In this Article
- कोरिओनिक विलस सॅम्पलिंग टेस्ट म्हणजे काय?
- सीव्हीएस चाचणी सर्व गर्भवती महिलांना लागू आहे का?
- चाचणीची तयारी कशी करावी?
- सीव्हीएस चाचणी कशी केली जाते?
- सीव्हीएस चाचणी वेदनादायक आहे का?
- कोरिओनिक विलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) चाचणी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे?
- तुम्हाला सीव्हीएस चाचणीचा निकाल कधी मिळेल?
- चाचणीनंतर खालील समस्या उद्भवू शकतात
- सिव्हीएस चाचणीमुळे निर्माण होणारे धोके
- सीव्हीएस गर्भधारणा चाचणी निकालाचा अर्थ काय आहे?
- सीव्हीएस चाचणीमध्ये असामान्यता आढळल्यास काय करावे?
- सीव्हीएस चाचणीसाठी पर्याय काय आहेत?
- लक्षात घ्याव्यात अश्या गोष्टी
वैज्ञानिक विकासामुळे बाळाच्या जन्मापूर्वीच बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्यांचा शोध घेणे शक्य झाले आहे. बाळाला कोणताही आजार किंवा वैद्यकीय समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणात अनेक चाचण्या केल्या जातात. बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्येचे लवकर निदान झाल्यास डॉक्टरांना योग्य ते उपाय करता येतात आणि निरोगी बाळाचा जन्म होऊन जीवघेण्या परिस्थितीपासून बाळ मुक्त होऊ शकते.
कोरिओनिक विलस सॅम्पलिंग टेस्ट म्हणजे काय?
कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग चाचणी ही प्रसूतीपूर्व चाचणी आहे. ह्या चाचणीमध्ये बाळाला डाऊन सिंड्रोम किंवा थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया ह्यासारखे विशिष्ट अनुवांशिक विकार असतील तर त्याचे निदान करण्यासाठी ही चाचणी केली जाते. कोरिओनिक विली म्हणजे लहान, बोटाच्या आकाराची वाढ प्लेसेंटामध्ये आढळते आणि त्यामध्ये बाळाच्या पेशींप्रमाणेच अनुवांशिक सामग्री असते. सीव्हीएस चाचणी गरोदरपणात अगदी सुरुवातीला म्हणजे गरोदरपणाच्या १० व्या आणि १३ व्या आठवड्यात केली जाते.
सीव्हीएस चाचणी सर्व गर्भवती महिलांना लागू आहे का?
सीव्हीएस प्रसवपूर्व चाचणी ही एक नियमित चाचणी नाही आणि ती खालील परिस्थिती आढळ्यास केली जाऊ शकते.
- जन्मपूर्व स्क्रीनिंग चाचणीचे असामान्य परिणाम: पहिल्या तिमाहीतील स्क्रीनिंगचा परिणाम सकारात्मक किंवा असामान्य आलेला असल्यास, बाळामध्ये वैद्यकीय समस्या किती आहे याची खात्री करण्यासाठी डॉक्टर सीव्हीएस करून घेण्याची शिफारस करू शकतात.
- मागील गरोदरपणातील गुणसूत्र विकृती: जर तुम्हाला मागील गरोदरपणामध्ये गुणसूत्राची विकृती आढळली असेल किंवा तुम्हाला डाऊन सिंड्रोम असलेले मूल असेल, तर तुम्हाला ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाईल.
- कौटुंबिक वैद्यकीय इतिहास असल्यास आरोग्याची जोखीम वाढण्याची शक्यता असल्याचे निर्देशित करतो: अनुवांशिक विकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास सीव्हीएस चाचणीची शिफारस केली जाऊ शकते.
ज्या स्त्रियांना सक्रिय लैंगिक संक्रमित संसर्ग आहे, जुळी मुले आहेत किंवा गरोदरपणात योनीतून रक्तस्त्राव झाला आहे अशा स्त्रियांना सीव्हीएसची शिफारस केली जात नाही.
चाचणीची तयारी कशी करावी?
तुमचे डॉक्टर तुम्हाला चाचणीची प्रक्रिया तपशीलवार सांगतील आणि प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संमती फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास सांगितली जाईल. बाळाची आणि नाळेची स्थिती ठीक असल्याचे निश्चित करण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाऊंड वापरतील. अल्ट्रासाऊंड करताना मूत्राशय पूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे.
सीव्हीएस चाचणी कशी केली जाते?
गर्भवती महिलेच्या प्लेसेंटामधील पेशींचा नमुना घेऊन सीव्हीएस चाचणी केली जाते ह्या पेशींना ‘कोरियोनिक विली पेशी’ म्हणतात. पेशींचा नमुना पोटातून किंवा गर्भाशयाच्या मुखातून घेतला जाऊ शकतो.
1. तुमच्या ओटीपोटातून घेतलेला नमुना
एक लांब, पातळ सुई ओटीपोटातून गर्भाशयात घातली जाते आणि पेशींचा नमुना प्लेसेंटामधून सिरिंजमध्ये काढून घेतला जातो. ह्या सुईमुळे गर्भजल पिशवीला आणि बाळाला धक्का लागत नाही आणि प्रक्रिया स्थानिक भूल देऊन केली जाते.
2. गर्भाशयाच्या मुखातून घेतलेला नमुना
योनीमार्गे गर्भाशयाच्या मुखामध्ये एक पातळ, पोकळ नलिका घातली जाते. जेव्हा कॅथेटर प्लेसेंटापर्यंत पोहोचते, तेव्हा ऊतींचे नमुना काढण्यासाठी सौम्य सक्शन वापरले जाते.
3. प्रक्रियेनंतर
प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे १० मिनिटे लागतात. एकदा चाचणी पूर्ण झाल्यावर, रक्तस्राव होण्यासारखे दुष्परिणाम आढळ्यास एका तासासाठी तुमचे निरीक्षण केले जाईल. औपचारिकता पूर्ण झाल्यावर तुम्ही घरी जाऊन विश्रांती घेऊ शकता.
सीव्हीएस चाचणी वेदनादायक आहे का?
सिव्हीएस चाचणी सहसा वेदनादायक नसते परंतु ही चाचणी करताना अस्वस्थता निर्माण होते. चाचणी दरम्यान आणि नंतर तुम्हाला डंख मारल्यासारखी संवेदना होऊन पेटके येऊ शकतात. नंतर पोट दुखू शकते. सामान्यतः, जिथून सुई घातली जाते तेथे चाचणी करण्यापूर्वी स्थानिक भूल दिली जाते.
कोरिओनिक विलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) चाचणी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे?
सीव्हीएस चाचणी गरोदरपणाच्या १० व्या ते १३ व्या आठवड्यादरम्यान केली जाते. काही वेळा गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यावर ही चाचणी केली जाते. परंतु, ही चाचणी गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यापूर्वी केली जाऊ नये कारण ह्या कालावधीत सीव्हीएस मुळे जन्मदोष किंवा गर्भपात ह्यासारखी गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका जास्त असतो.
तुम्हाला सीव्हीएस चाचणीचा निकाल कधी मिळेल?
सीव्हीएस चाचणीनंतर, नाळेतून घेतलेल्या नमुन्यांवर दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. पहिला निकाल काही दिवसात उपलब्ध होतो आणि क्रोमोसोमची कोणतीही मोठी समस्या असल्यास ह्या चाचणीद्वारे हे समजते. बाळामध्ये दुर्मिळ वैद्यकीय समस्या असतील तर त्या कळण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागू शकतात. जर विशिष्ट विकार ओळखण्यासाठी चाचणी केली गेली असेल, तर एक महिना लागू शकतो.
चाचणीनंतर खालील समस्या उद्भवू शकतात
सीव्हीएस चाचणीमध्ये शरीरात प्रवेश करणार्या सुया आणि सक्शन ट्यूबचा वापर केला जातो आणि त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुष्परिणाम होऊ शकतात. चाचणीनंतर उदभवू शकणार्या काही समस्या खालीलप्रमाणे आहेत:
- सतत आणि तीव्र वेदना
- ताप
- थरथरणे किंवा थंडी वाजणे
- योनीतून जोरदार रक्तस्त्राव
- आकुंचन आणि पेटके
- योनीतून स्त्राव
- संसर्ग आणि स्पॉटिंग
सिव्हीएस चाचणीमुळे निर्माण होणारे धोके
सीव्हीएस चाचणी ही एक आक्रमक प्रक्रिया आहे. ह्या चाचणीमुळे जोखीम निर्माण होऊ शकते. सिव्हीएस प्रक्रियेसाठी सहमती देण्यापूर्वी फायद्यांच्या तुलनेत जोखीम बघणे महत्त्वाचे आहे. चाचणी करण्याचे काही सामान्य धोके खालीलप्रमाणे आहेत:
1. रक्तस्त्राव आणि पेटके:
चाचणी प्रक्रियेमुळे योनिमार्गातून रक्तस्राव किंवा स्पॉटिंग होऊ शकते. पेटके येऊ शकतात. मासिक पाळीतील पेटक्यांसारखीच ही परिस्थिती असते.
2. संसर्ग:
चाचणीनंतर तुम्हाला गर्भाशयाच्या संसर्गाचा अनुभव येऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती निर्माण होणे खूप दुर्मिळ आहे.
3. आरएच फॅक्टर:
सीव्हीएस चाचणीमुळे तुमच्या बाळाचे रक्त तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकते. त्यामुळे आरएच फॅक्टर विषयी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही आरएच नेगेटिव्ह असाल तर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
4. अपघाती गर्भपात किंवा गर्भपात:
सिव्हीएस चाचणीमुळे अपघाती गर्भपात किंवा गर्भपात होण्याचा धोका देखील होऊ शकतो. सीव्हीएस केल्यावर गर्भपात होण्याचा धोका वाढतो. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात नैसर्गिकरित्या गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. सीव्हीएस चाचणीची निवड करणाऱ्या प्रत्येक शंभर महिलांपैकी एक किंवा दोन महिलांना गर्भपाताचा अनुभव येतो.
5. गर्भाच्या अवयवांच्या समस्या:
सीव्हीएस चाचणीमुळे तुमच्या बाळाच्या हातापायांची बोटे गायब होऊ शकतात. परंतु, जर ही चाचणी गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यापूर्वी केली असेल तर हा धोका जास्त असतो.
सीव्हीएस गर्भधारणा चाचणी निकालाचा अर्थ काय आहे?
सीव्हीएस चाचणीचा निकाल ९९ टक्के अचूक असण्याचा अंदाज असतो. ह्या चाचणीमध्ये अगदी कमी त्रुटी असतात. सीव्हीएस चाचणीचा वापर विशिष्ट अनुवांशिक विकारांची चाचणी घेण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्या चाचणीद्वारे प्रत्येक जन्मदोष समजत नाहीत. सीव्हीएस चाचणीचा निकाल एकतर सामान्य (म्हणजे नकारात्मक) किंवा असामान्य (म्हणजे सकारात्मक) असतो.
1. सामान्य परिणाम:
जेव्हा चाचणीच्या परिणामांमध्ये कोणतेही दोष किंवा कमतरता दिसून येत नाही, तेव्हा अहवाल सामान्य किंवा नकारात्मक असतो. अहवालात कोणतेही दोष नसले तरीसुद्धा ज्या समस्येसाठी चाचणी करण्यात आली होती ती समस्या किंवा आनुवंशिक स्थितीसह बाळ जन्माला येण्याची शक्यता असते.
2. असामान्य परिणाम:
अहवालात ‘सकारात्मक’ परिणाम दिसून आल्यास, ज्या समस्येवसाठी बाळाची चाचणी करण्यात आली होती ती समस्या बाळाला असण्याची शक्यता असते. आनुवंशिक समस्येवर कुठलाही इलाज नसतो म्हणून अशा विकारांच्या परिणामांवर तुमच्यासोबत पूर्णपणे चर्चा केली जाईल.
सीव्हीएस चाचणीमध्ये असामान्यता आढळल्यास काय करावे?
असामान्य परिणामांची तुमच्यासोबत चर्चा केली जाईल आणि संभाव्य उपचारात्मक पर्याय सामायिक केले जातील. बहुतेक अनुवांशिक समस्यांवर उपचार करता येत नसल्यामुळे, तुमच्याकडे खालील पर्याय असू शकतात.
- आनुवंशिक समस्यांसह बाळ स्वीकारून बाळाच्या जन्मानंतर त्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी तयार रहा.
- तुमचे गर्भारपण संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन त्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल.
सीव्हीएस चाचणीसाठी पर्याय काय आहेत?
ऍम्नीऑसेन्टोसिस हा सीव्हीएस चाचणीचा पर्याय आहे. ह्यामध्ये चाचणीसाठी आईच्या अम्नीओटिक द्रवपदार्थाचा नमुना घेतला जातो. गरोदरपणाच्या १५ व्या ते २९ व्या आठवड्यांच्या दरम्यान ऍम्नीओसेन्टेसिस केले जाते. सीव्हीएस चाचणीचा फायदा असा आहे की ही चाचणी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर केली जाते. तर अम्नीओसेन्टेसिस गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यावर केले जाते.
लक्षात घ्याव्यात अश्या गोष्टी
चाचणी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, चाचणीशी संबंधित जोखीम आणि अपेक्षित परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे. ज्या स्त्रीची चाचणी करायची आहे अश्या स्त्रीने किंवा त्या जोडप्याने आपल्या डॉक्टरांशी पूर्णपणे चर्चा केली पाहिजे आणि संभाव्य धोके स्पष्टपणे समजून घेतले पाहिजेत.
सीव्हीएस चाचणीचे काही फायदे तसेच तोटे सुद्धा आहेत. परंतु, तुमच्या बाळाला कोणत्याही विकारांचा धोका असल्यास तुमचे डॉक्टर सीव्हीएस चाचणी करून घेण्यास सांगतील. गर्भारपण यशस्वी होण्यासाठी सीव्हीएस चाचणी आवश्यक आहे की नाही याबद्दल योग्य विचार करून निर्णय घेतल्याने तुम्हाला आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास मदत होईल.
आणखी वाचा:
गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी
गरोदरपणातील ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (जीसीटी) आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (जीटीटी)