In this Article
बाळाला स्तनपान द्यावे की फॉर्मुला दूध हा पालकांसाठी मोठा निर्णय आहे. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देण्याचे ठरवले तर ते दररोज किती प्रमाणात द्यावे ह्या विचाराने तुम्ही गोंधळात पडाल. ह्याचे उत्तर बाळाचे वय, उंची, तुम्ही फक्त फॉर्मुला देणार आहात का? किंवा स्तनपानासोबत अथवा घनपदार्थांसोबत पूरक म्हणून देणार आहात? ह्या सर्व घटकांवर अवलंबून आहे .तुमच्या बाळाला तुम्ही किती प्रमाणात फॉर्मुला दूध देणार आहात हे ठरवण्याआधी इथे काही गोष्टी दिल्या आहेत त्या वाचा.
बाळाला भूक लागल्याचे संकेत
साधारणपणे प्रत्येक २–३ तासांनंतर बाळाला दूध द्यावे लागते. प्रत्येक बाळ हे वेगळे असते त्यामुळे बाळाला भूक लागून ते खूप रडू लागण्याआधी बाळाला भूक लागली आहे हे समजणे महत्वाचे असते. भूक लागल्यावर बाळ सारखे तोंड उघडते आणि बंद करते. तसेच बाळ ओठ, हात, हाताची बोटे किंवा कपडे चोखू लागते. ४ महिन्यांच्या वयापर्यंत भूक लागल्यावर बाळ त्याचे डोके तुमच्या छातीपाशी नेते. बाळ चोखल्यासारख्या हालचाली करू लागते आणि हात तोंडाजवळ नेते. बाळाला दूध पाजण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. थोडी मोठी बाळे सुद्धा भूक लागल्यावर डोके एका बाजूकडून दुसरीकडे फिरवतात आणि रडतात.
परंतु, बाळाला भूक लागल्याचे संकेत समजणे काही वेळा अवघड होते. जर तुम्ही बाळाला बाटली दिली तर भूक नसतानाही काही वेळा बाळ ती तोंडात धरते कारण बाळाला तुमच्या जवळ राहायचे असते.
तुमच्या बाळाला किती फॉर्मुला दुधाची गरज असते?
बाळाला किती फॉर्मुला दुधाची गरज आहे हे समजणे काही वेळा अवघड असते कारण प्रत्येक बाळाची भूक आणि पोषणाची गरज प्रत्येक महिन्याला वेगळी असते. साधारणपणे बाळाला जेव्हा भूक असते तेव्हा बाळ दूध पिते आणि पोट भरल्यावर थांबते. फॉर्मुला दूध घेणारी बाळे जास्त दूध पितात आणि स्तनपान घेणाऱ्या बाळांपेक्षा त्यांचे वजन जास्त असते. बाळांना दररोज १५० मिली ते २००मिली इतके दूध त्यांच्या वजनाच्या प्रत्येक किलो साठी लागते. म्हणून, जर बाळाचे वजन ३ किलो असेल तर बाळाला ४५० मिली आणि ६०० मिली फॉर्मुला दूध दररोज लागते. परंतु पहिल्या आठवड्यात बाळे इतके दूध घेणार नाहीत. किंवा प्रत्येक वेळेला बाळ तितकेच दूध घेईल असे नाही त्यामुळे बाळाला जबरदस्ती करू नका.
नवजात बाळाला किती फॉर्मुला द्यावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही बाळाला ६०–७० मिली फॉर्मुला एका वेळेला देण्याचा प्रयत्न करा कारण ह्यापेक्षा जास्त फॉर्मुला ते एका वेळेला घेणार नाहीत.
बाळाच्या गरजेनुसार फॉर्मुला दुधाचे प्रमाण
बाळाचे फॉर्मुला दूध घेण्याचे प्रमाण त्याच्या वजनाबरोबरच त्याच्या वयावर सुद्धा अवलंबून असते. बाळ मोठे होते तसे त्यांच्या पोषणाच्या आणि कॅलरीजच्या गरजा वाढतात आणि ते जास्त खातात. पहिल्या आठवड्यात ते साधारणपणे ७० मिली फॉर्मुला एकवेळेला घेतात. पहिले २ आठवडे ते २ महिने ह्या कालावधीत ते ७५–१०५ मिली फॉर्मुला एका वेळेला घेतात आणि दिवसाला ४५० मिली ते ७३५ मिली फॉर्मुला पितात. जेव्हा ते २–६ महिन्यांचे होतात, तेव्हा ते १०५ मिली ते २१० मिली फॉर्मुला दूध एका वेळेला पितात.
६ महिन्याचे बाळ दिवसाला एकूण ९०० मिली फॉर्मुला दूध घेतात आणि एका वेळेला साधारणपणे २१० मिली ते २४० मिली दूध घेतात. तसेच, ह्या वेळेपर्यंत, बऱ्याच बाळांना घनपदार्थांची ओळख होते आणि त्यांचे फॉर्मुला घेण्याचे प्रमाण दिवसाला ६०० मिली इतके कमी होते.
तुम्ही तुमच्या बाळाला किती वेळा दूध द्याल?
बाळाच्या मागणीनुसार बाळाला दूध द्यावे असे म्हटले जाते, म्हणजेच बाळाला भूक लागली आहे अशी लक्षणे दिसली की बाळाला दूध द्यावे. फॉर्मुला दूध घेणाऱ्या बाळाला प्रत्येक २–३ तासांनी दूध द्यावे. बाळ जसे मोठे होते तसे त्यांच्या पोटाची क्षमता वाढते. एका वेळेला ते जास्त दूध घेऊ लागते आणि त्यांना प्रत्येक २–३ तासांनी दुधाची गरज भासते. आधी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही बाळाच्या भुकेच्या संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याप्रमाणे बाळाला दूध दिले पाहिजे. बाळ जेव्हा रडू लागते तेव्हा बाळाला खूप भूक लागलेली असते. बाळाचे पोट भरले असल्याच्या लक्षणांवर लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे उदा: दूध पिण्याचा वेग मंदावणे आणि दूध पिताना मध्येच थांबणे इत्यादी.
तसेच जर बाळ लहान असेल किंवा बाळाचे वजन वाढत नसेल तर बाळाला वरचेवर दूध दिले पाहिजे, त्यासाठी त्यांना झोपेतून उठवले तरी चालेल. अशा बाबतीत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून बाळाला किती वेळा आणि किती प्रमाणात दूध द्यावे हे जाणून घेणे चांगले.
बाळ पुरेशा प्रमाणात फॉर्मुला दूध घेत आहे हे तुम्हाला कसे कळेल?
बाळाचे शरीर आणि वागणे ह्यावरून बाळाला पुरेशा प्रमाणात फॉर्मुला दूध मिळत आहे ना हे तुम्हाला समजेल
जर बाळाला पुरेशा प्रमाणात फॉर्मुला दूध मिळत नसेल तर त्याची लक्षणे खालीलप्रमाणे (अर्धपोटी):
- बाळाचे वजन वाढण्याचा वेग नॉर्मल पेक्षा कमी असेल तर हे लक्षण अगदी खात्रीलायकरीत्या सांगते की बाळाला दूध कमी पडते आहे आणि अशा वेळी बालरोगतज्ञांशी त्वरित संपर्क साधावा.
- दूध पिऊन झाल्यावर सुद्धा बाळ समाधानी दिसत नाही.
- लघवी कमी होते.
- ओल्या डायपर वर नारिंगी स्फटिक दिसतात. हि लक्षणे निर्जलीकरणाची तसेच बाळाला द्रवपदार्थ कमी पडत असल्याची आहेत .
- बाळाच्या त्वचेवर सुरकुत्या दिसतात आणि त्वचा सैल पडते.
- बाळ नेहमीपेक्षा खूप जास्त रडू लागते.
बाळ प्रमाणापेक्षा जास्त फॉर्मुला दूध घेत असल्याची लक्षणे खालीलप्रमाणे (अतिप्रमाणात):
- बाळाला दूध पाजल्यावर बाळाला उलटी होते.
- बाळाला पोटात वायू होऊन पोट दुखू लागते अशा वेळी बाळ पाय पोटाजवळ घेऊन रडू लागते.
- बाळाचे वजन वेगाने वाढू लागते आणि त्याचे वजन जास्त असते.
बाळ योग्य प्रमाणात फॉर्मुला दूध घेत असल्याची लक्षणे खालीलप्रमाणे:
- २ आठवड्यांनंतर बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत राहते आणि ते पहिल्या वर्षापर्यंत नियमित राहते.
- दूध दिल्यानंतर बाळ आनंदी, समाधानी आणि आरामात असते.
- बाळाला पांढरी लघवी होते आणि दिवसातून ५–६ वेळा ओला डायपर बदलावा लागतो.
परंतु, वर दिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त २–६ आठवड्यांपासून तसेच ४थ्या आणि ६व्या महिन्यात बाळाची वाढ झपाट्याने होते. आणि ही वेगाने होणारी वाढ केव्हाही होऊ शकते. ह्या कालावधीत बाळांना नेहमीपेक्षा जास्त भूक लागते आणि ते जास्त खाऊ लागतात.
तसेच, फॉम्युला दूध घेणारी बाळे जास्त दूध पितात. स्तनपान घेताना त्यावर नियंत्रण राहते परंतु फॉर्मुला दूध बाटलीतून दिले जाते आणि दूध वेगाने येते. बाटलीमध्ये खूप दूध असते आणि बाळांची दूध वेगाने ओढण्याची सवय असते त्यामुळे बाळे जास्त प्रमाणात दूध घेतात आणि बाळ जास्त दूध पिण्याची शक्यता वाढते. फॉर्मुला दूध आणि स्तनपान ह्यांचे पचन वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि स्तनपानाच्या तुलनेत फॉर्मुला दुधाचे पोषण कमी पडते आणि त्यामुळे ते जास्त प्रमाणात लागते.
फॉर्मुला दूध बदलण्याची आदर्श वेळ कुठली आहे?
बाळाला घनपदार्थांची सुरुवात केल्यावर, म्हणजेच साधारणपणे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर फॉर्मुला दूध बंद करता येते. परंतु असे खूप काही घनपदार्थ नाहीत जे बाळाला खायला आवडतील आणि त्यासोबतच त्यांची पोषणाची गरज भागेल. म्हणून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्यांना फॉर्मुला दूध सुरु ठेवावे. बाळाला घनपदार्थ सुरु केल्यावर फॉर्मुला दुधाचे प्रमाण ९०० मिली पासून ६०० मिली इतके कमी होईल. एक वर्षानंतर, बाळाला दिवसाला ३५० मिली दूध लागते आणि ते फॉर्मुला दूध, स्तनपान किंवा गायीचे दूध ह्यापैकी कुठल्याही स्वरूपात असू शकते. जर बाळाला फॉर्मुला दुधावर वाढवले गेले असेल आणि आता बाळाला घनपदार्थांची सवय झाली असेल तर फॉर्मुला दूध मोठ्या प्रमाणात कमी केले तरी चालेल.
फॉर्मुला दूध हा स्तनपानाला पोषक पर्याय आहे. त्यातून बाळाच्या वाढीसाठी आवश्यक जवळजवळ सगळीच पोषणमूल्ये बाळाला मिळतात. म्हणून, तुमच्या बाळाला किती प्रमाणात फॉर्मुला दूध पुरेसे आहे हे माहिती करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून महत्वाच्या पोषक घटकांपासून बाळ वंचित राहणार नाही.
आणखी वाचा:
बाळांसाठी गाईचे दूध
बाळाचे स्तनपान सोडवताना – लक्षणे, अन्नपदार्थ आणि घनपदार्थांची ओळख