In this Article
- रक्ताची गरोदर चाचणी म्हणजे काय?
- गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्ही रक्ताच्या चाचणीची निवड का केली पाहिजे?
- गर्भधारणा निश्चित करण्यासाठी रक्त तपासणीचे प्रकार
- चाचणी कशी केली जाते?
- चाचणीच्या परिणामांचा अर्थ कसा लावला जातो?
- गर्भधारणेच्या रक्त चाचणीचे परिणाम किती अचूक असतात?
- परिणामांच्या अचूकतेवर परिणाम करणारी औषधे
- रक्ताची गर्भधारणा चाचणी गर्भधारणा झाली आहे हे किती लवकर ओळखू शकते?
- रक्ताची गर्भधारणा चाचणी करण्याचे धोके
- रक्त गर्भधारणा चाचणी चुकीची असू शकते?
- तुम्ही ही चाचणी घरीच करू शकता का?
जर तुम्ही आणि तुमचे पती कुटुंबाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही गरोदर असल्याची तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही आधीच घरगुती गर्भधारणा चाचणी केलेली असण्याची शक्यता आहे. चाचणी जर पॉसिटीव्ह आलेली असेल तर तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. पण तुमचा गर्भारपणाचा हा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला आता डॉक्टरांना भेटावे लागेल. डॉक्टर त्यासाठी रक्त तपासणी सुचवतील. गर्भधारणेची पुष्टी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्ताची तपासणी करून घेणे होय . पालकत्वाचा निरोगी आणि आनंदी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात रक्त तपासणी देखील केली जाते.
रक्ताची गरोदर चाचणी म्हणजे काय?
स्त्रीला गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी रक्ताची गर्भधारणा चाचणी केली जाते. पालकत्वाच्या प्रवासातील ही पहिली पायरी आहे.
रक्ताच्या गर्भधारणा चाचणीमध्ये अनेक घटकांचा विचार केला जातो:
- लघवीची चाचणी घरी केली जाऊ शकते तर रक्ताची गर्भधारण चाचणी क्लिनिक किंवा निदान केंद्रातील तज्ञांकडून करून घेणे आवश्यक आहे.
- एखादी महिला गर्भवती आहे की नाही हे निश्चितपणे जाणून घेण्यासाठी रक्ताची गर्भधारणा चाचणी केली जाते.
- रक्ताची गर्भधारणा चाचणी शरीरातील एचसीजी किंवा गर्भधारणा संप्रेरक पातळी तपासण्यासाठी वापरली जाते. तुम्ही गर्भवती असल्यावरच हे संप्रेरक वाढते.
- ही चाचणी करून घेण्यासाठी, स्त्रीच्या शरीरातून रक्ताचा नमुना काढला जातो आणि नंतर त्याची एचसीजी चाचणी केली जाते.
- मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) हे संप्रेरक गर्भधारणेनंतर सुमारे ८–१० दिवसांनी वाढलेले आढळून येते.
गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्ही रक्ताच्या चाचणीची निवड का केली पाहिजे?
घरगुती गर्भधारणा चाचणी घेणे सोपे असते आणि त्यामध्ये लघवीची तपासणी केली जाते, परंतु गर्भधारणेपासून पुढील मासिक पाळीच्या वेळेपर्यंतचा कालावधी स्पष्ट नसल्यामुळे ती चाचणी नेहमीच अचूक नसते. रक्ताची चाचणी अचूक परिणाम देते आणि गर्भधारणा लवकर ओळखण्यास आणि पुष्टी करण्यास देखील मदत करते.
गर्भधारणा निश्चित करण्यासाठी रक्त तपासणीचे प्रकार
गर्भधारणा निश्चित करण्यासाठी दोन प्रकारच्या रक्त चाचण्या वापरल्या जातात. ती कधी घेतली जाते त्यानुसार ती गर्भधारणा चाचणी एकतर नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकते.
रक्त गर्भधारणा चाचण्यांचे दोन प्रकार आहेत:
- गुणात्मक एचसीजी रक्त चाचणी – गरोदरपणाचे हार्मोन शरीरात तयार होत आहे की नाही हे जाणून घेणे.
- परिमाणात्मक एचसीजी रक्त चाचणी – ही चाचणी शरीरात तयार केली जाणारी एचसीजीची विशिष्ट पातळी निर्धारित करण्यासाठी ४८ तासांच्या अंतराने केली जाते.
रक्तातील सिरमची गुणात्मक चाचणी
व्हेनपंक्चर नावाची एक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमध्ये गुणात्मक रक्त चाचणीसाठी रक्तवाहिनीतून रक्त नमुना काढला जातो आणि रक्तातील एचसीजीची पातळी शोधण्यासाठी हे फक्त एकदाच केले जाते.
रक्तातील सिरमची परिणात्मक चाचणी
या प्रकारच्या चाचणीमध्ये गर्भधारणा निश्चित करण्यासाठी व्हेनपंक्चरचा वापर केला जातो आणि गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ४८–७२ तासांच्या कालावधीत दोनदा रक्त काढले जाते. ही चाचणी रक्तातील एचसीजी पातळी देखील शोधते आणि अधिक अचूक असते कारण प्रथमच चुकीचा नकारात्मक परिणाम आढळल्यास पुढील चाचणीपूर्वी वाट बघण्यासाठी वेळ असतो.

चाचणी कशी केली जाते?
रक्ताची गर्भधारणा चाचणी तंत्रज्ञ किंवा नर्सद्वारे केली जाते. त्यासाठी प्रथम एखाद्या रक्तवाहिनीतून रक्त काढते. ही रक्तवाहिनी सहसा हातावरची असते. सिरिंज किंवा कुपी वापरून रक्त गोळा केले जाते. रक्त तपासणी सामान्यतः वेगळ्या प्रयोगशाळेत केली जाते आणि नंतर त्याचा अहवाल डॉक्टरांकडे पाठवला जातो किंवा तुम्हाला अहवाल घेण्यासाठी प्रयोगशाळेत जावे लागते. चाचणीद्वारे सहसा रक्तातील एचसीजी किंवा गर्भधारणा हार्मोनची पातळी ओळखली जाते आणि निर्धारित केली जाते.
चाचणीच्या परिणामांचा अर्थ कसा लावला जातो?
परिमाणात्मक चाचणीद्वारे गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत एचसीजीची वाढलेली पातळी समजते आणि नंतर ही पातळी कमी होण्यास सुरुवात होते.
चाचणी केल्यानंतर खालील गोष्टी समजतात:-
- एकापेक्षा जास्त गर्भांची उपस्थिती, म्हणजे जुळे किंवा तिळे असल्यास
- गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असल्यास
- गर्भाशयामध्ये साधा ट्युमर असल्यास
- गर्भाशयाचा संसर्ग किंवा घातक ट्यूमर
एचसीजीची पातळी सामान्यपेक्षा कमी असल्यास, ते देखील ह्या चाचणीद्वारे सूचित होऊ शकते
- गर्भाचा संभाव्य मृत्यू
- अपूर्ण किंवा पूर्ण गर्भपात
- एक्टोपिक गर्भधारणा
गर्भधारणेच्या रक्त चाचणीचे परिणाम किती अचूक असतात?
जर ओव्यूलेशन नंतर सुमारे ७ दिवसांनी आणि मासिक पाळी सुरु होण्याच्या एक आठवडा आधी ह्या चाचण्या केल्यास त्या ९८–९९% अचूक असतात. खोटे–नकारात्मक आणि खोटे–सकारात्मक परिणाम मिळण्याची सुद्धा शक्यता असते
खोटे–नकारात्मक परिणाम
तुम्ही प्रत्यक्षात गरोदर असताना चाचणी तुम्ही गरोदर नाही असे दर्शवते. चाचणी खूप लवकर घेतल्यास हे सहसा घडते. कारण रक्तातील एचसीजीची पातळी शोधणे कठीण असते त्यामुळे नकारात्मक परिणाम मिळतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा अचूक परिणाम नाही आणि गर्भधारणा झालेली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ४८–७२ तासांच्या आत चाचणीची पुनरावृत्ती करावी.
खोटे–सकारात्मक परिणाम
तुम्ही गरोदर नसताना सुद्धा तुम्ही गरोदर आहात असे चाचणी दर्शवते आणि ते अत्यंत दुर्मिळ आहे. जर तुम्ही विशिष्ट औषधोपचार घेत असाल किंवा ज्यामुळे एचसीजीची उच्च पातळी असण्याची काही वैद्यकीय समस्या असेल तर हा असा परिणाम होऊ शकतो .
परिणामांच्या अचूकतेवर परिणाम करणारी औषधे
अशी अनेक औषधे आहेत जी गर्भधारणेसाठी घेतलेल्या रक्त चाचणीच्या अचूकतेवर परिणाम करू शकतात. त्यापैकी काही खाली सूचीबद्ध केलेली आहेत:
- हिप्नोटिक्स– झोपेच्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे एचसीजीच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
- प्रोमेथ्याझिन – ऍलर्जीची लक्षणे, सर्दी किंवा खोकला किंवा अतिसारावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध एचसीजीची पातळी वाढवू किंवा कमी करू शकते.
- फिट टाळण्यासाठी वापरली जाणारी औषधे
- पार्किन्सन रोगावर उपचार करण्यासाठी घेतली जाणारी कोणतीही औषधे
- प्रेग्निल, एपीएल,प्रॉफेसी, कोरेक्स, नोवारेल किंवा ओवीड्रेल सारखे एचसीजी असलेले कोणतेही प्रिस्क्रिप्शन
- फेनोथियाझिन औषधे जसे की क्लोरप्रोमाझिन किंवा थोराझिन
रक्ताची गर्भधारणा चाचणी गर्भधारणा झाली आहे हे किती लवकर ओळखू शकते?
गर्भधारणेनंतर रक्त तपासणी झाल्यावर गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे किती लवकर समजू शकते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तुम्ही आणि तुमचे पती मूल होण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही गरोदर आहात, तर लगेच गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तुमची पाळी चुकल्यास लगेच रक्त तपासणी करण्याची वेळ येते.
- गर्भाचे रोपण झाल्यानंतर एचसीजी हे संप्रेरक तयार होते. मासिक पाळी चुकल्यानंतर १० दिवसांनंतर रक्तामध्ये ते आढळते. त्यानंतर तुम्हाला रक्ताची गर्भधारणा चाचणी कधी करायची हे समजते. .
- गरोदरपणाच्या पहिल्या दोन महिन्यांत एचसीजीची पातळी झपाट्याने वाढते. हार्मोन्समध्ये लवकर बदल झाल्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर १०–१२ दिवसांनी रक्त तपासणीद्वारे गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे समजणे सोपे जाते.
- जर गर्भधारणा निश्चित करण्यासाठी रक्त तपासणी केली असेल, तर तुम्हाला निदान केंद्रातून अहवाल येण्यासाठी एक किंवा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, एचसीजीची पातळी निश्चित करण्यासाठी किमान ४८ तासांच्या अंतराने रक्त काढले जाते. संप्रेरक दर ४८ तासांनी दुप्पट होते त्यामुळे तुम्ही गरोदर असल्यास परिणाम अचूक मिळतील.

रक्ताची गर्भधारणा चाचणी करण्याचे धोके
आजकाल रक्त–आधारित गर्भधारणा चाचण्या करण्यामागे कोणतीही जोखीम नाही कारण ती पूर्णपणे नियंत्रित आहे. काही धोके आहेत ते खालीलप्रमाणे –
- गर्भधारणेसाठी रक्त चाचणी घेण्याचा सर्वात मोठा धोका हा खोटा सकारात्मक परिणाम आहे.. खोटा सकारात्मक परिणाम आईने घेतलेल्या वेगवेगळ्या औषधांमुळे मिळू शकतो
- जिथून सुईद्वारे रक्त काढले जाते तिथे हलकी जखम होऊ शकते
- डोके हलके होणे
- बेशुद्ध पडणे (दुर्मिळ)
- संसर्ग (दुर्मिळ)
- हेमॅटोमा – त्वचेखाली रक्त जमा झाल्यावर ही समस्या होते
रक्त गर्भधारणा चाचणी चुकीची असू शकते?
जर लवकर रक्ताची गर्भधारणा चाचणी केली, तर तुम्ही गरोदर असलात तरीही परिणाम खोटे असण्याची शक्यता असते.
- रक्त चाचण्या सामान्यतः ९८–९९ % अचूक असतात कारण गर्भधारणेच्या तारखेपासूनच्या वेळेनुसार गरोदरपणाचे संप्रेरक रक्तात वाढण्यास वेळ लागतो.
- तथापि, औषधोपचार आणि इतर अनेक घटक चाचणीच्या अचूकतेवर परिणाम करू शकतात. जर तुम्हाला अजूनही मासिक पाळी येत नसेल तर १० दिवसांनी पुन्हा चाचणी घेणे केव्हाही चांगले.
- जेव्हा स्त्रिया प्रजननक्षमतेची औषधे घेत असतात, चाचणी खोटे पॉझिटिव्ह परिणाम दर्शवते कारण ट्रीटमेंटमुळे एचसीजीची पातळी वाढलेली असते.
तुम्ही ही चाचणी घरीच करू शकता का?
रक्त गर्भधारणा चाचणी स्त्रीरोगतज्ञाच्या दवाखान्यात किंवा निदान केंद्रात करून घेणे आवश्यक आहे . ती घरी केली जाऊ शकत नाही.
तुम्ही गर्भवती आहात असे तुम्हाला आतून वाटत असेल, तर तुम्ही सुरुवातीला घरगुती गर्भधारणा चाचणी किंवा मूत्र चाचणी करू शकता. परंतु गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. पालकत्वाच्या प्रवासासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे देखील महत्त्वाचे आहे कारण ती एक मोठी जबाबदारी आहे.
आणखी वाचा:
चुकीची नकारात्मक गरोदर चाचणी
लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात
 
 


 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
                                         
                                         
                                         
                                         
                                         
                                     
                                         
                                         
                                        