In this Article
तुम्ही गर्भावस्थेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पदार्पण करत आहात. हा टप्पा ४०व्या आठवड्यांपर्यंत असणार आहे आणि तुम्ही तेव्हा बाळाला जन्म देणार आहात, किती छान भावना आहे ना!
तिसऱ्या तिमाहीचा कालावधी हा ७व्या महिन्यापासून ते ९व्या महिन्यांपर्यंत असतो. प्रसूती कळा, प्रसूती दिनांकाच्या २ आठवडे आधीपासून सुरु होण्याची शक्यता खूप जास्त असते.
ह्या महत्वाच्या कालावधीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांना आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा भेटले पाहिजे.
गर्भारपणाच्या २८व्या आठवड्यातील तुमचे बाळ
२८व्या आठवड्यापर्यंत तुमचे बाळ डोळे उघडून मिटू शकते आणि बाळाची दृष्टी विकसित होत असते. बाळाला तुमच्या पोटातला मंद प्रकाश जाणवतो. बाळाच्या छोट्याश्या मेंदूमध्ये कोट्यवधी चेतापेशी तयार होत असतात आणि बाळ, डोळे मिचवकणे, स्वप्ने बघणे, आणि स्वतःच्या शरीराचे तापमान राखणे इत्यादी कौशल्ये आत्मसात करू लागते.
तिसऱ्या तिमाहीमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा बदल म्हणजे कूर्चेपासून बाळाची हाडे विकसित होणे हा होय. हा बदल ७ व्या आणि ८ व्या महिन्यात दिसून येतो. तुम्ही कॅल्शिअमने समृद्ध आहार घेत आहात ह्याची खात्री करा, कारण तुमच्या बाळाला हाडांच्या विकासासाठी कॅल्शिअमची गरज भासते.
तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची पंचेंद्रिये विकसित होतील. ह्यामध्ये बाळाची स्पर्शाची संवेदना विकसित होईल (२९ किंवा ३०व्या आठवड्यात) तसेच इतर संवेदना जसे की प्रकाश समजणे, तुम्ही काय खात आहात ह्याची चव समजणे, तसेच तुमचा आवाज ऐकणे हे सगळं ३१व्या आठवड्यांपर्यंत होते.
बाळाचा आकार केवढा असतो?
जेव्हा तुम्ही २८ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा बाळाचा आकार खूप मोठ्या वांग्याएवढा असतो. बाळाचे वजन साधारणपणे २.२५ पौंड्स (अंदाजे १. ०२ किलो) इतके असते. आता बाळाची लांबी १६ इंच इतकी असते.
तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ वेगाने होत असते कारण त्यांची वाढ ४०व्या आठवड्यापर्यंत १६ इंच ते १९-२२ इंच इतकी होते. बाळाच्या उंचीसोबत बाळाचे वजन सुद्धा वाढते. २८व्या आठवड्याच्या सुरुवातीस असलेले बाळाचे १ किलो वजन ४०व्या आठवड्यात २-४ किलो असते. तुमचे छोटे बाळ प्रत्येक दिवसागणिक मोठे होते आहे.
शरीरात होणारे बदल
तुमच्या पोटात होणाऱ्या बाळाच्या विकासासोबत तुम्हाला गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान खूप बदल जाणवतील.
पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसणे: गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर त्वचा जास्त ताणली गेल्याने स्ट्रेच मार्क्स तुमच्या पोटाच्या त्वचेवर दिसतात. हे बरेचदा आनुवंशिक असते, जर तुमच्या आईला त्यांच्या गर्भारपणादरम्यान स्ट्रेच मार्क्स असतील तर तुम्हाला सुद्धा ते असण्याची शक्यता असते.
रात्रीची झोप न लागणे: तिसऱ्या तिमाहीमध्ये हे सामान्य आहे आणि त्यामागे बरीच कारणे आहेत जसे की बाळाचे पाय मारणे, वाढलेला पोटाचा घेर, वारंवार बाथरूमला जाणे आणि अशी इतर बरीच कारणे.
पायांना सूज येणे: ह्यास इंग्रजीमध्ये oedema असे सुद्धा म्हणतात, वजन वाढीमुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे पायांना सूज येते.
तिसऱ्या तिमाहीत सामान्यपणे आढळणारे बदल म्हणजे स्तनांमधून स्त्राव गळू लागतो आणि तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील रक्तवाहिन्या फुगीर होतात.
२८ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
शारीरिक बदलांव्यतिरिक्त तिसऱ्या तिमाहीदरम्यान तुम्हाला काही हलकी आणि गंभीर लक्षणे जाणवतील.
पोटात दुखणे: वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी पोट ताणले गेल्यामुळे तुम्हाला पोटात पेटके किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात.
थकवा: तिसऱ्या तिमाहीत, गर्भारपणामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल त्यासाठी तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे आणि कार्यरत राहिले पाहिजे त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही.
पाठदुखी: पोटाच्या वाढणाऱ्या घेरामुळे तुमच्या पाठीच्या कण्यावर खूप दाब पडतो आणि पाठदुखी होते. पाय वर करून बसल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
रेस्टलेस लेग सिन्ड्रोम: काही गर्भवती महिलांना पायाच्या खालील भागात विचित्र संवेदना जाणवतात, त्यामुळे झोपल्यावर किंवा आराम करत असताना सतत पाय हलवत ठेवण्याची संवेदना जागृत होते. पाय ताणून ठेवल्यास किंवा पायांना मालिश केल्यास रेस्टलेग सिंड्रोम कमी होण्यास मदत होते किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लोह पूरक गोळ्यांची मागणी करू शकता.
प्रिक्लेम्प्शिया: ज्या स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यामध्ये हे आढळते. प्रिक्लेम्प्शिया च्या सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांमध्ये चेहऱ्याला सूज येणे, डोळ्यांखाली सूज येणे, वजनात अचानक वाढ होणे, सततची डोकेदुखी, मळमळणे किंवा उलट्या होणे इत्यादी लक्षणे आढळतात. ह्याचे स्वरूप जर गंभीर असेल तर त्यामुळे आयुष्याला धोका पोहचू शकतो त्यामुळे लक्षणे आढळल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
स्तनांमधून दूध गळणे: आतापर्यंत तुमच्या शरीरातून बाळास पोषणमूल्यांचा पुरवठा होत होता तथापि आता तुमच्या स्तनांमधून दूध गळू लागेल.
श्वास गुदमरणे: जसजशी बाळाची वाढ होते, तसे तुमच्या फुप्फुसांवर खूप दाब येतो त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करावे लागतात.
सामान्यपणे आढळणाऱ्या इतर लक्षणांमध्ये तुम्हाला चक्कर येणे, पोट फुगणे, पोटात वायू होणे, नाक चोंदणे, हिरड्यांमधून रक्त येते इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात पोटाचा आकार
२८व्या आठवड्यात तुमचे बाळ पोटामध्ये प्रसूतीच्या तयारीसाठी योग्य स्थितीत (डोके खाली ) राहिले पाहिजे. तुमच्या पोटाची उंची म्हणजेच तुमच्या गुह्यभागापासून ते गर्भाशयाच्या वरच्या भागापर्यंतचे अंतर साधारणपणे २६-३० सेंमी इतके असते. जर तुम्हाला जुळी बाळे होणार असतील तर पोटाची उंची मोजणे अशक्य आहे.
तुम्ही तुमच्या बाळाच्या हालचालीवर दिवसभर लक्ष ठेवले पाहिजे. १० हालचालींसाठी बाळाला किती वेळ लागतो हे तपासून पहा. तो वेळ २ तासांपेक्षा कमी असावा.
गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यातील सोनोग्राफी
गर्भारपणाच्या २८व्या आठवड्यानंतर तुमचे बाळ जास्त चरबीची निर्मिती करीत आहे, त्यामुळे बाळाची त्वचा गुळगुळीत होत चालली आहे. तुमच्या बाळाची फुप्फुसे श्वसनाची प्रक्रिया सुरु करण्याइतपत परिपक्व झाली आहेत.
जर गर्भारपणात काही गुंतागुंत नसेल तर २८व्या आठवड्यात डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करण्यास सांगणार नाहीत. आता तुम्हाला डॉक्टरांकडे वरचेवर जावे लागेल म्हणजेच साधारणपणे दर दोन आठवडयांनी किंवा महिन्यातून दोन वेळा.
आहार कसा असावा?
ह्या तिमाहीमध्ये तुमच्या बाळाची वेगाने वाढ होते. तुमच्या गर्भारपणातील २८व्या आठवड्यातील आहारातून बाळाला पोषण मिळेल. तथापि तुमच्या पोटाच्या आकारामुळे आणि नेहमी मळमळ होत असल्यामुळे तुम्हाला खाण्याची इचछा होणार नाही. त्यामुळे खूप खाण्याऐवजी, पोषणमूल्यानी समृद्ध अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात खा. दिवसभरात खूप अन्न एकदाच खाण्याऐवजी ६ किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा थोडे थोडे जेवण किंवा नाश्ता घ्या.
तिसऱ्या तिमाहीमध्ये डॉक्टर्स मासे खाण्याचा सल्ला देतात, कारण माशांमुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यास फायदा होतो. मॅकरेल आणि स्वार्डफिश सारखे उच्च प्रमाणात पारा असलेले मासे खाऊ नका.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
तुम्ही तुमच्या प्रसुती दिनांकाच्या जवळ जात आहात त्यामुळे काय करावे आणि करू नये ह्याविषयीच्या काही टिप्स सोबत देत आहोत.
हे करा
खाली काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये केल्या पाहिजेत
- तुम्ही तुमच्या जन्मपूर्व तपासणीच्या ठरवलेल्या वेळाने नियमित जात आहात ना ह्याची खात्री करा.
- बाळाच्या हालचाली वर लक्ष ठेवा.
- तुम्हाला भरपूर झोप आणि विश्रांती मिळत आहे ना ह्याची खात्री करा.
- तुमच्या व्यायामाचे दैनंदिन वेळापत्रक ठेवा.
हे करू नका
- गर्भारपणाच्या प्रत्येक टप्प्यावर काय करू नये ह्याची यादी खाली दिली आहे.
- धूम्रपान टाळा कारण त्यामुळे बाळाचे वजन घटते आणि श्वसनाचे प्रश्न निर्माण होतात.
- मद्यपान टाळा, कारण त्याचा बाळाच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो.
- कच्चे आणि अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाऊ नका.
- हॉट डॉग आणि सॉसेज खाणे टाळा.
- गरम पाण्याच्या टब मध्ये बसणे टाळा.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
तुमच्या पोटाच्या वाढत्या घेरामुळे तुम्हाला पोटाकडील भागात खूप अस्वस्थता जाणवेल आणि त्याचा दाब मणक्यावर सुद्धा पडेल. ओटीपोटात आणि कुल्ल्याच्या भागात जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर तुम्ही मॅटर्निटी बेल्ट ची सुद्धा खरेदी करू शकता. पाठीवरचा ताण कमी होण्यासाठी तुम्ही पट्टा सुद्धा खरेदी करू शकता.
व्हेरिकोज व्हेन्स आणि पायाचे दुखणे कमी होण्यासाठी गुडघ्यापर्यंत मॅटर्निटी कॉम्प्रेशन सॉक्स सुद्धा खरेदी करू शकता.
निष्कर्ष
ही तुमची तिसरी तिमाही आहे, तुम्हाला येणाऱ्या अस्वस्थतेमुळे निराशाजनक वाटू शकते, परंतु चांगली बातमी म्हणजे तुमची प्रसूतीची तारीख जवळ येत आहे आणि शेवटच्या काही महिन्यांचा त्रास सहन करून लवकरच तुम्ही गोड बाळाला जन्म देणार आहात.
मागील आठवडा: गर्भधारणा: २७वा आठवडा
पुढील आठवडा: गर्भधारणा: २९वा आठवडा