Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांना उचकी लागणे: कारणे, खबरदारी आणि उपाय

बाळांना उचकी लागणे: कारणे, खबरदारी आणि उपाय

बाळांना उचकी लागणे: कारणे, खबरदारी आणि उपाय

खूप जास्त किंवा खूप भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, सोडा पिणे इत्यादी अनेक कारणांमुळे मोठ्या माणसांना उचकी लागते. उचकी आपल्या इच्छेविरुद्ध लागते कारण ती स्वायत्त मज्जासंस्थेशी जोडलेली असते. स्वायत्त मज्जासंस्था हृदयाचे ठोके आणि शरीराच्या इतर अनियंत्रित क्रियाकलापांचे नियमन करते. उचकी लागणे जसे आपल्यासाठी सामान्य आहे, तसेच नवजात बाळांसाठी देखील ती एक सामान्य प्रक्रिया आहे. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना उचकी लागणे स्वाभाविक आहे. जन्मापूर्वी सुद्धा बाळांना उचकी लागू शकते. म्हणूनच उचकी कशामुळे लागते , ती कशी टाळायची आणि त्यापासून आराम कसा मिळवायचा आणि डॉक्टरांना कधी भेटायचे याबद्दल सर्वकाही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ: बाळाच्या उचकीची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

बाळांना उचकी लागणे सामान्य आहे का?

डायफ्रॅमचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे नवजात बाळांना उचकी लागते. डायफ्रॅम हा बरगडीच्या पिंजऱ्याचा आधार असतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्याची मदत होते. उचकी लागल्यावर ती साधारणतः एक मिनिट ते दोन तास सुरु राहते. परंतु उचकी लागणे हे पूर्णपणे निरुपद्रवी तसेच वेदनारहित असते. जेव्हा तुमच्या बाळाची अवयव प्रणाली पूर्णपणे विकसित होते, तेव्हा उचकी नैसर्गिकरित्या कमी होते. गंमतीची गोष्ट म्हणजे, तुमच्या बाळाला त्याच्या शरीरातून येणार्‍या आवाजांमुळे आनंद होईल आणि त्याची करमणूक होईल. तुमच्या लहान बाळाला जरी उचकी लागली तरी काळजी करू नका कारण बाळाला उचकी लागणे ही समस्या नसते. बाळांना उचकी लागण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

लहान बाळांना उचकी का लागते?

उचकी लागणे हे बऱ्याचदा चिंतेचे कारण नसते. परंतु बाळामध्ये काही समस्या असल्यास उचक्या लागू शकतात. उचकीमुळे त्या समस्या कमी होऊ शकतात. गर्भाशयात, जेव्हा बाळ गर्भजल गिळते तेव्हा बाळाला उचकी लागते, परंतु जन्मानंतर, बहुधा खालील कारणांमुळे बाळाला उचकी लागू शकते.

  1. जास्त आहार देणे: जर तुमच्या बाळाला खूप अन्न किंवा आईचे दूध दिल्यास बाळाला पोट फुगण्याचा अनुभव येईल. पोट फुगल्यामुळे, उदरपोकळीच्या आत असलेले डायफ्रॅम विस्तारते, आणि अचानक आकुंचन पावते. हे आकुंचन म्हणजे उचकी होय
  2. एकाच वेळी श्वासाद्वारे खूप हवा आत घेणे: बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळांना उचकी लागण्याची शक्यता असते कारण बाळे दुधासोबत भरपूर हवा गिळतात. ही जास्तीची हवा आत घेतल्यामुळे पोट फुगते आणि डायफ्रॅम आकुंचन पावते
  3. वातावरणातील घटक: लहान बाळांची श्वासनलिका नाजूक असते. हवेतील धूळ, प्रदूषक, उग्र वास आणि वाहनातून बाहेर पडणारा धूर ह्यामुळे त्यांना खोकला येऊ शकतो. खोकला बराच काळ चालू राहिल्यास, डायाफ्रामवर दाब येतो आणि ते आकुंचन पावते आणि त्यामुळे उचकी लागते
  4. दमा: तुमच्या बाळाला दम्याच्या समस्येमुळे देखील उचकी येऊ शकते. फुफ्फुसातील श्वसनलिकेमध्ये जळजळ झाल्यामुळे फुफ्फुसात हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे श्वास घेताना घरघर ऐकू येते. डायफ्रॅम आकुंचन पावते आणि उचकी लागते
  5. ऍलर्जीक प्रतिक्रिया: ऍलर्जिक प्रतिक्रिया आल्यामुळे अन्ननलिकेला सूज येऊ शकते. त्यामुळे डायफ्रॅम सुद्धा आकुंचन पावते आणि बाळाला उचकी लागते. बाळाला दुधाच्या प्रथिनांची ऍलर्जी असू शकते. आईने तिच्या आहारात बदल केल्यास, किंवा आईच्या दुधाचे रासायनिक संतुलन बदलल्यास ऍलर्जी कोणत्याही वेळी होऊ शकते
  6. तापमानात बदल: कधीकधी, बाळाच्या शरीराच्या पोटाकडील भागातील तापमानात बदल झाल्यामुळे डायाफ्रामचे स्नायू आकुंचन पावतात. उदाहरणार्थ, बाळाला थंड दूध दिल्यानंतर लगेचच गरम आहार दिल्यास बाळाला उचकी सुरू होते.
  7. गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स: काहीवेळा, बाळाच्या पोटातील अन्नपदार्थ अन्ननलिकेमध्ये परत जातात. ह्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स म्हणतात. ज्या बाळांमध्ये पोट आणि अन्ननलिका वेगळे करणाऱ्या स्नायू मध्ये समस्या असतात अशा बाळांमध्ये ही गुंतागुंत आढळते. अन्नाचा हा उलटा प्रवाह अन्ननलिकेच्या मज्जातंतूंना त्रास देतो. त्यामुळे डायफ्रॅम वेगाने संकुचित होते आणि त्यामुळे उचकी लागते. उचकी लागणे हे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्सचे लक्षण नसले तरीसुद्धा रडणे, विक्षिप्तपणा आणि जास्त थुंकी येणे यासारख्या इतर लक्षणांसह सतत उचकी लागणे हे डॉक्टरकडे जाण्याचे एक कारण आहे.

बाळाची उचकी कशी थांबवायची?

बाळाला उचकी अनेकदा येऊ शकते आणि एका वेळी दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. तथापि, जर तुमच्या बाळाला त्रास होत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या बाळाला उचकी लागू नये म्हणून येथे काही उपाय दिलेले आहेत.

. उचकी नैसर्गिकरित्या थांबू द्या

बाळाची उचकी बऱ्याचदा आपोआप कमी होते. जर उचकीमुळे तुमच्या बाळाचा ताण वाढत असेल तरी सुद्धा बाळाला तसेच राहू द्या. उचकी हळूहळू आपोआप थांबेल. परंतु उचकी येणे अनेक तास किंवा अनेक दिवस सुरु राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

. ग्राईप वॉटर वापरा

बाळाला आराम पडण्यासाठी तुम्ही त्याला थोडे ग्राईप वॉटर देऊ शकता. ग्राईप वॉटर हे बडीशेप, लिंबू आणि आले यांसारख्या औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. ग्राईप वॉटर दिल्यास बाळाचे पोटाचे त्रास कमी होतात असे मानले जाते. तुमच्या बाळाला देण्यापूर्वी ग्राईप वॉटर थोडे पातळ करा, कारण ते खूप चवदार असू शकते. तसेच तुम्ही वापरत असलेल्या ग्राईप वॉटरच्या ब्रँडचे घटक तपासून पहा. टीप: जर तुमचे बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल तर ग्राईप वॉटर वापरू नका कारण ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ग्राइप वॉटर वापरण्याची शिफारस केलेली नाही.

बाळाची उचकी कशी थांबवायची?

. तुमच्या बाळासाठी पॅसिफायर वापरा

तुमच्या बाळाला जेव्हा उचकी येण्यास सुरुवात होते, तेव्हा तुम्ही त्याला चोखण्यासाठी एक पॅसिफायर देऊ शकता. त्यामुळे डायफ्रॅमला आराम पडेल आणि ते आकुंचन पावणार नाही.

. बाळाला साखर द्या

साखर खाऊ घालणे हा उचकीवरील सर्वात जुना उपाय आहे. जर तुमचे बाळ घन पदार्थ खात असेल, तर त्याच्या तोंडात थोडी साखर ठेवा. जी बाळे फक्त द्रवपदार्थ घेतात, त्यांच्यासाठी पॅसिफायर काही वेळ साखरेच्या पाकात बुडवून ठेवता येते. साखर डायाफ्रामच्या स्नायूंना आराम देते, शांत करते आणि उचकी थांबवते

. बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या

जर तुमच्या बाळाला सतत उचकी लागत असेल, तर त्याचे लक्ष एखादी गोष्ट किंवा खेळणे ह्यासारख्या मजेदार गोष्टीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. उचकी हा नैसर्गिकरित्या मज्जासंस्थेशी जोडलेल्या स्नायूंच्या आकुंचनाचा परिणाम आहे. त्यामुळे खेळण्यासारखे काहीतरी रोमांचकारी क्रियाकलाप करून किंवा कार्टून दाखवून, संवेदनात्मक विचलनाचा वापर केल्यास उचकी थांबू शकते.

प्रतिबंध

बाळाला उचकी येण्याची वेगवेगळी कारणे असल्याने उचकी पूर्णपणे टाळणे अशक्य आहे. परंतु उचकीची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काही गोष्टी करून बघू शकता.

  1. आहार देताना बाळाला ताठ ठेवा: जर तुमचे बाळ बसू लागले असेल आणि ते स्वतःचे स्वतः उठू शकत असेल, तर त्याला नेहमी सरळ स्थितीत ताठ बसवून खायला द्या आणि त्यानंतर किमान २०३० मिनिटे तुम्ही त्याला त्याच स्थितीत ठेवा. असे केल्याने डायफ्रॅमचे स्नायू नैसर्गिक स्थितीत येतात. तसेच स्नायू आकुंचन पावण्याची शक्यता कमी होते. तुमच्या बाळाच्या पाठीला हलक्या हाताने थोपटून ढेकर काढा कारण त्यामुळे स्तनपानादरम्यान गिळलेली हवा बाहेर पडू शकते. तसेच असे केल्याने डायफ्रॅमचे स्नायू सामान्य स्थितीत येतात आणि बाळाला उचकी लागत नाही
  2. स्तनपान: बाटलीने दूध पिण्याच्या तुलनेत स्तनपान घेताना बाळ कमी प्रमाणात हवा आत घेते. तथापि, स्तनपान घेणाऱ्या बाळांनी जास्त हवा आत घेऊ नये म्हणून बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लॅच होणे आवश्यक आहे. बाळ स्तनाग्रांना नीट लॅच झाल्यास स्तनाग्रांना वेदना सुद्धा होत नाहीत
  3. पाठीचा मसाज: नियमितपणे, सरळ स्थितीत असताना तुमच्या बाळाच्या पाठीला मालिश करा. त्यामुळे डायफ्रॅमच्या स्नायूंवरील ताण कमी होईल. बाळाच्या पाठीच्या खालच्या बाजूने हळूवारपणे गोलाकार मालिश करा आणि हळूहळू मालिश करत मानेपर्यंत न्या. मालिश करताना खूप दाब पडत नाही ह्याची खात्री करा.
    पाठीचा मसाज
  4. तुमच्या बाळाची ढेकर काढा: तुमच्या बाळाची उचकी टाळण्यासाठी ही एक उत्तम पद्धत आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर, त्याने गिळलेली हवा बाहेर काढण्यासाठी बाळाची ढेकर काढली आहे ना ह्याची खात्री करा. स्तनपान दिल्यानंतर प्रत्येक वेळेला बाळाला सरळ स्थितीत ठेवा. फक्त तुमच्या बाळाच्या पाठीवर थोपटा किंवा चोळा. कधीही जास्त दाब देऊ नका
  5. बाळ शांत असतानाच त्याला खायला द्या: बाळाला खूप भूक लागून त्याने रडायला सुरुवात केल्यावर त्याला खायला देऊ नका, कारण खाताना बरीचशी हवा आत गिळली जाऊ शकते
  6. मजेदार क्रियाकलाप नंतर करा: तुमच्या बाळाला शारीरिक श्रमाची आवश्यकता असलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतवू नका
  7. बाळाला जास्त खायला घालणे टाळा: बाळाला जास्त आहार देणे हे उचकी लागण्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. तुमच्या बाळाला एकाच वेळी जास्त खायला देऊ नका. आवश्यक असल्यास, बाळाला थोड्या थोड्या अंतराने खायला द्या. त्याच्या पोटात हवा गोळा होऊ नये म्हणून जेवताना किमान २३ वेळा ढेकर काढा. श्वास घेताना घरघर ऐकू येत असेल तर जेवताना हवा गिळल्याचे ते लक्षण आहे.

खालील गोष्टी टाळा

जेव्हा उचकी लागते तेव्हा आपल्याकडे बरेच उपचार आणि उपाय आहेत. तथापि,खालील गोष्टी टाळणे आवश्यक आहे नाहीतर त्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

  1. आंबट गोळ्या देऊ नका: काही चवदार आंबट गोळ्या चोखल्याने मोठ्या माणसांची उचकी थांबण्यास मदत होते, परंतु बाळांची उचकी थांबण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तसेच, ह्या गोळ्यांमधील आंबटपणा हा अम्लीय पदार्थांपासून येतो. हे पदार्थ तुमच्या बाळासाठी हानिकारक असतात
  2. तुमच्या बाळाच्या पाठीवर जोरजोरात थोपटू नका: ह्या तंत्राचा मोठ्या माणसांना उपयोग होतो, परंतु बाळावर ह्या तंत्राचा कधीही वापर करू नये. लहान मुलांच्या सांगाड्याची रचना अतिशय नाजूक असते आणि त्यावर दबाव किंवा शक्ती वापरल्याने गंभीर दुखापत होऊ शकते. परंतु, बाळाच्या पाठीवर हळूवारपणे थाप दिल्याने मदत होऊ शकते.
  3. बाळाची जीभ, हात किंवा पाय खेचू नका: ही जुनी पद्धत लहान मुलांसाठी देखील खूप धोकादायक आहे कारण त्यांचे अस्थिबंधन आणि सांगाडा अद्याप इतका मजबूत झालेला नसतो.
  4. मोठा आवाज करणे: मोठ्याने अनपेक्षित आवाज केल्याने मोठी माणसे विचलित होऊन त्यांना उचकीच्या समस्येतून बाहेर पडण्यास मदत होते. ही पद्धत बाळाच्या बाबतीत वापरल्यास बाळे घाबरू शकतात किंवा त्यांच्या कानाच्या नाजूक पडद्याला इजा पोहोचू शकते
  5. डोळ्यांवर कोणताही दबाव टाकू नका: कृपया तुमच्या बाळाचे डोळे दाबू नका कारण त्यांना एकत्र धरून ठेवणारे आणि त्यांच्या हालचालीत मदत करणारे स्नायू अद्याप पूर्णपणे कार्यरत नाहीत. असे केल्यास तिरळेपण येण्याची शक्यता असते
  6. तुमच्या बाळाचा श्वास रोखू नका: ऑक्सिजनची कमतरता तुमच्या बाळासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि ही पद्धत कोणत्याही कारणास्तव कधीही वापरली जाऊ नये

आपण डॉक्टरांना कधी फोन करावा?

तुमच्या नवजात बाळाला उचकी येणे ही अगदी सामान्य घटना आहे हे तुम्हाला आतापर्यंत माहित झाले आहे. परंतु, काही वेळा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

  • जर तुमच्या बाळाला सतत उचकी येत असेल, ते भरपूर थुंकत असेल, खूप विक्षिप्त वागत असेल आणि खायला दिल्यानंतर रडत असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. ही लक्षणे गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सची लक्षणे असू शकतात. ही एक गंभीर स्थिती आहे आणि त्यासाठी औषधे आणि/किंवा शस्त्रक्रिया आवश्यक आहे
  • जर तुमच्या बाळाला बराच काळ, म्हणजे काही दिवसांपर्यंत उचकी लागत असेल, तर ही एक असामान्य परिस्थिती आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. साधारणपणे, बाळांना एक तासापर्यंत उचकी येऊ शकते. जर जास्त काळ बाळाला उचकी येत राहिली तर त्यामागे काही गंभीर कारण असू शकते. विशेषत: जर तुमच्या बाळाला उचकी सोबत खोकला येत असेल किंवा श्वास घेताना घरघर होत असेल तर ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते
  • जर तुमच्या बाळाला उचकीमुळे खेळणे, खाणे आणि झोपणे ह्यासारख्या क्रियाकलापांमध्ये अडथळा येत असेल, तर त्यांना बालरोगतज्ञांकडे घेऊन जाण्याची शिफारस केली जाते. सततच्या उचकीमुळे तुमच्या बाळाला खूप त्रास होतो आणि शक्य तितक्या लवकर त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

बाळाला होणाऱ्या अनपेक्षित समस्यांमुळे तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. परंतु, बाळाला उचकी लागणे हे चिंतेचे कारण नाही. तुमची मनःशांती आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी संयम आणि शांत राहणे ही सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे. उचकी लागणे हे पूर्णपणे नैसर्गिक आणि निरुपद्रवी आहे. तुमच्या बाळाला उचकी लागल्यावर ती कमी करण्यासाठी काही उपाय सावधगिरीने करा. उचकी खूप दिवस सुरु राहिली आणि त्यासोबत इतर लक्षणे दिसत असल्यास, कृपया तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आणखी वाचा: 

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी
बाळांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन): लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article