Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात दही खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात दही खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात दही खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात दही हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांसारखी महत्वाची पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे नाश्त्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे कारण गरोदरपणात प्रथिनांची खूप जास्त आवश्यकता असते. पाश्चराइज्ड दुधापासून बनवल्यास आणि कालबाह्य तारखेच्या आत सेवन केल्यास दही हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. गरोदरपणात दह्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

व्हिडिओ: गरोदरपणात दही खाणे – सुरक्षित आहे का?

दह्याचे पौष्टिक मूल्य

दही हे दुधापासून बनवले जात असल्याने त्याचे पौष्टिक मूल्य दुधासारखेच असते. दह्याच्या सर्व्हिंगमधून मिळणारे पोषण खाली दिले आहे. प्रति 100 ग्रॅम दह्यामध्ये असलेल्या पौष्टिक मूल्यांची माहिती खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.

पोषक घटक प्रमाण % पोषक घटक प्रमाण %
एकूण चरबी 0.4 ग्रॅम 0 % आहारातील फायबर 0 ग्रॅम 0 %
संतृप्त चरबी 0 ग्रॅम 0 % साखर 4 ग्रॅम 16 %
ट्रान्स फॅट 0 ग्रॅम 0% प्रथिने 15 ग्रॅम 30 %
कोलेस्ट्रॉल 5 मिग्रॅ 1% व्हिटॅमिन A 0 ग्रॅम 0 %
पोटॅशियम 210 मिग्रॅ 6% व्हिटॅमिन C 0 ग्रॅम 0 %
सोडियम 55 मिग्रॅ 2% कॅल्शियम 300 मिग्रॅ 15 %
एकूण कर्बोदके 6 ग्रॅम 2% लोह 0 ग्रॅम 0 %
कॅलरीज 80 किकॅलरी 4% फॅट पासून कॅलरीज 0 0

गर्भवती स्त्रियांसाठी दही खाणे सुरक्षित आहे का?

पाश्चराइज्ड आणि कच्च्या दुधाचे दही बनवता येते. गरोदरपणात दही खाणे चांगले आहे का असा प्रश्न बऱ्याचशा स्त्रियांना पडतो. जर दही पाश्चराइज्ड दुधापासून बनवलेले असेल तर ह्याचे उत्तर हो असे आहे.

गरोदरपणात दही खाण्याचे फायदे

गरोदरपणात दही खाण्याचे नऊ फायदे येथे दिलेले आहेत.

1.पचन सुधारते

आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला आवश्यक असलेले उपयुक्त बॅक्टेरिया दह्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. अन्नाचे पचन आणि पचनमार्गाद्वारे होणारे शोषण देखील सुधारते. यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात आणि पचन चांगले होण्यासाठी मदत करतात.

2. शरीराला थंडावा देते

जेव्हा तुम्ही काही मसालेदार खात असाल तेव्हा त्यामध्ये थोडे दही घाला. दही घातल्याने मसालेदार पदार्थाचा परिणाम कमी होतो आणि ऍसिडिटी तसेच छातीत होणारी जळजळ कमी होते गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असणे सामान्य आहे, म्हणून दही खाणे चांगले असते.

3. कॅल्शियमचे भरपूर प्रमाण

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. दिवसभरात दह्याचे तीन सर्व्हिंज पुरेसे आहेत. कॅल्शियम बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि दातांच्या निर्मितीमध्ये लागणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीराच्या इतर कार्यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डी शरीरात शोषून घेण्यासाठी देखील कॅल्शियम महत्त्वाचे आहे.

4. प्रतिकारशक्ती सुधारते

दह्यामध्ये चांगले जिवाणू असल्यामुळे दही खाल्ल्याने पोट खराब होत नाही तसेच संक्रमणांशी लढा देण्यास मदत होते. दह्यामुळे प्रोबायोटिक्सची संख्या वाढते. हे प्रोबायोटिक्स आतड्यातील बॅक्टेरिया फ्लोरा पुनर्संचयित करतात. पचन सुधारते आणि रोग दूर राहतात.

ताजे दही

5. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यास मदत होते

गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होणे सामान्य आहे. उच्च रक्तदाबाचा आई आणि बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दह्याचे सेवन केल्यास शरीर शांत राहते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. दह्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते आणि ते हृदयासाठी चांगले असते.

6. तणाव आणि चिंता कमी करते

गरोदरपणात चिंता वाटणे सामान्य आहे आणि बऱ्याच गरोदर स्त्रियांना तणाव जाणवतो. दही हे एक शीत अन्न आहे आणि ते आरोग्यासाठी चांगले आहे. आईस्क्रीम आणि केक ह्यासारख्या इतर मिष्टान्नापेक्षा तो एक चांगला पर्याय आहे.

7. कोरडी त्वचा आणि पिगमेंटेशनशी लढा देते

गरोदरपणात संप्रेरकांमध्ये होणारे बदल आणि असंतुलनामुळे अनेक स्त्रियांमध्ये त्वचेचा असमान पोत आणि कोरड्या डागांची समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन ई समृद्ध असलेले दही त्वचा निरोगी ठेवते आणि त्यामुळे पिगमेंटेशन टाळले जाते.

8. शरीराचे वजन नियमित राखले जाते

वजन वाढणे हे गर्भारपणाचे निरोगी लक्षण मानले जात असले तरी, वजन जास्त असल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. दही शरीरातील कॉर्टिसॉल ह्या संप्रेरकाच्या वाढीस प्रतिबंध करते. त्यामुळे आई आणि बाळ दोघांचेही दीर्घकाळ वजन वाढू शकते.

9. स्नायूंसाठी चांगले

दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते,  हे प्रोटीन स्नायूंच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. स्नायू तंतूंच्या योग्य आकुंचनासाठी कॅल्शियम देखील आवश्यक आहे, आणि म्हणूनच, स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी दही उत्तम आहे.

गरोदरपणात प्रोबायोटिक दही

आपल्या आतड्यांमध्ये शेकडो विविध प्रकारचे प्रोबायोटिक जिवाणू असतात. हे जिवाणू आपल्या पचन संस्थेचे कार्य योग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो. दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर असल्याने ते पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

कोणत्या प्रकारचे दही खाणे चांगले आहे?

पाश्चराइज्ड दुधापासून बनवलेले दही वापरण्यास चांगले आणि सुरक्षित असते. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध असलेल्या दह्यामध्ये बरेचसे सर्व-नैसर्गिक घटक वापरलेले असतात आणि ते पाश्चराइज्ड कमी चरबीयुक्त दुधापासून बनवले जातात. हे सर्व दह्याचे प्रकार वापरण्यासाठी चांगले आहेत.

ताज्या बेरी सह दही

गर्भवती स्त्रियांनी एका दिवसात किती दही खावे?

दह्यापासून सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळविण्यासाठी, दिवसाला सुमारे 600 ग्रॅम दही खाणे पुरेसे आहे. प्रत्येकी 200 ग्रॅम ह्याप्रमाणे तीन सर्व्हिंग्ज मध्ये हे दही विभागले गेलेले असते.

गरोदरपणात टाळले पाहिजेत असे दह्याचे प्रकार

गरोदरपणात दोन प्रकारचे दही खाणे टाळावे. पहिले म्हणजे कच्च्या, पाश्चराईज न केलेल्या दुधापासून बनवलेले दही. लिस्टरिया सारख्या जिवाणूंमुळे रोगाचा धोका असल्यामुळे अश्या प्रकारचे दही टाळले पाहिजे. चरबीयुक्त दही सुद्धा टाळले पाहिजे कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

फ्लेवर्ड दही खाण्यास सुरक्षित आहे का?

सर्वसाधारणपणे फ्लेवरचे दही खाण्यामुळे काही नुकसान होत नाही. जर दह्यामध्ये कमी साखर असेल, ते कमी चरबीयुक्त असेल आणि त्यात नैसर्गिक घटक असतील तर फ्लेवर्ड दही खाण्यास काही हरकत नाही. परंतु जर तुम्हाला वजन वाढण्याची किंवा रसायनांची काळजी वाटत असेल, तर तुम्ही त्यामध्ये स्वतःच्या आवडीचे फ्लेवर्स घालू शकता. बेरी, ताजी फळे, मध किंवा नैसर्गिक गोडवा तुमच्या स्वतःच्या घरी बनवलेल्या दह्यामध्ये घालणे योग्य आहे.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • पाश्चराइज्ड दुधापासून बनवलेल्या दह्याचा समावेश तुमच्या आहारात करणे फायदेशीर आहे, कारण त्यातून भरपूर पोषक तत्वांचा पुरवठा होऊ शकतो.
  • कमी चरबीयुक्त दही चांगले असते. अनावश्यक वजन कमी करण्यासाठी, जास्त साखर असलेले दही टाळणे चांगले.
  • जर तुम्हाला फ्लेवर्ड दही टाळायचे असेल तर फळे आणि नैसर्गिक गोडवा वापरून तुम्ही स्वतःचे स्वतः दही बनवा.

दही वापरून पौष्टिक आणि चविष्ठ स्मूदी रेसिपी

दररोज लागणारी पोषक तत्वे मिळवण्यासाठी स्मूदी घेणे हा एक चांगला मार्ग आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुमच्या आवडीनुसार आणि पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे नट्स, ड्रायफ्रुट्स, फळे आणि अगदी पालेभाज्या तसेच तुम्हाला आवडतील ते पदार्थ दह्यामध्ये घालू शकता. तुमच्यासाठी येथे एक सोपी, पण चवदार स्मूदी रेसिपी दिलेली आहे.

साहित्य:

  • 1/2 कप दही
  • 1कप स्ट्रॉबेरी
  • 1/2  केळी
  • 4-5 बदाम
  • 2 टीस्पून फ्लेक्स बियाणे
  • 2टीस्पून भोपळ्याच्या बिया
  • 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • पाश्चराइज्ड दूध (आवश्यक असल्यास)

कृती:

  • फ्लेक्स बिया आणि भोपळ्याच्या बिया ब्लेंडरमध्ये घालून बारीक पावडर करा.
  • दही, व्हॅनिला अर्क आणि बदाम घाला. गुळगुळीत होईपर्यंत एकत्र करा.
  • केळी आणि स्ट्रॉबेरी घाला. जोपर्यंत तुम्हाला स्मूदीची सुसंगतता मिळत नाही तोपर्यंत मिश्रण एकत्र करा. आवश्यक असल्यास दूध घाला.
  • वर स्ट्रॉबेरीचे काही स्लाइस टाकून सर्व्ह करा.

गर्भवती स्त्रीच्या आहारात दह्याचा समावेश करणे हा अत्यंत पौष्टिक आणि सुरक्षित पर्याय आहे. म्हणून, साधे दही खा किंवा कधी कधी मधुर दही तयार करा आणि आनंद घ्या!

आणखी वाचा:

गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात लिंबू पाणी पिणे – सुरक्षितता, फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article