In this Article
आपण सगळ्यांनी शरीरात वायू झाल्यामुळे वेदनेचा अनुभव घेतला आहे – त्यामुळे खूप अस्वस्थता येते आणि ते नकोसे वाटते. बाळांसाठी तर वायूमुळे होणाऱ्या वेदना खूपच अस्वस्थ करणाऱ्या असतात. सर्व बाळांना वायूमुळे वेदना होतात आणि बाळे दिवस वायू बाहेर सोडतात आणि बाळांच्या बाबतीत हे सर्वसामान्यपणे आढळते.
जर तुमच्या लहान बाळाला वायुमुळे वेदना होत असतील, तर बाळाला ते सांगता येत नाही परंतु तुम्ही इतर लक्षणांकडे लक्ष देऊन बाळाला वायू झाला आहे का हे तपासून पाहू शकता. जर बाळ अस्वस्थ असेल, किंवा उगाचच रडत असेल किंवा बाळ झोपत नसेल तर बाळाला वायूमुळे वेदना होत आहेत असे समजावे. जर तुमच्या बाळाला वायूमुळे वेदना होत असतील आणि बाळ फार चुळबुळ करीत असेल तर ते वायूमुळे असू शकते. तुम्ही बाळाच्या ह्या समस्येला कसा प्रतिबंध घालू शकता किंवा त्यावर उपचार करू शकता ह्याविषयी जाणून घ्या.
बाळांना वायू कसा होतो?
जेव्हा बाळे स्तनपान किंवा फॉर्मुला दुधातील प्रथिने किंवा चरबी पचवतात तेव्हा त्यांना वायू होतो. वायू बाळाच्या शरीरात दाब निर्माण करून पचनसंस्थद्वारे शरीराच्या बाहेर पडतो. तथापि, काहीवेळा, जेव्हा आतड्यांमध्ये जास्त प्रमाणात वायू तयार होतो तेव्हा जास्त दाब निर्माण होऊन वेदना होतात. बाळाच्या पचनसंस्थेत वायू तयार होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे
१. हवा गिळणे: बाळ स्तनपान किंवा फॉर्मुला दूध घेताना हवा गिळते आणि ते बाळांमध्ये वायू होण्याचे प्रमुख कारण आहे. जर बाळाची स्तनाग्रांवरील पकड चुकीची असेल किंवा जर बाळ फॉर्मुला दुधाची बाटली चुकीच्या पद्धतीने ओढत असेल तर बाळ हवा गिळू शकते आणि त्यामुळे बाळाला वायू होऊ शकतो.
२. रडणे: दूध पाजताना किंवा दूध पाजण्याच्या आधी बाळ रडत असेल तर बाळ हवा गिळू शकते. काहीवेळा, जर बाळ खूप जास्त रडत असेल तर ते वायू झाल्याचे लक्षण आहे. जर बाळ सारखे रडत असेल, तर बाळाच्या रडण्याचे कारण कळत नाही. परंतु लवकरच तुम्हाला बाळाचे वेगवेगळ्या पद्धतीचे रडणे समजू लागेल. आता, तुम्हाला बाळाच्या गरजा समजू लागतील आणि बाळाला शांत करण्यास त्यामुळे मदत होईल. तथापि, जर बाळ रडण्याचे थांबले नाही तर तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे नेले पाहिजे.
३. अपरिपक्व पचन संस्था: नवजात बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत असते. त्यामुळे अविकसित पचनसंस्थेमुळे, बाळ अजूनही अन्न कसे पचवायचे हे शिकत असते. आणि त्या प्रक्रियेत जास्त वायू निर्माण होतो.
४. अविकसित जिवाणू: आतड्यांमध्ये चांगले जिवाणू अजून विकसित झालेले नसतात त्यामुळे बाळाला वायू होण्याची शक्यता असते.
५. बाळाला स्तनपान करताना काही विशिष्ट पदार्थ खाणे: स्तनपानात आई खात असलेल्या अन्नपदार्थांचे काही अंश असतात. जर तुम्ही सुकामेवा, कॉफी, बीन्स, दुग्धजन्य पदार्थ उदा: चीझ, बटर आणि तूप खात असाल तर ते तुमच्या बाळापर्यंत जातात आणि बाळाला वायू होऊ शकतो.
६. जर बाळाला जास्त दूध पाजले तर: जर तुमच्या बाळाला जास्त दूध पाजले, तर बाळाला वायू होऊ शकतो. स्तनपान सुरु करताना येणारे आधीचे घट्ट चिकट दूध आणि नंतरचे पातळ दूध ह्यामध्ये साखर जास्त प्रमाणात असते आणि नंतरचे घट्ट दूध ह्यामध्ये चरबी जास्त प्रमाणात असते. लॅकटोजच्या जास्त प्रमाणामुळे वायू तयार होतो आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते.
७. इतर घटक: संप्रेरके, बद्धकोष्ठता आणि कर्बोदकांमुळे वायू तयार होतो.
बाळांमध्ये दिसणारी गॅसची लक्षणे आणि चिन्हे
बाळाला काय हवे आहे ते सांगण्यासाठी आणि अस्वस्थता दर्शवण्यासाठी, संवादाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रडणे. तुमच्या बाळाच्या रडण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुमची निरीक्षणशक्ती चांगली पाहिजे. बाळाला जर भूक लागली असेल, वेदना होत असतील, अस्वस्थता वाटत असेल किंवा पोटात वायू झाला असे तर ते सांगण्यासाठी बाळाचे काही संकेत असतात. जर बाळ वेदनेमुळे रडत असेल तर बाळाचे रडणे खूप जोरात आणि तीव्र असते. बाळाला वायू झाला आहे हे सांगण्याची काही चिन्हे खाली दिली आहेत.
- पाठीची कमान करणे
- चुळबुळ करणे आणि रेकणे
- हाताच्या मुठी आवळणे आणि ताणून धरणे
- पाय वर उचलून पोटाजवळ धरणे
- रडताना चेहरा लाल होणे
- नेहमीप्रमाणे नीट न खाणे किंवा झोपणे
बाळांच्या वायूच्या समस्येवर उपचारांसाठी घरगुती उपाय
तुमच्या बाळाला वायूचा त्रास होताना बघून तुमचे हृद्य पिळवटून निघेल. परंतु तुम्ही तुमच्या बाळाला मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि तुम्ही बाळाला त्यातून बाहेर काढू शकता. इथे काही घरगुती उपाय दिले आहेत जे वापरून तुम्ही बाळाला वायूहोण्याच्या समस्येपासून बाहेर काढू शकता.
१. बाळाला पाजतानाची स्थिती योग्य असावी – बाळाला स्तनपान करताना बाळाचा डोके आणि मान अशा स्थितीत ठेवा की ते पोटापेक्षा थोडे वरच्या कोनात असतील. ह्यामुळे दूध खाली पोटात जाते आणि पोटातील वायू वर येतो. बाटलीने दूध पाजताना सुद्धा असेच होते. तसेच, बाटली धरताना सुद्धा अशा पद्धतीने धरा की बाटलीमधील हवा बाटलीच्या निपलजवळ साठणार नाही.
२. पाजून ढेकर काढण्याचा नियम पाळा – बऱ्याचदा, बाळाला पाजताना तोंडात हवा गेल्यामुळे पोटात वायू होतात आणि त्यामुळे वेदना होतात. बाळाने जास्तीची हवा तोंडात घेणे थांबवण्यासाठी,बाळाला पाजताना प्रत्येक ५ मिनिटांनी थोडा वेळ ब्रेक घ्या आणि बाळाची ढेकर काढण्याआधी बाळाच्या पाठीवर हळूच थोपटा. असे केल्यास दूध पोटात जाऊन वायू वर येऊन बाळाला ढेकर येते.
३. लक्ष दुसरीकडे वेधून घेणे – आधी सांगितल्याप्रमाणे, रडताना बाळ हवा तोंडात घेऊ शकते. बाळ जितके जास्त रडेल तितके ते हवा आत घेईल. आणि त्यामुळे बाळाला जास्त वायू होईल. त्यामुळे जर बाळ रडत असेल तर बाळाला कडेवर घेऊन बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या त्यामुळे ते रडायचे थांबेल. विनोदी चेहरे किंवा वेगवेगळे आवाज काढून, गाणी म्हणून किंवा बाळाला नवीन खेळणे देऊन बाळाचे रडणे तुम्ही थांबवू शकता आणि तुम्हाला लक्षात येईल की बाळाची वायूची समस्या कमी झाली आहे.
४. बाळाच्या पोटावर मसाज – बाळाच्या पोटावर मसाज करणे हा बाळांमधील वायूची समस्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. बाळाला पाठीवर झोपवा आणि बाळाच्या पोटावर घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने मसाज करा आणि नंतर हात खाली घेत पोटावर मसाज करा. ह्या कृतीमुळे आतड्यांमधून वायू खाली सरकतो.
५. सीमेथीकोन द्या – गॅस समस्येवर सीमेथिकोन हे औषध दिले जाते. ह्या औषधामुळे हवेचे छोटे छोटे बुडबुडे एकत्र येऊन एक मोठा बुडबुडा पोटात तयार होतो आणि तो लवकर बाहेर पडू शकतो. हे औषध कृत्रिम रंग आणि चवी मध्ये उपलब्ध आहे. परंतु ते घेण्याआधी बालरोगतज्ञांशी संपर्क साधावा.
६. बाळाला गुंडाळणे – तुमच्या बाळाला गुंडाळलेले आवडणार नाही परंतु तुम्ही ते करा, त्याने गॅस पासून सुटका मिळण्यास मदत होते. तुमच्या बाळाला मऊ ब्लॅंकेट किंवा कापडात गुंडाळा त्यामुळे बाळाच्या हात पायांच्या हालचालीवर मर्यादा येते. आणि त्यामुळे वायूची समस्या कमी होण्यास मदत होते.
७. प्रोबायोटिक्सचा विचार करा – दह्यासारख्या प्रोबियॉटिक्समध्ये बरेच चांगले जिवाणू असतात आणि ते आतड्यांसाठी चांगले असतात. काही आठवडे ते देत राहिल्यास, वायू आणि पोटाच्या समस्या कमी होतात.
८. बाळाला ग्राईप वॉटर द्या – अनेक दशकांपासून वायू किंवा पोटशूळच्या समस्येसाठी ग्राईप वॉटर वापरतात. ग्राईप वॉटर म्हणजे पाणी, सोडियम बायकार्बोनेट, बडीशेप तेल आणि साखर ह्यांचे मिश्रण होय. त्यामुळे बाळाला ५ मिनिटांच्या आत वायूच्या समस्येपासून आराम मिळतो.
९. मोहरीच्या तेलाचा मसाज – वायूपासून सुटका होण्यासाठी तुमच्या बाळाला कोमट मोहरीच्या तेलाचा मसाज द्या आणि नंतर कोमट पाण्याने अंघोळ घाला. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने आतड्यातून वायू बाहेर पडण्यास मदत होईल आणि कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाला झोप येऊन बाळ शांत होईल
१०. हिंग – कोमट पाण्यात दोन मोहरीच्या दाण्याएवढे हिंग घाला आणि जर बाळाला वायू झाला असेल तर पाजा. थोड्या प्रमाणात हिंग दिल्यास वायूच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते.
बाळाला वायूची समस्या होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?
‘Prevention is better than cure’ अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. जर तुमच्या बाळाला वायू झाल्याने वेदना होत असतील तर बाळाला स्तनपान देताना किंवा बाटलीने दूध पाजताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बाळाला स्तनपान करत असतानाच्या काळात काही विशिष्ट अन्नपदार्थ खाणे तुम्ही टाळले पाहिजे उदा: सुके मासे, मसालेदार मांस, सुकामेवा, डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर सारख्या भाज्या. जर तुम्ही बाळाला घनपदार्थ देण्यास सुरुवात केली असेल तर ज्या अन्नपदार्थांमुळे बाळाला गॅस होतील असे पदार्थ देणे टाळा.
बाळाला दररोज थोडा वेळ तरी पोटावर झोपवत आहात ना ह्याची खात्री करा. बाळाला काही मिनिटे पोटावर झोपवून ठेवा. पोटावर पडलेला हलक्या दाबामुळे वायू बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच त्यामुळे पाठ आणि मानेचे स्नायू बळकट होतील. दिवसभरात जेव्हा तुम्ही बाळाला घ्याल तेव्हा पाठीवर थोपटा आणि बाळाशी खेळात रहा. त्यामुळे बाळाच्या शरीरातून वायू बाहेर पडण्यास मदत होईल.
तुम्ही डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?
जर तुमचे बाळ खूप वेळ रडत असेल आणि बाळाच्या वर्तणुकीत काही बदल जाणवत असेल तसेच बाळाला ताप, उलट्या होत असतील आणि बाळ काही खात नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे उत्तम.
वायूमुळे वेदना होत आहेत हे तुमच्या बाळाला सांगता येत नसेल तर तुम्ही लक्षणांची नोंद घेणे आवश्यक आहे. जर वायू साठून राहिला आणि योग्य काळजी घेतली गेली नाही तर बाळाला खूप अस्वस्थता येऊन वेदना होतात. त्यामुळे तुम्ही बाळाची चांगली काळजी घ्या.
आणखी वाचा:
बाळांमधील हिरवे शौच
बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय