In this Article
आता तुमचे बाळ स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागते आणि कदाचित तिच्याकडे लक्ष देणाऱ्या कुणाशीही ती हसण्यात आणि गप्पा मारण्यात खूप वेळ घालवू लागते. बाळ जे आवाज किंवा शब्द उच्चारते त्याचा संबंध ती लावू लागेल. उदा: ‘दा” आणि “मा” ह्याचा संबंध बाळ तुमच्याशी आणि तुमच्या पतीशी लावू लागेल. ह्या वयात तुमच्या बाळाची जसजशी वाढ आणि विकास होईल तसे बाळामध्ये खूप बदल झालेले तुम्हाला दिसतील. २५ आठवड्यांच्या बाळाची वाढ आणि विकास ह्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
२५ आठवड्यांच्या बाळाचा विकास
आता पर्यंत, तुम्ही आपल्या बाळासाठी सर्व काही करत होतात. आता मात्र ती स्वतंत्र होण्याची चिन्हे दाखवू लागली आहे. ती खूप वेगाने विकसित होत आहे आणि शिकत आहे, आणि तिचे पालक म्हणून, तिला ह्या मार्गात मदत करणे आणि प्रोत्साहित करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. वयाच्या २५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचा मेंदू अधिक जास्त गोष्टी ओळखण्यासाठी अधिक विकसित होण्यास सुरवात होते. बाळ अधिक घन पदार्थ घेण्यास तयार होऊ लागेल आणि स्वतःचे स्वतः पालथे पडण्यास सक्षम असेल. ह्या वयात दात येणे ही एक मोठी समस्या असू शकते आणि जर आपले बाळ खूप रडत असेल, लाळ गाळत असेल किंवा बाळाला सौम्य ताप येत असेल आणि हिरड्या सुजलेल्या असतील तर ही सर्व दात येण्याची लक्षणे आहेत.
२५ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे
प्रत्येक आठवड्यात बाळामध्ये नवीन बदल झालेला दिसतो. प्रत्येक आठवड्यात ती निरंतर वाढते, निरीक्षण करते आणि तिच्या सभोवतालच्या जगाबद्दल शिकते. या आठवड्यात ती जे काही विकासाचे टप्पे गाठणार आहे त्यापैकी काही येथे आहेत
- या वयात बाळ पोटावरून पाठीवर पालथे कसे पडायचे हे शिकते त्यामुळे डायपर बदलण्याचा प्रयत्न करीत असताना तुम्हाला काही आश्चर्याचा सामना करावा लागेल. तुमच्या दोघांसाठी हा एक नवीन आणि मनोरंजक अनुभव असेल, परंतु अपघात रोखण्यासाठी तिच्यावर बारीक नजर ठेवा
- तुमच्या लहान बाळाला तुम्ही काय बोलता त्यामध्ये फार रस असेल. या वयाची मुले कोणता हावभाव किंवा आवाज केल्यास आपल्याला कोणता प्रतिसाद मिळतो हे संबद्ध करणे शिकतात.
उदाहरणार्थ, आपल्या बाळाला हे समजते की जेव्हा ती रडत असते, तेव्हा तुमचे लक्ष वेधून घेते. तिला हे समजते आहे की ती हसल्यास तुम्ही हसता. तुम्ही आणि तुमचे पती वैयक्तिकरित्या काय प्रतिसाद देता हे मौखिक संकेत देखील ती शिकत आहे
- ती कदाचित काही अक्षरे पुन्हा पुन्हा उच्चारेल आणि तिचा आवाज ऐकून तुम्हाला आनंद होईल. तिच्याशी संवाद साधून तिला प्रोत्साहित करा आणि तिला योग्य शब्द आणि वस्तूंचा संबंध साधण्यास मदत करण्यासाठी तिला आवडणाऱ्या गोष्टी दाखवून प्रोत्साहित करा
- या वयापर्यंत बरीच लहान मुले घनपदार्थ खाण्यास तयार असतात. जर तुमचे बाळ आधार घेऊन बसू लागले असेल आणि तिची मान स्थिर ठेऊ शकत असेल, तर ती बहुधा अन्न गिळण्यासाठी जिभेचा वापर करून अन्न तोंडात ढकलेल
- ती एका हातातून दुसरीकडे वस्तू पास करण्यास आणि शोधाशोध करण्यास सक्षम असेल, मुळात तिला हवे आहे ते मिळवण्यासाठी तिच्या दोन्ही हातांचा वापर ती करेल
- या वयातही ती खूप हसते
बाळाचा आहार
दिवसातून काही वेळा आपल्या बाळाला काही प्रमाणात सीरिअल देणे तसेच तिचे नेहमीचे आईचे दुध किंवा फार्मूला दूध देणे हे कदाचित तुम्ही आतापर्यंत करत आहात. तथापि, आता स्तनपान कमी करून अधिक घन आहार देण्याची वेळ आता आली आहे. मूग डाळ, तांदूळ मिक्स, तांदूळ दलिया आणि गहू दलिया यासारख्या सहज पचण्यायोग्य पदार्थांसह प्रारंभ करा आणि त्यामध्ये मॅश केलेली पपई, आंबा, पिकलेली केळी, बटाटे, रताळे किंवा गाजर यासारख्या फळांचा समावेश असू शकतो. दररोज एक याप्रमाणे हळू हळू आपल्या बाळाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा परिचय द्या आणि कोणत्याही ऍलर्जिक प्रतिक्रियेवर लक्ष ठेवा.
बाळाची झोप
येथे आपल्या २५ आठवड्यांच्या बाळाच्या काही सवयी दिलेल्या आहेत
- २५ आठवड्यांचे बाळ एकूण चौदा किंवा पंधरा तास झोपते. कृतज्ञतापूर्वक, यापैकी अकरा तास रात्रीच्या वेळी असतात, तर उर्वरित तास दिवसा झोपेचे असतात.
- या वयोगटातील काही मुले आपली तिसरी डुलकी मारण्यास तयार आहेत
- या वयात तुमच्या बाळाच्या झोपेत अडथळा येऊ शकतो जो बर्याच कारणांमुळे असू शकतो.वेगाने होणारी वाढ आणि दात येणे ही दोन उदाहरणे आहेत
- आपले बाळ जागे होऊ शकते आणि कदाचित रात्री जागे राहू शकते. ती तिच्या पालथे पडण्याच्या कौशल्याचा सराव करण्यात खूप गुंतलेली असू शकते
- प्रौढांप्रमाणेच, मध्यरात्री उठण्याची प्रवृत्ती बाळांमध्ये देखील असते. “रात्री झोपून जाणे” याचा खरा अर्थ असा आहे जेव्हा एखादे मूल झोपेतून जागे होते तेव्हा स्वतःला शांत करून पुन्हा न रडता झोपी जाणे.काही कुटुंबांना त्यांच्या मुलांना या वयापासून झोपेचे प्रशिक्षण देणे आवडते
- जरी तुमचे बाळ आता पालथे पडत असेल आणि पोटावर झोपण्यात बाळाला मजा येत असेल तरीही, तिला तिच्या पोटात झोपायला न लावणे चांगले. तिला तिच्या पाठीवर झोपवा
२५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
तुमच्या २५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स येथे आहेत.
- काही स्त्रिया स्तनपान करीत असताना आपल्या मुलांना बाटलीने पाणी देण्याचा पर्याय निवडतात. जर अद्याप तुम्ही हे केले नसेल तर तुम्ही तुमच्या बाळाला पाणी देण्यासाठी सीपीकप चा वापर करू शकता.
- आपले बाळ लवकरच रांगणार आहे आणि सगळीकडे हालचाल करणार आहे. जेणेकरून नंतर कोणतीही अनावश्यक अडचण येऊ नये म्हणून तुम्ही तुमचे घर चाईल्ड प्रूफ करणे चांगले
- बाळाने आता पालथे पडण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे बाळाचे डायपर बदलण्याची जागा जमिनीवर असणे चांगले. त्यामुळे तुमचे अगदी क्षणभर दुर्लक्ष होऊन बाळ पालथे पडण्याची भीती राहणार नाही
- तुमच्या २५ आठवड्यांच्या बाळाचा व्यावसायिक फोटो घ्या
- जर बाळाला फिंगर फूड खाण्यात रस असेल किंवा स्वतः चमच्याने खाण्याचा प्रयत्न करीत असेल तर तिला ते करू द्या. जरी त्यामुळे खूप गडबड होऊ शकते, तरीही ते बरेच काही शिकते आणि चमच्याने कसे खावे हे शिकण्यास तिला मदत होते
२५ व्या आठवड्यातील चाचण्या आणि लसी
आपल्या बाळाच्या सर्व तपासण्या करून घेणे चांगले. आपण आपल्या डॉक्टरांना फ्लू शॉट देण्याबद्दल विचारू शकता कारण आता बाळाचे वय त्यासाठी योग्य आहे. आपल्या बाळाला तिच्या ६ महिन्यांच्या डॉक्टरांच्या भेटीदरम्यान एचआयबी, डीटीएपी, हिपॅटायटीस बी आणि पोलिओव्हायरस ह्या लसी देता येतील. तिच्या नऊ महिन्यांच्या डॉक्टरांच्या भेटीचे वेळापत्रक निश्चित करा.
खेळ आणि क्रियाकलाप
तुमच्याबरोबर खेळणे बाळाला सर्वात प्रिय असते. ही केवळ मजाच नाही तर त्यामुळे तुमचा बाळाशी बंध निर्माण होण्यास सुद्धा वेळ मिळतो. यामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकास होण्यास मदत होते. येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकता.
१. फोटो अल्बम
यासाठी तुम्हाला प्लास्टिक असलेला एक साधा फोटो अल्बम आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही फोटो ठेऊ शकता. तुम्ही त्यामध्ये तुमची, तुमच्या पतीची, मुलांची आणि इतर काळजीवाहकांची व नातेवाईकांची छायाचित्रे ठेवा. जेव्हा तुम्ही एकत्र बसता तेव्हा तिला अल्बम दाखवा. सर्व रंगीबेरंगी चित्रांनी ती मंत्रमुग्ध होईल आणि चित्रांमधील चेहरे ओळखताच ती आनंद आणि उत्साह देखील दर्शवेल
२. कारण आणि परिणाम
तुमच्या बाळासाठी सर्वकाही नवीन असल्याने तुम्ही तिला दाखवलेल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर ती पूर्णपणे मोहित होईल. जेव्हा आपण लाईट स्विच चालू किंवा बंद करता तेव्हा काय होते ते दाखवण्यासाठी पुढे जा, आपल्या बाळाला डोअरबेल वाजविण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही तिला नळ चालू करण्याची परवानगी देऊ शकता (पाणी थंड आहे तोपर्यंत). विशिष्ट कृतींचे विशिष्ट परिणाम कसे होतात हे जाणून घेण्यास ह्यामुळे तिला मदत होईल
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
जर आपल्या बाळाने अद्याप हसणे, बडबड करणे सुरू केले नसेल तर, ती डोळ्यांशी संपर्क साधत नसेल तर किंवा बाळ मदतीशिवाय बसत नसेल किंवा आवाजांना प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या.
प्रत्येक मूल समान गतीने वाढत नाही. ते स्वतःचे गतीने विकासाचे टप्पे गाठत असते. अकाली जन्मलेल्या बाळांचा विचार केला तर त्यांना विकासाचे टप्पे गाठायला जास्त वेळ लागण्याची शक्यता असते. बाळांना वाढवण्यास बराच वेळ, प्रयत्न आणि धैर्य लागते, परंतु पालकांच्या प्रेमामुळे आणि मार्गदर्शनामुळे सर्व मुले चांगली व्यक्ती म्हणून वाढण्यास सक्षम असतात.
मागील आठवडा: तुमचे २४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी