भारतामध्ये सणांचे खूप महत्व आहे. सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि आनंद घेतात. तुम्ही भारताच्या कुठल्याही भागात असलात तरीसुद्धा भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांची यादी बघून थक्क व्हाल. ह्या सणांच्या यादीमध्ये गुढीपाडव्याचा विशेष उल्लेख केलेला तुम्हाला आढळेल.
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च–एप्रिल दरम्यान साजरा केला जाणारा गुढी पाडवा हा सण हिंदू कॅलेंडर महिन्यातील चैत्राचा पहिला दिवस मानला जातो. परंतु, ह्या सणाबद्दलची ही एक मूलभूत माहिती आहे. ह्या सणाबद्दल आणखी कितीतरी छान माहिती आहे. गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो ह्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे!
गुढीपाडव्याचा इतिहास
इतर सर्व सणांप्रमाणेच गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अनेक पौराणिक घटना आहेत. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने महापूर किंवा प्रलयानंतर जगाची पुनर्रचना केली तो हा दिवस आहे. म्हणून हा दिवस दिनदर्शिकेच्या आणि सत्–युगाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्रज्ञांना विचारून मुहूर्त बघण्याची देखील गरज नाही. हा असा एक दुर्मिळ दिवस आहे जेव्हा ह्या दिवसाचा प्रत्येक क्षण हा एक भाग्यकारक “मुहूर्त” असतो. गुढीपाडव्यातील काही उल्लेखनीय घटनांचा येथे विशेष उल्लेख करावा लागेल.
- मत्स्यावतार हा भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आहे. हा अवतार ह्या दिवशी प्रकट झाला. प्रलयापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी श्रीविष्णूंनी मत्स्यावतार घेतला. ही पौराणिक आख्यायिका काही प्रमाणात नोहाच्या जहाजाशी मिळतीजुळती आहे.
- ह्या दिवशी मर्कट साम्राज्याचा क्रूर राजा, वाली याची सुद्धा हत्या झाली होती. रामायणात, श्रीरामांनी दयाळू सुग्रीवला त्याचा निर्दयी भाऊ वालीपासून वाचवले आणि वाईटाचा अंत केला.
- मार्च–एप्रिल हा कालावधी रब्बी पिकाच्या हंगामाचा समारोप असतो आणि साहजिकच नवीन पिकाचा हंगाम सुरू होतो आणि तो म्हणजे आंब्याचा हंगाम. गुढीपाडवा हा सुगीचा सण म्हणूनही फार पूर्वीपासून साजरा केला जातो.
गुढी पाडवा – विधी
गुढीपाडव्याचा अगदी अलीकडच्या काळातील इतिहास म्हणजे शिवाजी राजांची विजयी घौडदौड होय. राजांच्या विजयाला सन्मानित करण्यासाठी गुढी (एका काठीच्या वरच्या टोकाला जरीची साडी, एक भांडे, हार, कडुलिंबाची पाने बांधलेले असते) उभारतात. गुढी उभारण्याची परंपरा आजही कायम आहे. पाडवा म्हणजे प्रतिपदा किंवा हिंदू कॅलेंडर महिन्याचा पहिला दिवस होय.
गुढीपाडवा का साजरा केला जातो?
गुढीपाडव्याबद्दल माहिती गोळा करताना, आपण इतर काही समर्पक पैलूंबद्दल देखील बोलले पाहिजे. विषुववृत्ताला रेखावृत्ताने छेदणे ही चैत्राच्या सुरुवातीला एक प्रमुख वैज्ञानिक घटना आहे. ही घटना जेव्हा घडते तेव्हा,तो काळ वसंत ऋतू म्हणून ओळखला जातो. जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो, तेव्हा निसर्गाचे रूप खूप आकर्षक असते. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते आणि चैतन्य निर्माण होते. हा नैसर्गिकरित्या आनंदाचा काळ सणासाठी योग्य आहे. गुढीपाडवा हा सण ह्या आनंददायी ऋतूतील बदलाचे प्रतिनिधित्व करतो.
गुढीपाडव्याला पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि धार्मिक असे अनेक अर्थ आहेत आणि त्यामुळेच होळी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख भारतीय सणांमध्ये गुढीपाडवा ह्या सणाची गणना होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या भारतातील काही राज्यांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी असते. ह्या सणाचे महत्व खूप असल्याने देशभर हा सण साजरा केला जातो.
आणखी वाचा:
गुढीपाडव्यासाठी चविष्ट आणि विशेष पाककृती
तुमच्या प्रियजनांसाठी गुढीपाडव्याच्या सर्वोत्तम शुभेच्छा, मेसेजेस आणि कोट्स