In this Article
पहिले गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक टप्पा आहे. जर तुम्ही गरोदर असाल, तर एका जीवाचे तुम्ही पालनपोषण करत आहात ह्या विचाराने तुम्ही भारावून जाल. पण गरोदरपणामुळे तुमच्या चिंतेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकेल. तुम्ही खात असलेला प्रत्येक पदार्थ तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे की नाही हा विचार तुमच्या मनात येईल. मद्यपान करणे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे गरोदरपणावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ते टाळलेच पाहिजे.
व्हिडिओ: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत घ्यावयाची महत्त्वाची काळजी
गरोदरपणाची पहिली तिमाही हा एक महत्वाचा टप्पा आहे. ह्या काळात गर्भाचा वेगाने विकास होत असतो आणि म्हणूनच त्याची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. गर्भपात टाळण्यासाठी आणि पहिल्या तिमाहीत बाळाला होणाऱ्या जन्मदोषांची शक्यता कमी करण्यासाठी गरोदर स्त्रीने गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यात सावधगिरी बाळगली पाहिजे.
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात घ्यायची काळजी
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून त्यांचे पालन करण्याची गरज आहे. सावधगिरी बाळगल्यास तुमचे गरोदरपण निरोगी जाईल.
१. धूम्रपान टाळा
जर तुम्ही गर्भवती असाल आणि धूम्रपान करत असाल तर ते आता सोडण्याची वेळ आली आहे. गरोदरपणात धूम्रपान केल्याने गर्भपात, अकाली प्रसूती आणि एक्टोपिक गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. धुरामुळे गर्भाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि निरोगी प्रसूतीची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे सिगरेटला ‘नाही‘ म्हणा आणि तुम्हाला निरोगी गर्भारपण हवे असल्यास तंबाखूमुक्त जीवनाचा स्वीकार करा.
२. मद्यपान टाळा
गरोदरपणात मद्यपान करणे सुरक्षित आहे हे सिद्ध करणारा कोणताही अभ्यास नाही, म्हणून मद्यपान टाळणे केव्हाही चांगले. मद्यपान केल्यास बाळाच्या मेंदूचा विकास नीट होत नाही. तसेच, गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांत मद्यपान केल्याने गर्भपात सुद्धा होऊ शकतो. म्हणून गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत आणि कदाचित नंतरही मद्यपान न करणे चांगले. त्यामुळे गरोदर असताना अल्कोहोलपासून दूर रहा आणि निरोगी गरोदरपणाचा आनंद घ्या.
३. तुमचे कॅफिनचे सेवन मर्यादित करा
तुम्हाला जर कॉफी आवडत असेल तर कॉफी बंद करण्याचा विचार तुम्हाला दुःखी करू शकतो, परंतु तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे तुम्ही पूर्णपणे कॉफी सोडण्याची अजिबात गरज नाही – तुम्ही गरोदर असलात तरीही कॉफीचा आनंद घेऊ शकता. गरोदरपणात कॉफी घ्या, पण तुम्ही फक्त १ कप कॉफी घेण्याची मर्यादा पाळा. जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो आणि त्याला जन्मजात दोष होऊ शकतात. दररोज एक कप म्हणजे २०० मिलिग्रॅम पेक्षा कमी कॅफेन घ्या, त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्रास होणार नाही. गरोदरपणात किती प्रमाणात कॅफेन घेणे सुरक्षित आहे हे तुमच्या डॉक्टरांना विचारा. काळजी घेणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे!
४. सौना आणि हॉट बाथ टाळा
उच्च तापमान गर्भाच्या विकासासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गरम पाणी अंगावर घेणे टाळा. जर तुम्हाला पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर टॉवेलमध्ये गुंडाळलेले हीटिंग पॅड वापरण्याचा विचार करा. परंतु हीटिंग पॅडचे तापमान 100°F किंवा 37°C पेक्षा जास्त नसावे.
५. पूरक औषधे आणि वेदनाशामक औषधे सावधगिरीने घ्या
वेदनाशामक औषधे आणि पूरक औषधे घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला काही औषधे लिहून देतील. तुम्ही पूरक औषधे किंवा वेदनाशामक औषधे घेत असाल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण तुम्ही सध्या घेत असलेल्या औषधांसोबत हर्बल सप्लिमेंट्स किंवा वेदनाशामक औषधांचा अतिवापर केल्यास ते गर्भाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते कारण काही रसायने नाळेतून रक्तप्रवाहात जाऊ शकतात.

६. समुद्री अन्न टाळा
सीफूड हे प्रथिने आणि चरबी ह्यांचा निरोगी स्रोत आहे. तरीसुद्धा शार्क, स्वॉर्डफिश आणि मार्लिन यांसारख्या काही माशांमध्ये विषारी पदार्थ आणि पारा ह्यांची पातळी उच्च असते. गरोदरपणात मासे खाणे बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत किंवा संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत समुद्री अन्न घेणे टाळा. तथापि, तरीही तुम्हाला आहारात माशांचा समावेश करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
७. तब्येतीला हानिकारक अन्न घेणे टाळा
जर तुमचे वजन योग्य असेल, तर तुम्हाला गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत कॅलरीजचे सेवन कमीत कमी ३०० ने वाढवावे लागेल. गरोदरपणाच्या पहिल्या प्रत्येक आठवड्यात १ पौंड (०.४ किलो) वजन वाढणे अपेक्षित आहे. परंतु तुम्ही संतुलित आहार घेऊन तब्येतीला हानिकारक असे अन्नपदार्थ टाळणे आवश्यक आहे.
८. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अन्न टिकण्यासाठी काही घटक घातले जातात. हे घटक गर्भाच्या विकासासाठी हानिकारक असतात. ह्या पदार्थांमध्ये सोडियम नायट्रेटचे काही अंश आणि कर्करोग निर्माण करणारे पदार्थ असतात. हे पदार्थ तुमच्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. याव्यतिरिक्त, अशा खाद्यपदार्थांमध्ये कीटकनाशके सुद्धा काही प्रमाणात आढळतात, म्हणूनच तुम्ही सेंद्रिय अन्नपदार्थांची निवड केली पाहिजे. तसेच प्रक्रिया केलेले किंवा पॅक केलेले अन्नपदार्थ घेणे टाळा. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून आणि सोलून घ्या.
९. फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घ्या
तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला फॉलीक ऍसिड सप्लिमेंट्स लिहून दिल्या असतील – तुमच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करा आणि ओमेगा–३ चे सेवन वाढवा कारण तुमच्या बाळाचे डोळे, मेंदू आणि मज्जातंतूंच्या योग्य विकासासाठी त्यांची गरज भासेल. व्हिटॅमिन डी घेणे देखील महत्त्वाचे आहे. अंड्यातील पिवळ बलक, फोर्टिफाइड दूध आणि दररोज सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेऊन तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता.
तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत स्वतःची काळजी घेण्यासाठी आणखी काही टिप्स
दुसर्या आणि तिसर्या तिमाहीची चांगली सुरुवात करण्यासाठी आणि प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी आम्ही इथे खाली काही टिप्स देत आहोत.
- भरपूर प्रमाणात भाज्या खा – गरोदरपणात भाज्या खाणे नेहमीच चांगले असते. म्हणून गरोदर असताना, भाज्या आणि स्वादिष्ट सेंद्रिय पदार्थांचे सेवन वाढवा आणि निरोगी गरोदरपणाचा आनंद घ्या
- व्यायाम – योगाभ्यास आणि हलके व्यायाम केल्याने गरोदरपणात तुम्ही निरोगी रहाल. सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही योगा आणि प्राणायामचा सराव सुरू करू शकता कारण काही व्यायामांमुळे गरोदर महिलांची मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. तुम्ही काही हलके व्यायाम देखील करू शकता – हे व्यायाम केल्यास तुम्ही सक्रिय रहाल आणि तुमचे चयापचय चांगले राहील. परंतु तुम्ही कोणताही व्यायाम करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कुठल्याही परिस्थतीत कठोर व्यायाम टाळा

- प्रसवपूर्व जीवनसत्त्वे घ्या – जीवनसत्त्वे घेण्याबाबत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली जीवनसत्त्वे नियमितपणे घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला पहिल्या तिमाहीत आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील आणि तुमच्या बाळाच्या वाढीसही त्यामुळे मदत होईल
- तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला – तुम्हाला काही औषधे, खाद्यपदार्थ किंवा पूरक आहार घेतल्यानंतर वेदना होत असल्यास किंवा बरे वाटत नसल्यास, तुमच्या डॉक्टरांशी त्याविषयी चर्चा करा. काय चूक आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होत आहे हे कळेपर्यंत ते घेणे थांबवा. तुम्हाला काही खाद्यपदार्थ किंवा औषधांची ऍलर्जी असू शकते किंवा कदाचित त्या औषधांची तुम्ही घेत असलेल्या औषधांसोबत प्रक्रिया होऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा
- तुमचे वजन पहा – सक्रिय जीवनशैली असणे गरजेचे आहे आणि जर एखादी स्त्री बाळाचा विचार करत असेल तर तिने निरोगी बीएमआय राखणे आवश्यक आहे. लठ्ठपणा गरोदरपणात धोका निर्माण करतो. तुम्ही आधीच गरोदर असल्यास, निरोगी गरोदरपणासाठी तुम्ही हलके व्यायाम करू शकता आणि पौष्टिक पदार्थ खाऊ शकता. पहिल्या तिमाहीत आणि गरोदरपणाच्या पुढील कालावधीत तुमचे वजन खूप वाढल्यास, गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कॅलरीजकडे लक्ष ठेवा. कॅलरीयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खा आणि गरज पडल्यास तुमच्या आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या.
- नैसर्गिक उपाय करून पहा – वेदना तीव्र नसल्यास वेदनाशामक औषधे घेणे टाळा. बरे वाटण्यासाठी विश्रांतीचे व्यायाम, ध्यान, माइंडफुलनेस आणि श्वास घेण्याची तंत्रे वापरून पहा. पाठदुखी कमी करण्यासाठी तुमच्या पतीला मसाज करायला सांगा आणि गरज पडल्यास थोडेसे झुकलेल्या स्थिती मध्ये झोपा. काहीही असो, औषधे घेण्यापेक्षा वेदना कमी करणारे नैसर्गिक मार्ग किंवा उपाय वापरून पहा.
गरोदरपणात, आवश्यक खबरदारी घेतल्यास निरोगी आणि सामान्य प्रसूती होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे निरोगी खा, तणाव टाळा, आनंदी राहा आणि स्वतःची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या.
आणखी वाचा: गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीमध्ये शारीरिक संबंध कसे ठेवावेत?
 
 


 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
                                         
                                         
                                         
                                         
                                         
                                     
                                         
                                         
                                        