Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य आहे का?

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य आहे का?

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य आहे का?

अनियोजित गर्भधारणा थांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या ह्या परिणामकारक असतात. गर्भनिरोधक गोळ्या ह्या संप्रेरकांच्या गोळ्या असतात आणि त्या शरीराची ओव्युलेशन प्रक्रिया थांबवतात तसेच गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा घट्ट करतात.  त्यामुळे शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचत नाहीत आणि गर्भाशयाच्या आवारणामध्ये  फलित अंड्याचे रोपण होत नाही. हा लेख तपकिरी स्त्रावाबद्दल  तसेच त्यास कसा प्रतिबंध करावा आणि डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ह्याविषयी भाष्य करतो.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाच्या स्त्रावाची कारणे

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो, परंतु इतर अन्य काही घटक आहेत ज्यामुळे स्त्रियांमध्ये तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना खालील काही घटकांमुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो.

१. जुने रक्त

बऱ्याच वेळेला, हा तपकिरी रंगाचा स्त्राव म्हणजे जुने रक्त असते. तुमच्या मासिक पाळीनंतर तुमच्या शरीरातून गर्भाशयाच्या आवरणाचे काही अवशेष जे आत राहिले असतील ते बाहेर टाकले जातात. ह्या जुन्या रक्तातील लोहाचा ऑक्सिजनशी संयोग झाल्यास ह्या स्त्राव तपकिरी रंगाचा दिसतो.

२. हलके डाग

गर्भनिरोधक गोळ्या घेताना पहिले ६ महिने तुमचे शरीर गोळ्यांद्वारे मिळणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीला समायोजित करीत असते आणि त्याचा परिणाम म्हणून हलके डाग किंवा अचानक रक्तस्त्राव होतो आणि तो तपकिरी रंगाचा असतो. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरातील ल्युटिनाइझिंग हॉर्मोन (LH) आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) च्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भाशयाचे आवरण पातळ होते आणि गर्भाशयाचे आतील आवरण (एन्डोमेट्रिअल टिश्यू ) हे तपकिरी रंगाच्या स्त्रावाच्या स्वरूपात शरीराच्या बाहेर टाकले जाते.

३. गर्भनिरोधक गोळ्यांचा कमी डोस

काही केसेसमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये  खूप कमी असलेल्या संप्रेरकांच्या पातळीमुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. हे खूप धोकादायक आहे कारण ह्यामुळे गोळ्यांचा परिणाम कमी होतो. जर हे कारण असेल तर, तुमच्या डॉक्टरांना गोळ्यांचा डोस वाढवण्याविषयी विचारा.

४. गोळी घेणे विसरणे

जर तुम्ही एका ठराविक वेळेला गर्भ निरोधक गोळ्या घेतल्या तर त्या परिणामकारक असतात. जर तुम्ही १ किंवा २ गोळ्या घेण्याचे विसरलात तर तुमच्या शरीराचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. ह्याचे कारण म्हणजे गर्भाशयाचे आतील आवरण पातळ होण्यास सुरुवात होते.

५. विशिष्ट प्रकारच्या गोळ्यांविषयी संवेदनशीलता

गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन ही संप्रेरके वेगवेगळ्या प्रमाणात असतात. जर विशिष्ट गर्भनिरोधक गोळ्यांविषयी संवेदनशील असाल तर तपकिरी रंगाच्या स्त्रावाचा दुष्परिणाम होऊ शकतो.

६. फायब्रॉईड

फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयात वाढणाऱ्या गाठी, ज्या कर्करोगाच्या नसतात. ह्या गाठींमुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होऊ शकतो. सोनोग्राफीद्वारे डॉक्टरांना ह्याचे निदान होऊ शकते. खूप जास्त रक्तस्त्राव आणि त्यानंतर तपकिरी रंगाचा स्त्राव झाल्यास ते काळजीचे कारण असू शकते कारण ते गर्भाशयातील फायब्रॉइड्स किंवा अंडाशयातील सिस्टमुळे होते. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

७. रोपण

जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तरीही ओव्युलेशन होत असेल तर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. अशावेळी तपकिरी रंगाच्या स्रावाचे कारण हे रोपण रक्तस्त्राव असते. जेव्हा फलित अंडे स्वतःचे रोपण गर्भाशयाच्या आवरणावर करते तेव्हा थोडे रक्त त्यातून येऊ शकते. हे हलके डाग तपकिरी रंगाच्या स्त्रावासारखे  दिसू शकतात. जर तुम्हाला शंका आली तर, लवकर निदान व्हावे म्हणून खात्रीसाठी घरी चाचणी करू शकता. जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर तुम्ही संतती नियमन थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

८. ओव्युलेशन

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ओव्युलेशनची प्रक्रिया दाबली जाते. तथापि, जर तुम्ही डोस चुकवला किंवा डोस कमी मात्रेचा असेल तर ओव्यूलेशन होऊ शकते. जेव्हा तुमच्या शरीरात ओव्यूलेशन होते तेव्हा तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. पुढच्या मासिक पाळीच्या आधी १०-१४ दिवस हे  होते. ह्यासाठी तुम्हाला संतती नियमनासाठी गोळ्यांबरोबरच दुसरी पद्धती वापरली पाहिजे आणि तुमच्या डॉक्टरांशी लगेच बोलले पाहिजे.

९. संसर्ग

काही वेळा, तपकिरी रंगाचा स्त्राव हे योनिमार्गाच्या संसर्गाचे किंवा लैंगिक संबंधातून पसरवलेले आजाराचे लक्षण असते. हे Bacterial vagionosis, gonorrhoea किंवा chlamydia असू शकते. जर तुम्हाला योनिमार्गाच्या भागात लाल होणे, दुखणे, खाज सुटणे, दुर्गंधी येणे किंवा योनिमार्गाच्या भागात तपकिरी स्त्रावासह  अस्वस्थता जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

१०. पॅप स्मिअर

पॅप स्मिअर ही गर्भाशयाच्या मुखाची चाचणी असून महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे का हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. ह्यामध्ये स्पेक्युलम (धातूचे एक साधन)च्या साहाय्याने योनीमार्ग उघडला जातो आणि गर्भाशयाच्या मुखाच्या बाहेरच्या बाजूचा नमुना खरवडून काढला जातो आणि कर्करोग किंवा कर्करोगपूर्व पेशींची तपासणी केली जाते. काही स्त्रियांमध्ये पेशी खरवडून काढल्यामुळे काही दिवसांकरिता हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव तपकिरी रंगाचा स्त्राव म्हणून दिसू शकतो.

तपकिरी रंगाच्या स्त्रावाची स्थिती कशी हाताळावी ह्याविषयी काही टिप्स

तपकिरी रंगाचा स्त्राव वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. तपकिरी रंगाचा स्त्राव कसा हाताळावा ह्याविषयी काही टिप्स इथे देत आहोत.

१. पॅड्स वापरा

तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले काही महिने तुम्ही पॅड्स किंवा पॅंटी लायनर वापरू शकता. जर हा स्त्राव खूप जास्त होत असेल तर किंवा तुम्हाला फ्रेश पॅड हवे असेल तर तुमच्या सोबत पॅड्स किंवा पॅंटी लायनर्स ठेवा.

२. गोळ्या घेत असताना इतर संततिनियमनाची साधने सुद्धा वापरा

तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून काही काळासाठी दुसरे एखादे गर्भनिरोधक साधन सुद्धा वापरा. तुम्ही घेत असलेला गोळ्यांचा डोस तुमच्यासाठी योग्य आहे आणि गोळ्यांचा योग्य परिणाम होत आहे ह्याची खात्री करा. कमी डोस घेतल्यास तो तपकिरी रंगाच्या स्त्रावास कारणीभूत असतो आणि जर तुम्ही संततिनियमनाची इतर साधने जसे की काँडोम्स किंवा spermicide वापरली नाहीत तर तुम्हाला गर्भधारणा होण्याचा धोका असतो.

३. डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला तपकिरी रंगाचा स्त्राव होत राहिला आणि तो आपोआप थांबला नाही  तर तुमच्या डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर तपकिरी रंगाच्या स्त्रावाला कसा प्रतिबंध घालावा?

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी स्त्राव होत असेल तर त्यास प्रतिबंध होण्यासाठी खाली काही मार्ग आहेत:

  • दिवसाची एक ठराविक वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेला गोळी घ्या. जर आदल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी उशिरा गोळी घेतली तर तुमच्या संप्रेरकांचे संतुलन बिघडेल आणि त्यामुळे सुद्धा तपकिरी रंगाचा स्त्राव होऊ शकतो.
  • गोळी घेण्याचे टाळू नका. जर तुम्ही गोळी घेण्याचे विसरलात तर डॉक्टरांशी संपर्क साधून त्याविषयी काय करायचे हे विचारून घ्या. एका पेक्षा जास्त वेळेला गोळी घेण्याचे विसरल्यास गोळ्यांचा परिणाम होणार नाही आणि त्यामुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो.
  • दुकानात जाऊन गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नका. डॉक्टरांनी विशेषकरून तुमच्यासाठी लिहून दिलेल्या गोळ्या घेणे सर्वात उत्तम, कारण त्यामध्ये संप्रेरकांचा डोस तुमच्या शरीरासाठी योग्य प्रमाणात असतो. जर तुम्ही तुम्हाला लिहून दिलेल्या गोळ्या घेत नसाल तर गर्भधारणा टाळण्यासाठी त्या परिणामकारक होणार नाही आणि त्यामुळे तपकिरी रंगाचा स्त्राव होतो.
  • भरपूर पाणी प्या. सजलीत राहिल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते आणि तपकिरी स्रावास प्रतिबंध होतो.
  • तुमच्या डॉक्टरांशी बोला ते तुमच्या शरीरासाठी योग्य असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या सुचवतील. जर गोळ्या तेवढ्या तीव्र नसतील तर तुमची मासिक पाळी नियमित होणार नाही. त्यामुळे तुम्हाला अनियमित मासिक पाळी आणि तपकिरी रंगाचा स्त्रावाचा त्रास होतो.

तपकिरी स्त्रावाचा प्रश्न गंभीर केव्हा होतो?

जरी तपकिरी रंगाचा स्त्राव हा गर्भनिरोधक गोळ्यांचा दुष्परिणाम असला, तरी काही वेळा हा स्त्राव गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्देशित करतो. खालील परिस्थितीत तुम्हाला तपकिरी रंगाचा स्त्राव होत असेल तर तुम्ही गंभीर पणे लक्ष दिले पाहिजे.

१. योनिमार्गास दुर्गंधी

जर तुमच्या योनीमार्गातून स्रावाबरोबर दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. हे संसर्गाचे लक्षण आहे आणि त्यासाठी उपचार आणि प्रतिजैविकांची गरज आहे.

२. योनिमार्गाजवळचा भाग लाल होणे

योनिमार्गाजवळचा भाग लाल होणे हे संसर्गाचे लक्षण आहे आणि ते सहज घेता कामा नये, त्याकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.

३. सूज येणे आणि दुखणे

योनिमार्गाजवळ जर संसर्ग झाला असेल तर सूज येते आणि दुखते सुद्धा . योनिमार्गाजवळ खाज सुटून तपकिरी रंगाचा स्त्राव होत असेल तर दुर्लक्ष करता कामा नये.

४. पोटात दुखणे आणि पेटके येणे

पोटात दुखत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे हे सुद्धा योनिमार्गाच्या संसर्गाचे लक्षण आहे जसे की, बॅक्टरील व्हजायनोसिस, ट्रॅकोमोनिआसिस किंवा chlamydia

५. १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त ताप असणे

जर तुम्हाला तपकिरी स्त्राव होण्याबरोबर तापसुद्धा येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण हे गंभीर संसर्गाचे लक्षण असू शकते.

६. फ्लू सारखी लक्षणे दिसणे

जर तुम्हाला थकल्यासारखे आणि आळसावल्यासारखे होत असेल आणि तुम्हाला तपकिरी रंगाचा स्त्राव होत असेल आणि त्यासोबत ताप येत असेल तर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा कारण ह्याचे कारण गंभीर संसर्ग असू शकते.

जेव्हा तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करता तेव्हा गोळ्यांमधून मिळणाऱ्या जास्तीच्या संप्रेरकांच्या पातळीला समायोजित करण्यासाठी तुमचे शरीर कार्यरत असते. काही स्त्रियांना हलके डाग पडतात तर काहींना एका महिन्यात दोनदा पाळी येते तर काहींना तपकिरी स्त्राव होतो.  हे नॉर्मल आहे, ६ महिन्यांनी तुमच्या शरीराला गोळ्यांची सवय होईल आणि हलके डाग किंवा तपकिरी स्त्राव कमी होईल किंवा पूर्णपणे थांबेल. तथापि, जर तपकिरी स्त्राव होत असेल आणि काही दिवसात तो आपोआप थांबत नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article