In this Article
- गर्भवती स्त्री कोविड-१९ लस घेऊ शकते का?
- गर्भवती असताना किंवा स्तनपान देण्याच्या कालावधीत कोविड -१९ लस घेणे सुरक्षित आहे का?
- तुम्ही गर्भवती असल्यास कोविड -१९ लसीबद्दल तुम्ही काय विचार करावा?
- तुम्ही स्तनपान देत असल्यास तुम्हाला कोविड -१९ ह्या लसीबद्दल काय माहित असले पाहिजे?
- लहान बाळे आणि मुलांना कोविड-१९ लस मिळू शकते का?
- कोविड -१९ लस प्रजननक्षमतेवर परिणाम करते का?
- जर गरोदरपणात आईचे लसीकरण केले गेले असेल तर प्रतिपिंडांसह (antibodies) बाळ जन्माला येऊ शकते का?
- सामान्य प्रश्न
कोविड – १९ चा उद्रेक होऊन आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सन २०२० मध्ये आपल्या सगळ्यांना सोशल डिस्टंसिंग, पँडेमिक, लॉकडाउन आणि न्यू नॉर्मल शब्दांची ओळख झाली. कोरोनाव्हायरसच्या भीतीने जगताना आपण सर्वजण लस कधी येणार ह्याची वाट पाहत होतो.
आता कोविड -१९ लसीचा शोध लागला आहे, त्यामुळे आशा वाटत आहे. आपण कोविड -१९ ह्या लसीबद्दल दररोज काहीतरी नवीन शिकत असलो तरी ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. होय, या लसीचे इतर कोणत्याही लसीसारखे काही दुष्परिणाम आहेत, परंतु ही लस आतापर्यंत प्रभावी सिद्ध झाली आहे.
तथापि, ही लस प्रत्येकासाठी नाही, किमान अद्याप तरी नाही. तुम्ही गर्भवती असल्यास (किंवा गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करीत असल्यास) किंवा स्तनपान देत असल्यास, तुम्हाला लसीच्या कार्यक्षमतेबद्दल आणि लसी घ्यावी किंवा नाही याविषयी जाणून घ्यायचे आहे का? तर मग हा लेख नक्की वाचा.
गर्भवती स्त्री कोविड-१९ लस घेऊ शकते का?
तुम्ही गर्भवती असल्यास किंवा बाळाला स्तनपान करत असल्यास तुम्ही लस घेऊ शकता परंतु लस घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारणे आणि तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय, कोविड -१९ लस मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने, प्रत्येक राज्यात आणि देशात वेगवेगळी रोलआउट सिस्टम आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये ज्यांना वैद्यकीय समस्या आहेत अशांना (गर्भवती महिलांचा समावेश आहे) लस दिली जात आहे. काही राज्ये प्रथम वृद्धांना लसीकरण करीत आहेत. इतर राज्यात लोक त्यांच्या व्यवसायाप्रमाणे लस घेत आहेत. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गृह राज्य आरोग्य विभागाच्या वेबसाइटवर तपासणी करू शकता. जर तुम्ही त्यास पात्र असाल आणि तुमच्या डॉक्टरांनी लस घेण्यास परवानगी दिली तर तुम्ही लस घेऊ शकता.
भारतात, आरोग्यसेवा कामगारांना प्रथम लसीकरण करण्यात आले, त्यानंतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. सध्या, ६०वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना तसेच ४५ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील लोक ज्यांना इतरही आजार आहेत त्यांना ही लस दिली जात आहे. आरोग्यविषयक समस्या असो वा नसो लवकरच ४५ ते ६० वयोगटातील लोक ह्या लसीसाठी पात्र ठरतील.
तुम्ही तुमच्या देशाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाइटवर लस घेण्यासाठी पात्र आहात का ते तपासून पाहू शकता. तुम्ही पात्र असल्यास आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला परवानगी दिल्यास तुम्ही तुमचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
गर्भवती असताना किंवा स्तनपान देण्याच्या कालावधीत कोविड -१९ लस घेणे सुरक्षित आहे का?
कोविड -१९ ह्या लसीची माहिती वेगाने विकसित होत आहे. आम्ही पुन्हा सांगतो की, गरोदरपणात किंवा स्तनपान करत असताना लसीच्या कार्यक्षमतेबद्दल डॉक्टरांशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे.
जरी कोविड -१९ लस इतर सर्व लोकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असले तरी सुद्धा ही लस गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी सुरक्षित असल्याचे निश्चितपणे सांगता येणार नाही. गरोदरपणात कोविड -१९ च्या लसीची कार्यक्षमता तपासण्यासाठी अद्याप क्लिनिकल चाचण्या घेतल्या जात आहेत.
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) नुसार, एमआरएनए लशींमध्ये कोविड -१९ होण्यास कारणीभूत असलेला जिवंत विषाणू नसतो. परंतु तुम्ही लसीकरण घेण्यास पात्र असल्यास, तुम्ही ते घ्यावे की नाही याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अभ्यास आणि योग्य संशोधनाच्या अभावामुळे गर्भवती महिला आणि गर्भावर एमआरएनए लसीची जोखीम व त्याचे परिणाम माहित नसल्यामुळे, तुमचे डॉक्टर तुम्हाला लस घेण्याचा सल्ला देणार नाहीत.
तुम्ही गर्भवती असल्यास कोविड -१९ लसीबद्दल तुम्ही काय विचार करावा?
तुमच्या राज्यात जर तुम्ही लस घेण्यास पात्र असाल तर ती घेण्यापूर्वी तुम्ही स्वतःला आणि डॉक्टरांना काही प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते प्रश्न खालीलप्रमाणे:
- तुम्ही लस घेण्यास पात्र असल्यास आणि लस उपलब्ध असल्यास तुम्ही ती घ्यावी काहे तपासून पहा
तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला कोविड-१९ होण्याचा धोका असेल तर तुम्हाला लवकरात लवकर लस घेण्याची गरज भासू शकेल. एखाद्या गुंतागुंतीच्या गरोदरपणात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लस घेण्याचा पर्याय शहाणपणाचा ठरू शकतो.
- तुमच्या बाळाचा जन्म होईपर्यंत तुम्ही लस घेण्यासाठी वाट पाहू शकता का ह्या विषयी विचारा
जर तुमचे गरोदरपण जटिल नसेल आणि तुम्ही बाहेर जाणे टाळत असाल तसेच हात धुणे, सॅनिटायझर वापरत असाल, मास्क घालून सावधगिरी बाळगत असाल तर तुम्ही बाळाचा जन्म होईपर्यंत लस घेण्याची वाट पाहणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
- कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही संपर्क मर्यादित ठेऊ शकता का हे तपासून पहा जेणेकरुन तुम्ही लस घेण्यास उशीर करू शकता
जर काही जोखीम घटक असतील किंवा तुम्ही लोकांच्या संपर्कात येत असाल तर तो संपर्क कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ह्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. गर्भपाताचा धोका टाळण्यासाठी दुसरी तिमाही संपेपर्यंत तुम्ही लस घेण्यास उशीर करू शकता. आरसीपीआयने नुकतेच सांगितले आहे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यानंतर दिली जाऊ शकते. तुम्ही कोणती खबरदारी घेतली पाहिजे ह्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता जेणेकरून बाळाचा जन्म होईपर्यंत लसीकरण टाळता येईल.
तुम्ही स्तनपान देत असल्यास तुम्हाला कोविड -१९ ह्या लसीबद्दल काय माहित असले पाहिजे?
तुम्ही जर स्तनपान करणाऱ्या आई असाल आणि तुम्ही कोविड -१९ लस घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एमआरएनए लस घेऊ शकता कारण ती लस स्तनपान घेणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहे. ह्या लसीबद्दल तुम्हाला खात्री देणारे असे काही मुद्दे इथे देत आहोत.
- एमआरएनए लसीमध्ये कोरोनाचा जिवंत विषाणू नसल्यामुळे ही लस घेतल्यास तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कोविड -१९ होणार नाही. स्तनपान घेणाऱ्या बाळांना हानी पोहचवणारे कोणतेही घटक ह्या लशीमध्ये नाहीत.
- जेव्हा लस दिली जाते तेव्हा एमआरएनए लसीचे लहान कण इंजेक्शन जिथे दिले जाते तिथल्या स्नायूंच्या पेशी वापरतात आणि ते दुधापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. कोणताही लहान कण पोहोचला तर त्याचे पचन होऊन जाते.
- जेव्हा तुम्ही लसीकरण करता तेव्हा तुमची रोगप्रतिकारक प्रणाली कोविड -१९ च्या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी प्रतिपिंडे तयारकरते . ही प्रतिपिंडे आईच्या दुधातून बाळाकडे जातात आणि कोविड -१९ ह्या विषाणू पासून बाळाचे रक्षण करू शकतात.
- व्हायरल वेक्टर लस ही सध्या भारतात उपलब्ध नाही, परंतु जगातील इतर भागात उपलब्ध आहे, ती गर्भवती महिलांना तसेच स्तनपान देणाऱ्या मातांना दिली जाऊ शकते.
लहान बाळे आणि मुलांना कोविड-१९ लस मिळू शकते का?
एफडीएने आणीबाणीच्या वापरासाठी अधिकृत केलेली लस १६ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांसाठी आहे. एफडीएने मंजूर केलेल्या इतर दोन लसी १८ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयासाठी सुरक्षित आहेत. म्हणून अद्याप लहान बाळे आणि लहान मुलांना लस दिली जाऊ शकत नाही.
मुलांमध्ये क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत, परंतु बाळांना आणि लहान मुलांना लसीकरण करण्यास महिने लागू शकतात. सध्या, जागतिक आरोग्य संघटना १६ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोविड -१९ लस देण्याची शिफारस करत नाही, जरी ते एखाद्या उच्च-जोखीम गटाचे असले तरीही ती देण्याची शिफारस केली जात नाही.
कोविड -१९ लस प्रजननक्षमतेवर परिणाम करते का?
अनेक स्त्रिया चुकीच्या माहितीमुळे कोव्हीड लस घेण्याचे पुढे ढकलण्याचा विचार करीत आहेत, लस वंध्यत्वाला कारणीभूत आहे अशी माहिती इंटरनेटवर फिरत आहे. पण कोविड लसीमुळे वंध्यत्व येते याची पुष्टी करण्यासाठी आजपर्यंत कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
कोविड लस घेतल्यामुळे कोरोनाव्हायरस विरूद्ध लढाई लढण्यास मदत होते आणि कुणीही त्याविषयी चुकीची माहिती पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. जर तुम्हाला लसीचे इतर काही परिणाम होतात का ह्याविषयी प्रश्न असतील तर आपल्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीमुळे तुम्ही निर्धास्त रहाल.
जर गरोदरपणात आईचे लसीकरण केले गेले असेल तर प्रतिपिंडांसह (antibodies) बाळ जन्माला येऊ शकते का?
या विषयावर संशोधन सुरु आहे, गरोदरपणात लसीकरण केलेल्या आईला प्रतिपिंडासह बाळ जन्माला आपल्याने आशा वाढल्या आहेत.
फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातील पॉल गिलबर्ट आणि चाड रुडनिक यांनी त्यांच्या निरीक्षणासह या विषयावरील एक लेख सादर केला, ह्या लेखाचा इतर अभ्यासकांनी अजून अभ्यास केलेला नाही. त्यांच्या अभ्यासानुसार, आईला मॉडर्ना एमआरएनए लसीचा पहिला डोस तिच्या गरोदरपणाच्या ३६ आठवडे आणि ३ दिवसांनी दिला गेला. तिने एका निरोगी आणि पूर्ण-मुदतीच्या बाळाला जन्म दिला, ज्याच्या रक्ताच्या नमुन्यात कोरोनाव्हायरस या विषाणूविरुद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असल्याचे आढळून आले. हे निश्चितपणे आशेचे लक्षण आहे, परंतु गर्भवती असताना मातांना लसीकरण केले गेले असेल तर त्यांची बाळे अँटीबॉडीजसह जन्माला येतात की नाही याची पुष्टी करण्यासाठी एक प्रकरण पुरेसे नाही. गरोदरपणात लसीकरण केलेल्या मातांची बाळे कोरोनाव्हायरस विरूद्ध प्रतिपिंडे घेऊन जन्माला येतील किंवा नाही याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे आणि जर ह्याचे उत्तर होय असेल तर अँटीबॉडीजचा प्रतिसाद प्रमाणित करणे आवश्यक आहे.
सामान्य प्रश्न
१. कोविड -१९ च्या लसीकरणानंतर मी गर्भवती असल्याचे आढळल्यास काय करावे?
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही गर्भवती आहात हे लक्षात आले आणि तुम्ही फ्रंटलाइन हेल्थकेअर किंवा सामाजिक कार्यकर्ते नसाल तर तुम्ही तुमच्या बाळाच्या जन्मापर्यंत दुसर्या डोसची प्रतीक्षा केली पाहिजे. तुम्ही गर्भवती आहात हे समजण्यापूर्वी जर तुम्हाला लस मिळाली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण लसीचा तुमच्या बाळाला कुठलाही त्रास होत नाही.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही गर्भवती आहात हे तुम्हाला समजल्यास त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. आरसीपीआयनुसार,जर लसीचा पहिला डोस दिला गेला असेल तर कोव्हिड -१९ च्या लसीचा दुसरा डोस गरोदरपणाच्या ३३ आठवड्यांच्या आत द्यावा.
२. गरोदरपणात लस कधी घ्यावी हे कसे ठरवायचे?
आपल्याला याचे उत्तर माहित आहेः जर आपण गर्भवती असताना लस घेण्याचा विचार करीत असाल तर लसीकरण करण्याचा योग्य काळ कधी असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोला.
तुमचे डॉक्टर बहुधा पहिल्या तिमाहीनंतर लसीकरण सुचवतील, कारण नैसर्गिक गर्भपात होण्याचा धोका आता कमी झाला आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला लस घेण्याचा सल्ला देण्यापूर्वी ते तुमचे आरोग्य, तुम्ही राहत असलेल्या भागातील वातावरण आणि तुमचा व्यवसाय इत्यादी घटकांचा देखील विचार करतील.
३. जर गरोदरपणात मी एखादी लस घेतली असेल तर कोरोनाव्हायरस लस घेण्याची वाट पाहणे आवश्यक आहे का?
सीडीसीने शिफारस केली आहे की एकाच वेळी दोन किंवा अधिक लसी घेतल्यामुळे उद्भवणारी गुंतागुत कमी करण्यासाठी इतर कोणतीही लस घेतल्यावर कमीत कमी १४ दिवसांच्या अंतराने कोविड -१९ ची लस घ्यावी. सर्वात चांगला पर्याय म्हणजे कोविड -१९ ची लस घेण्याबाबतच्या सर्वोत्तम वेळेबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४. मी पहिला डोस घेतल्यावर आणि दुसरा डोस घेण्याआधी गर्भवती राहिल्यास काय करावे?
कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही गरोदर राहिल्यास तुम्ही बाळाच्या जन्मानंतर दुसरा डोस घेऊ शकता. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
कोविड -१९ लसीबद्दल इंटरनेटवर बरीच चुकीची माहिती फिरत असताना, लस घेण्याबद्दल प्रश्न आणि चिंता असणे स्वाभाविक आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही गर्भवती असता किंवा स्तनपान करीत असता आणि एखादा जीव तुमच्यावर अवलंबून असतो तेव्हा चिंता जास्त वाटू शकते. चाचण्या अजूनही चालू असल्याने लसीची कार्यक्षमता, दुष्परिणाम आणि संभाव्य जोखीम याबद्दल दररोज काहीतरी नवीन माहिती येत असते.
जोपर्यंत तुमहाला लस घेण्याबद्दल आत्मविश्वास वाटत नाही, तोपर्यंत स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या. तुम्ही लस घेऊ इच्छित असल्यास, आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. ते तुमच्यासाठी आणि तुमच्या वाढत्या बाळासाठी काय योग्य आहे ते ठरवतील.
आणखी वाचा:
कोविड-१९ कोरोनाविषाणू विषयी गर्भवती स्त्रींने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी