आहार आणि पोषण

गरोदरपणात ओवा (कॅरम सीड्स) खाणे

ओवा म्हणजेच अजवाइनला (कॅरम सीड्स), ‘बिशप्स विड’ किंवा ‘थायमॉल सीड्स’ म्हणूनही ओळखले जाते. ओवा हा बहुतेक भारतीय घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे. ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.  ओव्याची चव आणि औषधी गुणधर्मांमुळे ओवा भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. ओवा कच्चा खाल्ल्यास त्याची चव तिखट लागू शकते म्हणून, ओवा सहसा फोडणीमध्ये वापरला जातो.

व्हिडिओ: गरोदरपणात ओवा (कॅरम सीड्स) खाणे सुरक्षित आहे का?

https://youtu.be/dPxz7qjq9m4 ओवा त्याच्या औषधी गुणधर्मांची ओळखला जातो. अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असलेला ओवा  खाल्ल्याने गॅस आणि इतर पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. ओवा  खाल्ल्याने पचनशक्ती वाढून भूकही वाढते. मूत्रपिंड आणि श्वसन प्रणालीच्या योग्य कार्यासाठी देखील ओवा फायदेशीर आहे. त्यामुळे गरोदर महिलांना गरोदरपणात ओवा खाण्याचा फायदा होऊ शकतो.

गर्भवती असताना ओवा खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात योग्य प्रमाणात ओवा खाल्ल्यास ते सुरक्षित मानले जाते. मात्र, ओवा थोड्या प्रमाणात खाण्याची काळजी घ्यावी. जर तुम्ही ओवा कच्चा खाऊ शकत नसाल, तर ओवा पाण्यात भिजवून ओव्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता.

गरोदरपणात ओवा खाण्याची कारणे

गरोदरपणात ओवा खाणे खालील प्रकारे उपयुक्त ठरू शकते:

१. पचन सुलभ होते

वाढत्या गर्भाशयामुळे अनेक गर्भवती स्त्रियांना पोट फुगणे, आम्लपित्त आणि अपचनाचा अनुभव येतो आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. ओव्यांमध्ये थायमॉल असते त्यामुळे पचन सुलभ होते, आतड्याचे  आरोग्य सुधारते आणि पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो.

२. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

गरोदरपणामुळे स्त्रीच्या आतड्याच्या हालचालींवर परिणाम होतो, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. गरोदरपणात ओवा खाल्ल्याने पचनक्रिया वेगात होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

३. छातीतील कफ कमी होण्यास मदत होते

गरोदरपणात ओवा खाल्ल्याने सर्दी-खोकला बरा होतो आणि कफ दूर होतो.

४. कोलेस्ट्रॉल कमी होते

ओवा खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची (HDL) पातळी वाढवण्यास मदत करतो. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग केले गेले होते. ओव्यांमध्ये अविश्वसनीय अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत आणि त्यांची सक्रिय संयुगे साल्मोनेला आणि ईकोली सारख्या जीवाणूंच्या वाढीशी लढण्यास मदत करतात. हे जिवाणू प्रामुख्याने अन्न विषबाधेसाठी जबाबदार आहेत. त्याशिवाय, ज्यांना जळजळ होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठीही ओवा उपयुक्त  आहे.

ओव्याच्या सेवनाचे काही दुष्परिणाम आहेत का?

ओव्याचे संपूर्ण फायदे मिळण्यासाठी गरोदरपणात ओव्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. परंतु,ओवा जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदरपणात ओव्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे गरोदरपणात नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गरोदरपणात ओवा जास्त प्रमाणात खाल्ल्याने चक्कर येणे आणि मळमळ होणे वाढू शकते.

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात ओव्याचा समावेश करणे

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात ओव्याचे सेवन बियांच्या स्वरूपात, चूर्ण स्वरूपात किंवा ओव्याच्या  पाण्याच्या स्वरूपात समावेश करू शकता. बहुतेक गर्भवती स्त्रिया गरोदरपणात ओव्याचे पाणी पिणे पसंत करतात कारण ते सोपे जाते. गरोदरपणात, ओव्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे. परंतु, तुम्हाला त्याबाबत कोणतीही शंका असल्यास, आपल्या आहारात ओव्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संसाधने आणि संदर्भ: Healthline

आणखी वाचा:

गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन (फेनुग्रीक सीड्स) करणे

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved