांसाठी रताळ्याचे पदार्थ चवदार तर आहेतच परंतु पौष्टिक देखील आहेत!
आणखी वाचा:
बाळाला अंडे केव्हा आणि कसे द्यावे?
बाळांना बीटरूट देणे – आहारातील एक पौष्टिक पर्याय