Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाच्या शरीरावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

बाळाच्या शरीरावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

बाळाच्या शरीरावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

जेव्हा तुमचे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, शरीराचा रंग लालसर असतो आणि ते रडत असते. मऊ दुपट्यात गुंडाळलेले आणि बाहुलीसारखे दिसणारे बाळ तुमच्या सोबत घरी येते. बाळाच्या अंगावर केस आहेत कि नाही, बाळ तुमच्यासारखे दिसते कि तुमच्या पतीसारखे दिसते हे प्रश्न बाजूला राहून तुमचे बाळ तुमचे लाडके होते.

परंतु, काही बाळाच्या आयांना त्यांच्या बाळाच्या शरीरावर जास्त केस दिसल्याबद्दल काळजी वाटते. नवजात बालकांच्या शरीरावरील केस हे पूर्णपणे सामान्य असतात त्याला लॅनुगो म्हणतात, आणि ते मुख्यत्वे अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतात, परंतु वेळेवर जन्मलेल्या बहुतेक बाळांच्या शरीरावर देखील हे केस असू शकतात. बारीक आणि मऊ पोत असलेले केस बाळाच्या शरीरावर असतात. हे केस जन्मापूर्वी गर्भाशयात किंवा जन्मानंतर काही आठवड्यांत किंवा महिन्यांत गळून पडतात.

जरी बाळाच्या शरीरावर केस येणे नैसर्गिक आणि आनुवंशिक असते, तरीही काही स्त्रियांना आपल्या बाळाच्या शरीरावर हे केस नको असतात. (आणि ते सामान्य देखील आहे). लहान बाळांच्या शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी नैसर्गिक उपाय आहेत आणि अनेक पद्धती पिढ्यानपिढ्या वापरल्या जात आहेत, त्या सेंद्रिय आणि रसायनमुक्त असल्यामुळे केस काढून टाकणे अगदी सुरक्षित आहेत.

बाळाच्या शरीरावरील केस काढण्यासाठी सोपे घरगुती उपाय

तुम्ही तुमच्या बाळाच्या अंगावरील केस काढण्याआधी, त्यांना ते का आहेत, ते कसे महत्त्वाचे आहे आणि शेवटी त्याचे काय होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बाळाच्या शरीरावरील केस आणि ते काढण्याच्या पद्धतीबद्दल सर्व जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

तुमच्या बाळाचा जन्म होताना बाळाच्या शरीरावर असलेले लॅनुगो किंवा केस काही महिन्यांत नाहीसे होतील. तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी बाळाला हलक्या हाताने मसाज करून केस झपाट्याने नाहीसे होण्यास मदत करू शकतात किंवा तुम्ही निसर्गतःच केस नाहीसे होण्याची वाट पाहू शकता. परंतु, जर तुम्हाला काही महिने वाट पाहायची नसेल, तर तुम्ही तुमच्या नवजात बाळाला लॅनुगोपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहू शकता. या घरगुती उपचारांमध्ये दूध, हळद, मैदा आणि इतर सामान्य घरगुती घटकांचा वापर केला जातो, ह्या मध्ये कोणतेही हानिकारक रसायने नसतात. हे घटक शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतात ह्याविषयी कोणतेही वैज्ञानिक पुरावे असू शकत नाहीत. परंतु हे उपाय आपल्या घरातील जेष्ठ मंडळींनी बऱ्याच काळापासून वापरले आहेत आणि ते आपल्या पारंपारिक उपायांचा एक भाग आहेत.

शरीराचे केस काढण्यासाठी तीन सर्वात सुरक्षित घरगुती पद्धती खाली नमूद केल्या आहेत, त्या सर्वांमध्ये सौम्य मसाज आणि सहज उपलब्ध घटकांचा समावेश आहे. चला त्यांच्याकडे एक नजर टाकूया!

1. आयुर्वेदिक पीठ चोळणे

नवजात बाळांसाठी. केस काढण्याची ही सर्वोत्कृष्ट आयुर्वेदिक पद्धतींपैकी एक आहे, कारण ही पद्धत साध्या घटकांचा वापर करते. पीठ, हळद आणि बदामाच्या तेलापासून ते बनवले जाते. संपूर्ण गव्हाच्या पीठाला प्राधान्य दिले जाते, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि ते शरीरासाठी आवश्यक असलेले शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. गव्हाचे पीठ त्वचेसाठी देखील सौम्य असते आणि तुमच्या बाळाचा रंग सुधारू शकतो. बदामाचे तेल चांगले मॉइश्चरायझर आणि वंगण म्हणून काम करते आणि ते त्वचेला शांत करते. थोडेसे पाणी वापरून, हे सर्व साहित्य एकत्र चांगले मळून त्याचे छोटे गोळे केले जातात. हे पीठ बाळाच्या त्वचेला चोळण्यापूर्वी कोमट बदामाच्या तेलात बुडवले जाते. कपाळ, खांदा आणि पाठ यांसारखे केस असलेले शरीराचे सर्व अवयव हे पीठ लावून हलक्या हाताने चोळा. ह्या पद्धतीमुळे केस सहज निघतात.

2. हळद आणि दूध

मसाज केल्यावर हळद आणि दुधाचे मिश्रण बाळाला त्याच्या संपूर्ण शरीरावर लावता येते. मिश्रण शरीरावर लावून कोरडे होऊ द्या आणि नंतर दुधात बुडवून मऊ कापडाने ते काढून टाका. हे झाल्यावर तुमच्या बाळाला आंघोळ घाला, परंतु कोणताही साबण किंवा बॉडी वॉश वापरू नका. दूध हे क्लिंजिंग एजंट म्हणून काम करते, आणि म्हणून क्लिंझरची गरज नाही! बाळाच्या शरीरावरील केस नैसर्गिकरित्या काढण्याचा किंवा लवकर काढण्याचा हा एक सौम्य मार्ग आहे.

3. उटणे

उटणे हे बेसन, दूध आणि चिमूटभर हळद यापासून बनवले जाते. हे सर्व घटक एकत्र केले जातात आणि मालिश करण्यापूर्वी बाळाला लावले जातात. उटणे हे लहान मुलांसाठी चेहऱ्यावरील केस काढण्याचा सुरक्षित मार्ग आहे. दुधाऐवजी दही किंवा मलई देखील वापरली जाऊ शकते. आणि, जास्तीचे केस काढण्याबरोबरच, उटणे हे मॉइश्चरायझर म्हणून देखील कार्य करते आणि त्वचेचा रंग सुधारू शकते!

बाळाच्या शरीरावरील केस काढण्यासाठी इतर पद्धती

या तीन लोकप्रिय घरगुती उपचारांव्यतिरिक्त, येथे काही इतर आहेत जे तुम्ही देखील वापरून पाहू शकता.

  1. चंदन पावडर आणि चिमूटभर हळद दुधात मिसळून केस असलेल्या शरीराच्या अवयवांवर लावा. ही पेस्ट तुमच्या बाळाच्या त्वचेवर हलक्या हाताने चोळा. आंघोळीपूर्वी हे करा, कारण नंतर तुम्ही पाणी वापरून पेस्ट काढू शकता
  2. तुम्ही बदाम, पिवळी मोहरी आणि हळद इत्यादी घटक एकत्र करून देखील पेस्ट बनवू शकता आणि तुम्हाला जे केस काढायचे आहेत त्यावर वापरू शकता
  3. तुम्ही ब्रेडचा तुकडा निरस दूध घेऊन त्यात बुडवून बाळाच्या संपूर्ण शरीरावर मसाज करू शकता. केस काढण्यासाठी हे नियमित करा
  4. दुसरी पद्धत म्हणजे बेबी क्रीम आणि बारीक केलेली लाल मसूर डाळ यांची पेस्ट बनवून केस असलेल्या भागात लावा आणि बाळाला हलक्या हाताने मसाज करा

केस काढण्याच्या पद्धती वापरताना अनुसरण कराव्यात अश्या टिप्स

  • तुम्ही तुमच्या बाळाची त्वचा नाजूकपणे हाताळा बाळ अतिशय नाजूक आणि संवेदनशील आहे! जोर लावून धुतल्याने किंवा स्क्रबिंग केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे ओरखडे, पुरळ, जखम किंवा ऍलर्जी देखील होऊ शकते
  • तुमच्या बाळासाठी जे योग्य आहे ते करा कोरडी पेस्ट चोळून धुणे हा बाळासाठी एक अस्वस्थ अनुभव असू शकते, म्हणून आवश्यकतेनुसार उपाय बदला
  • जर तुम्ही कच्चे दूध वापरत असाल तर सावध रहा. त्यात रोगजनक घटक असू शकतात. ह्या घटकांमुळे अतिसार आणि आमांश यांसारखे संक्रमण होऊ शकते आणि ते नवजात बाळासाठी अत्यंत हानिकारक असते.
  • या पद्धतींमुळे तुमच्या बाळाचे केस कायमचे काढून टाकता येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काही वेळाने केस पुन्हा वाढताना दिसतील. हे केस नैसर्गिकरित्या विरळ होण्यासाठी वेळ द्या. तुमचे बाळ मोठे झाल्यावर केस कायम राहिल्यास किंवा गडद आणि दाट होत असल्यास, तुम्ही त्याबद्दल बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

नवजात बाळाच्या अंगावरील केस हे चिंतेचे कारण नसते आणि हे केस सामान्यतः जन्मानंतर काही महिन्यांनी नाहीसे होतात. परंतु, घरगुती उपाय वापरणे हा तुमच्या बाळाच्या शरीरातील केस काढून टाकण्याचा एक चांगला आणि सुरक्षित मार्ग आहे आणि या पद्धतींचा नियमितपणे चांगला परिणाम साध्य करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

आणखी वाचा:

बाळाच्या केसांच्या वाढीसाठी टिप्स
बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article