In this Article
- तुम्हाला गरोदरपणाच्या १२व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का असते?
- तुमच्या गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्याच्या स्कॅनची तयारी कशी करावी?
- ह्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला किती वेळ लागतो?
- १२ व्या आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?
- स्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते?
- १२ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये डाउन सिंड्रोम अचूकपणे शोधता येतो का?
- स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?
- हा स्कॅन गरोदरपणातील चाचण्यांचा भाग आहे का?
- लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा प्रत्येक क्षण आनंदी आणि रोमांचक असतो. तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड हे पहिल्या तिमाहीचे शेवटचे अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे आणि तुमच्या बाळाच्या प्रगतीबद्दल जाणून घेऊन तुम्हाला खूप आनंद होईल. हे अल्ट्रासाऊंड स्कॅन बाळाच्या आरोग्याविषयी तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल.
तुम्हाला गरोदरपणाच्या १२व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का असते?
गरोदरपणाचे १२ आठवडे पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण तेव्हा तुमची पहिली तिमाही पूर्ण होते तेव्हा गरोदरपणात तुमची कशी प्रगती होत आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचा सल्ला देऊ शकतात. खालील गोष्टी तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅनचा उपयोग होईल.
- मानेच्या मागील बाजूस असलेल्या गर्भाच्या त्वचेखालील द्रवपदार्थ असलेली न्यूकल पारदर्शकता मोजण्यासाठी
- न्यूकल पारदर्शकतेचे मूल्यांकन गुणसूत्र विकृतीचा कोणताही धोका स्थापित करण्यात मदत करते.
- हा स्कॅन डॉक्टरांना प्लॅसेंटाची स्थिती आणि आरोग्य तपासण्यासाठी मदत करेल
- मागील स्कॅनप्रमाणे, ह्या स्कॅनमध्ये तुम्हाला किती बाळे होणार आहे ते समजते. तुम्हाला एक किंवा एकाधिक बाळे होणार आहेत का हे ह्या स्कॅन द्वारे समजते
- बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंतची उंची मोजून बाळाच्या गर्भावस्थेतील वयाचा अंदाज लावता येऊ शकतो
- गर्भाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी
- बाळाचे हात, पाय, छाती आणि डोके इत्यादींची वाढ सामान्य गतीने होत आहे का याचे मूल्यांकन करण्यासाठी
- डॉक्टर गर्भाच्या मणक्याची तपासणी करतील तसेच कुठली विकृती तर नाही ना हे सुद्धा पाहतील.
तुमच्या गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्याच्या स्कॅनची तयारी कशी करावी?
स्कॅन दरम्यान काय होईल याबद्दल तुम्ही अस्वस्थ आणि आश्चर्यचकित असाल. तुम्ही करू शकता ती पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला स्कॅनसाठी मानसिकदृष्ट्या तयार करणे. थंड आणि पातळ जेलमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते, परंतु शांत आणि आरामात राहण्याचा प्रयत्न करा.
ह्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला किती वेळ लागतो?
मंद दिवे असलेल्या शांत खोलीत तुम्हाला झोपायला लावले जाईल. गरोदरपणाच्या १२ आठवड्यांच्या संपूर्ण स्कॅनिंग प्रक्रियेस अंदाजे १५ ते ३० मिनिटे लागू शकतात.
१२ व्या आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?
डॉक्टर तुमच्या पोटाकडील भागावर जेल लावतील आणि ट्रान्सड्यूसर उपकरण तुमच्या पोटावर फिरवतील . स्क्रीनवर एखादी ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमा दिसेल आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना ते समजावून सांगण्यास सांगू शकता. तुमच्या ओटीपोटावर दाब जाणवणे सामान्य आहे, परंतु ते वेदनादायक नाही.
तुमचे वजन जास्त असल्यास किंवा तुमचा गर्भ तुमच्या ओटीपोटात खूप खोल असेल तर तुमचे डॉक्टर व्हजायनल स्कॅनची शिफारस करू शकतात.
स्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते?
१२ आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड स्कॅन करून तुमच्या बाळाबद्दल खालील गोष्टी लक्षात येऊ शकतात:
- आईच्या प्लेसेंटाची स्थिती
- बाळाचे हातपाय आणि पाठीचा कणा
- गर्भाच्या अनुनासिक हाडांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती आणि त्याची लांबी
- गर्भाचे मूत्राशय आणि पोट
- आईच्या गर्भाशयाच्या क्षेत्राभोवतीचे रक्ताभिसरण
१२ आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, तुम्हाला जुळे होणार असल्यास ते डॉक्टरांना समजू शकेल. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळे होणार असतील तर अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे तुमच्या डॉक्टरांना ते निर्धारित करण्यात मदत होईल.
१२ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये डाउन सिंड्रोम अचूकपणे शोधता येतो का?
होय, जर तुमच्या बाळाला डाऊन सिंड्रोमचा त्रास होत असेल तर तो १२ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये शोधला जाऊ शकतो. जर बाळाला डाऊन सिंड्रोम असेल, तर बाळाच्या मानेच्या खाली असलेल्या न्यूकल फोल्डमध्ये द्रव जास्त प्रमाणात जमा होईल. तुमच्या डॉक्टरांना याची शंका असल्यास, न्यूकल पारदर्शकता चाचणी केली जाऊ शकते. डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळांचे माप निरोगी गर्भाच्या तुलनेत जास्त असते.
स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?
गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील स्कॅन म्हणजे गर्भाची वाढ आणि विकास जाणून घेण्यासाठी तो पहिला स्कॅन असू शकतो. परंतु ह्या स्कॅनमध्ये तुमच्या डॉक्टरांना गर्भाच्या कोणत्याही विकृतीचे मूल्यांकन करण्यास मदत होते. जर तुमच्या बाळामध्ये काही दोष किंवा असामान्यता आढळली तर तुम्हाला तज्ञांकडे पाठवले जाऊ शकते. सल्लागार तुमच्या डॉक्टरांनी केलेल्या निदानाचे मूल्यांकन करतो आणि असामान्यतेची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला पुढील चाचण्या किंवा स्कॅन करण्यास सांगू शकतो.
हा स्कॅन गरोदरपणातील चाचण्यांचा भाग आहे का?
अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या बाळाची वाढ आणि विकास ह्यांचे मूल्यांकन करण्याचा उत्तम मार्ग आहे. हे स्कॅन परवडणारे, कमी जोखमीचे आहेत. ते आवश्यक आहेत कारण ते तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना तुमच्या बाळाबद्दल बरीच माहिती देतात आणि तुम्ही १२–आठवड्यांच्या स्कॅनच्या प्रतिमा देखील मिळवू शकता. तथापि, १२ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी जायचे आहे की नाही हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे. बहुतेक रुग्णालये तुम्हाला तुमच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनच्या प्रतिमा देतील आणि त्यापैकी काही तुम्हाला स्कॅनचा व्हिडिओ देखील देऊ शकतात. ही सेवा उपलब्ध आहे की नाही हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे तपासू शकता.
काही पालकांचे असे मत आहे की अल्ट्रासाऊंड स्कॅन करू नये. याचे मुख्य कारण असे आहे की गर्भामध्ये काही दोष किंवा असामान्यता आढळून आल्यास त्यांना गर्भावस्था सुरु ठेवायची कि गर्भपात करायचा हा निर्णय घेण्याच्या कठीण परिस्थितीत टाकले जाईल.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी जात असताना, सैल कपडे घालण्याचे लक्षात ठेवा जेणेकरून डॉक्टरांना अल्ट्रासाऊंड करणे सोपे जाईल
- तुम्हाला तुमच्या डॉक्टरांसाठी काही प्रश्न असल्यास, ते लिहून घेणे उपयुक्त ठरेल
- तुम्हाला स्कॅनचे प्रिंट हवी असल्यास, ही सेवा प्रदान केली आहे की नाही हे विचारण्यासाठी तुम्ही रुग्णालयाशी संपर्क साधू शकता
- प्रसूतीपूर्व वर्गांच्या बाबतीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या प्रकारची मदत उपलब्ध आहे. हे तुमच्या डॉक्टरांना विचारा. ह्यामुळे तुमच्या बाळाच्या जन्माची तयारी करण्यास आणि तुमचे मन शांत राहण्यास मदत होऊ शकते.
मागील आठवडा: गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन