Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील प्रोजेस्टेरॉनची पातळी: चिन्हे, लक्षणे आणि उपचार

गरोदरपणातील प्रोजेस्टेरॉनची पातळी: चिन्हे, लक्षणे आणि उपचार

गरोदरपणातील प्रोजेस्टेरॉनची पातळी: चिन्हे, लक्षणे आणि उपचार

In this Article

गरोदरपणात, गर्भाची वाढ आणि विकास होत असताना स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. ह्या बदलांमधील मुख्य बदल म्हणजे संप्रेरकांच्या पातळीत वाढ होणे हा होय. गरोदरपणात महत्त्वाची भूमिका  असणारे एक संप्रेरक म्हणजे प्रोजेस्टेरॉन. गर्भवती स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी हे संप्रेरक खूप मह्त्वाचे कार्य करते.

प्रोजेस्टेरॉन म्हणजे काय?

प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांच्या शरीरात (अंडाशयात) तयार होणारे एक संप्रेरक आहे. हे संप्रेरक गर्भधारणेसाठी गर्भाशयाला तयार करत असते. ओव्यूलेशन दरम्यान स्त्रीला गर्भधारणा झाली तर गर्भधारणेची प्रक्रिया सोपी करण्यासाठी स्त्रीच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. पण जर स्त्रीच्या शरीरात  प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असेल, तर त्याचा गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्या स्त्रीचा गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो.

गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनची भूमिका काय आहे?

गरोदरपणात, प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक, प्लेसेंटा आणि गर्भाशय ह्या दरम्यानचा रक्त प्रवाह वाढवते. तसेच दूध तयार करण्यासाठी स्तन ग्रंथींच्या वाढीस उत्तेजन देते.

प्रोजेस्टेरॉनचा तुमच्या गर्भारपणावर कसा परिणाम होऊ शकतो?

खालील कारणांमुळे गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनला खूप महत्त्व आहे.

  • रोपण होण्यासाठी गर्भाशयाचे अस्तर तयार करते.
  • ओव्हुलेशन कालावधीच्या शेवटी आणि मासिक पाळीच्या संपूर्ण कालावधीत शरीराचे तापमान नियंत्रित करते.
  • गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी हे संप्रेरक गर्भाशयाचे अस्तर जाड करते.
  • हे संप्रेरक, गर्भाशयाकडील भागात रक्त आणि ग्लायकोजेनचा प्रवाह वाढवते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषक तत्व मिळतात.
  • प्रोजेस्टेरॉन संप्रेरक गर्भाशयाला घट्ट करते आणि म्युकस प्लग तयार करते. त्यामुळे जीवाणूंना गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखण्यास मदत होते.
  • हे संप्रेरक गर्भाशयाचे आकुंचन रोखण्यास मदत करते.
  • प्रोजेस्टेरॉन हार्मोन तुमच्या मासिक पाळीचे देखील नियमन करते.

प्रोजेस्टेरॉनची सामान्य पातळी काय आहे?

गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनची सामान्य पातळी खाली दिली आहे. तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून, आम्ही आठवडे आणि त्रैमासिकांवर आधारित माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉनला खूप महत्त्व असते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यात प्रोजेस्टेरॉन कसे वाढते हे माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा.

1. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात

गरोदरपणाच्या पहिल्या दोन आठवड्यात, अंडाशयातून सुमारे 1 ते 1.5 एनजी/मिली प्रोजेस्टेरॉन बाहेर पडते. तुम्ही गरोदर नसलात तरीसुद्धा तुमचे शरीर गर्भधारणेच्या तयारीसाठी प्रोजेस्टेरॉन तयार करेल. तुमच्या मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसापासून तुमच्या गरोदरपणाच्या कालावधीची गणना केली जाईल, परंतु तुम्ही दुसऱ्या आठवड्यापर्यंत गरोदर नसता.

2. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात

एकदा ओव्हुलेशन झाल्यानंतर, तुमच्या अंडाशयातील ग्रंथी प्रोजेस्टेरॉन तयार करण्यास सुरवात करतात. ह्या काळात तुमची प्रोजेस्टेरॉनची पातळी हळूहळू 2 ng/ml किंवा त्याहून अधिक वाढेल. हे संप्रेरक  अंड्याच्या रोपणाच्या अपेक्षेने गर्भाशयाच्या भित्तिका घट्ट होण्यासाठी उत्तेजित करेल. तिसर्‍या आठवड्यात अंड्याचे फलन झाल्यावर, तुमच्या प्रोजेस्टेरॉनची पातळी दररोज 1 किंवा 2 ng/ml ने वाढेल.

3. पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात

ह्या काळात तुमचे प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण 10 ng/ml आणि 29 ng/ml दरम्यान असू शकते. डॉक्टरांना पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात हे प्रमाण किमान 6 ng/ml ते 10 ng/ml अपेक्षित आहे. ह्या टप्प्यावर, तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन, गर्भ आणि प्लेसेंटाचा विकास करण्यास मदत करेल, तसेच तुमच्या रक्तवाहिन्यांच्या वाढीस सुद्धा मदत करेल. गरोदरपणात तुमच्या चेहऱ्यावर येणारे तेज हे प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांमुळे येते. परंतु कधीकधी ह्यामुळे पुरळ येऊन त्वचेला खाज येऊ शकते.

4. सातव्या ते चौदाव्या आठवड्यापर्यंत

सातव्या आठवड्यापासून, प्रोजेस्टेरॉन अंडाशयाऐवजी प्लेसेंटामध्ये तयार होईल. त्यामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, पहिल्या तिमाहीच्या शेवटी तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण पुन्हा वाढेल. ह्या काळात तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण 15 ते 60 ग्रॅम/मिलीच्या  दरम्यान असू शकते. एकाधिक गर्भधारणा असलेल्या स्त्रियांसाठी ह्याचे प्रमाण जास्त असू शकते. ह्या काळात हे प्रोजेस्टेरॉन संप्रेरक तुमच्या स्नायूंना शिथिल करण्यास मदत करेल. त्यामुळे तुमच्या शरीराचा विस्तार होऊन वाढत्या बाळाला सामावून घेणे सोपे होईल. ह्यामुळे गरोदरपणात लवकर कळा सुरु होत नाहीत. परंतु ह्या काळात प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे अपचन, छातीत जळजळ, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध इत्यादी विकार होऊ शकतात.

तिमाहीनुसार

गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनच्या पातळीबद्दल तिमाहीनुसार खालीलप्रमाणे माहिती खाली दिली आहे.

1. पहिल्या तिमाही

तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉनची पातळी 9 ते 47 एनजी/एमएलच्या दरम्यान असू शकते.

2. दुसरी तिमाही

दुसऱ्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉनची सामान्य पातळी 17 आणि 147 ng/ml च्या दरम्यान असते.

3. तिसरी तिमाही

55 आणि 300 ng/ml ह्या दरम्यान प्रोजेस्टेरॉनची पातळी तिसऱ्या तिमाहीत सामान्य मानली जाते.

कमी प्रोजेस्टेरॉन पातळीचे प्रमाण किती असते?

एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भपात झाला आहे का ते पाहण्यासाठी पहिल्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉनच्या पातळीचे परीक्षण केले जाते. गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यात प्रोजेस्टेरॉनची पातळी 6 ते 10 ng/ml पेक्षा कमी असते. जर तुम्हाला प्रोजेस्टेरॉनच्या कमी पातळीबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही रक्त तपासणी करून घेऊ शकता. चाचणीचे निकाल एका दिवसात तुम्हाला दिले जातील. गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यात 3 पेक्षा जास्त गर्भपात झालेल्या स्त्रियांमध्ये, गर्भपात होण्याची शक्यता टाळण्यासाठी डॉक्टर प्रोजेस्टेरॉनच्या उपचारांची शिफारस करतात.

प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होण्याची काय कारणे आहेत?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होण्याची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत

  • :एक्टोपिक गर्भधारणा – जेव्हा फलित अंड्याचे रोपण फॅलोपियन ट्यूब, अंडाशय, श्रोणि किंवा उदर पोकळी किंवा गर्भाशय ग्रीवामध्ये होते तेव्हा ती एक्टोपिक गर्भधारणा असते. एक्टोपिक गर्भधारणेचे वेळेवर निदान केले पाहिजे. त्यावर वेलेलेअर उपचार न केल्यास जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते.
  • विशिष्ट गुणसूत्रांच्या विकृतींमुळे गर्भ लवकर नष्ट होणे.
  • पूर्ण किंवा अपूर्ण गर्भपात. 10ते 25 टक्के गरोदरपणांमध्ये असे घडते.
  • गर्भपाताचा धोका किंवा अपरिहार्य गर्भपात.
  • BHCG च्या कमी पातळीमुळे रासायनिक गर्भधारणा होते. रासायनिक गर्भधारणा म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातच गर्भपात होतो. गर्भधारणा झाल्यावर पाच आठवड्यांच्या आत असे होते.
  • कॉर्पस ल्यूटियम लवकर नष्ट होणे: अंडाशयात कॉर्पस ल्यूटियम प्रोजेस्टेरॉन तयार करत असते. त्यानंतर प्लॅसेंटा प्रोजेस्टेरॉन तयार करू लागते.

गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनच्या कमी पातळीची सामान्य चिन्हे आणि लक्षणे

प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होणे हे गर्भपाताचे लक्षण आहे. जरी तुम्हाला इतर काही कारणांमुळे स्पॉटिंग आणि रक्तस्त्राव होत असला तरीही तुमच्या प्रोजेस्टेरॉनच्या पातळीची चाचणी घेणे केव्हाही चांगले. तुमची गर्भधारणा टिकेल की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतील. जर तुमची प्रोजेस्टेरॉनची पातळी खूप कमी असेल, तर तुम्ही बाळाला जन्म देऊ शकणार नाही. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कमी प्रोजेस्टेरॉन पातळीचे काय दुष्परिणाम आहेत?

https://cdn.cdnparenting.com/articles/2018/02/441552133-H.webp

जर गरोदरपणात  प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचे दुष्परिणाम  होऊ शकतात:

  • गर्भपात
  • बाळाचा अकाली जन्म
  • रक्तातील साखरेची पातळी कमी होणे
  • योनिचा कोरडेपणा

प्रोजेस्टेरॉन पातळी जास्त असेल तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत?

गरोदरपणात तुमची प्रोजेस्टेरॉनची पातळी जास्त असल्यास, तुम्हाला खालील दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो:

1. मूड स्विंग्स

प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील वाढ ही मूड स्विंग आणि नैराश्याशी संबंधित असते.

2. चोंदलेले नाक

गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनमुळे स्नायू शिथिल होतात. हार्मोनच्या ह्या अस्थिर पातळीमुळे नाकपुड्याचे स्नायू शिथिल होऊ शकतात आणि त्यामुळे नाक चोंदले जाऊ शकते.

3. डोकेदुखी

प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्याने मेंदूमधील रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात. परिणामी, स्त्रियांना मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखी होऊ शकते.

4. बद्धकोष्ठता

ह्या संप्रेरकामुळे आतड्यांचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे आतड्यातून अन्न पुढे सरकणे कठीण होते. आणि म्हणून बद्धकोष्ठता होते.

5. स्तनांची कोमलता

ह्या संप्रेरकामुळे तुमच्या स्तनांमध्ये कोमलता येऊन स्तन अधिक संवेदनशील होऊ शकतात.

6. थकवा

हे संप्रेरक मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्याने, तीव्र थकवा आणि झोपेची भावना येऊ शकते.

गरोदरपणातील कमी प्रोजेस्टेरॉन पातळीवर उपचार

प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असल्यास स्त्रीला गर्भधारणा होणे अत्यंत कठीण होऊ शकते. जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्ही प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकाची योग्य पातळी राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यामुळे गर्भधारणा पूर्ण होण्यास मदत होते. तुमची प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असल्यास,  डॉक्टर तुम्हाला विविध उपचार पद्धती सुचवतील. गरोदरपणात कमी प्रोजेस्टेरॉनसाठी काही सामान्य उपचार खाली सांगितलेले आहेत –

  • हॉर्मोन थेरपी – गर्भवती स्त्रियांमध्ये, गर्भाशयाचे अस्तर मजबूत करण्यासाठी आणि बाळाला जन्म देण्याची शक्यता वाढवण्यासाठी ही थेरपी केली जाते.
  • डॉक्टर काही क्रीम आणि जेल देखील सुचवू शकतात. ह्या क्रिम्सचा वापर स्थानिक क्षेत्रांसाठी  केला जाऊ शकतो. तसेच काही क्रीम योनीतून वापरल्या जाऊ शकतात. परंतु त्याआधी डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.
  • कमी प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमुळे प्रजनन समस्या उद्भवतात तेव्हा डॉक्टर सपोसिटरीजची शिफारस करू शकतात. योनि सपोसिटरीज ही विशेष ऍप्लिकेटरसह योनीमध्ये घातली जाणारी औषधे आहेत. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधे वापरावीत.
  • संप्रेरक-रिलीझिंग यंत्रणेसह योनीच्या रिंग देखील वापरल्या जाऊ शकतात. तोंडातून घेतल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा कमी वेगाने संप्रेरके सोडली जातात.
  • प्रोव्हेरा सारख्या गोळ्या डॉक्टरांनी लिहून दिल्यासच घेतल्या जाऊ शकतात.

प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ओव्हर-द-काउंटर औषधांचा वापर करू नका हे खूप महत्त्वाचे आहे कारण ही औषधे घेण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असते. तसेच,  तुम्ही जी  औषधे आणि पूरक आहार घेता त्यासाठी योग्य प्रिस्क्रिप्शन घेणे महत्वाचे आहे.

घरगुती उपाय

येथे काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही तुमच्या प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही करून बघू शकता.

1. तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी6आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा

एस्ट्रोजेनचे विघटन करण्यासाठी यकृताला व्हिटॅमिन बी 6 ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे इस्ट्रोजेनचे विघटन कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे शरीरात त्याची पातळी वाढते. म्हणून संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होऊ शकते. त्याचा प्रतिकार करण्यासाठी, तुम्ही सीफूड, अक्रोड, संपूर्ण धान्य, दुबळे लाल मांस, कुक्कुटपालन, बीन्स, पालक आणि बटाटे यांसारखे व्हिटॅमिन बी 6 समृद्ध असलेले पदार्थ खाऊ शकता. तुम्ही व्हिटॅमिन सी घेणे देखील गरजेचे असते. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की,  सहा महिने, दररोज 750 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी घेतल्यास शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते. परंतु व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात घ्या. कारण कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी समृध्द पदार्थांचे सेवन वाढवण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. झिंक युक्त पदार्थांचे सेवन करा

शरीरात प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन वाढवण्यासाठी झिंक महत्त्वाचे आहे. झिंकमुळे पिट्यूटरी ग्रंथी अंडाशयातील फॉलिकल्सला उत्तेजित करणारे हार्मोन्स सोडते. त्यामुळे ओव्हुलेशन होते आणि इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन होते. रेड मीट, टरबूज, डार्क चॉकलेट, भोपळा, चणे, स्क्वॅश बियाणे इत्यादी पदार्थांमध्ये झिंक खूप प्रमाणात आढळते.

3. मॅग्नेशियम असलेले पदार्थ खा

शरीरात प्रोजेस्टेरॉनचे योग्य प्रमाण राखण्यासाठी मॅग्नेशियम देखील महत्वाचे आहे. कारण त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन राखले जाते. तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीन, भोपळा, भेंडी, पालक, नट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता कारण हे सगळे पदार्थ मॅग्नेशियम समृद्ध आहेत. तुम्ही पूरक आहार देखील घेऊ शकता.

प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्याचे काही इतर मार्ग

या घरगुती उपायांव्यतिरिक्त, प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्याचे इतर मार्ग आहेत. तुम्ही खालील उपाय करू शकता.

1. तुमची तणाव पातळी कमी करा.

खूप ताण घेतल्यास त्याचा ऍड्रिनल ग्रंथींवर परिणाम होतो. त्यामुळे कोर्टिसोलचे उत्पादन कमी होते. तणाव संप्रेरकांमुळे मूत्रपिंड प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे कॉर्टिसॉलमध्ये रूपांतर करू शकतात. कोर्टिसोल पातळी जास्त असल्यास ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणून, आपण आपल्या तणावाची पातळी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यासाठी क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. तुम्ही लिखाण करू शकता, वाचू शकता, संगीत ऐकू शकता किंवा ध्यान करू शकता.

2. योग्य वजन राखा

तुमचे वजन जास्त असल्यास, तुमचे शरीर अधिक एस्ट्रोजेन तयार करेल. त्यामुळे प्रोजेस्टेरॉनच्या पातळीचे असंतुलन होऊ शकते. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेनचे प्रमाण सामान्य असावे. वजन कमी केल्याने तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन वाढत नसले तरी त्यामुळे तुमची संप्रेरकांची पातळी संतुलित होते.

3. जास्त व्यायाम करू नका.

गरोदरपणात व्यायाम करणे चांगले आहे कारण त्यामुळे तुम्हाला तणावाचे व्यवस्थापन करण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत होऊ शकते. परंतु जर तुम्ही जास्त व्यायाम केला तर त्यामुळे तुमचे शरीर प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त ताणतणाव संप्रेरक तयार करू शकते. म्हणूनच जर तुम्हाला गरोदरपणात व्यायाम सुरु ठेवायचा असेल तर तुम्ही पोहू शकता, चालू शकता किंवा योगाभ्यास करू शकता. कठोर व्यायाम पूर्णपणे टाळा आणि व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. खोट्या सकारात्मक प्रोजेस्टेरॉन पातळीचा अर्थ काय आहे?

गर्भधारणा आणि ओव्हुलेशन व्यतिरिक्त इतर कारणास्तव तुमच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते तेव्हा ती खोटी सकारात्मक प्रोजेस्टेरॉनची पातळी असते. तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • गर्भाशयाचा कर्करोग
  • ऍड्रिनल कर्करोग
  • प्रोजेस्टेरॉन गोळ्या किंवा सपोसिटरीज घेणे
  • जन्मजात ऍड्रिनल हायपरप्लासिया हा विकार असल्याचा त्याचा ऍड्रिनल ग्लॅण्डसवर परिणाम होतो.
  • इतर हार्मोन्सच्या क्रॉसरिअॅक्शनमुळे झालेल्या प्रयोगशाळेतील चुकांमुळे देखील ह्या संप्रेरकाची पातळी जास्त दिसू शकते.

2. जर प्रोजेस्टेरॉन खोटी सकारात्मक गर्भधारणा एचसीजी चाचणी दाखवत असेल तर?

गर्भधारणा चाचणीचे परिणाम एचसीजी (ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन) संप्रेरकांच्या पातळीवर आधारित असतात. हे गर्भधारणा संप्रेरक प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांसारखे नाही.

3. गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असल्यास ते गर्भपाताचे लक्षण असू शकते का?

प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असणे हे एक्टोपिक गर्भधारणेचे सूचक असू शकते. म्हणजेच गर्भधारणा गरोदरपणाचे संपूर्ण दिवस भरेपर्यंत टिकू शकत नाही. गरोदरपणाच्या 6व्या आठवड्यात प्रोजेस्टेरॉनची पातळी 6 ते 10 ng/ml पेक्षा कमी असल्यास तुम्हाला गर्भपात होण्याचा खूप जास्त धोका असू शकतो.

4. मी घरी प्रोजेस्टेरॉनची पातळी कशी तपासूशकते?

आपण घरी प्रोजेस्टेरॉन चाचणी घेऊ शकता. ही एक सोपी रक्त चाचणी आहे. ह्या चाचणीद्वारे रक्तातील  प्रोजेस्टेरॉन संप्रेरक शोधले जाते. 28-दिवसांचे मासिक पाळी चक्र असल्यास ओव्हुलेशन झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी 21 व्या दिवशी चाचणी घ्या.

5. प्रोजेस्टेरॉनचा आयव्हीएफवर कसा परिणाम होतो?

इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) चक्रादरम्यान अकाली ओव्हुलेशन  टाळण्यासाठी वारंवार औषधांचा वापर केला जातो. दुर्दैवाने, ह्या औषधांचा तुमच्यावर परिणाम होतो. गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी झाल्यावर तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंटचा सल्ला देऊ शकतात. अशा प्रकारे, गर्भ तुमच्या गर्भाशयात प्रवेश करू शकतो आणि गर्भाशयात विकसित होऊ शकतो. असंख्य शैक्षणिक संशोधनांनी प्रोजेस्टेरॉन-आधारित IVF उपचारांच्या यशाचे प्रमाण तपासले आहे. या संशोधनानुसार, प्रोजेस्टेरॉन-आधारित IVF च्या यशाचा दर खूप जास्त आहे.

गर्भारपण सुरळीत पार पाडण्यासाठी प्रोजेस्टेरॉन आवश्यक आहे. तसेच गरोदरपणातील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी योग्य असणे गरजेचे अस्ते. म्हणूनच, गरोदरपणात  तुमच्या प्रोजेस्टेरॉनची पातळी तपासण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात नीट लक्ष ठेऊन काळजी घ्या आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास वेळेवर उपचार घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article