गर्भारपण

गरोदरपणात निरोगी राहण्यासाठी कुठल्या १० गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

गरोदरपणात तुमचे शरीर असंख्य बदलांमधून जात असते. तुमच्यातील वेगळेपण तुम्हाला जाणवत असेल त्यामुळे तुम्ही स्वतःची योग्य मार्गाने काळजी घेणे महत्वाचे आहे. योग्य आहार घेणे आणि शरीराची योग्य स्थिती राखणे महत्वाचे आहे. गरोदरपणात होत असलेल्या अनपेक्षित बदलांमुळे तुम्ही काय करावे आणि काय टाळावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. ह्या लेखात त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे.

गरोदरपणात खालील गोष्टी करा

गरोदर असताना करावयाच्या काही गोष्टी येथे दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि पाळल्या पाहिजेत.

१. योग्य प्रमाणात पाणी प्या

गरोदरपणात किती प्रमाणात निर्जलीकरण होते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. दररोज ८-१० पूर्ण ग्लास पाणी, हे सर्वसामान्य प्रमाण आहे आणि तेच पाळले पाहिजे,  तुम्ही घरी असाल किंवा प्रवास करत असाल तरी इतक्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर ते पाण्याच्या कमतरतेचे एक ठोक लक्षण आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने निर्जलीकरण रोखले जाते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील कमी होतो.

२. तुमच्या आहारात फॉलिक ऍसिडचा समावेश करा

तुमच्या बाळाच्या विकासात फोलेट किती महत्त्वाचे आहे हे ऐकून तुम्हाला कदाचित कंटाळा आला असेल. तुमच्या बाळाच्या विकासात त्याचे महत्त्व लक्षात घेऊन येथे फॉलिक ऍसिडचे महत्व पुन्हा एकदा सांगत आहोत. बाळाचा मज्जातंतू आणि मेंदूचा विकास जेव्हा नीट होतो तेव्हा जन्माशी संबंधित दोष आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या टाळता येऊ शकतात. त्यासाठी फॉलिक ऍसिड अत्यंत आवश्यक आहे.

३. खाणे आणि व्यायाम ह्यांचा चांगला समतोल राखा

गरोदर स्त्रियांना सहजपणे विशिष्ट अन्नपदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो आणि त्यांची लालसा पूर्ण करण्यासाठी त्या प्रत्येक प्रकारचे अन्न खाऊ शकतात. परंतु असे केल्याने तुमचे वजन सहजपणे किलोग्रॅम मध्ये वाढू शकते. आणि बाळाच्या जन्माच्या वेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचा आहार तुमच्यासाठी आणि बाळासाठी पौष्टिक असायला हवा आणि काही इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. परंतु पचन नीट होण्यासाठी पुरेसा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

४. केगल व्यायाम करा

ओटीपोटाकडील स्नायू तुम्हाला तुमच्या लघवीवर आणि इतर हालचालींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवून देतात, बरेचसे स्नायू बाळाच्या जन्मादरम्यान आवश्यक असतात. बाळाचा जन्म होताना प्रसूतीचे विविध टप्पे असतात. तुमचे ओटीपोटाकडील स्नायू दबाव सहन करण्यास आणि बाळाला पुढे ढकलण्यास मजबूत असावे लागतात. हे स्नायू पुरेसे मजबूत नसतील तर मोठ्या प्रमाणात वेदना आणि इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्रसूतीनंतर ओटीपोटाकडील स्नायू घट्ट करण्यासाठी देखील केगेल व्यायाम प्रकार सुचवले जातात आणि सामान्य प्रसूतीदरम्यान हे स्नायू सैल होतात.

५. प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे

गरोदर असताना, तुम्ही यापुढे मित्रमैत्रिणींनी आयोजित केलेल्या सहलींना अचानक जाऊ शकत नाही. कमी अंतराचा प्रवास असो किंवा वर्ल्ड टुर असो तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वीच अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. प्रवासात स्वतःला आधार देण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक औषधे आणि उपकरणे असल्याची खात्री करा. प्रवास करणार्‍या वाहनामध्ये तुम्हाला आरामात बसण्याची सोय असली पाहिजे कारण तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागेल. तुमच्यासाठी सुरक्षित असा वाहतुकीचा मार्ग निवडा.

६. तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाचे संशोधन करा

तुमच्या पूर्वजांची आणि तुमच्या जोडीदाराच्या पूर्वजांची जनुके आता एका नवीन जीवामध्ये असणार आहेत. तुमचे मूल कसे दिसेल आणि कसे असेल तसेच त्याची शारीरिक वैशिष्ट्ये किंवा आरोग्यविषयक गुंतागुंत ह्या जनुकांवर अवलंबून असते. कोणतीही आनुवंशिक परिस्थिती किंवा रोग जन्माला येणाऱ्या बाळामध्ये येऊ शकतात. म्हणून, अशी कोणतीही समस्या असल्यास ती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांना त्याबद्दल कळवा जेणेकरून आवश्यक वाटल्यास प्रतिबंधात्मक कारवाई आणि चाचण्या केल्या जाऊ शकतात.

७. छोटीशी विश्रांती

शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये होणारा बदल, विविध घटकांचा सतत मागोवा घेणे आणि गरोदरपणातील कामांमुळे तुम्ही सहजपणे थकू शकता. तुमच्या शरीरावर अवाजवी ताण टाकणे तुमच्या बाळासाठीही फायदेशीर नाही. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचे मूलही शांत असते. दुपारच्या वेळी पॉवर नॅप्स घेणे चांगले आहे कारण त्यामुळे तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळेल आणि उर्वरित दिवस कोणत्याही त्रासाशिवाय जाईल. तुम्ही गरोदर असतानाही काम करत असाल, तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी त्याबद्दल बोलू शकता आणि त्याची गरज समजावून सांगू शकता.

८. मानसिक आरोग्य आणि विश्रांती

गरोदरपणातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनस्थितीत होणारे बदल होय. कधीकधी, तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल खूप प्रेम वाटेल आणि पुढच्याच क्षणी तुम्ही निराश व्हाल. लहानशा कारणावरून तुम्ही अश्रू ढाळू शकता किंवा मुलाच्या भवितव्याबद्दल तणावग्रस्त होऊ शकता. मानसिक शांतता आणि विश्रांतीसाठी काही सवयी लावून घ्या.  प्रामुख्याने ध्यान आणि योग ह्या अत्यंत महत्वाच्या सवयी आहेत. अत्यंत तीव्र तणावाच्या परिस्थितीतही तणाव कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो हे सिद्ध झालेले आहे आणि याचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या आरोग्यावर होईल.

९. तुमच्या बाळाशी संभाषण सुरू करा

बाळाची उपस्थिती जाणवायला तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. पण तुमचे बाळ ऐकू शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तुमचे बाळ तुम्हाला पूर्णपणे समजून घेऊ शकते आणि तुम्हाला काय वाटते आहे हे सुद्धा त्याला समजते.  स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी सर्व वेळ कामांमध्ये घालवा आणि आपल्या बाळाशी बोलण्यासाठी दररोज थोडा वेळ काढा. त्याला तुमच्या आवाजाची सवय होऊ द्या. काही गाणी वारंवार गुणगुणत रहा त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटेल. विशेषतः जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा बाळाला सुरक्षित वाटण्यासाठी ह्याचा फायदा होईल.

१०. तुमचे गर्भारपण संस्मरणीय बनवा

एक छोटी डायरी लिहिणे सुरू करा किंवा दररोज तुमच्या पोटाचे फोटो घ्या आणि त्यांना योग्यरित्या लेबल करा. तुम्ही दररोज काय केले आणि तुम्हाला काय प्रगती वाटली ते त्या डायरीमध्ये लिहा. जेव्हा तुमच्या बाळाचा जन्म होतो आणि तुमचा नित्यक्रम सुरु होतो, तेव्हा तुमचे लहान बाळ तुमच्या पोटात कसे वाढले आणि गरोदरपणाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काय वाटले ते तुम्ही पाहू शकता.

गरोदरपणात करू नयेत अशा गोष्टी

तुमच्या बाळाला हानी पोहोचू नये म्हणून गरोदर असताना करू नये अशा अनेक गोष्टी येथे आहेत

१. कच्चे मांस आणि पदार्थ खाणे

गरोदरपणात निर्माण होणाऱ्या विविध लालसा पूर्ण करताना तुम्ही कच्च्या भाज्या किंवा कच्चे मांस वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्याची शक्यता आहे. नीट शिजवलेले नसल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव असू शकतात. त्यामुळे रोग किंवा संक्रमण होऊ शकते.

२. भरपूर कॅफिनयुक्त पेये घेणे

चहा किंवा कॉफीचा एखादा कप तुमच्या शरीरासाठी सुखदायक ठरू शकतो, त्यामुळे कदाचित तुम्ही एकापेक्षा जास्त कप कॉफीचे सेवन कराल. कॅफीन हे प्रामुख्याने एक उत्तेजक घटक आहे. त्यामुळे तुम्हाला झोप नीट लागत नाही, तुमच्या हृदयाची गती वाढते तसेच रक्तदाब सुद्धा वाढण्याची शक्यता असते. वारंवार द्रवपदार्थांचे सेवन करणे म्हणजे वारंवार बाथरूमला जाणे. म्हणून, कॅफीन टाळण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या दैनंदिन कॅफिनचे सेवन मर्यादित करा.

३. उंच टाचेच्या चपला घालू नका

तुम्ही गरोदर असल्यास तुमचे सामाजिक जीवन पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. तुम्ही अजूनही बाहेर जाऊ शकता, खरेदी करू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटू शकता किंवा पार्टीचा आनंद घेऊ शकता. तुमचे वजन आधीच वाढत आहे आणि तुमच्या हाडांच्या संरचनेत गंभीर बदल झाले आहेत. उंच टाचेच्या किंवा स्टिलेटोज घातल्याने तुमच्या मणक्यावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला फक्त अस्वस्थताच येत नाही तर अडखळण्याचा आणि खाली पडण्याचा धोकाही वाढतो. विशेषतः जर तुमच्या पायांना सूज आलेली असेल तर सपाट टाचेच्या चपलांची निवड करा.

४. तुमच्या मांजरीचे शौच साफ करणे

हे काम आधी तुम्ही नियमितपणे करत असलात तरीसुद्धा आता तुमच्या पोटात एक लहान बाळ आहे त्यामुळे अश्या कामांपासून दूर रहा. सर्वप्रथम, हे काम अस्वच्छ आहे आणि दुसरे म्हणजे, मांजरीच्या विष्ठेमध्ये एक परजीवी असतो. हा परजीवी टोक्सोप्लाज्मोसिस नावाच्या धोकादायक रोगास कारणीभूत असतो. पर्याय नसताना, हातमोजे वापरा आणि आपले हात योग्यरित्या निर्जंतुक करण्याचे लक्षात ठेवा.

५. मासिके आणि पुस्तकांमधील विरोधाभासी सल्ल्याला बळी पडणे

नातेवाईक, पुस्तके, मासिके, डॉक्टर्स, इंटरनेटइत्यादी स्त्रोतांचे  गरोदरपणात आपण काय करावे आणि काय करू नये ह्याविषयी वेगवेगळे मत असते. "सात सुगरणी आणि भोपळा अळणी" हे अगदी सत्य आहे. तुम्ही जितके जास्त वाचाल, तितकी अधिक माहिती तुमच्या समोर येईल आणि तुम्ही आधी वाचलेल्या गोष्टीपेक्षा अगदी विरुद्ध वाटतील. असा गोंधळ दूर करण्यासाठी, नेहमी आपल्या डॉक्टरांशी बोला आणि त्यांचे मत जाणून घ्या.

६. व्हिटॅमिन ए पूरक औषधे घेणे

व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स तुमच्या डॉक्टरांनी स्वतः शिफारस केल्याशिवाय घेऊ नयेत. व्हिटॅमिन ए च्या अतिरेकामुळे जन्मलेल्या मुलामध्ये दोष आढळून आले आहेत.

७. इलेक्ट्रॉनिक संप्रेषण उपकरणे

तुमच्‍या नोकरीच्‍या ओघात किंवा तुम्‍ही राहात असलेल्‍या ठिकाणी, तुमच्‍या सभोवताली इलेक्ट्रॉनिक संप्रेषण   उपकरणे असल्‍यास, ही अशी उपकरणे उच्च शक्तीचे रेडिएशन उत्सर्जित करतात. त्यामुळे तुम्ही जागा बदलणे चांगले आहे कारण ही रेडिएशन्स तुमच्या बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकतात.

८. असुरक्षित संभोग किंवा एकाधिक लैंगिक जोडीदार

जेव्हा तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवता किंवा अनेक पार्टनर असतात तेव्हा एसटीडी होण्याची शक्यता जास्त असते. या आजारांचा मुलावर परिणाम होऊ शकतो आणि प्रसूतीनंतरही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

९. जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे

एकाच स्थितीत जास्त वेळ राहणे टाळा, कारण यामुळे तुमच्या घोट्यांवर आणि शिरांवर अवाजवी ताण पडतो. नियमित अंतराने थोडे चाला आणि वारंवार विश्रांती घ्या त्यामुळे तुमचे शरीर गतिमान राहील.

१०. तापासाठी वेदनाशामक किंवा औषध घेणे

गरोदरपणात सर्व औषधे घेणे योग्य नाही. तुम्हाला कोणत्याही वेदना होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोलण्यापूर्वी कोणतीही औषधे, अगदी मलम किंवा लोशन वापरू नका. गरोदर स्त्रिया त्यांच्या गरोदरपणात खूप काळजी घेतात. परंतु गरोदरपणात तुमच्या बाळाच्या फायद्यासाठी काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. या प्रमुख टिप्स लक्षात ठेवल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास कधीही संकोच करू नका. आणखी वाचा: गरोदरपणात खाऊ नयेत असे अन्नपदार्थ निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे अन्नपदार्थ
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved