गर्भारपण

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी कशी वाढवावी?

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक प्रथिने आहे आणि ते शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असते. गरोदरपणात, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होण्यासाठी  स्त्रीच्या हिमोग्लोबिनची पातळी योग्य असणे महत्वाचे असते. रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता हीमोग्लोबिनच्या पातळीच्या थेट प्रमाणात असते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्या बाळाला पुरेसे पोषण मिळण्यासाठी तुमचे हृदय कठोर परिश्रम करत असेल. गरोदरपणात, तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण 30% ते 50% पर्यंत वाढते. जास्तीच्या रक्ताच्या गरज पूर्ण करण्यासाठी तसेच गरोदरपणात तुमच्‍या हिमोग्लोबिनची पातळी स्‍थिर राहण्‍यासाठी तुम्‍ही पौष्टिक पदार्थ खात असाल. परंतु गर्भारपणाच्या नंतरच्या टप्प्यात हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. गरोदरपणात तुम्ही तुमची हिमोग्लोबिनची पातळी कशी वाढवू शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठीचे सर्वोत्तम मार्ग

गरोदरपणात तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास, डॉक्टर काही औषधे आणि इंजेक्शन्स लिहून देऊ शकतात. परंतु जर तुमचे हिमोग्लोबिन खूप कमी नसेल तर आहारात काही बदल करून आणि दररोज व्यायाम करून तुम्ही तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकता. गरोदरपणात तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते येथे आहे.

पौष्टिक पदार्थ खा

हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न, फॉलिक ऍसिड  इत्यादी समृध्द पदार्थांचा समावेश करा. गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही खाल्ले पाहिजेत अश्या पदार्थांची यादी येथे दिलेली आहे.

1. पालेभाज्या

लोहाचे प्रमाण जास्त असणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात केला पाहिजे. जर तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. हिमोग्लोबिन तयार करण्यास लोह मदत करते, तसेच लाल रक्तपेशी तयार करण्यास सुद्धा लोहाची मदत होऊ शकते. काही लोहयुक्त पदार्थ आणि औषधी वनस्पती तुम्ही गरोदर असताना खाऊ शकता. ह्यामध्ये पालक,  ब्रोकोली आणि धणे, पुदिना आणि मेथी यांचा समावेश होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये गरोदरपणात आवश्यक असलेली इतर जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे देखील भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पालेभाज्यांना तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवा.

2. सुकामेवा आणि नट्स

खजूर आणि अंजिरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. अक्रोड, मनुका आणि बदाम सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण गरोदरपणात तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास त्यांची मदत होते.

3. कडधान्ये

कडधान्यांमध्ये लोह आणि प्रथिने असतात. तुम्ही सलाड किंवा सूपमध्ये घालून कडधान्ये खाऊ शकता.  मटार, मसूर आणि बीन्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, लोह आणि प्रथिने असतात. त्यामुळे आहारात कडधान्यांचा समावेश केल्यास गर्भवती स्त्रियांसाठी तो एक संतुलित आहार बनेल.

4. शतावरी

शतावरीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जर तुम्हाला काही हलके आणि पचायला सोपे हवे असेल तर तुम्ही गरम शतावरी सूप घेऊ शकता. अधिक लोह मिळण्यासाठी तुम्ही सूपमध्ये तीळ देखील घालू शकता

5. ताजी फळे

डाळिंब आणि संत्री यासारखी ताजी फळे खाल्ल्याने गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते. डाळिंबात लोहाचे प्रमाण भरपूर असते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते. किवी, पीच, द्राक्ष, पेरू यासारखी इतर फळे देखील लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहेत. गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी वाढते. परंतु गरोदरपणात ही फळे खाण्यापूर्वी तुम्ही तुमचे आहारतज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.

6. फॉलिक ऍसिड समृद्ध भाज्या

फोलेट किंवा फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन बी चा एक प्रकार आणि पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व गरोदरपणात न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत करते. हे जीवनसत्व हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या फॉलिक ऍसिडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कॉर्न, केळी, सलगम, स्प्राउट्स, एवोकॅडो, लेट्यूस, भेंडी इत्यादी खाऊ शकता, कारण त्यात फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते.

7. स्मूदी

सफरचंद, बीटरूट आणि गाजरापासून बनवलेली स्मूदी प्या. ही स्मूदी प्यायल्याने गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

8. बिया

तुम्ही भोपळ्याच्या बिया, बदामाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या लोहाने समृद्ध असलेले काही बिया देखील खाऊ शकता. ह्या बिया खाल्ल्याने गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते.

पूरक आहार घ्या

पूरक आहार घेतल्यास गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते.
  1. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते.  फॉलीक ऍसिड किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आढळल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. आणि पूरक औषधे घेऊ शकता.
  2. तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असल्यास, तुम्हाला लोह पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
  3. लोहयुक्त पदार्थ खाणे महत्वाचे आहे परंतु त्याहीपेक्षा लोह शोषण्यास मदत करणारे पदार्थ सुद्धा खाल्ले पाहिजेत. जर तुम्ही लोह शोषण्यास मदत करणारे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खात नसाल तर तुम्हाला व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घ्यावे लागतील. व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स तुमच्या शरीराची लोह शोषण्याची क्षमता सुधारू शकतात. तुम्हाला व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्सची आवश्यकता असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल रक्तपेशी उत्तेजित करा

लाल रक्तपेशींच्या उत्तेजनासाठी, तुमचे डॉक्टर काय सुचवू शकतात त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे.
  1. जर तुम्हाला जुनाट आजार असतील तर त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. तुम्हाला कदाचित जीवनसत्त्वे आणि लोहाच्या गोळ्या घ्याव्या लागू शकतात आणि त्यामुळे तुमचे  हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.
  2. जेव्हा कुठल्याच उपायांचा उपयोग होत नाहीत, तेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला गरोदरपणात हिमोग्लोबिनचे इंजेक्शन देऊ शकतात. सिंथेटिक एरिथ्रोपोएटिन नावाचे इंजेक्शन लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करू शकते.

व्यायाम करा

गरोदरपणात नैसर्गिकरित्या तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे व्यायाम करणे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराची ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शरीर जास्त प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करेल. तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर तुम्ही मध्यम-तीव्रतेचा व्यायाम सुरू करू शकता. गरोदरपणात उच्च-तीव्रतेचा व्यायाम करणे टाळा कारण हा व्यायाम तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तुमची हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी तुम्ही शितली प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम किंवा कपाल भाती यासारखे प्राणायाम देखील करून पाहू शकता.

स्टिरॉइड उपचारांचा विचार करा

स्टिरॉइड उपचार हा शेवटचा उपाय आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते  तेव्हा त्यांना स्टिरॉइड उपचार लिहून दिले जातात. अशा केसेस मध्ये, रोगप्रतिकारक पेशींद्वारे निरोगी आरबीसी नष्ट होतात. ह्याचा सामना करण्यासाठी, स्त्रीला रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे औषध लिहून दिले जाते. या वैद्यकीय स्थितीला हेमोलाइटिक ऍनिमिया असे  म्हणतात.  कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असल्यास अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे उपचार केले जातात. ही उपचारपद्धती निवडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्याचे काही मार्ग आहेत. परंतु तुम्ही हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही एक गोष्ट टाळली पाहिजे.

लोह अवरोधक टाळा

तुमचे हिमोग्लोबिन कमी असल्यास, तुमच्या शरीराची लोह शोषण्याची क्षमता रोखणारे पदार्थ,  पेये टाळा. चहा, कॉफी, शीतपेये, बिअर आणि वाईन पिणे बंद करा.

गरोदरपणात हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी काय असावी?

हिमोग्लोबिनची संख्या ग्रॅम प्रति डेसीलिटर (ग्रॅ/डीएल ) मध्ये मोजली जाते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत, स्त्रीचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 11.6 ग्रॅ/डीएल आणि 13.9 ग्रॅ/डीएल दरम्यान असावे. दुसऱ्या तिमाहीत, हिमोग्लोबिनची पातळी  9.7 ग्रॅ/डीएल आणि 14.8 ग्रॅ/डीएल च्या दरम्यान असली पाहिजे. आणि गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत,  9.5 ग्रॅ/डीएल आणि 15 ग्रॅ/डीएल दरम्यान हिमोग्लोबिन आदर्श मानले  जाते. हिमोग्लोबिनच्या कमी पातळीमुळे अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच, गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी हे उपाय करून पहा. आणखी वाचा:  गरोदरपणातील रक्तक्षय (आयर्न-डेफिशिएन्सी अ‍ॅनिमिया) गरोदरपणातील रक्ताची सीबीसी (संपूर्ण रक्ताची गणना) चाचणी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved