In this Article
- व्हिडिओ: लहान मुलांसाठी ओट्स – फायदे आणि पाककृती
- ओट्स बाळांसाठी चांगले आहेत का?
- तुम्ही तुमच्या बाळाला ओट्स खायला द्यायला कधी सुरुवात करू शकता?
- लहान मुलांसाठी ओट्सचे आरोग्यविषयक फायदे
- ओट्सचे पौष्टिक मूल्य
- तुमचे बाळ खाऊ शकेल असे ओट्सचे प्रकार
- ओट्सची निवड कशी करावी? तसेच ओट्सची साठवणूक कशी करावी?
- तुमच्या बाळाला ओट्स खायला घालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- लहान बाळांसाठी ओट्स रेसिपी
वयाच्या सहा महिन्यांपर्यंत, जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान दिलेले असेल तर ते चांगले आहे, कारण ह्या काळात त्याच्या वाढीस आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे बाळाला स्तनपानातून मिळतात. परंतु, एकदा का तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी तयार होतेच परंतु बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला नवीन अन्नपदार्थांची सुद्धा गरज भासू लागते. बरेच पालक जेव्हा आपल्या बाळाला नवीन अन्नपदार्थ देण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांचा कल बाळाला भाज्या आणि फळे देण्याकडे असतो. परंतु बाळाला भाज्या आणि फळे इतर अन्नपदार्थांसोबत दिल्यास त्यामध्ये जास्त ऊर्जा असते आणि पौष्टिक मूल्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वाढ होते. ओट्स हा असाच एक अन्नपदार्थ आहे आणि त्याबद्दल आपण ह्या लेखात चर्चा करूयात. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
व्हिडिओ: लहान मुलांसाठी ओट्स – फायदे आणि पाककृती
ओट्स बाळांसाठी चांगले आहेत का?
ओट्स हे खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे लहान बाळांसाठी अन्नाचा तो एक चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे ओट्स तुमच्या बाळासाठी ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. ओट्सची पचनास देखील मदत होते आणि तांदळाच्या तुलनेत ओट्स पचायला देखील खूप हलके आहेत. ओट्स हा एकमेव अन्नपदार्थ आहे आणि लहान मुलांना त्याची सर्वात कमी ऍलर्जी होते. परंतु, तरीही कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया टाळण्यासाठी आपल्या बाळाला ओट्स खायला देण्यास सुरुवात करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
तुम्ही तुमच्या बाळाला ओट्स खायला द्यायला कधी सुरुवात करू शकता?
तुमचे बाळ सात महिन्यांचे झाल्यावर तुम्ही बाळाला ओट्स देण्यास सुरुवात करू शकता. ओट्स दलिया सारख्या सोप्या पाककृतींनी सुरूवात करा. तुमच्या बाळाला ओट्स खायला देताना त्यामध्ये फळे आणि भाज्या घालून बाळाला द्या. परंतु, बाळाच्या आवडीनिवडी आणि ऍलर्जी जाणून घेण्यासाठी तुम्ही एका वेळी फक्त एक जास्तीचा पदार्थ बाळाला द्या.
लहान मुलांसाठी ओट्सचे आरोग्यविषयक फायदे
ओट्स पौष्टिकतेने भरलेले असतात आणि विशेषत: लहान मुलांसाठी त्यांचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यापैकी काही येथे आहेत:
१. हाडांचा विकास आणि मज्जासंस्थेचे कार्य
ओट्समध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात आणि हि खनिजे तुमच्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. प्रत्येक खनिज आपल्या लहान मुलाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कसे योगदान देते याबद्दल येथे थोडक्यात माहिती दिलेली आहे.
- कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांची ताकद वाढवतात, त्यामुळे तुमच्या बाळाची हाडे मजबूत होतात.
- लोह हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहते आणि ऍनिमियाचा सामना करण्यास मदत होते.
- पोटॅशियम आणि सोडियम शरीराच्या मज्जासंस्थेची कार्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी ओळखले जातात.
- मॅग्नेशियम ऊर्जा निर्माण करण्यास आणि लहान मुलांचे दात आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
२. निरोगी वाढ
फोलेट, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन ह्यासारखी जीवनसत्वे असल्याने तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ओट्सची मदत होते.
३. फ्री रॅडिकल्सच्या हल्ल्याचा धोका कमी करते
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या हल्ल्याचा धोका कमी करू शकतात आणि म्हणूनच, बाळाच्या आहाराचा तो एक आवश्यक भाग आहे.
४. ऊर्जा प्रदान करते
प्रत्येक १०० ग्रॅम ओटचे पीठ बाळांना ४०० किलोकॅलरी ऊर्जा प्रदान करते. ही ऊर्जा लहान मुलांसाठी त्यांच्या विकासाच्या ह्या टप्प्यामध्ये आवश्यक असते आणि ती बाळाच्या वाढीसाठी मदत करते.
५. पचन सुलभ होते
ओट्समध्ये आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि ते आतड्यांच्या योग्य हालचालीसाठी आवश्यक असते. तुमच्या बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत असल्यामुळे, ओट्स तुमच्या बाळाच्या प्रणालीवर कोणताही ताण न आणता पचनास मदत करू शकतात.
ओट्सचे पौष्टिक मूल्य
ओट्स तुमच्या बाळासाठी आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. येथे ओट्समध्ये असलेल्या पोषक तत्वांची संपूर्ण यादी आहे.
पोषण प्रकार | प्रमाण (प्रती १०० ग्रॅम सर्व्हिंग) | पोषण प्रकार |
प्रमाण (प्रती १०० ग्रॅम सर्व्हिंग)
|
व्हिटॅमिन के | ४.१ मिग्रॅ | ऊर्जा | ४०७ किकॅलरी |
प्रथिने | ११.०८ ग्रॅम | एकूण लिपिड (चरबी) | ९.५ ग्रॅम |
कर्बोदके | ६८.५ ग्रॅम | फायबर | १० ग्रॅम |
साखर | ३.८ ग्रॅम | कॅल्शियम | ५४ मिग्रॅ |
लोह | २.५ मिग्रॅ | मॅग्नेशियम | १०६ मिग्रॅ |
फॉस्फरस | ६१० मिग्रॅ | पोटॅशियम | ४२० मिग्रॅ |
सोडियम | ९.५ मिग्रॅ | झिंक | ५.३९ मिग्रॅ |
थायामिन | ०.८ मिग्रॅ | रिबोफ्लेविन | ३.३१३ मिग्रॅ |
नियासिन | १.० मिग्रॅ | व्हिटॅमिन बी-६ | ०.५६३ मिग्रॅ |
फोलेट | ५६ युजी | व्हिटॅमिन ई | ०.१ मिग्रॅ |
तुमचे बाळ खाऊ शकेल असे ओट्सचे प्रकार
तुमच्या लहान बाळासाठी सुरक्षित असे ओट्सचे काही प्रकार इथे देत आहोत.
- बाळांसाठी ओटमील सीरिअल पावडर स्वरूपात सहज उपलब्ध आहे. तुम्हाला ते फक्त आईच्या दुधात किंवा पाण्यात मिसळून बाळाला द्यावे लागेल आणि तुम्ही तुमच्या लहान बाळाला देखील ते देऊ शकता.
- जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी ओटमील सीरिअल मिळाले नाहीतर, तर तुम्ही तुमच्या बाळाला सामान्य ओट्स खायला देऊ शकता. फक्त ते नीट शिजवून घ्या आणि त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
- इन्स्टंट प्री–कट ओट्स हा एक दुसरा पर्याय आहे आणि तो तुम्ही वापरून बघू शकता. इन्स्टंट ओट्स तयार करताना त्यावर प्रक्रिया केलेली असते त्यामुळे दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नसेल तरच हा पर्याय तुम्ही वापरू शकता.
- रोल केलेले ओट्स उकळत्या पाण्यात किमान पाच ते सहा मिनिटे शिजवावे लागतात. तुम्ही शिजवलेले ओट्स आधी मॅश करा आणि त्यानंतरच तुमच्या बाळाला खायला द्या.
- स्टील कट ओट्स सुद्धा तुम्ही बाळांना देऊ शकता. जरी असे ओट्स शोधायला सोपे नसले तरी सुद्धा ते अतिशय स्वादिष्ट म्हणून ओळखले जातात.
आता तुमच्या बाळाला कुठले ओट्स द्यायचे हे तुम्हाला आता माहिती झालेलं आहे त्याची निवड कशी करायचे आणि ते कसे साठवायचे ते आता पाहुयात.
ओट्सची निवड कशी करावी? तसेच ओट्सची साठवणूक कशी करावी?
तुमचे बाळ बहुतेक प्रकारचे ओट्स खाऊ शकत असले तरी, त्याला इन्स्टंट ओट्स किंवा जास्त प्रक्रिया केलेले ओट्स देण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे कारण त्यात कमी किंवा कोणतेही पोषण दिले जाणार नाही. म्हणूनच, तुमच्या बाळासाठी स्टील–कट किंवा नेहमीचे साधे ओट्स देणे चांगले. हवाबंद डब्यात ओट्सची साठवणूक करणे चांगले तसेच जास्त वेळ टिकण्यासाठी हे ओट्स थंड आणि कोरड्या जागेत ठेवा. जर तुमचे घर उबदार असेल तर तुम्ही कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.
तुमच्या बाळाला ओट्स खायला घालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
तुम्ही तुमच्या बाळाला ओट्सची ओळख करून देण्यापूर्वी, तुमच्या बाळाला या अन्नपदार्थाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
- अन्नाची कोणतीही प्रतिकूल प्रक्रिया टाळण्यासाठी, सहा महिन्यांच्या नियमित स्तनपानानंतरच बाळाला घन पदार्थ देण्यास सुरुवात करा.
- अर्ध–प्रक्रिया केलेले किंवा स्टील–कट ओट्सची निवड करा.
- जोपर्यंत बाळाला सहज पचण्याइतपत ओट्स पुरेसे मऊ होत नाहीत तोपर्यंत ओट्स २० ते ३० मिनिटे किंवा थोडा जास्त वेळ शिजवून घ्या.
- तुमच्या बाळाला पहिल्यांदा साधे शिजवलेले ओट्स द्या आणि त्याला ऍलर्जी आहे का ते तपासा. जर ऍलर्जी नसेल तर तुम्ही तुमच्या बाळाला ओट्स पुडिंगमध्ये फळे घालून खायला देऊ शकता. परंतु बाळाला ओट्सची ऍलर्जी आल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लहान बाळांसाठी ओट्स रेसिपी
जर तुम्ही तुमच्या बाळाला ओट्सची ओळख करून देण्याची योजना तुम्ही आखत असाल तर येथे काही सोप्या पाककृती आहेत. ह्या पाककृतींची तुम्हाला मदत होऊ शकते.
१. ऍपल ओट्स पोरीज रेसिपी
साहित्य
- १/४ कप ओट्स
- १ कप पाणी
- एक सफरचंद, सोलून किसलेले आणि प्युरी केलेले
कृती
- ओट्स १ कप पाण्यात उकळा. तुम्ही ओट्स पावडर करू शकता आणि नंतर ते नितळ सुसंगततेसाठी उकळून घेऊ शकता.
- ओट्स जळू नये म्हणून ते नियमितपणे ढवळत रहा.
- ओट्स शिजल्यावर त्यात किसलेले/पुरी केलेले सफरचंद घालून नीट ढवळून घ्यावे.
- तुम्ही मिश्रण आणखी काही मिनिटे शिजवू शकता.
- तुमच्या बाळाला खायला देण्यापूर्वी ओट्स पूर्णपणे थंड होऊ द्या.
२. साधी ओट्स पोरीज रेसिपी
साहित्य
- १/४ कप ओट्स
- १ कप पाणी
- १/४ कप आईचे दूध
कृती
- ओट्स एक कप पाण्यात उकळा. ते संपूर्णपणे शिजवल्याची खात्री करा
- ह्यामध्ये आईचे दूध मिसळा
- बाळाला देण्यापूर्वी ते थंड होऊ द्या
३. बेबी ओटमील आणि बनाना बार्स रेसिपी
ही कृती मोठ्या मुलांसाठी उत्तम आहे.
साहित्य
- १/२ कप बारीक केलेले ओट्स
- १ मॅश केलेले केळी
कृती
- शिजवलेले ओट्स आणि मॅश केलेली केळी एकत्र करा.
- ह्या मिश्रणाचे वेगवेगळे आकार तुम्ही तयार करू शकता.
- त्यांना बेकिंग ट्रेवर ठेवा.
- १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर १० ते १५ मिनिटे बेक करावे.
- जर तुम्हाला बार चावून घायचे असतील तर तुम्ही त्यांना कमी कालावधीसाठी बेक करू शकता.
४. केळी आणि ओट्स रेसिपी
साहित्य
- १/४ कप ओट्स
- १ कप पाणी
- १ केळी, प्युरी
कृती
- एक कप पाण्यात ओट्स मऊ होईपर्यंत शिजवा.
- केळ्याची प्युरी घालून नीट ढवळून घ्यावे.
- थंड झाल्यावर सर्व्ह करा.
५. भाज्या घालून केलेले ओट्स
साहित्य
- २ चमचे बारीक केलेले गाजर
- २ टेबलस्पून बारीक केलेले बटाटे
- १/२ कप रोल केलेले ओट्स
- २–३ कप पाणी
- एक चिमूटभर मीठ (पर्यायी)
कृती
- कढईत थोडे पाणी घाला आणि भाज्या मऊ होईपर्यंत उकळा.
- ओट्स घालून ते व्यवस्थित शिजेपर्यंत उकळून घ्या.
- आवश्यक असल्यास तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता.
- चवीनुसार मीठ घालावे.
- आपल्या बाळाला खायला देण्यापूर्वी ते थंड होऊ द्या.
लहान बाळांसाठी ओट्स हे एक उत्तम पूरक अन्न आहे. तुमच्या बाळाला नवीन पदार्थ देताना हळूहळू सुरुवात करा. बालरोगतज्ञांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतरच बाळाला नवीन पदार्थ देण्यास सुरुवात करा., सर्वोत्तम फायद्यांसाठी, शक्यतो तुमच्या बाळाला सेंद्रिय अन्नपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.
आणखी वाचा:
बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज
बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती