In this Article
तुमचे बाळ घन पदार्थ खाण्यासाठी तयार झाल्यावर, आईचे दूध किंवा फॉर्म्युल्याव्यतिरिक्त, तुम्हाला बाळाला काही घनपदार्थ सुद्धा द्यावे लागतील. पण तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात. बाळाला कोणताही नवीन पदार्थ देण्यापूर्वी तुम्ही नक्कीच खूपदा विचार कराल (आणि तुम्ही तसा विचार केलाच पाहिजे). बाळांचे पोट लहान असते आणि त्यांची पचनसंस्था सुद्धा नाजूक असते त्यामुळे बाळे जास्त खात नाहीत, म्हणूनच त्यांना जे अन्नपदार्थ दिले जातात ते त्यांच्यासाठी पोषक आणि सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. सुका मेवा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे कारण त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, परंतु तुमच्या बाळाच्या आहारात सुक्यामेव्याचा समावेश करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सुकामेवा लहान मुलांसाठी सुरक्षित आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा आणि जर ह्याचे उत्तर होय असे असेल तर त्याचा परिचय तुम्ही बाळाला कधी करून देऊ शकता ह्याबद्दलची माहिती सुद्धा ह्या लेखामध्ये वाचा.
सुका मेवा म्हणजे काय?
खरंतर ताजी फळे वाळवून सुकामेवा तयार होतो. ताजी फळे एकतर पारंपारिक उन्हात वाळवली जातात किंवा डिहायड्रेटर्स वापरून त्यांचे निर्जलीकरण केले जाते. (पाणी काढून टाकले जाते). परंतु निर्जलीकरणानंतरही ह्या फळांमधील पौष्टिकता तशीच राहते. सुकी फळे लोकप्रिय आहेत कारण ही फळे ताज्या फळांपेक्षा जास्त काळ साठवली जाऊ शकतात.
सुका मेवा लहान मुलांसाठी सुरक्षित आहेत का?
होय, सुकामेवा लहान बाळांसाठी सुरक्षित असतो. सुक्यामेव्यातून बाळांना भरपूर पोषणद्रव्ये मिळतात. तुमचे बाळ १ वर्षांचे झाल्यावर तुम्ही बाळाला सुकामेवा दुधात किंवा पाण्यात भिजवून देऊ शकता. साखरेचा लेप असलेल्या सुक्या मेव्याची निवड करू नये कारण त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते आणि दात किडण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय, तुमच्या बाळासाठी सुकामेवा आणल्यावर,तो बाळाला देण्याआधी मऊ करण्यासाठी पाण्यात भिजवू शकता. त्यामुळे पोषक तत्वांचे चांगले पोषण होण्यास मदत होते. तुमच्या लहान बाळाला बदाम देताना, बाळाच्या घशाला त्रास होऊ नये म्हणून त्याची साल काढून तुम्ही त्याला ते देऊ शकता . लक्षात ठेवा, बाळ १ वर्षाचे झाल्यावर सुकामेवा दुधात किंवा पाण्यात भिजवल्यानंतरच बाळाला द्यावा.
बाळांना सुका मेवा कधी द्यावा?
जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर बाळ ७ ते ९ महिन्यांचा झाल्यावर त्याला सुकामेवा द्यावा. आतापर्यंत, तुम्ही त्याच्यासाठी फिंगर फूड्स आणि इतर मऊ पदार्थ आधीच ठरवून ठेवलेले असतील. आता हळूहळू त्याच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सुका मेवा पचनास थोडा जड असल्यामुळे, सुकामेवा देण्याआधी तुम्ही बाळाला इतर हलक्या घन पदार्थांची सवय लावण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
तुम्हाला ऍलर्जीची शक्यता देखील विचारात घ्यावी लागेल. काही बाळांना काही ड्रायफ्रुट्सची ऍलर्जी असते. म्हणून ३–दिवसांचा नियम वापरून पहा. आपल्या बाळामध्ये कुठली ऍलर्जीची चिन्हे दिसत आहेत का ते पहा. विशेषत: सुकामेवा खाल्ल्यानंतर तुम्हाला बाळामध्ये ऍलर्जीची लक्षणे दिसल्यास, बाळाला सुकामेवा देणे ताबडतोब बंद करा.
बाळासाठी सुक्यामेव्याचे आरोग्यविषयक फायदे
सुक्या मेव्यामुळे बाळांना अनेक फायदे होतात. बाळाच्या वाढीसाठी आणि बाळांचा योग्य विकास होण्यासाठी त्याची मदत होते. लहान मुलांसाठी सुक्यामेव्याचे काही फायदे खाली नमूद केले आहेत.
१. अशक्तपणा कमी होतो
सुकामेवा म्हणजे लोहाचा समृद्ध स्रोत आहे, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि मुलांमधील अशक्तपणाचा धोका टळतो.
२. ऊर्जा मिळते
सुका मेवा, फायबर, प्रथिने, जस्त, लोह आणि इतर खनिजांचा समृद्ध स्रोत असल्याने, तुमच्या बाळाला ऊर्जा मिळते. तुमच्या बाळाच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश केल्यास बाळ उत्साही आणि निरोगी राहील.
३. बद्धकोष्ठता कमी होते
सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. हे पदार्थ लहान मुलांच्या आतड्याची हालचाल करण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. बाळ वर्षाचे होण्यापूर्वी त्याला सुका मेवा देऊ नका.
४. पचनसंस्था निरोगी राहते
सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स किंवा चांगले बॅक्टेरिया असतात. हे जिवाणू तुमच्या बाळाची पचनसंस्था निरोगी ठेवू शकतात. प्रोबायोटिक्स तुमच्या बाळाची पचन संस्था विकसित करण्यास मदत करतात तसेच अन्नाचे पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते.
५. हाडे आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते
सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए तुमच्या बाळाची हाडे बळकट होण्यास आणि दृष्टी निरोगी राखण्यास मदत करू शकतात. कॅल्शियम मुळे बाळाच्या हाडांचा विकास चांगला होतो आणि ती चांगली राहण्यास मदत होते
६. मेंदूच्या विकासास मदत होते
अक्रोड सारख्या सुक्या मेव्यामध्ये आणि नट्समध्ये असलेले ओमेगा – ३ फॅटी ऍसिड लहान मुलांच्या मेंदूच्या विकासास मदत करू शकतात.
तुमच्या बाळासाठी स्वादिष्ट ड्रायफ्रूट रेसिपी
येथे काही सोप्या पाककृती आहेत. ह्या पाककृतींद्वारे तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात सुक्यामेव्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करू शकता.
१. खजूर आणि अंजीर घातलेले दूध
येथे खजूर आणि अंजीर घातलेल्या दुधाची पाककृती दिलेली आहे. पण लक्षात ठेवा, हे दूध तुमच्या बाळाला ते एक वर्षांचे झाल्यावरच द्या.
साहित्य:
- खजूर – १–२
- अंजीर – २
- दूध – १ कप
- पाणी
कृती:
- खजूर आणि अंजीर दुधात किंवा पाण्यात चांगले उकळून घ्या.
- एका ग्लासमध्ये बारीक चाळणीतून दूध गाळून घेऊन बाळाला द्या.
२. सुक्या मेव्याची प्युरी घातलेले सीरिअल
ही साधी नाश्त्याची रिसीपी तुमच्या बाळाच्या नेहमीच्या सीरिअलला अधिक चवदार बनवू शकते.
साहित्य:
- केळं – १
- जर्दाळू – २
- पीच – २
- सफरचंद सॉस – १/२ कप
- पृन्स – २
- बेबी सीरिअल (आवश्यकतेनुसार)
- दूध – ३ कप
कृती:
- फळे, सुका मेवा आणि सफरचंद ह्यांची एकत्र प्युरी करा.
- त्यात थोडे दूध घालून तुम्ही प्युरी पातळ करू शकता.
- हे मिश्रण बेबी सीरियलवर ओतून सर्व्ह करा.
टीप: रेसिपीच्या फोटोंमध्ये सुक्यामेव्याचे खडबडीत तुकडे दिसत आहेत. तुमच्या बाळाच्या घशामध्ये सुक्यामेव्याचे तुकडे अडकून बाळ गुदमरू नये म्हणून ते व्यवस्थित बारीक झाल्याची खात्री करा. तसेच, तुमचे बाळ १ वर्षाचे झाल्यावर आणि तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांकडून तपासणी करून घेतल्यानंतर ह्या पाककृती बाळासाठी करा.
सुका मेवा तुमच्या बाळासाठी फायदेशीर आहे कारण त्यामध्ये बरीच पोषक तत्वे आहेत. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तुमच्या बाळाला सुका मेवा द्या. त्यामुळे तुमच्या बाळाला सुक्यामेव्याचा आनंद घेता येईल तसेच त्याचे फायदे सुद्धा मिळतील. परंतु, आपल्या बाळाच्या आहारात सुक्यामेव्याचा समावेश करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी परवानगी दिल्यास, एका वेळी सुक्यामेव्याचा एकाच प्रकार द्या. तुमच्या बाळामध्ये ऍलर्जीची कुठली लक्षणे तर दिसत नाही ना हे पहा.
आणखी वाचा:
बाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती
बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी