Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील अतिसार: कारणे, उपचार आणि प्रतिबंध

गरोदरपणातील अतिसार: कारणे, उपचार आणि प्रतिबंध

गरोदरपणातील अतिसार: कारणे, उपचार आणि प्रतिबंध

तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला नुकतेच समजले आहे का? गर्भारपणाच्या अनेक लक्षणांची तुम्हाला अद्याप माहिती नसण्याची शक्यता आहे. अशीच एक समस्या म्हणजे गरोदरपणात होणारा अतिसार (जुलाब)  ही होय. ही समस्या गरोदरपणाच्या इतर लक्षणांसोबत उद्भवू शकते. गरोदरपणाच्या ह्या गंभीर काळातील अतिसाराचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो ह्याचा तुम्ही विचार करू लागाल. आपल्या आतड्यांशी संबंधित समस्या कशी टाळता येईल तसेच त्यावर उपचार कसे करता येतील ह्याचा शोध घेऊयात.

अतिसार आणि गर्भारपण

गरोदरपणात पचनाच्या समस्या निर्माण होणे हे सामान्य आहे. अतिसार हे गरोदरपणाचे लक्षण आहे का? होय, कधी कधी अतिसार हे गरोदरपणाचे पहिले लक्षण असू शकते. मातृत्वाच्या प्रवासात कधीतरी बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे सामान्य आहे.

अतिसाराची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही २४ तासांच्या कालावधीत तीन किंवा अधिक वेळा शौचास जाल. जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल, तर तुमचे शरीर पूर्णपणे सजलीत ठेवणे चांगले आहे, कारण गरोदरपणात तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही शौचास जाता तेव्हा लक्षणीय प्रमाणात शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. वारंवार मलविसर्जनामुळे निर्जलीकरण होऊ शकते, आणि ते गंभीर असू शकते. परंतु क्वचितच आई आणि बाळासाठी ही समस्या जीवघेणी ठरू शकते. विशेषत: जर तुम्हाला गरोदरपणात जुलाबाचा त्रास होत असेल तर अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

गरोदरपणात अतिसार होणे सामान्य का आहे?

गरोदरपणातील बहुतेक समस्या संप्रेरकांमधील बदलांमुळे होतात. संप्रेरकांमधील बदलांमुळे गरोदर स्त्रीला त्रास होतो, परंतु तुमच्या बाळाच्या विकासात संप्रेरके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मॉर्निंग सिकनेस, मळमळ किंवा उलट्यांसह गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांमधून जाणार्‍या बहुतेक स्त्रियांना अतिसाराचाही अनुभव येऊ शकतो. गरोदरपणाशी संबंधित बदल किंवा सामान्य परिस्थितींमुळे तुम्हाला हिरव्या रंगाचे जुलाब होऊ शकतात. एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) सारखे हार्मोन्स सामान्यतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टमवर परिणाम करतात. जरी बहुतेक स्त्रियांना संप्रेरकांमधील बदलांचा अनुभव येत असला तरी, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत फक्त काही जणींनाच अतिसाराचा त्रास होतो.

गरोदरपणात अतिसार कशामुळे होतो?

गरोदरपणात अतिसार कशामुळे होतो

गरोदरपणात अतिसार होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी काही कारणे खाली सूचीबद्ध आहेत:

१. हार्मोनल बदल

गरोदरपणात शरीरात तयार होणाऱ्या हॉर्मोन्समुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे तुमच्या अन्नातून पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने काढून तुमच्या भ्रूणाच्या विकासास मदत होते. मात्र, यामुळे होणाऱ्या आईला  बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात. दुसरीकडे, जर संप्रेरकांनी पचन प्रक्रियेला गती दिली तर त्यामुळे अतिसार होऊ शकतो.

२. जन्मपूर्व जीवनसत्त्वे

वाढत्या बाळाच्या आरोग्यासाठी जन्मपूर्व जीवनसत्त्वे महत्त्वाची असतात. ह्या पूरक औषधांमुळे  कधीकधी पोट खराब होते आणि अतिसार होतो. जर ही प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे तुमच्यासाठी योग्य नसतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी काही दिवस ही जीवनसत्वे न घेणे चांगले.

३. आहारातील फरक

तुम्ही गरोदर राहिल्यावर, पौष्टिक अन्नाचा समावेश करण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल अधिक जागरूक राहिले पाहिजे. तुमच्या आहारातील अचानक बदलामुळे तुमच्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो आणि अतिसार होऊ शकतो.

४. अन्नाविषयीची संवेदनशीलता

जर तुम्ही विशिष्ट प्रकारच्या अन्नाबद्दल संवेदनशील असाल, तर गरोदरपणात असे अन्न खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही एखादा विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्यावर पोट खराब होईल किंवा ते फुगेल.

५. लैक्टोज असहिष्णुता

बहुतेक डॉक्टर पोटदुखी असलेल्या मुलांना दूध न देण्याचा सल्ला देतात कारण ते नैसर्गिक रेचक आहे. हेच तुम्हालाही लागू होऊ शकते. तुमच्या आहारात दुधाचा समावेश करणे हा तुमच्या आहारातील आणखी एक महत्त्वपूर्ण बदल आहे त्यामुळे गरोदरपणात अतिसार होऊ शकतो.

बहुतेक स्त्रिया गरोदर असल्याचे समजल्यावर जास्त दूध घेऊ लागतात. परंतु जर तुम्हाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर दुधाचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो. काही दिवस दूध घेणे बंद केल्यास  लैक्टोज असहिष्णुतेची लक्षणे कमी होऊ शकतात. तुमच्या कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात चीज आणि दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

६. जिवाणू आणि इतर कारणे

जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल, तर तर हा त्रास नेहमी गर्भधारणेशी संबंधित समस्यांमुळे होत नाही. जिवाणू, विषाणू, आतड्यांसंबंधी परजीवी, पोटाचा फ्लू किंवा अन्न विषबाधामुळे तुम्हाला अतिसाराचा  त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला क्रॉन्सचा आजार असेल किंवा तुम्हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा सेलिआक रोगाची तक्रार असेल, तर तुम्हाला अतिसाराचा त्रास सतत होऊ शकतो.

गर्भवती असताना अतिसाराचा उपचार

गर्भवती असताना अतिसाराचा उपचार

जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खाली दिलेले आहारातील काही बदल करून पहा.

१. काही अन्नपदार्थ टाळा

तुमचा आहार बदललल्यास तुम्हाला थोडे बरे वाटू शकते. कारण काही पदार्थ अतिसार वाढवू शकतात. तुम्ही मसालेदार, तळलेले, जास्त चरबीयुक्त आणि जास्त फायबर असलेले पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.

जर तुम्ही लैक्टोज असहिष्णु असाल, तर तुमच्या आहारात फळे आणि पालेभाज्या यांसारख्या इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करून तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची कमी भरून काढा.

२. तुम्ही काय प्यावे याबद्दल सावध रहा

कॉफी, चहा आणि द्राक्षाचा रस टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे अतिसाराचा त्रास वाढू शकतो. कॅफीनयुक्त आणि कार्बोनेटेड पेये, सुकामेवा, लाल मांस, मसाले तसेच मिठाई आणि चॉकलेट्स यांसारखे गोड पदार्थ टाळणे देखील चांगले आहे.

३. ब्रॅट आहाराचे पालन करा

बहुतेक वेळा, डॉक्टर पचनसंस्थेला शांत करण्यासाठी BRAT आहार सुचवतात. या आहारात केळी, तांदूळ, सफरचंद आणि टोस्ट यांचा समावेश होतो. हे पदार्थ तुमच्यासाठी आणि वाढत्या बाळासाठी पुरेशी पोषक तत्वे पुरवत नसल्यामुळे, डॉक्टरांनी तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे:

  • शिजवलेल्या गाजरासारख्या भाज्या
  • पिष्टमय पदार्थ जसे की साखरविरहित सीरिअल्स
  • बिस्किटे आणि बटाटे
  • मांस
  • राईस नूडल्स किंवा भाज्यांचे सूप

आपल्या आहारात लैक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस असलेल्या दह्याचा समावेश करणे ही देखील चांगली कल्पना आहे कारण त्यामुळे संक्रमण दूर राहण्यास मदत होते.

४. सीआरएएम (CRAM) आहार वापरून पहा

CRAM आहार हा एक पर्यायी आहार आहे. हा डाएट तुम्ही करू शकता. ह्यामध्ये धान्य, तांदूळ, सफरचंद आणि दूध यांचा समावेश आहे. हे पदार्थ BRAT आहारापेक्षा तुलनेने चांगले आहेत, कारण त्यापासून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात आणि ते वाढत्या बाळासाठी चांगले आहे.

५. स्वतःला हायड्रेटेड ठेवा

जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल, तर शरीरातील कमी झालेले इलेक्ट्रोलाईट्स भरून काढण्यासाठी  तुम्ही भरपूर पाणी, रस आणि मटनाचा रस्सा घ्यावा. शरीरातील कमी झालेले द्रव भरून काढण्यास पाण्याची मदत होते, तर रस आणि मटनाचा रस्सा तुमच्या शरीरातील पोटॅशियम आणि सोडियमची पातळी बदलण्यास मदत करतात. तुम्हाला ओरल रीहायड्रेशन थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण ही पद्धत  अतिसार नियंत्रित करण्याच्या सर्वात अचूक चाचणी पद्धतींपैकी एक आहे. ही एक सर्वकालीन थेरपी आहे. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही दोन आठवडे साखर आणि मीठ आणि पूरक झिंक असलेले पाणी पिण्यास सांगितले जाते. असे केल्याने पचनसंस्थेतून पाणी शोषण्यास मदत होते, कारण अतिसारामुळे शरीरातील द्रवपदार्थांचा ऱ्हास होतो.

६. औषधांवर लक्ष असु द्या

औषधे हे अतिसाराचे एक कारण असू शकते, परंतु तुमचे शरीर सहसा काही काळानंतर त्यांच्याशी जुळवून घेते.जर तुम्हाला तुमच्या पूरक जीवनसत्वांमुळे अतिसार होत असेल, तर डॉक्टरांनी लिहून दिलेली पूरक औषधे तुम्ही शकता किंवा इतर मार्गांनी अतिसारावर उपचार करून तुम्हाला मदत होऊ शकते. लक्षात ठेवा की गरोदरपणात तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिसारविरोधी औषधे घेऊ नका, कारण त्याचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

गरोदरपणातील अतिसारावर घरगुती उपाय

गरोदरपणातील अतिसारावर घरगुती उपाय

गरोदरपणात तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही समस्यांसाठी आधी घरगुती उपचार करणे चांगले. ओव्हर द काउंटर औषधे घेणे शक्यतो टाळावे आणि अशा प्रकारे, अतिसाराच्या बाबतीत, तुम्ही यापैकी काही घरगुती उपाय करून पाहू शकता:

  • तुमच्या शरीरातील कमी झालेल्या द्रवपदार्थाची पूर्तता करण्यासाठी भरपूर पाणी प्या. दर दोन तासांनी किमान एक लिटर पिण्याचा प्रयत्न करा.
  • आल्याचा चहा प्या कारण त्यामध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात आणि त्यामुळे पोटातील उबळ कमी होऊन अतिसाराच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. आंबलेल्या पदार्थातील वायूमुळे वारंवार, पातळ मल तयार होते. थोडे आले आणि चहा पाण्यात उकळून घ्या. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. गाळून घ्या आणि नंतर साखर किंवा मध घालून त्याचे सेवन करा.
  • तुम्ही एका ग्लास कोमट पाण्यात तीन ते चार चमचे मध टाकूनही पिऊ शकता. मधातील एन्झाईम्स आणि अमीनो ऍसिडमध्ये,अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
  • लिंबामध्ये यकृत उत्तेजक घटक असतात. ते आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे अतिसारापासून आराम मिळण्यास मदत होते. तुम्ही लिंबाचा रस, एक चतुर्थांश चमचा ठेचलेली काळी मिरी आणि अर्धा चमचा आले पावडर यांचे मिश्रण दिवसातून दोन वेळा घेऊ शकता.
  • तुम्ही अर्धा कप पाण्यात पेपरमिंट अर्क टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊन शकता.पेपरमिंटमधील तेलांच्या शांत आणि बधिर करण्याच्या गुणधर्मामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोम कमी होण्यासाठी मदत होते.
  • सायलियम हस्क प्रभावी असल्याचे म्हटले जाते कारण ते अतिसाराची वारंवारता आणि तीव्रता कमी करते. हे अतिसारविरोधी आहे, म्हणजेच ते आतड्यामधून पाणी शोषून घेते आणि अतिसार कमी करण्यासाठी त्याची मदत होते.

गर्भवती स्त्रियांना होणारा अतिसार कसा टाळावा?

काही सोप्या सवयी लावून तुम्ही तुमच्या आतड्याला संसर्ग होण्यापासून रोखू शकता:

  • नळाचे पाणी टाळा कारण त्यात जिवाणू आणि रोगजनक असू शकतात.
  • वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशुद्ध पाण्याने दात घासू नका किंवा नळाच्या पाण्यापासून बनवलेला बर्फ वापरू नका.
  • रस्त्यावरील विक्रेत्यांपासून दूर रहा आणि सोलून न काढता येणारी फळे टाळा कारण त्यात जंतू असू शकतात. केळी आणि संत्री यांसारखी फळे तुम्ही स्वत: सोलू शकता याची खात्री करा.
  • अपुरी स्वच्छता असलेल्या भागात जाऊ नका कारण विष्ठेतून विषाणू आणि जिवाणूंच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त असते.
  • कच्चे किंवा कमी शिजलेले मांस किंवा सीफूड खाणे टाळा कारण त्यामध्ये विषाणू आणि जिवाणू असू शकतात.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मूलभूत स्वच्छता राखा आणि जेव्हा तुम्ही पाणी वापरू शकत नाही तेव्हा हँड सॅनिटायझर वापरा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जरी गरोदरपणात अतिसार होणे सामान्य असले तरी सुद्धा घाबरण्याचे कारण नाही, तरीही तुम्ही तुमच्या लक्षणांवर लक्ष ठेवा, त्यामुळे सामान्य नसलेल्या कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण केले जाऊ शकते आणि वेळेवर त्याचा सामना केला जाऊ शकतो. तुम्हाला गरोदरपणात अतिसाराचा त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१. जुनाट अतिसार

जर अतिसार ३-४ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकला आणि पुरेसे बरे वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे अतिसार दीर्घकाळ टिकल्यामुळे तुमच्या शरीराला डिहायड्रेशनचा धोका असू शकतो. तुमच्यावर योग्य उपचार करू शकतील अशा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

२. निर्जलीकरणाची चिन्हे

निर्जलीकरणामुळे गरोदरपणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गडद पिवळा लघवी, सतत तहान लागणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोके दुखणे, थकवा आणि डोकेदुखी किंवा कोरडे तोंड अशी निर्जलीकरणाची लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३. इतर लक्षणे

अधिक गंभीर समस्या दाखवणारी इतर लक्षणे तुम्हाला दिसल्यास, शक्य तितक्या लवकर स्वतःची तपासणी करून घ्या. अशाप्रकारे, कोणत्याही जटिल परिस्थितीवर वेळेवर उपचार करणे सोपे होऊ शकते.

गरोदरपणात हिरव्या रंगाचे शौचास होणे

जर तुम्ही क्लोरोफिल समृद्ध भाज्या खात असाल तर त्यामुळे तुमच्या शौचाचा रंग बदलून हिरवा होऊ शकतो. गरोदरपणात लोहयुक्त अन्न खाणे हे देखील हिरव्या रंगाच्या मलमूत्राचे कारण असू शकते.  सामान्यतः क्लोरोफिल-समृद्ध आहाराच्या अत्यधिक वापरामुळे  असे होते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या लहान आतड्याच्या मुख्य भागात स्त्रवणारे पित्त हिरवे असते आणि जेव्हा पचलेले अन्न पाण्यासह मोठ्या आतड्यातून जाते तेव्हा रंग बदलतो. तुमच्या मोठ्या आतड्यातून नको असलेले घटक  त्वरीत पुढे सरकतात आणि परिणामी, शौचाचा रंग बदलत नाही. ही प्रक्रिया अगदी जलद होते त्यामुळे  आतड्यांचा संक्रमण वेळ कमी होतो आणि हिरव्या रंगाचे मल तयार होते. तुमच्या गरोदरपणात लोहाच्या पूरक औषधांमुळे काळ्या रंगाचे मल तयार होऊ शकते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिरव्या रंगाचे शौचास होणे हे आतड्यांसंबंधी विकार, आतड्यांचा संसर्ग  आणि जिआर्डिया किंवा साल्मोनेला विषबाधामुळे देखील होऊ शकतो. गरोदरपणात जर हिरव्या रंगाचे शौचास होत असेल आणि त्यास तुमचा आहार जबाबदार नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा, कारण हे अधिक गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

प्रवासादरम्यान होणारा अतिसार आणि गर्भारपण

प्रवास करताना तुम्हाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो किंवा प्रवास केल्यानंतर एका आठवड्याच्या आत तो होऊ शकतो. ह्याचे कारण म्हणजे दूषित पाणी किंवा अन्नपदार्थ हे असू शकते. गरोदरपणात प्रवाशांचा अतिसार टाळण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून अन्न खरेदी करणे टाळा, कारण त्यात जंतू असू शकतात. मूलभूत स्वच्छता राखा आणि वर नमूद केलेल्या टिप्सचे पालन करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. अतिसार हे लवकर गर्भधारणेचे सामान्य लक्षण आहे का?

अतिसार होणे हे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते. ह्याचा त्रास एखाद्यालाच होऊ शकतो. उलट्या आणि मळमळ, अन्नाची लालसा आणि तिरस्कार ही सुद्धा लक्षणे ह्यासोबत दिसू शकतात. संप्रेरक पातळीतील बदलांमुळे किंवा वर चर्चा केलेल्या इतर कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो.

२. अतिसारामुळे बाळाला इजा होऊ शकते का?

नाही, प्रकृती गंभीर असल्याशिवाय अतिसारामुळे तुमच्या पोटातील बाळाला त्रास होत नाही. जर अतिसाराचे स्वरूप गंभीर असेल तर आईच्या शरीरात डिहायड्रेशन होईल आणि गर्भाला रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होईल. परंतु, दुस-या किंवा तिस-या तिमाहीत गर्भाशय आणि पोटाचा संसर्ग झाल्यास त्यामुळे होणाऱ्या  गुंतागुंतांमुळे अतिसार झाल्यास त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

३. दुसऱ्या तिमाहीत अतिसार होऊ शकतो का?

दुस-या तिमाहीत सहसा अतिसार होत नाही, परंतु अतिसारानंतर ताप किंवा शरीरदुखी यांसारखी इतर लक्षणे आढळल्यास, सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. तुम्ही डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास, डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. गरोदरपणात शौचास पातळ होण्याव्यतिरिक्त, पोटात पेटके येणे, पोटदुखी, शौचामध्ये श्लेष्मा किंवा रक्त, तीव्र डोकेदुखी किंवा उलट्या या लक्षणांवर लक्ष ठेवा. याव्यतिरिक्त, ताप येणे, लघवीला कमी होणे आणि हृदयाचे ठोके कमी प्रमाणात पडणे याकडे लक्ष द्या. गरोदर असताना पेटके येण्यासारखी इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास, गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणाच्या शेवटच्या कालावधीत होणारा अतिसार

असे मानले जाते की तुम्ही प्रसूती तारखेच्या जवळ येत असताना, अतिसाराची वारंवारता वाढते, कारण तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते. तुमची प्रसूतीची वेळ जवळ आली आहे असा त्याचा अर्थ होत नाही. गरोदरपणाच्या इतर लक्षणांप्रमाणेच अतिसाराचे हे लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीप्रमाणे बदलते. काहींना शेवटच्या तिमाहीत वारंवार अतिसार होऊ शकतो, तर काहींना ही लक्षणे जाणवत सुद्धा नाहीत. गरोदरपणात सौम्य अतिसार हा बहुधा खूप कमी काळ टिकणारा असतो आणि त्यामुळे तुमच्या बाळाला हानी पोहोचण्याची शक्यता नसते.

आता तुम्हाला अतिसाराची कारणे, लक्षणे आणि त्यास प्रतिबंध कसा करायचा हे माहिती असल्याने, तुम्ही गरोदरपणात कोणत्याही टप्प्यावर आतड्यांची ही समस्या टाळू शकता. त्वरीत आराम मिळण्यासाठी तुम्ही वर सुचवलेल्या घरगुती उपायांचा देखील विचार करू शकता. म्हणून, गरोदरपणात पोटाच्या कोणत्याही समस्यांपासून दूर राहण्यासाठी पौष्टिक खा आणि निरोगी रहा.

आणखी वाचा:

गरोदरपणात सूज येणे
गरोदरपणातील झोपेची समस्या – कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article