Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३९वा आठवडा

गर्भधारणा: ३९वा आठवडा

गर्भधारणा: ३९वा आठवडा

३९व्या आठवड्यात तुमचे बाळ पूर्णतः विकसित झालेले आहे आणि बाहेरच्या जगात पाऊल टाकण्यासाठी तयार आहे. ह्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवणे हे खूप सामान्य आहे. तुमच्या शरीरात छोटे परंतु खूप महत्वाचे बदल होतील, जसे की तुम्हाला नियमित कळा येणे सुरु होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रसूतीसाठी तयार व्हाल.

गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात, बाळाचा आकार आणि वजन त्याच्या जन्माच्या वेळच्या आकार आणि वजनाएवढे होईल. ह्या आठवड्यात बाळामध्ये खालील नवीन बदल होतील.

  • ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचा मेंदू अजूनही वेगाने विकसित होत आहे. मेंदूच्या विकासाचा हा वेग पहिली ३ वर्षे असाच राहील.
  • तुमचा बाळाच्या शरीरावर पुरेशी चरबी तयार झाली आहे त्यामुळे बाळाला जन्मानंतर उब मिळण्यास मदत होईल.
  • ह्या काळात, पोषणमूल्ये आणि अँटीबॉडीजचा नाळेद्वारे बाळाला पुरवठा होईल आणि त्यामुळे आजाराविरुद्ध लढण्यास बाळाला मदत होईल.
  • बाळाला नवीन त्वचा येण्यास सुरुवात होईल कारण बाळाच्या त्वचेचा बाहेरील थर गळून पडण्यास सुरुवात होईल.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भावस्थेच्या ३९व्या आठवड्यातील बाळाचा आकार हा साधारणपणे ३.१ ते ३.६ किलो इतका असतो आणि बाळाची डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतची लांबी १९ इंच ते २१ इंच इतकी असते.

शरीरात होणारे बदल

३९वा आठवडा म्हणजे जवळजवळ गर्भावस्थेच्या शेवट असतो. हे तुमचे गर्भारपणाचा अनुभव घेण्याचे शेवटचे काही दिवस आहेत. ३९व्या आठवड्यात आढळणारे काही सामान्य बदल म्हणजे जड झालेल्या गर्भाशयामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते.

३९व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाच्या लक्षणे

बरीचशी लक्षणे ही प्रसूती लक्षणे असतील आणि ती पुढीलप्रमाणे:

१. सराव कळा (Braxton Hicks Contraction)

 

ह्या काळात, कितीही काळजी घेतली तरीसुद्धा गर्भाशयात पेटके येणे किंवा घट्टपणा जाणवणे वारंवार होते. शरीराच्या पुढच्या भागात जाणवणारी प्रसूतीची ही खोटी लक्षणे स्थिती बदलल्यावर कमी होतात. खऱ्या कळा ह्या गर्भाशयाच्या वरच्या भागात जाणवतात, त्या नियमित असतात तसेच वारंवार येत राहतात.

२. श्रोणीच्या भागावर दाब जाणवणे

गर्भावस्थेच्या ह्या शेवटच्या काही दिवसांमध्ये, तुमचे बाळ खाली श्रोणीकडे सरकले आहे, त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ आणि जड वाटेल.

३. ओटीपोटाच्या खालील भागात वीज चमकल्यासारख्या संवेदना जाणवणे

बाळ खाली सरकल्यामुळे बाळाच्या हालचालीमुळे अती संवेदनशील मज्जातंतूंवर त्याचा दाब पडतो आणि त्यामुळे तुम्हाला ओटीपोटाच्या खालील भागात वीज चमकल्यासारख्या संवेदना जाणवतील.

४. स्वच्छता करणे

बाळाच्या जन्माआधी बऱ्याच स्त्रियांना घर स्वच्छ करण्याची इच्छा होते.

५. चिकट स्त्राव आणि/ किंवा रक्तमिश्रित स्त्राव

गर्भारपणाच्या ३९ व्या आठवड्यात, ‘म्युकस प्लग’ विकसित होऊ शकतो. हा घट्ट चिकट स्त्राव असतो आणि त्यामध्ये काही प्रमाणात रक्त सुद्धा असू शकते. काही लोकांचा असा समज आहे ते लवकरच प्रसूती होणार असल्याचे लक्षण आहे, परंतु ह्या सिद्धांताला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

प्रसूतीची कुठली लक्षणे दिसून येतात?

बाळाचं लवकरच आगमन होणार आहे हे सूचित करण्यासाठी काही लक्षणे दिसून येतात. ह्या लक्षणांची माहिती असणे असणे जरुरीचे आहे. परंतु त्याचा ताण घेण्याची काही गरज नाही. जरी तुम्हाला ह्या लक्षणांची माहिती नसली आणि तुम्हाला प्रसूती कळा सुरु झाल्या तरी हरकत नाही. सहसा ही लक्षणे गर्भारपणाच्या इतर लक्षणांपेक्षा खूप वेगळी आणि तीव्र असतात, त्यामुळे तुम्ही ती सहज ओळखू शकता.

जर तुम्हाला खालील लक्षणे आढळून आली तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना फोन करू शकता किंवा दवाखान्यात जाऊ शकता.

१. गर्भजल पिशवी फुटणे

तुम्हाला तुमच्या पायांवर पाण्याचा हळूवार ओघळ जाणवेल. ह्याचा अर्थ असा आहे की तुमची गर्भजल पिशवी फुटली आहे आणि तुम्हाला पुढच्या २ तासात प्रसूती कळा सुरु होतील.

२. नियमित अंतराने वारंवार कळा येणे

जर तुम्हाला नियमित कळा येत असतील तर  कळा किती वेळच्या अंतराने येत आहेत ह्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता तसेच दोन कळांमधील वेळ कमी झाला आहे का हे सुद्धा बघू शकता. जर कळा नियमित असतील तर तुमची प्रसूतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहात. हा टप्पा कितीवेळेचा  असेल हे मात्र अनिश्चित आहे. गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात काही गरोदर स्त्रियांमध्ये प्रसूतीची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु काळजी करण्याचे कारण नाही.

काही गरोदर स्त्रियांमध्ये प्रसूतीची लक्षणे जसे की गर्भाशयाचे मुख उघडणे किंवा नियमित कळा येणे ही लक्षणे प्रसूतीच्या आधी काही दिवस किंवा कधी कधी काही आठवड्यांपासून दिसू लागतात. तर काही गरोदर स्त्रियांमध्ये फक्त काही तासांमध्ये गर्भाशयाचे मुख ० ते १० सेंमी इतके उघडते.

३९व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे

गर्भारपणाच्या ह्या कालावधीत प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी काही नैसर्गिक पद्धती आहेत ज्या तुम्हाला माहित करून घ्याव्याशा वाटतील. खाली काही सुरक्षित पद्धती दिल्या आहेत.

१. चालणे

खूप लांब अंतरावर चालण्याने उपयोग होतो. ह्या पद्धतीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, परंतु तंज्ञांच्या मते गुरुत्वाकर्षणामुळे बाळ ओटीपोटामध्ये सरकते आणि दाब पडल्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडते.

२. ऍक्युपंक्चर पद्धती

ही प्रसूती प्रवृत्त करण्याची अजून एक पद्धती आहे आणि त्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. ही खूप जुनी पद्धत आहे आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो असे मानले जाते, त्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते.

३. शारीरिक संबंध

तज्ञांच्या मते शारीरिक सुखाचा आनंद घेतल्यास प्रसूती कळा सुरु होतात. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे!

डॉक्टर्स तुम्हाला Pitocin सारखी औषधे देऊन प्रसूती प्रवृत्त करण्याचा सल्ला देऊ शकतील. ह्याचे कारण म्हणजे गर्भारपणातील गुंतागुंत जसे की, गर्भारपणातील मधुमेह, हृदयाचे काही प्रश्न असतील तर, प्रीकॅलॅम्पसिया, तसेच नाळेची गुंतागुंत, गर्भाशयाचा संसर्ग इत्यादी. ज्या गरोदर महिला गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात आहेत आणि त्यांना जुळी बाळे आहेत त्यांना सुद्धा डॉक्टर्स प्रसूती प्रवृत्त करण्याचा सल्ला देतात. गर्भजल पिशवी फुटल्यानंतरही प्रसूती कळा सुरु झाल्या नाहीत तरी सुद्धा डॉक्टर्स प्रसूती प्रवृत्त करण्याचा सल्ला देतात.

गर्भधारणेच्या ३९व्या आठवड्यात पोटाचा आकार

गरोदरपणाच्या ३९व्या आठवड्यात, बाळाची सतत वाढ होत असल्याने पोटात जागा नसते. पोटावरची त्वचा संपूर्णतः ताणली जाते. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी मार्जरासन (cat streches ) करण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भधारणेच्या ३९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

नॉर्मल आणि सुरक्षित प्रसूतीसाठी बाळाची स्थिती योग्य आहे ह्याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफी करून घ्यायला सांगितले जाते. नॉर्मल आणि सुरक्षित प्रसूतीसाठी योग्य स्थिती म्हणजे बाळाचे डोके खाली आणि पाय वर असणे. ह्या आठवड्यात सोनोग्राफी टेक्निशियन ला बाळाचा चेहरा ७५% दिसतो आणि बाळाच्या पापण्यासुद्धा  दिसतात.

आहार कसा असावा?

अन्नपदार्थांमुळे प्रसूती प्रवृत्त होते ह्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात पचायला सोप्या असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश होतो. चरबीयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस खाणे ह्या आठवड्यात टाळले पाहिजे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

ह्या कालावधीत खाली काही टिप्स दिल्या आहेत त्या जरूर पाळा

हे करा

  • पचायला हलके असणारे अन्नपदार्थ खा, नाहीतर तुमच्या पचनसंस्थेवर ताण येईल.
  • तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वाहन चांगल्या स्थितीत आहे ह्याची खात्री करा आणि कुठल्याही क्षणी ते तुमच्यासाठी तयार आहे किंवा नाही हे तपासून पहा.

हे करू नका

  • दुग्धजन्य पदार्थ, मांस तसेच चरबीयुक्त पदार्थ ह्या काळात खाऊ नका त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर ताण पडतो.

  • जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते, तुमच्या पैकी बऱ्याच जणींना  घराची स्वच्छता करण्याची इच्छा होते आणि त्या खूप काम करत राहतात. घर खूप नीटनेटके आणि स्वच्छ ठेवणे ह्यामध्ये गैर काही नाही परंतु तुम्ही घरातील इतर सदस्यांची मदत घेत आहात किंवा स्वच्छतेसाठी कामवाल्या बाईंची मदत घेत आहात ना ह्याची खात्री करा.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

इथे काही गोष्टी दिल्या आहेत त्यांची तुम्ही गरोदरपणाच्या ३९व्या आठवड्यात खरेदी करा.

  • ब्रेस्ट पंप
  • बेबी वाईप्स
  • नॅपी
  • स्तनपान साठवून ठेवण्यासाठी पिशव्या

प्रसूतीची तारीख जवळ येत आहे त्यामुळे चिंता वाटणे साहजिक आहे. गर्भारपणाचे शेवटचे काही दिवस नीट हाताळता यावेत म्हणून वाचन करून त्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करणे हा उत्तम मार्ग आहे.

आरामात रहा, आणि तुमच्या गोंडस बाळाला भेटण्यासाठी तयारीत रहा.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३८वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ४०वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article