In this Article
गूळ म्हणजे उसाचा रस किंवा खजुराच्या रसापासून बनवलेली अपरिष्कृत साखर आहे. गुळाला हिंदीमध्ये ‘गुर‘ असेही म्हणतात. उसाचा रस किंवा खजुराचा रस घट्ट होईपर्यंत उकळवून, तो घट्ट होईपर्यंत थंड करून गूळ तयार केला जातो. भारतामध्ये तसेच दक्षिण–आशियाई देशांमध्ये गोड आणि चवदार पदार्थांमध्ये गूळाचा वापर केला जातो. भारतात, बाळाच्या आहारात गूळाचा वापर गोडीसाठी केला जातो. ह्या लेखामध्ये तुमच्या बाळासाठी गूळ खाण्याचे फायदे आणि जोखीम तपशीलवार दिलेली आहे.
तुम्ही बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये गूळ घालू शकता का?
गूळ लहान मुलांसाठी चांगला आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर होय असे आहे, परंतु गूळ वापरताना सावधगिरीने वापरला पाहिजे. ग्रामीण भारतात, डॉक्टर एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी जेवणात गुळाचा वापर मध्यम प्रमाणात करण्यास सांगतात. गूळ हा लोहाचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे बाळाला ऍनिमियाशी लढण्यास मदत होऊ शकते. परंतु, तुमच्या बाळाच्या आहारात गूळाचा समावेश करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या बाळाच्या आहारात गूळाचा समावेश करणे हे तुमच्या आहाराच्या पद्धती आणि जीवनशैलीवर अवलंबून असेल.
तुम्ही बाळाला गूळ कधी देऊ शकता?
बाळ एक वर्षांचे झाल्यावर त्याच्या आहारात तुम्ही गुळाचा समावेश करावा. परंतु, बाळाचे आरोग्य आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा कालावधी बदलू शकतो. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची साखर देऊ नये असे डॉक्टर सांगतात.
लहान बाळांच्या आरोग्यासाठी गूळाचे आश्चर्यकारक फायदे
गूळाचे बाळांसाठी अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत – परंतु, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गूळ देऊ नये. एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या बाळांना गूळ दिला जाऊ शकतो. गूळाचे आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे:
१. ऍनिमिया प्रतिबंधित होतो
गूळ हा लोहाचा चांगला स्रोत आहे. १० ग्रॅम गुळात ०.३ मिग्रॅ लोह असते. हे ३% किंवा दररोज शिफारस केलेला आहार भत्ता (RDA) असतो. तुमच्या बाळाच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय टाळता येतो.
२. हाडे मजबूत होतात
गुळामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते तसेच मजबूत, निरोगी हाडांच्या विकासासाठी आवश्यक खनिजे असतात. म्हणून, गुळाचे सेवन केल्याने तुमच्या बाळाची हाडे मजबूत होऊ शकतात.
३. यकृतामधून विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात
गूळ ही एक अपरिष्कृत साखर आहे. गूळामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. गूळ यकृत स्वच्छ आणि डिटॉक्सिफाय करते.
४. प्रतिकारशक्ती वाढते
गूळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि जस्त ह्यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. गुळामध्ये व्हिटॅमिन बी ४, बी ५, बी ६ आणि कोलीन देखील आहे. हे सर्व घटक तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
५. फ्लू, खोकला आणि सर्दी इत्यादी आरोग्याच्या समस्यांची लक्षणे कमी होतात
भारतात सर्दी, खोकला आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी गुळाचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. सर्दी, खोकला किंवा फ्लू झालेल्या बाळांना कोमट पाण्यात थोडासा गूळ घालून दिले जाते. ह्यामुळे बाळाला लगेच बरे वाटते. गुळामध्ये शरीराला थंडावा देण्याची क्षमता असते. जेव्हा तुमच्या बाळाला फ्लू होतो तेव्हा गुळासोबत कोमट पाणी दिल्याने शरीराचे तापमान कमी होते.
६. बद्धकोष्ठता कमी होते
गूळामुळे मलविसर्जन नियमित होते तसेच बद्धकोष्ठता टाळता येते. गूळामुळे पोटआणि आतड्यांमधील पाचक संप्रेरके सक्रिय होऊन पचनास देखील मदत होते.
७. झटपट ऊर्जा देते
गुळामध्ये ९७% साखर आणि जटिल कर्बोदके असल्याने, गूळ शरीराद्वारे शोषून घेण्यासाठी अधिक वेळ घेतला जातो. गूळ तुमच्या बाळाला दीर्घ कालावधीसाठी अधिक ऊर्जा प्रदान करतो.
८. आतड्यांच्या आरोग्यासाठी गूळ चांगला असतो
गुळातील मॅग्नेशियम हा घटक आतड्यांचे आरोग्य चांगले राखतो त्यामुळे पचनास मदत होते. १० ग्रॅम गुळात जवळपास ४% मॅग्नेशिअम असते.
बाळांना गूळ देण्याचे धोके
गुळात ९७% साखर असते. त्यामुळे, गुळाचा जास्त वापर तुमच्या बाळासाठी हानिकारक असू शकतो. बाळांना गूळ देण्याचे धोके खालीलप्रमाणे आहेत:
१. खूप जास्त कॅलरीज
गुळात प्रति १० ग्रॅम सुमारे ३८ कॅलरीज असतात. गुळाच्या अतिसेवनामुळे बाळाला खूप कॅलरीज मिळू शकतात. त्यामुळे पुढील आयुष्यात उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
२. साखरेचे व्यसन
गूळामुळे बाळांना नंतर साखरयुक्त पदार्थांचे व्यसन लागू शकते, त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
३. प्रतिकूल प्रतिक्रिया
काही बाळांना गूळ खाल्ल्यावर पुरळ येणे किंवा पोटाच्या समस्या निर्माण होणे ह्यासारख्या प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ शकतात. जर गूळ योग्य प्रकारे तयार केला गेला नसेल आणि त्यात अशुद्धता असेल तर त्यामुळे आतड्यांवरील परजीवी वाढतात तसेच जंत होण्याचा धोका वाढवू शकतो.
४. दातांमध्ये पोकळी
गुळाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या बाळाच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते.
५. लठ्ठपणा आणि मधुमेह
खूप जास्त गूळ खाल्ल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आढळतो आणि मधुमेह होऊ शकतो.
बाळांसाठी गुळाच्या आरोग्यदायी पाककृती
लहान बाळांसाठी गुळाच्या काही आरोग्यदायी पाककृती खाली दिलेल्या आहेत
१. सूजी हलवा
गुळासोबत गोड पदार्थ बनवण्यासाठी सूजी किंवा रवा वापरला जातो.
साहित्य
सूजी किंवा रवा, गूळ, पाणी आणि वेलची पावडर.
कृती
थोडा गूळ घालून पाणी उकळून घ्या. रवा एका कढईमध्ये तांबूस लाल होईपर्यंत भाजून घ्या. हा रवा आता उकळत्या गुळाच्या पाण्यात घाला, सतत ढवळत राहा. लापशीसारखे घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. आता त्यामध्ये वेलची पूड घाला. नीट ढवळून घ्या आणि तुमचा सूजी हलवा तयार आहे.
२. गुळाचे सिरप
लहान मुलांसाठी गुळाचे सिरप करण्याची रेसिपी अगदी साधी आणि बनवायला सोपी आहे. हे सिरप रेफ्रिजरेटरमध्ये २ महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकते. बाळाची लापशी गोड करण्यासाठी हे सिरप वापरले जाऊ शकते.
साहित्य
गूळ आणि पाणी
कृती
एका पातेल्यात मंद आचेवर एक चमचा पाणी घालून गूळ वितळवून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये हा गूळ चाळून घ्या आणि गुठळ्या असतील तर काढून टाका. आता त्यामध्ये १ कप पाणी घालून उकळी आणा. आणखी दोन मिनिटे गॅसवर ठेवा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, हे मिश्रण घट्ट सोनेरी तपकिरी रंगाच्या सिरपसारखे दिसले पाहिजे. हे सिरप रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि बाळाच्या लापशीमध्ये गोडीसाठी वापरा.
लहान बाळांच्या आरोग्यासाठी गुळाचे अनेक फायदे आहेत, परंतु तुमच्या बाळाच्या आहारात गुळाचा समावेश करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. तुमच्या बाळाला गूळ देण्याचेही काही धोके आहेत, त्यामुळे साधारणपणे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना गूळ देण्याची शिफारस केली जात नाही. मॅश केलेले केळं, खजुराची प्युरी किंवा सफरचंदाच्या प्युरीचा वापर करून तुम्ही लहान बाळांचे अन्न तुम्ही गोड करू शकता.
आणखी वाचा:
बाळांसाठी साबुदाणा – फायदे आणि पाककृती
बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी