In this Article
ब्रेड हा सर्वात सोपा, सर्वात कमी त्रासदायक आणि जास्त प्राधान्य असलेला न्याहारीचा पर्याय आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी तो सहज सोपा पर्याय तर असतोच परंतु बऱ्याचजणांना त्याची चव देखील आवडते. आपल्या मुलाच्या आहारामध्ये आपल्याला ब्रेडचा समावेश करावासा वाटेल, परंतु ते करण्याची योग्य वेळ कधी आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
बाळांना ब्रेड देणे सुरक्षित आहे का?
ब्रेड मुलांसाठी चांगला आहे का? आपल्या छोट्या बाळाच्या पौष्टिक गरजा सर्वात महत्वाच्या आहेत, म्हणून त्याविषयी तुम्हास अगोदर माहित असणे आवश्यक आहे. बाळाला ब्रेड देणे हे त्याच्या वयावर अवलंबून आहे. तसेच त्याला ब्रेडची ऍलर्जी आहे का हे सुद्धा तपासून पाहणे आवश्यक आहे. सर्वात आधी तुम्ही तुमचे बाळ सहा महिन्यांचे होईपर्यत त्याला ब्रेड किंवा कुठलेही घनपदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देणे टाळले पाहिजे. तुम्ही बाळावर कुठलेही प्रयोग करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी शिफारस आम्ही करतो. तुमच्या बाळाच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तुम्ही सुरक्षितपणे तुमच्या बाळाच्या आहारात ब्रेडचा समावेश करू शकता.
तुम्ही बाळाला ब्रेड केव्हा देऊ शकता?
तुम्ही तुमच्या बाळाला ब्रेड बटर केव्हा देऊ शकता, हा तुमचा प्रश्न असेल. पण बाळाला ब्रेडची ऍलर्जी नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच तुम्ही बाळाला ब्रेड बटर देऊ शकता. तसेच तेव्हा तुमच्या बाळाचे वय ६ महिने असणे सुद्धा गरजेचे आहे. खरंतर, बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर बाळाच्या आहारात ब्रेडचा समावेश करणे चांगले.
मुलांसाठी कोणता ब्रेड सर्वोत्तम आहे?
तुम्हाला चिंता वाटण्याजोगा पुढचा प्रश्न म्हणजे बाळासाठी सर्वोत्कृष्ट ब्रेड कुठला? बाजारात ब्रेडचे खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे गव्हाच्या पिठाचा ब्रेड, संपूर्ण धान्य ब्रेड, कमी मीठ असलेला ब्रेड, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड इत्यादी होत. ह्यापैकी एक पर्याय निवडणे म्हणजे तुमच्यासाठी ते गोंधळात टाकणारे असू शकते. ब्राऊन ब्रेड मध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात कारण तो संपूर्ण धान्यांपासून बनवलेला असतो तर दुसरीकडे व्हाईट ब्रेड मध्ये पोषणमूल्ये नसतात कारण हा ब्रेड रिफाईंड पिठापासून बनवलेला असतो. तथापि, ब्राऊन ब्रेड मधील तंतुमय पदार्थ छोट्या बाळांसाठी योग्य नसतात कारण त्यामुळे त्यांचे पोट भरते आणि भूक कमी होते आणि दुसरे अन्नपदार्थ किंवा पोषणासाठी जागा उरत नाही. तसेच आहारात जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्याने शरीरात जस्त आणि लोहाचे पोषण योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे, ब्राऊन ब्रेड ऐवजी बाळाला व्हाईट ब्रेड द्या. परंतु त्यामुळे बाळाला फार काही पोषण मिळणार नाही हे लक्षात असू द्या.
तुम्ही तुमच्या बाळाला किती ब्रेड द्यावा?
वरील विभागात चर्चा केल्याप्रमाणे, पांढर्या ब्रेडमध्ये बाळाच्या इष्टतम वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक महत्वाची पोषणमूल्ये नसतात. म्हणूनच, तुमच्या बाळाला जास्त प्रमाणात ब्रेड खायला देऊ नका. तुमच्या बाळाला ब्रेड देण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की दुकानात मिळणाऱ्या ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते – बाळाची प्रणाली जास्त प्रमाणात मीठ हाताळू शकत नाही. त्यामुळे बाळाला जास्त प्रमाणात ब्रेड देऊ नका. आम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा त्याच्या आहारात थोड्या प्रमाणात ब्रेडचा समावेश करण्याची शिफारस करतो.
बाळांसाठी ब्रेडच्या सोप्या पाककृती
आपल्या लहान बाळाला ब्रेडची ओळख करून देण्यासाठी पर्यायांचा विचार करता आहात का? येथे आमच्याकडे बाळांसाठीच्या काही सुलभ, स्वादिष्ट ब्रेड रेसिपी आहेत. तथापि, ब्रेड किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ बाळाला देण्यापूर्वी बाळाला ऍलर्जी नसल्याची खात्री करा. खाली नमूद केलेल्या रेसिपीमधील घटक अन्यथा सुरक्षित आहेत परंतु बाळांना त्याची ऍलर्जी येऊ शकते. म्हणूनच बालरोगतज्ज्ञांद्वारे बाळाची तपासणी करून घ्या आणि जेव्हा आपल्या बाळाचे वय १ वर्षापेक्षा जास्त असेल तेव्हाच बाळाला अशा प्रकारचे खाद्यपदार्थ द्या.
१. जाम आणि ब्रेड फिंगर्स
बाळांना जामची चव आवडेल आणि हा एक छान गोड पदार्थ आहे.
साहित्य
- पांढरा ब्रेड
- कोणताही जाम (आंबा, स्ट्रॉबेरी किंवा मिश्रित फळांचा, त्यामध्ये सर्व नैसर्गिक घटक आहेत हे सुनिश्चित करा)
कसे तयार करावे
- ब्रेड घ्या आणि त्याच्या कडा कापून घ्या.
- ब्रेडच्या लांब पट्ट्या कापून घ्या.
- ब्रेड वर भरपूर जाम पसरवा, आणि सर्व्ह करा
२. लोणी आणि ब्रेड फिंगर्स
आपल्या बाळासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.
साहित्य
- पांढर्या ब्रेडचे तुकडे
- लोणी किंवा तूप
कसे तयार करावे
- ब्रेडच्या खडबडीत बाजू कापून घ्या.
- लोणी किंवा तूप ह्यांचा एक छान थर पसरवा.
- ब्रेडचे स्लाइस कापून सर्व्ह करा
३. फ्रेंच टोस्ट
आपल्या बाळाला कुठली चव आवडते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तथापि, या रेसिपीमध्ये अंडी आहेत, त्यामुळे तुमच्या मुलास अंड्याची ऍलर्जी तर नाही ना हे तपासून पहा.
साहित्य
- अंडे – १ संपूर्ण
- ब्रेड – लहान चौकोनी किंवा लांब तुकडे
- साखर किंवा चवीनुसार मीठ
- तळण्याचे लोणी
कसे तयार करावे
- एका भांड्यात अंडे फोडून घ्या.
- अंडी छान फेटून घ्या. साखर घालून मिक्स करा. मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
- पॅन गरम करून घ्या आणि त्याला लोणी लावून घ्या.
- अंड्याच्या मिश्रणामध्ये ब्रेडचे तुकडे घाला आणि प्रत्येक तुकड्याला मिश्रणाचे चांगले कोटिंग करून घ्या. गरम पॅनमध्ये ठेवा.
- दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्या.
- तुमच्या बाळाला गरम फ्रेंच टोस्ट सर्व्ह करा.
४. पीनट बटर आणि ब्रेड फिंगर्स
ही कृती शेंगदाण्याच्या पौष्टिक फायद्यासह येते. तथापि, आपल्या बाळाला शेंगदाणाची ऍलर्जी तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या.
साहित्य:
- पांढर्या ब्रेडचे तुकडे
- पी नट बटर (घरगुती तयार केलेले चांगले)
- ब्रेड टोस्ट करण्यासाठी काही लोणी
कसे तयार करावे
- पॅन गरम करा आणि त्याला लोणी लावून घ्या.
- दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
- गॅस वरून पॅन खाली उतरवून घ्या. टोस्ट वर पी नट बटर पसरवा.
- त्याचे लहान तुकडे करा आणि आपल्या बाळाला खायला द्या.
सावधगिरी
दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये ऍलर्जी निर्माण होण्याची आणि बाळाच्या आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची उच्च क्षमता असते. अंड्याच्या पांढऱ्या बलकामुळे सुद्धा ऍलर्जी होते. फळे मुख्यत्वे लहान मुलांसाठी सुरक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी फ्रुक्टोज इंटॉलरन्समुळे काही बाळांना ते सहन करणे कठीण वाटू शकते. गहू, ओट्स, राई आणि बार्लीमध्ये ग्लूटेन नावाचे प्रोटीन असते जे काही पचन संस्थेच्या विकारांमुळे पचण्यास कठीण असते. पीनट ऍलर्जी ही जगातील सर्वात सामान्य अन्नपदार्थांच्या ऍलर्जी पैकी एक आहे. जर आपण वरील खाद्यपदार्थ आपल्या बाळाला देत असाल तर, कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये अशा प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी नाही ना हे तपासून पाहणे चांगले.
बाळांसाठी ब्रेडला पर्याय
ज्या कुटुंबासाठी ब्रेड हा आहारातील एक मुख्य भाग आहे त्यांना कदाचित आपल्या बाळाच्या आहाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी कोणते पर्याय जोडता येतील असा प्रश्न पडू शकतो. बरं, असे बरेच आरोग्यदायी पर्याय आहेत जे तुम्ही करून पाहू शकता.
- पिठाचे बनविलेले पॅनकेक्स
- ओटकेक्स
- कॉर्न केक्स किंवा राईस केक्स
ब्रेड मुलांसाठी चांगला असतो (जर त्यांना ऍलर्जी नसेल तर नक्कीच!) परंतु जास्त प्रमाणातील प्रत्येक गोष्टीचा आपल्या बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, बाळ १ वर्षांचे झाल्यावर त्याच्या आहारात मध्यम प्रमाणात ब्रेडचा समावेश करा. आपल्या बाळाच्या आहारात कोणत्याही नवीन पदार्थाचा समावेश करण्यापूर्वी आपल्या बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
बाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का?
बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का?