In this Article
तुम्ही आई होणार आहात ही ” गोड बातमी” म्हणजे नवीन साहसाच्या सुरवातीची तुमची तयारी होय. गर्भधारणेमुळे तुमच्या मध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होतात आणि बाळाच्या जन्मापर्यंत तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो.
बऱ्याचवेळा गर्भधारणेचे पहिले चिन्ह म्हणजे मॉर्निंग सिकनेस. पण नावाप्रमाणे हे काही आजारपण नव्हे तसेच फक्त ते सकाळी जाणवते असे नाही. मॉर्निग सिकनेस म्हणजे मळमळ आणि उलटी होईल असे वाटणे ज्याची सुरुवात प्रामुख्याने सकाळी होते. म्हणून, जर तुम्ही उलटीसाठी सारखे बाथरूमकडे पळत असाल तर काळजीचे काहीच कारण नाही, तुम्ही एकटे नाही आहात. इथे वस्तुस्थिती, लक्षणे आणि मॉर्निग सिकनेस कसे हाताळावे ह्याविषयी काही उपाय सांगितले आहेत.
मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय?
बऱ्याच गर्भवती स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. पहिल्या तिमाहीमध्ये हे खूप सामान्य आहे. काही स्त्रियांसाठी मळमळ आणि उलटीचा त्रास संपूर्ण गर्भधारणेच्या दिवसांमध्ये होतो आणि ही लक्षणे प्रसूतीपर्यंत दिसून येतात. ह्यासाठी काही तज्ञांच्या उपचारपद्धतींची गरज नसते.
मॉर्निंग सिकनेसची कारणे काय आहेत?
बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान मळमळ होते आणि हे सर्वात सामान्यपणे आढळणारे लक्षण आहे. जरी हा त्रास होण्यामागे काही विशेष कारण नसले तरीसुद्धा मळमळ आणि ह्यूमन कोरीओनिक गोनॅडोट्रोपिन (HCG) ह्या संप्रेरकाचा एकमेकांशी संबंध असतो. वैज्ञानिक दृष्ट्या, जेव्हा फलित अंडे गर्भाशयाच्या आवरणाला चिकटते तेव्हा ह्या संप्रेरकाची निर्मिती होते. जरी hCG आणि मळमळ ह्यांचा संबंध नसला तरी सुद्धा दोन्हीचा उच्चांक एकाच वेळी होतो म्हणून तज्ञांच्या मते त्यांच्यामध्ये संबंध आहे.
गर्भधारणेदरम्यान मॉर्निंग सिकनेसची कारणे नक्की काय आहेत हे माहित नाही. तथापि, बऱ्याच तज्ञांच्या मतानुसार संप्रेरकांमधील बदल हे प्रमुख कारण असावे. ह्यामध्ये खालील संप्रेरकांचा समावेश होतो
१. इस्ट्रोजेनची पातळी
ह्या संप्रेरकाची पातळी गर्भधारणेदरम्यान खूप वाढते. जेव्हा की गर्भवती नसलेल्या स्त्रीच्या शरीरातील ह्या संप्रेरकाची पातळी खूप कमी असते. ह्या बदललेल्या संप्रेरकांच्या पातळीमुळे मॉर्निंग सिकनेस होतो.
२. प्रोजेस्टेरॉनची पातळी
गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. संप्रेरकांची वाढलेली पातळी मुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे बाळाचा अकाली जन्म होण्यास प्रतिबंध होतो. तथापि, पोट आणि आतड्यांच्या शिथिलतेमुळे, पोटातील आम्ल वाढते आणि त्यामुळे पोटाचे विकार आणि आम्लता वाढते.
३. ह्युमन कोरीओनिक गोनॅडोट्रोपिन (HCG)
आधी चर्चा केल्याप्रमाणे गर्भधारणा झाल्यावर लगेच विकसित होणारे भ्रूण ह्या संप्रेरकाची निर्मिती करते. आणि नंतर त्याची निर्मिती प्लॅसेंटा करते. त्यामुळे hCG आणि मॉर्निंग सिकनेस ह्यांचा संबंध असतो.
४. वासाची संवेदना
जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा उग्र वासां प्रती तुमची संवेदना वाढल्याचा अनुभव तुम्हाला येत असेल आणि पुढे जाऊन त्यामुळे मळमळ सुरु होते.
गरोदर स्त्री जास्त लाळेची निर्मिती करते आणि काही वासांविषयी संवेदना सुद्धा वाढते आणि काही अन्नपदार्थांच्या चवीमध्ये काही बदल सुद्धा जाणवतात.
लक्षात ठेवा, उलट्या होण्यामागे फक्त गर्भधारणा हेच कारण नाही
त्यामागे खालीलप्रमाणे इतरही काही कारणे असतात
- पोटाची संवेदनशीलता वाढल्यामुळे मॉर्निंग सिकनेसचा त्रास वाढतो
- मूत्रमार्गाचा संसर्ग हे सुद्धा एक कारण असू शकते
- ताण किंवा थकवा ह्यामुळे शरीराची ती एक प्रतिक्रिया असू शकते आणि त्यामुळे मळमळ आणि उलट्या होतात.
काही गरोदर स्त्रियांना खूप मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. त्यांना खूप थकवा येतो आणि पोटात काही अन्नपाणी रहात नाही आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होतो.
खूप उलट्या झाल्यास त्यास इंग्रजीमध्ये Hyperemesis Gravidarum (HG) असे म्हणतात आणि त्यासाठी खूप काळजीची गरज असते. हा विकार कशामुळे होतो हे अजून समजलेले नाही किंवा स्त्रियांना हा जास्त प्रमाणात का होतो हे कळलेले नाही. तज्ञांच्या मते गर्भधारणेदरम्यान शरीरातील बदलणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीशी ह्याचा संबंध असला पाहिजे.
मॉर्निंग सिकनेसची लक्षणे
बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. लक्षणे आणि त्यांची तीव्रता ही स्त्रीचे आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनुवंशिकता ह्यावर अवलंबून असते. मॉर्निंग सिकनेसची सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
- मळमळ होणे
- भूक मंदावणे
- काही पदार्थांचा तिटकारा वाटणे
- निर्जलीकरण
- औदासिन्य – जेव्हा खूप उलट्या होतात, तेव्हा तुम्हाला तुमची दररोजची कामे करणे किंवा घराची काळजी घेणे अवघड होऊन बसते. मळमळ होऊन अस्वस्थ वाटण्याची भावना दिवसातून केव्हाही होऊ शकते आणि ती काही आठवडे किंवा काही महिने इतकी राहू शकते.
- अशक्तपणा वाटणे
लक्षणांची तीव्रता प्रत्येक व्यतीप्रमाणे बदलते. बऱ्याच गर्भवती स्त्रियांमध्ये १२ आठवड्यांनंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी होतो. दुर्दैवाने काही स्त्रियांना गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत त्रास होत राहतो.
साधारणपणे मॉर्निंग सिकनेसचा त्रास केव्हा सुरु होतो आणि केव्हा बंद होतो?
गर्भधारणेपासून ४ ते ८ आठवडयांनी मॉर्निंग सिकनेसचा त्रास सुरु होतो आणि १३ ते १४ आठवड्यांनंतर तो बंद होतो. तथापि, तो आधी सुरु होऊन बंद होण्यास जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो. प्रत्येक स्त्रीला पहिल्या तिमाहींभर मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत नाही. काही स्त्रियांना फक्त पहिले २ आठवडे त्रास होतो किंवा पहिले काही महिने होत राहतो.
उपचारपद्धती
मॉर्निंग सिकनेसमुळे आईच्या दैनंदिन आयुष्यावर खूप परिणाम होतो. अशावेळी कुटुंबातील सदस्यांचा आणि मैत्रिणींचा प्रेमळ आधार ह्यामुळे तब्येतीच्या ह्या तक्रारींदरम्यान मदत होऊ शकते. आहारामध्ये काही बदल आणि भरपूर विश्रांती ह्यांची मॉर्निंग सिकनेसवर मात करण्यासाठी खूप गरज असते. तुमच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार तुमचे डॉक्टर्स तुम्हाला लागणारी वैद्यकीय मदत घेण्यास सांगू शकतील.
मॉर्निंग सिकनेसवर उपाय म्हणून गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर औषधे देऊ शकतात. ह्या औषधांमध्ये व्हिटॅमिन (बी–६ आणि बी–१२) किंवा दोन्हीचे कॉम्बिनेशन अशी औषधे तुम्हाला बरे वाटण्यासाठी डॉक्टर्स देऊ शकतात. बरीच पूरक औषधे गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतात आणि बाळासाठी सुरक्षित असतात.
मॉर्निंग सिकनेसवर काही उपचारपद्धती उपलब्ध आहेत ह्या तुमच्या विशिष्ट समस्या सोडवू शकतील
१. वैद्यकीय उपचारपद्धती
- व्हिटॅमिन बी–६ सौम्य ते मध्यम प्रमाणातील मळमळ कमी करण्यास मदत करते.
- डॉक्सीलामीन च्या स्वरूपातील अँटिहिस्टॅमीन्स हे अगदी सहज उपलब्ध होते आणि गर्भारपणात मळमळ आणि उलट्यांच्या त्रासावर उपचार म्हणून वापरले जाते.
- झेनटाक किंवा पेप्सीड ही ऍसिडिटी वर काम करणारी औषधे आहेत आणि जर पोट किंवा ऍसिडिटीच्या प्रोब्लेममुळे मळमळ होत असेल तर ही औषधे उपयोगी पडतात.
२. नैसर्गीक/घरगुती उपाय
इथे काही नैसर्गिक घरगुती उपाय दिले आहेत. आपली आई किंवा आजी गर्भारपणातील मॉर्निग सिकनेस साठी
हे उपाय करत असत.
जर तुम्हाला सौम्य मळमळ किंवा उलट्यांचा त्रास झाला तर साधे उपाय करणे हे गर्भारपणातील मॉर्निंग सिकनेस साठी पुरेसे असते. ह्या सूचनांना काही सबळ पुरावा नाही परंतु स्त्रीरोगतज्ञ हे उपाय करून बघण्याचा सल्ला देतात.
- थोडे अन्न आणि नाश्ता थोड्या थोड्या वेळच्या अंतराने हळू हळू खात रहा जेणेकरून तुमचे पोट कधीही रिकामे नसेल. प्रथिने आणि कर्बोदकांनी समृद्ध आहार घेतल्याने मदत होते.
- खाल्ल्यावर लगेच झोपू नका त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
- मध्यरात्री मळमळ होऊन तुम्हाला जाग आली तर फळे, सुकामेवा किंवा बिस्किटे खाल्ल्याने तुम्हाला बरे वाटण्यास मदत होते.
- सकाळी उठताना तुम्हाला लागणारा वेळ घ्या – बिछान्यावर काही वेळ बसून रहा
- तेलकट पदार्थ खाण्याचे टाळा आणि ज्या वासाने मळमळ होते असे वास टाळा
- गार किंवा सामान्य तापमान असलेले पदार्थ खा. खूप गरम पदार्थाना उग्र वास असतो
- खूप चरबीयुक्त पदार्थ, खूप तळलेले, आम्लयुक्त किंवा जंक फूड खाणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य मंदावते
- तुमच्या दोन जेवणांच्या मधल्या काळात द्रवपदार्थ घ्या, परंतु एकाच वेळी खूप द्रवपदार्थ पिऊ नका त्यामुळे तुमचे पोट भरलेले वाटते. थोडे थोडे द्रवपदार्थ दिवसभर घेत राहिल्याने सजलीत राहण्यास मदत होते आणि पोट भरल्यासारखे सुद्धा वाटत नाही.
- कार्बोनेटेड द्रवपदार्थ अगदी थोड्या प्रमाणात घेतले पाहिजेत. काही स्त्रियांना लेमोनेड किंवा साखर, मीठ, पोटॅशिअम असलेले द्रवपदार्थ उपयोगी वाटतात त्यामुळे ऱ्हास झालेले इलेकट्रोलाईट भरून काढण्यास मदत होते अन्नपदार्थांव्यतिरिक्त मळमळ आणि उलट्या होण्यासाठी कारणीभूत असलेल्या इतर घटकांपासून सुद्धा सावध रहा. ह्यामध्ये धूळ असलेली खोली, परफ्युम, वेगाने धूळ उडवत निघालेली कार किंवा काही दृश्य स्वरूपातील घटक जसे की लख्ख प्रकाश इत्यादी गोष्टींचा सुद्धा समावेश होतो.
- ताणविरहित रहा आणि झोपा. टीव्ही पहा, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा – तुम्ही जर तणावाखाली असाल किंवा थकलेले असाल तर मळमळ खूप वाढू शकते.
- आले खाल्ल्याने मळमळ कमी होऊ शकते आणि बिघडलेले पोट नीट होण्यासाठी हा एक उपाय आहे
- पोटाचा विचित्रपणा कमी होतो
- पपेपरमिंट चहा किंवा गोळ्या जेवणानंतर घेतल्यास त्याने मळमळ कमी होण्यास मदत होते
- ज्या स्त्रियांना लिंबू, पुदिना किंवा मोसंबीचा वास आवडतो त्यांच्यासाठी अरोमाथेरपीची मदत होऊ शकते
जर ह्या घरगुती उपायांचा उपयोग झाला नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या विशिष्ट समस्येसाठी औषधे घेऊ शकता.
मॉर्निंग सिकनेसचे धोके आणि गुंतागुंत
सामान्यपणे, मॉर्निंग सिकनेस हे गर्भधारणेचे नेहमी आढळणारे लक्षण आहे आणि त्यामध्ये धोका खूप कमी असतो. जर त्याने निर्जलीकरण होणार नसेल किंवा तुम्ही आजारी पडणार नसाल तर त्यास वैद्यकीय मदतीची गरज नसते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ नुसार, फक्त १ टक्के महिलांना hyperemesis Gravidarum (HG) हा आजार होतो आणि तो गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आपोआप बरा होतो आणि त्यामुळे बाळास आणि आईला कुठलाही धोका नसतो.
मदतीची केव्हा गरज असते?
जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान आजारपण किंवा मळमळ जाणवली आणि त्याचे दुष्परिणाम जाणवले तर तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे. तुमच्या परिस्थितीविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला जर तुम्हाला खालीलपैकी कुठलीही लक्षणे आढळली तर:
- जर लक्षणे खूप तीव्र असून त्यांचा सामना करणे कठीण जात असेल तर
- जर तुम्हाला तुमचा नियमित आहार आणि पाणी घेणे अशक्य होत असेल तर
- जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर
- जर तुमची द्रवपदार्थ घेण्याची क्षमता झपाट्याने कमी होत असेल तर
- जर उलट्यांसोबत ताप, डोकेदुखी किंवा पोटदुखी होत असेल तर
जर परिस्थिती आणखी गंभीर झाली तर दवाखान्यात काळजीची गरज आहे नाहीतर शरीरातील पाणी कमी होऊन तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
आधी चर्चा केल्याप्रमाणे जर गर्भधारणेदरम्यान मॉर्निंग सिकनेसचा त्रास खूप होत असेल तर सुलभ गर्भधारणेसाठी त्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.
तीव्र मॉर्निंग सिकनेस होण्यामागे वेगवेगळे घटक कारणीभूत असतात तथापि मॉर्निंग सिकनेस नक्की कशामुळे होतो हे माहित नाही. तसेच त्यावरची उपचारपद्धती अवघड असते कारण उपचारपद्धतीचा हेतू किंवा त्याचा बाळावर होणारा परिणाम ह्याची काहीच माहिती नाही.
गर्भवती स्त्रीने खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे:
- मळमळ आणि उलट्यांची लक्षणे तीव्र असतील तर
- लघवीला कमी होत असेल तर
- लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर
- कुठलाही द्रवपदार्थ घेण्यास असमर्थ असेल तर
- उभे राहिल्यावर चक्कर येत असेल तर
- उभे राहिल्यावर बेशुद्ध पडणे
- हृदयाची ठोके वेगाने पडत असतील तर
- रक्ताची उलटी होत असेल तर
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
ज्या स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी काही सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या शंका आणि भीती असते. इथे काही नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आम्ही उत्तरे देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला परिस्थितीचा सामना करण्यास मदत होईल.
१. मॉर्निंग सिकनेसमुळे गर्भपात होण्याची शक्यता असते का?
ज्या स्त्रीचा गर्भपात होतो त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. जर तुमचे बाळ किंवा तुमची नाळ ह्यांचा विकास जर नीट झालेला नसेल तर त्याचा अर्थ तुमची गर्भधारणेच्या संप्रेरकांची पातळी कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होत नाही.
तथापि, जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत नसेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. पहिल्या तिमाही मध्ये मॉर्निंग सिकनेसचा त्रास न होणाऱ्या गर्भवती महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत नसेल तर काळजी करू नका.
२. मॉर्निंग सिकनेस मुळे माझ्या बाळाला धोका पोहचू शकतो का?
सुदैवाने, उलट्या आणि मळमळ ह्या मुळे तुमच्या बाळाला कुठलाही त्रास होत नाही. जरी तुमचे पहिल्या तिमाहीत काही वजन वाढले नाही तरी जोपर्यंत तुम्ही अन्नपदार्थ व्यवस्थित खात आहात तोपर्यंत काळजीचे काही कारण नाही. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून पूरक औषधे घ्या त्यामुळे तुमच्या पोषणाच्या गरजा भागत आहेत ह्याची खात्री करा.
तथापि, खूप जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ उलट्या झाल्यास अकाली प्रसूतीचा धोका असतो तसेच बाळाचे जन्मतः वजन कमी असू शकते. जर तुम्हाला तीव्र लक्षणे जाणवली आणि तुम्हाला त्यांचा सामना करता येत नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.
मॉर्निग सिकनेस आणि इतर आरोग्यविषयक चिंतांमुळे काहीप्रमाणात थोड्या काळासाठी अस्वस्थता जाणवू शकते. तथापि, यशस्वी गर्भधारणेसाठी सगळ्या माता प्रयत्न करत असतात. तुमच्या दैनंदिन आयुष्यावर मळमळ, उलट्या आणि थकवा ह्यांचा परिणाम होऊ देऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन आणि नऊ महिन्यानंतर तुमच्या बाळाला कुशीत घेण्याची आशा मनात धरल्यास तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा नक्कीच सामना करता येईल.
आणखी वाचा: गरोदरपणातील पोटदुखी