Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना तिशीतल्या गर्भारपणाविषयी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत अशा गोष्टी

तिशीतल्या गर्भारपणाविषयी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत अशा गोष्टी

तिशीतल्या गर्भारपणाविषयी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत अशा गोष्टी

बऱ्याच जणींना असे वाटते की ३० हे वय गर्भारपणासाठी अगदी योग्य आहे. कारण तुम्ही तुमच्या करिअरमध्ये व आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिर झालेले असता. तसेच अनुभवानं सुद्धा समृद्ध असता. मातृत्वामुळे येणाऱ्या आव्हानांना पेलण्यास सक्षम झालेले असता. आर्थिक स्वावलंबन, नोकरीतील सुरक्षितता, उशीरा लग्न ह्या कारणांमुळे सध्या मुलं सुद्धा उशिरा होतात.

मातृत्व लांबणीवर टाकण्याआधी फक्त लक्षात ठेवा की वयाच्या ३० नंतर गरोदरपणाची शक्यता शरीरामधील जैविक बदलांमुळे खूप कमी होते.

वयाच्या तिशीमध्ये गर्भधारणेची शक्यता

तुमच्या वयाच्या तिशीत सुद्धा तुमच्या गरोदरपणाची शक्यता ८६% असते. पण दुसरीकडे गर्भपाताची शक्यता २० % ने वाढते. बऱ्याच प्रकरणांमध्ये जोडप्यांना प्रजननासाठी उपचारांची गरज नसते. पण डॉक्टरांच्या मते त्यांनी स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे, आणि गर्भारपणासाठी काही अडचण तर नाही ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. तुमची गर्भारपणाची शक्यता वयाच्या पस्तिशीनंतर सुद्धा ( म्हणजे ३५-३९ वर्षे ) खूप जास्त असते, पण वयाच्या तिशीपेक्षा नक्कीच कमी असते. तथापि वयाच्या पस्तिशीनंतर गर्भपात, डाउन सिन्ड्रोम आणि असामान्य गर्भारपणाची शक्यता वाढते.

काही महिलांच्या बाबतीत एका महिन्यात गरोदर राहण्याची शक्यता १५-२०% असते. काही महिलांना गरोदर राहण्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. जर तुम्ही ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी गरोदरपणासाठी प्रयत्न करत असाल आणि तरीही यश मिळत नसेल तर डॉक्टर्स In Vitro Fertilization (I V F ) साठी तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगतात.

वयाच्या तिशीमध्ये गर्भधारणेची शक्यता

वयाच्या ३५ नंतर सुद्धा तुम्ही गर्भवती होण्याची तुमची तयारी नसेल तरीही काळजीचे काही कारण नाही. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीला धन्यवाद. तुम्ही तुमच्या वयाच्या ४० पर्यंत अंडे फ्रीझ करून ठेऊ शकता आणि तुमच्या चाळीशीत सुद्धा तुम्ही गरोदर राह्यण्याची शक्यता चांगली असते.

तिशीतल्या गर्भधारणेविषयी काही साधक आणि बाधक गोष्टी

आपण कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे विचार करीत असाल तर येथे काही तथ्य आहेत जे आपल्याला निर्णय घेण्यास मदत करतील.

साधक गोष्टी

३० नंतर बाळ होऊ देण्याच्या काही जमेच्या बाजू खालीलप्रमाणे:

1. आर्थिक स्थिरता: तिशीनंतर बाळाचा विचार करण्यामागे आर्थिक स्थिरता हे सर्वात मोठे कारण आहे. कारण तोपर्यंत तुम्ही करिअर मध्ये स्थिरावलेले असता. तुम्ही कमीत कमी ५-७ वर्ष काम केलेले असते आणि तुम्ही पैसे वाचवण्यास आणि आर्थिक निर्णय घेण्यास समर्थ असता. बाळासाठी सर्व गोष्टी तसेच बाळाला सांभाळण्यासाठी पूर्णवेळ बाई ठेवण्याइतके तुमचे आर्थिक गणित तुम्ही मांडू शकता.

2. नात्यातील स्थिरता: जेव्हा तुम्ही तिशीत असता तेव्हा तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबरचं नातं स्थिर आणि निरोगी झालेलं असतं. बऱ्याच मुली लग्नानंतर २-३ वर्ष नवरा आणि आपण स्वतः कसे आहोत हे जाणून घेण्यासाठी जाऊ देतात. लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये एकमेकांसोबत जमवून घेताना, बाळाचा निर्णय घेणे म्हणजे परिस्थितीत अजून गोंधळ होऊ शकतो.

3. अनुभवात वाढ: जरा विचार करून पहा की जेव्हा तुम्ही २३-२४ वर्षांचे असता, तेव्हा तुम्ही तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेले असते. अजून खूप गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात. पण तिशीत तुमचं थोडं जग पाहून झालेलं असतं, कामाचा अनुभव असतो, स्वतःसाठी जगून झालेलं असतं. तुम्ही बाळ वाढवू शकण्याइतके सक्षम असता.

4. आधार गट (Support Group): जर तुम्ही २५ व्या वर्षी आई झालात तर तुमच्या मैत्रिणींमध्ये तुम्ही एकट्याच आई असाल कारण बऱ्याच जणी आई होण्याचा निर्णय तिशीत घेण्याची शक्यता जास्त असते. आणि मग तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी तुमच्या आईकडे किंवा मोठ्या वयाच्या स्त्रीकडे जावे लागेल. जर बाळाचा निर्णय तिशीत घेतला तर तुम्हाला तुमच्या वयाच्या आणि तुमच्यासारख्याच विचारांच्या मैत्रिणी मिळू शकतील.

5. तुम्ही तरुण दिसाल तसेच तुम्हाला तरुण वाटेल: बऱ्याच मातांनी हे मान्य केले आहे की आई लवकर झाल्याने त्या वयस्क दिसू लागल्या. जर तुम्हाला २४ व्या वर्षी बाळ झाले तर जेव्हा तुम्ही ३२ वर्षांच्या व्हाल तेव्हा तुमच्या जवळ तुमचे ६ वर्षांचे मूल असेल. तुमच्या बऱ्याच मैत्रिणींना आत्ता बाळ झालेलं असल्यामुळे त्या तुमच्यापेक्षा जास्त तरुण दिसतील.

बाधक गोष्टी

जर तुम्ही उशिरा गरोदरपणाचा निर्णय घेतला तर काही वेळा कठीण परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागतो. तिशीनंतर गरोदरपणातील काही समस्या खाली देत आहोत.

1. गर्भधारणेस विलंब: ३० नंतर गर्भधारणा कठीण होऊ शकते. वाढत्या वयानुसार ओव्यूलेशन अनियमित होते. त्यामुळे वंध्यत्व येते.

2. जीवनशैलीशी निगडित आजार: जसे तुमचे वय वाढते तसे तुम्हाला वेगवेगळे विकार जडतात जसे की थायरॉईड, मधुमेह, उच्चरक्तदाब वगैरे. त्यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते.

3. गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होते: जास्त वयामुळे तुम्हाला गर्भारपणात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आहाराचे सक्त नियोजन केले पाहिजे तसेच नियमित व्यायाम केला पाहिजे आणि डॉक्टरांना भेट दिली पाहिजे.

4. सिझेरिअन प्रसूतीची शक्यता: तिशीतील गर्भारपणात खालीलप्रमाणे गुंतागुंत येऊ शकते.

 • गर्भपिशवीचे तोंड योग्यरितीने उघडत नाही.
 • बाळाची हालचाल योग्य नसते.
 • गर्भपिशवीचे संकुचन बाळाला बाहेर येण्याइतपत पुरेसे नसते.

खालील दिलेल्या परिस्थितीत सिझेरिअन प्रसूती करावी लागते.

5. गर्भपाताची खूप जास्त जोखीम: पस्तिशीनंतर गर्भपाताचा धोका असतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त वयामुळे अंड्यांची कमी झालेली गुणवत्ता.

6. बाळाचे आरोग्य: तिशीच्या सुरुवातीला बाळाच्या आरोग्याची जोखीम असते. आईचे वय जास्त असल्यास बाळांना डाउन सिंड्रोम सारख्या जनुकीय आजारांचा धोका असतो.

वयाच्या तिशीत गर्भवती होण्याची योजना असताना करायच्या गोष्टी

खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील.

 • गर्भनिरोधक गोळ्या बंद करा: ही सूचना सर्वात साहजिक आहे. जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असला तर त्या दोन महिने आधीपासून बंद करा.
 • धूम्रपान तसेच मद्यपान बंद करा: गर्भवती होण्याची योजना असेल तसेच निरोगी बाळ हवे असेल तर धूम्रपान आणि मद्यपान बंद करा. तुमच्या पतीला सुद्धा धूम्रपान आणि मद्यपान कमी करण्यास सांगा. कारण मद्यपान आणि धुम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते.
 • वजन कमी करा: जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे गर्भवती होण्यास मदत होईल आणि गर्भारपणातील धोके आणि गुंतागुंत कमी होईन.
 • तुमच्या वैद्यांना भेटा: बऱ्याच तज्ञांच्या मते गर्भवती होण्याच्या योजनेआधी आपल्या डॉक्टरना भेटून दमा किंवा मधुमेह नाही ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. गरोदर राहिल्यानंतर नियमित तपासण्या केल्याने तुमच्या आणि बाळाच्या तब्येतीवर लक्ष राहील आणि जर काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर त्यांचे निवारण करता येईल.
 • औषध घेण्याआधी काळजी घ्या: जर तुम्ही औषधे घेत असाल तर डॉक्टरांना भेटा कारण बरीचशी औषधे गरोदर महिलेला योग्य नसतात.
 • आरोग्यपूर्ण आहार घ्या: ताजी फळे आणि भाज्या खा आणि भरपूर पाणी प्या.
 • व्यायाम: गर्भवतींसाठीच्या व्यायाम वर्गात सहभागी व्हा आणि तुम्ही निरोगी राहाल ह्याची खात्री करा.

३० च्या दरम्यान गर्भधारणा संबंधित इतर तथ्य

 • लैंगिक स्थिती गर्भधारणेच्या आपल्या शक्यतांवर परिणाम करत नाही

लैंगिक स्थिती गर्भधारणेच्या आपल्या शक्यतांवर परिणाम करत नाही

कुठल्याही सर्वेक्षणाद्वारे असे आढळून येत नाही की गर्भधारणेसाठी एखादी विशिष्ठ स्थिती चांगली असते.

 • पुरुष महत्वाची भूमिका बजावतात

लैंगिक स्थिती गर्भधारणेच्या आपल्या शक्यतांवर परिणाम करत नाही

वडिलांचे वय देखील यशस्वी गर्भधारणेस कारणीभूत असते. ३५ वर्षावरील १५% पुरुष आपल्या पत्नीस माता बनवण्यास अपयशी ठरतात. निरोगी जीवनशैलीमुळे जोडप्याला आई बाबा होण्यास मदत होईल.

 • गर्भपात असामान्य नाहीत

गर्भपात असामान्य नाहीत

साधारणपणे ३०% महिलांचे गर्भपात होतात. पण त्याविषयी कुणीच मोकळेपणाने बोलत नाहीत.

विशीत आई होता आले नाही म्हणून अजिबात वाईट वाटून घेऊ नका. लक्षात असू द्या की वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. बऱ्याच महिलांना वयाच्या ३० आणि ४० मध्ये निरोगी बाळे होतात. डॉक्टरांच्या मते जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेतली आणि योग्य आहार घेतला तसेच नियमित व्यायाम केल्यास तुमचे गर्भारपण आनंदात जाईल आणि तुम्हाला निरोगी बाळ होईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article