Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अकाली जन्मलेली बाळे गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३३ आणि ३४ व्या आठवड्यांच्या दरम्यान किंवा गरोदरपणाचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या बाळाला मुदतपूर्व बाळ म्हणतात. मुदतपूर्व किंवा अकाली जन्मलेले बाळ पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्याला वैद्यकीय काळजीची आवश्यकता असते. एनआयसीयूमध्ये अथवा घरी, दोन्हीकडे त्याच्या तब्येतीत गुंतागुंत होऊ शकते. म्हणून, बाळ सुरक्षित आणि निरोगी राहते आहे ह्याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त खबरदारी आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. या लेखात, आपण गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत होणाऱ्या प्रसूतीची कारणे आणि मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा करू.

३३ व्या आठवड्यात बाळाचा जन्म कशामुळे होतो?

खालील कारणांमुळे बाळाचा जन्म लवकर किंवा गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत होऊ शकतो.

 • गर्भाशयात अस्वस्थता आणि गर्भपिशवीचे तोंड मोठे असणे
 • नाळेशी संबंधित समस्या ज्यामुळे बाळ आईपासून लवकर वेगळे होते
 • गरोदरपणावर परिणाम करणारे अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे व्यसन
 • संसर्ग किंवा आजार ह्यामुळे लवकर प्रसूती होऊ शकते
 • ज्या महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असतील त्यांची अकाली प्रसूती होऊ शकते

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत जन्मलेल्या बाळाला सामोरे जावे लागते अशा समस्या

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात किंवा गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळाला अनेक आरोग्यविषयक समस्या असतात. काही जोखमींचा समावेश होतो:

. शरीरातील उष्णता राखण्यास असमर्थता

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाचे वजन १.५ ते ३ किलोग्रॅम दरम्यान असावे. परंतु, जर बाळाचे वजन २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी असेल, तर बाळाचे योग्य प्रमाणात वजन वाढेपर्यंत बाळाला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना व्यापक उपाय करावे लागतील. वजन वाढणे म्हणजे बाळाच्या शरीरात चरबी तयार झाल्याचे चिन्ह आहे. ही चरबी बाळाच्या शरीराचे तापमान सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक आहे. रेडिएटिंग वॉर्मर्स, इनक्यूबेटर, इलेक्ट्रिक बेड या सर्वांचा वापर बाळाला उबदार राखण्यासाठी केला जातो . एकदा बाळाचे वजन पुरेसे वाढले की ते काढले जाऊ शकतात.

. वजन वाढण्याची समस्या

बाळाचे शक्य तितक्या लवकर वजन वाढण्यासाठी, आई करू शकते ती गोष्ट म्हणजे बाळाला स्तनपान देणे. तथापि, गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेली बाळे आवश्यकतेनुसार प्रभावीपणे स्तन घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे तोंडाने दूध पिण्याची शक्यता नाकारली जाते. शिवाय, बाळाला दूध पिता येत नसल्यामुळे त्याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी अपचन होऊ शकते. त्यामुळे पुढील गुंतागुंत होऊ शकते. अशा परिस्थितीत, बाळाला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळण्यासाठी फीडिंग ट्यूब हा एकमेव मार्ग आहे. ही नळी थेट बाळाच्या पोटात जाते किंवा अगदी इंट्राव्हीनस सुद्धा असू शकते.

. विकासात्मक समस्या

बाळाच्या विकासाचा एक मोठा भाग गर्भाच्या आत घडतो ज्यामुळे त्याला प्रसूतीनंतरचे जग समजण्यास मदत होते. गरोदरपणाच्या ३५ व्या आठवड्यापर्यंत, बाळाचा मेंदू त्याच्या अंतिम वजनाच्या फक्त ६६% इतका असतो. ३३ व्या आठवड्यात अकाली प्रसूती झाल्यामुळे, मेंदू पूर्णपणे विकसित होत नाही, त्यामुळे जीवनात वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

. संसर्ग

मेंदूप्रमाणेच, रोगप्रतिकारक प्रणाली देखील विकसित होण्यास आणि चांगले कार्य करण्यास वेळ घेते. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात बाळाची प्रतिपिंडे वाढतात त्यामुळे त्याला जिवाणूंच्या संसर्गाचा सामना करता येतो. बाळाला जिवंत ठेवण्यासाठी अकाली प्रसूतीनंतर सतत प्रक्रिया केल्यास संसर्ग आणि पुढील गुंतागुंत होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

. न्यूमोनिया

अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनाच्या समस्या असू शकतात त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. न्यूमोनिया मध्ये फुप्फुसाचा संसर्ग होतो, त्यामुळे हवा आत घेऊन सोडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. जर बाळाला न्यूमोनिया झाला तर बाळाला ऑक्सिजन अपुरा पडतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शिवाय, जर या अवस्थेवर उपचार केले गेले नाहीत तर पुढील गुंतागुंत वाढू शकते.

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत जन्मलेल्या बाळाला सामोरे जावे लागते अशा समस्या

३३ व्या आठवड्यात अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

अकाली जन्मलेल्या बाळांना निरोगी बाळांच्या तुलनेत थोडी अतिरिक्त काळजी आवश्यक असल्याने, त्यांच्या काळजीसाठी काही विशिष्ट प्रोटोकॉल आहे आणि त्याची शिफारस केली जाते.

रुग्णालयात

 • जर बाळाचा जन्म वेळेपूर्वी झाला असेल, तर बाळाला कोणत्याही आधाराशिवाय जगता येईल याची खात्री होईपर्यंत डॉक्टर त्याला निरीक्षणाखाली ठेवतात. आपल्या डॉक्टरांचे ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.
 • अकाली जन्मलेले बाळ दूध पाजण्यास आणि स्तनपान घेण्यास तयार नसते, परंतु आईने आपल्या बाळाला स्तनपान देण्याचा प्रयत्न करावा. जर तुमचे बाळ अकाली जन्मलेले असेल, तर तुम्हाला शक्य होईल त्या क्षणी त्याला स्तनपान देणे आवश्यक आहे. त्यासाठी आईचे दूध नियमितपणे पंपाने काढून साठवून ठेवले पाहिजे. तसेच, स्तनपानासाठी मानसिकदृष्ट्या तयार रहा. कल्पना करा की तुमचे बाळ तुमच्या स्तनाला चिकटून तुम्ही त्याला दूध पाजत आहात. ह्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल!
 • आपल्या लहान मुलासोबत वेळ घालवणे आपल्यासाठी तितकेच आवश्यक आहे जितके त्याच्यासाठी आहे. तुमचे बाळ तुमचे बोलणे ऐकू शकते आणि सभोवतालची परिस्थिती जाणून घेऊ शकते. त्याच्याशी बोलत राहा किंवा त्याच्यासाठी गाणी म्हणा जेणेकरून तुम्ही त्याच्या आजूबाजूला आहात हे त्याला समजेल आणि त्याला सुरक्षित वाटेल. जर बाळाला स्तनपान घेता येत असेल तर तुम्ही त्याला जवळ घेऊन तुमच्या त्वचेचा स्पर्श त्याला होऊ द्या, त्यामुळे त्याचे वजन सुधारेल आणि बाळाशी तुमचा बंध निर्माण होण्यास मदत होईल. तापमान नियंत्रण आणि अकाली जन्मलेल्या बाळाची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी डॉक्टर कांगारू केअरची शिफारस करतात.

घरी

 • बाळ पूर्णपणे बरे होईपर्यंत बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवा
 • तुमच्या कुटुंबात कोणी आजारी असल्यास, बाळाला त्यांच्यापासून दूर राहण्याची खात्री करा कारण बाळाच्या अपरिपक्व रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याला संसर्ग होऊ शकतो आणि बाळ आजारी पडू शकते
 • तुमच्या बाळाला हाताळताना, तुमचे हात स्वच्छ आणि निर्जंतुक आहेत याची खात्री करा. कुटुंबातील इतर सदस्यांनीही अशीच खबरदारी घेणे आवश्यक आहे
 • स्वच्छता राखण्यासाठी बाळासाठी किंवा इतर कोणासाठीही टिशू पेपर वापरा आणि टिशू पपेरचा बॉक्स जवळ ठेवा. तुम्ही तुमच्या बाळाला दिलेली खेळणी निर्जंतुक करा
 • बाळ असलेल्या परिसरात अजिबात धूम्रपान करू नका

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बालकांचा जगण्याचा दर किती आहे?

गरोदरपणाच्या ३३व्या आठवड्यात जन्मलेल्या बालकांचा जगण्याचा दर ९८ टक्के इतका आहे. त्यामुळे गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत जर तुमच्या बाळाचा जन्म झालेला असेल तर तुम्ही आशावादी रहा. योग्य काळजी घेतल्यास, बाळाची व्यवस्थित वाढ होऊ लागते.

. ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला किती काळ एनआयसीयू मध्ये राहावे लागते?

३३ व्या आठवड्यांत जन्मलेले बाळ बरे असल्याची खात्री डॉक्टरांना होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मध्येच राहावे लागेल. बाळाचा एनआयसीयु मधील कालावधी त्याच्या आरोग्यस्थितीवर (म्हणजे, तो किती चांगला विकसित होत आहे) त्यावर ठरवला जाईल. बहुतेक बाळांचा, एनआयसीयू मधील मुक्काम कमी कालावधीसाठी असतो. श्वासोच्छवासाच्या समस्या सहसा लवकर सुटतात परंतु त्यांना आहार देण्यास थोडा वेळ लागतो. चोखणे आणि गिळण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांना थोडी ताकद लागते. जोपर्यंत बाळ चोखण्यास आणि गिळण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मध्ये ठेवावे लागेल. बाळ स्वतःचे स्वतः जगण्यासाठी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मधून डिस्चार्ज दिला जाणार नाही.

जरी बाळाचा जन्म अकाली म्हणजेच गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांपूर्वी झालेला असेल, तरीही बाळ चांगले जीवन जगण्याची शक्यता खूप जास्त असते. बाळ बरे होत असताना तुम्ही शांत राहिल्यास आणि योग्य ती खबरदारी घेल्यास पुढे जाऊन कुठलीही समस्या निर्माण होणार नाही व तुमचा आणि तुमच्या बाळाचा पुढील प्रवास सुखकर होईल.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article