Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

प्रौढांपेक्षा मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो कारण त्यांच्या लहान शरीरात पाण्याचा साठा कमी असतो. सामान्यत: देखील मुले प्रौढांपेक्षा अधिक क्रियाशील असतात आणि उन्हात खेळण्यात बराच वेळ घालवतात. मुले उलट्या आणि अतिसार सारख्या डिहायड्रेशन होण्यास कारणीभूत असणाया आजारांबद्दलही जास्त संवेदनाक्षम असतात.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणजे काय?

शरीराच्या पाणी टिकवून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा ऱ्हास जेव्हा जास्त होतो तेव्हा निर्जलीकरण होते. शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ नसतात. डिहायड्रेशनची कारणे अनेक आणि विविध असू शकतात आणि आपण त्यावरनजर ठेवणे आवश्यक आहे.

मुलांमधील डिहायड्रेशन विषयक तथ्ये

मुलांमध्ये निर्जलीकरण बर्‍याच कारणांमुळे होते. काही सर्वात सामान्य कारणांमध्ये उलट्या, अतिसार आणि पुरेसे पाणी न पिणे इत्यादी कारणे समाविष्ट आहेत. केवळ क्वचित प्रसंगी जास्त घाम येणे किंवा लघवी केल्याने निर्जलीकरण होते. लहान मुलांमध्ये पाण्याचा ऱ्हास मोठ्या मुलांपेक्षा लवकर होतो.

कारणे

मुलांमध्ये निर्जलीकरणाची काही कारणे खाली दिली आहेत

  • ताप
  • उलट्या होणे
  • अतिसार
  • विषाणूंचा संसर्ग ज्यामुळे खाण्यापिण्याची क्षमता कमी होते
  • तोंडातले फोड जे खाण्यापिण्याला त्रास देतात
  • गरम वातावरणामुळे वाढलेले घामाचे प्रमाण
  • जास्त लघवी होणे
  • मधुमेह
  • सिस्टिक फायब्रोसिससारख्या परिस्थिती ज्यामुळे शरीरात अन्न किंवा पाणी शोषले जात नाही

चिन्हे आणि लक्षणे

अशी अनेक लक्षणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही मुलांमध्ये डिहायड्रेशन शोधू शकता. येथे काही सामान्य लक्षणे आहेतः

  • सहा तासांपेक्षा जास्त काळ लघवी करत नाही
  • गडद रंगाची लघवी
  • तोंड कोरडे पडून ओठांना भेगा पडतात
  • सुस्तपणा
  • रडताना अश्रू येत नाहीत
  • थंड किंवा कोरडी त्वचा
  • हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे तसेच श्वसनाचा वेग वाढणे
  • डोळे खोल जाणे

निर्जलीकरणाचे निदान

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या डॉक्टरांना भेट द्याल, तेव्हा डॉक्टर त्याचा आरोग्यविषयक सर्व इतिहास घेतील आणि तुमच्या मुलाचे आरोग्य निश्चित करण्यासाठी कसून शारिरीक तपासणी करतील. डॉक्टर काही चाचण्या करण्यास सुद्धा सांगू शकतात. त्यामध्ये खालील काहींचा समावेश आहे:

  • संसर्ग आहे का हे निश्चित करण्यासाठी रक्ताची संपूर्ण तपासणी आणि संसर्गाचे कारण निश्चित करण्यासाठी विशिष्ट कल्चर्स केली जातील
  • मूत्राशयातील संसर्ग आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी किंवा अधिक गंभीर स्थिती ओळखण्यासाठी लघवीची तपासणी करण्यास सांगतील

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) कसे मोजावे?

क्लिनिकल डिहायड्रेशन स्केलचा उपयोग आपल्या मुलास सतत होणार्‍या डिहायड्रेशनची तीव्रता निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे एक स्केल आहे जे आपण वापरू शकता. स्केलच्या सहाय्याने तुमच्या मुलाच्या डिहायड्रेशनची पातळी वाढत आहे की कमी होत आहे हे तुम्हाला कळू शकते. उपचार करताना डॉक्टरांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकतो.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) स्थितीची गणना

तुमच्या मुलाच्या डिहायड्रेशन स्थितीची गणना करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता

  • तुमच्या मुलाच्या लक्षणांची नोंद घ्या
  • चार्टवरील लक्षणांच्या मूल्यानुसार स्केलवर गुण जोडा
  • गुण जोडा आणि गुण मिळवा

क्लिनिकल डिहायड्रेशन स्केल

सामान्य स्वरूप सामान्य तहानलेला, अस्वस्थ, सुस्त, स्पर्श केल्यास चीडचीड करते कंटाळवाणा, ,थंड, घाम फुटलेला
डोळे सामान्य डोळे खोल जाणे डोळे खूप खोल जाणे
श्लेष्मल त्वचा ओलसर चिकट कोरडी
अश्रू येतात कमी येतात अजिबात येत नाहीत

* श्लेष्मल त्वचेमध्ये तोंड आणि डोळ्यांच्या ओलसर अस्तराचा समावेश आहे

० स्कोर = निर्जलीकरण नाही

१ ते ४ स्कोअर = काही प्रमाणात निर्जलीकरण

५ ते ८ = मध्यम ते तीव्र निर्जलीकरण

मुलामध्ये निर्जलीकरणासाठी उपचार

निर्जलीकरणावरील उपचार त्याच्या तीव्रतेवर आधारित आहे जो क्लिनिकल डिहायड्रेशन स्केल वापरुन निर्धारित केला जातो

  • मध्यम ते गंभीर डिहायड्रेशन (५ ते ८ स्कोअर): जर तुमच्या मुलाने या पातळीवर स्कोअर केले तर तुम्ही त्वरित त्याच्यासाठी वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. तुम्ही नोंद घेतलेली सर्व चिन्हे आणि लक्षणे तुमच्या डॉक्टरांना सांगितल्याचे सुनिश्चित करा.
  • सौम्य डिहायड्रेशन (१ ते ४ स्कोअर): मुलाला ओरल रिहायड्रेशन द्रावण देण्यास त्वरित प्रारंभ करा. जरी बाजारात बरीच रेडिमेड ओआरएस सोल्यूशन उपलब्ध असली, तरी तुम्ही घरीच नवीन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्स बनविणे चांगले. एका लिटर स्वच्छ, ताज्या पाण्यात, ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळा. तुमच्या मुलाला दर पाच मिनिटांत एक किंवा दोन चमचे द्या. जर तुमच्या मुलाने ओआरएसला नकार दिला आणि त्याला अतिसाराचा त्रास होत नसेल तर ताज्या फळांच्या रसातून किंवा दुधापासूनही पुरेसे द्रवपदार्थ मिळत असल्याची खात्री करा.
  • निर्जलीकरण नाही (० स्कोअर): जरी तुमच्या मुलाला डिहायड्रेशनची कोणतीही चिन्हे दिसत नसली तरीही उलट्या किंवा अतिसाराच्या प्रत्येक घटनेनंतर त्याला द्रवपदार्थ देणे सुरू ठेवा. या काळात तुमचे मूल पुरेसे खात असल्याची खात्री करा.

निर्जलीकरणासाठी वापरली जाणारी औषधे

निर्जलीकरणाच्या तीव्रतेनुसार डॉक्टर उपचारपद्धती ठरवतील.

  • डिहायड्रेशन सौम्य असल्यास, शरीराचे एकूण वजन सुमारे ३ ते ५% कमी होते, तर बहुधा वरती चर्चा केलेली ओरल रिहायड्रेशन पद्धत डॉक्टर लिहून देतील. ते तुम्ही घरच्या घरी बाळाला देऊ शकता.
  • मध्यम डिहायड्रेशनच्या बाबतीत, शरीराचे वजन सुमारे ५ ते १० % कमी असल्यास, तुमच्या मुलाचे डॉक्टर आय. व्ही. द्वारे द्रवपदार्थ देतील. ह्यामुळे द्रवपदार्थांचा झालेला ऱ्हास लगेच भरून निघेल. आय. व्ही. नंतर जर द्रव पातळी चांगली राहिली तर तुमचे डॉक्टर तोंडी रीहायड्रेशन सुरू ठेवण्यास सांगून तुमच्या मुलाला घरी पाठवतील.
  • तीव्र डिहायड्रेशन किंवा १० ते १५ % शरीराचे वजन कमी झाल्यास तुमच्या मुलास आय. व्ही. द्वारे द्रवपदार्थ देण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. संसर्गाचे कारण निश्चित करण्यासाठी पुढील चाचण्या आवश्यक असतील. जिवाणूंच्या संसर्गासाठी, प्रतिजैविकांची एक फेरी दिली जाईल. विषाणूजन्य संक्रमणासाठी कोणतीही औषधे दिली जाणार नाहीत. उलट्या थांबविण्यासाठी विशिष्ट औषधे मुलांमध्ये टाळली जातील कारण त्यामुळे आजारपण दीर्घकाळ वाढत आहे.

सजलीकरणानंतर (रीहायड्रेशन) उपचार

एकदा आपल्या मुलाचे रिहायड्रेशन झाल्यावर पुढची पायरी म्हणजे त्याला नेहमी खातो ते अन्न खाण्यास मदत करणे. उलट्या किंवा अतिसाराच्या शेवटच्या घटनेनंतर सुमारे ४ ते ६ तासांनंतर तुम्ही तुमच्या मुलास त्याच्या आवडीचे अन्न देऊ शकता. केळी, तांदूळ, टोस्ट आणि सफरचंद सॉस खाल्लेले चांगले. साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असलेले अति प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे चांगले. मसालेदार असलेले अति चरबीयुक्त पदार्थ देखील टाळले जाऊ शकतात.

जर उलट्यांचा आणि अतिसाराचा त्रास सुरूच राहिला तर तुमच्या मुलास ओरल रेहायड्रेशन सोल्युशन द्या.

घरगुती उपचार

डिहायड्रेशनचे काही नैसर्गिक उपाय आहेत जे तुम्ही तुमच्या मुलाच्या निर्जलीकरणाच्या व्यवस्थापनासाठी वापरू शकता.

  • मुलांमध्ये डिहायड्रेशन व्यवस्थापित करण्याची मुख्य पद्धत तोंडी रीहायड्रेशन करणे ही आहे. तुम्ही हे ओरल रीहायड्रेशन सोल्युशन घरी ताजे केले पाहिजे आणि डिहायड्रेशन तीव्र असल्यास दर काही मिनिटांनी ते द्यावे.
  • स्तनपान देणार्‍या अर्भकांसाठी, फिडींगचे प्रमाण कमी केले पाहिजे. जर तुमच्या बाळाला दोनदा उलट्या झाल्या असतील तर बाळाला प्रत्येक एक ते दोन तासांनी पाजावे. जर बाळाला दोनपेक्षा जास्त वेळा उलट्या झाल्या असतील तर दर ३० ते ६० मिनिटांत ५ मिनिटे बाळाला पाजा. जर उलट्या चालू राहिल्या तर ४ तासांपर्यंत ओरल रेहायड्रेशन सोल्युशन देत रहा.
  • एका वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना सोडा, गॅटोरेड , सूप्स, पॉपसिकल्स आणि ओरल रीहायड्रेशन सोल्युशन दिले जाऊ शकतात. केवळ उलट्या झाल्यास आपल्या मुलास पाणी आणि बर्फाचे क्युब्स देखील देऊ शकता.
  • २४ तास मुलाला फक्त कर्बोदके असलेले सपक पदार्थ द्या
  • तुमच्या मुलाला ब्रेड, सॉल्टिन क्रॅकर्स, तांदूळ आणि तृणधान्ये खायला द्या
  • तुमच्या मुलाला कोवळ्या नारळाचे पाणी द्या कारण ते द्रवपदार्थाचे उत्कृष्ट स्रोत आहे.
  • दही
  • केळी
  • टरबुजासारखी पाणीदार फळे
  • ताक

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) कसे रोखायचे

मुलांमधील डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे

  • निर्जलीकरण होण्यापासून तुमच्या मुलाचे संरक्षण करणे अशक्य आहे, परंतु तुम्ही डिहायड्रेशनच्या काही लक्षणांबाबत जागरूक राहू शकता.
  • विशेषत: उष्ण दिवसात, तुमच्या मुलास पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ मिळत असल्याचे सुनिश्चित करा.
  • तुमच्या मुलास कार्बोनेटेड पेय देऊ नका. त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.
  • मुलाला पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ मिळण्यासाठी ज्यूस पातळ करा
  • ज्या वातावरणात तुमचे मूल खेळते त्या वातावरणात आर्द्रता असेल तर ते प्रतिबंधित करणे चांगले. जास्त सापेक्ष आर्द्रतेमुळे त्यास जास्त घाम येईल.
  • खेळताना तुमच्या मुलाने योग्य कपडे घातले आहेत ह्याची खात्री करा. जास्त उष्णता साचून राहू नये म्हणून योग्य वायुविजन होऊ शकेल असे हलक्या रंगाचे कपडे वापरणे चांगले.

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी

खालील परिस्थितीमध्ये ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

  • तुमच्या मुलाची डिहायड्रेशनची लक्षणे वेळेत सुधारताना दिसत नसतील किंवा आणखी खराब होत असतील तर
  • शौचामधून रक्त पडत असेल किंवा हिरव्या रंगाची उलटी होत असेल तर
  • द्रवपदार्थांचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी तुमचे मूल पुरेसे द्रवपदार्थ घेत नसेल तर
  • सतत उलट्या होणे किंवा अतिसार यामुळे आपल्या मुलाच्या द्रवपदार्थाचे सेवन करण्याच्या क्षमतेस अडथळा निर्माण होत असेल तर
  • अतिसार दहा दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

जेव्हा मुलांमध्ये डिहायड्रेशनचा प्रश्न येतो तेव्हा आपण हे मुद्दे लक्षात ठेवा

  • शिशु आणि लहान मुलांना निर्जलीकरण होण्याची अधिक शक्यता असते
  • लवकर निदान होणे आणि वेळीच उपचार हा त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे
  • मुलांना होणारे सौम्य डिहायड्रेशन घरी व्यवस्थापित केले जाऊ शकते
  • तीव्र डिहायड्रेशन असलेल्या मुलांकडे त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे

मुलांमध्ये वारंवार होणारे निर्जलीकरण धोकादायक असू शकते. सर्व लक्षणांचा मागोवा ठेवणे आणि लवकरात लवकर द्रवपदार्थाचे प्रमाण नियंत्रित करणे चांगले. मुलांमध्ये निर्जलीकरण झाल्याने सावधगिरी बाळगणे आणि तुमच्या मुलासाठी वैद्यकीय मदत घेणे सर्वात चांगले.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article