प्रसूतीनंतर, बहुतेक स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि पूर्ववत होण्यासाठी विविध उपाय करतात. ह्या उपायांपैकी एक म्हणजे पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचा पट्टा वापरणे. हा पट्टा वापरल्याने ओटीपोटाकडील सैल त्वचा घट्ट होण्यास तसेच चरबी कमी होण्यास मदत होते.
"प्रसूतीनंतर पोट बांधणे" म्हणजे काय?
प्रसूतीनंतर पोट बांधण्याची प्रथा बर्याच काळापासून चालत आली आहे, कारण पोट बांधल्यामुळे पोटाचे स्नायू घट्ट होतात, चरबी कमी होते आणि पाठीला आधार मिळतो. गरोदरपणात, वाढत्या गर्भाशयाला सामावून घेण्यासाठी पोटाच्या भित्तिका विस्तारित होतात. त्यामुळे ह्या भागात मोठ्या प्रमाणात चरबीच्या पेशी जमा होतात. हे अति-ताणलेले स्नायू प्रसूतीनंतर लगेच पूर्ववत होत नाहीत, त्यामुळे पोटाभोवती त्वचा सैल होते आणि चरबी शिल्लक राहते. पोटाला कापडाने किंवा पट्ट्याने गुंडाळल्याने ह्या स्नायूंना घट्ट आणि मजबूत होण्यास मदत होते असे मानले जाते.
पोट बांधण्याचे विविध प्रकार कोणते?
पारंपारिकपणे, प्रसूतीनंतर ओटीपोटाकडील भागाला घट्ट कापड गुंडाळले जात असे. परंतु, सध्या अनेक प्रकारचे पट्टे उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी सोयीस्कर आणि तुमच्या जीवनशैलीला अनुरूप असा एखादा पर्याय निवडा.
1. रॅप्स
हे कापडाचे बनलेले असतात आणि प्रसूतीनंतर लगेच वापरता येतात.
2. कॉर्सेट्स
सामान्यत: हे कपड्यांखाली घालतात. कॉर्सेट अत्यंत घट्ट असतात आणि त्यामुळे ओटीपोटाकडील भागावर तसेच ओटीपोटाकडील अवयव दाबले जाऊ शकतात. दीर्घकालीन वापरासाठी हे वापरू नयेत.
3. बेल्ट किंवा स्प्लिंट
हे जास्त आधुनिक पर्याय आहेत. वापरायला सोपे जावेत म्हणून हे वेल्क्रो फास्टनिंगसह येतात. आपल्या पोटावर आवश्यक दबाव लागू करण्यासाठी हा बेल्ट आवश्यक तितका घट्ट करता येतो.
गरोदरपणानंतरचा पोटाचा पट्टा म्हणजे काय?
गरोदरपणानंतरचा पट्टा म्हणजे, प्रसूतीनंतर, तुमच्या पोटाकडील अवयवांना आणि स्नायूंना आधार देण्यासाठी बांधलेले एक आवरण आहे. प्रसूतीनंतरचा पट्टा सैल स्नायूंना घट्ट होण्यासाठी आणि अवयवांना पुन्हा योग्य स्थितीत आणण्यासाठी मदत करू शकेल.
प्रसूतीनंतर तुम्ही तुमचे पोट बांधण्यास कधी सुरुवात करू शकता?
प्रसूतीनंतर पोट बांधण्यास सुरुवात करण्यापूर्वी किमान एक दिवस थांबावे असे काही डॉक्टर सांगतात. पोट बांधण्यास सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे, कारण तुमच्या डॉक्टरांना तुमच्या आरोग्याविषयी सर्व माहिती असेल.
1. सामान्य प्रसूतीनंतर
जर तुमची सामान्य प्रसूती झाली असेल, तर तुम्ही बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासांत तुमचे पोट बांधण्यास सुरुवात करू शकता.
2. सी-सेक्शन नंतर
सी-सेक्शन झालेले असल्यास, पोट बांधण्यापूर्वी जखम बरी होईपर्यंत वाट पहावी. म्हणजेच किमान सहा ते आठ आठवडे तुम्ही थांबावे. तुम्ही पट्टा लावण्यासाठी तयार असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रसूतीनंतर पोटाला पट्टा लावल्यास पोट कमी होण्यासाठी कशी मदत होऊ शकते?
प्रसूतीनंतर पोटाला पट्टा बांधण्यामागे अगदी थोडेसे वैज्ञानिक पुरावे असले तरी, त्यांची लोकप्रियता जगभरातील संस्कृतींमुळे उद्भवली आहे कारण पारंपारिकपणे प्रसूतीनंतर पोटाला पट्टे बांधले जातात. पोटाला पट्टा बांधल्यास खालील फायदे होऊ शकतात.
- पोटाकडील चरबी कमी होणे
- पोश्चर सुधारणे
- पोटाच्या स्नायू टोनिंग होणे
- अंतर्गत अवयवाना आधार मिळणे
- पाठीला आधार आणि पाठदुखी कमी होणे
- पोट कमी होणे किंवा शरीराला आकार देणे
- प्रसूतीनंतर हालचालीसाठी उत्तम
प्रसूतीनंतर पट्टा वापरण्याचे धोके कोणते आहेत?
प्रसवोत्तर पट्ट्यामुळे गरोदरपणात वाढलेली चरबी झाकली जाते आणि पोटाचा घेर कमी होतो. परंतु, खालील जोखीम घटकांमुळे अनेक डॉक्टर प्रसूतीनंतर या पट्ट्यांचा वापर न करण्याचा सल्ला देतात.
- गर्भाशयावर जास्त दबाव येऊन रक्तस्त्राव होऊ शकतो.
- पट्ट्याच्या कडा त्वचेवर ज्या भागावर दाबल्या जातात त्या भागाभोवती पुरळ आणि खाज सुटते.
- चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात दिवसभर बेल्टचा जास्त वापर केला जातो त्यामुळे वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते.
- सी सेक्शननंतर, जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लागू शकतात. आतील जखमा बऱ्या होण्यापूर्वी बेल्ट वापरल्याने गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
- ओटीपोटावर सतत दबाव असल्यामुळे हर्निया होऊ शकतो.
प्रसूतीनंतर वापरला जाणारा पट्टा आरामदायक असतो का?
प्रसूतीनंतर ज्या स्त्रियांनी पोटाचा पट्टा वापरला आहे, त्या सर्व स्त्रिया हे मान्य करतील की हा पट्टा वापरणे सोईचे नाही. पोटाचा पट्टा वापरणे अनेक वेळा वेदनादायक सुद्धा असू शकते, कारण हा पट्टा पोटाभोवती घट्ट आवळलेला असतो. सी-सेक्शन झालेले असल्यास, जिथे छेद घेतलेला असतो त्या भागावर दबाव आल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. हा बेल्ट सतत ऍडजेस्ट करावा लागतो. मऊ कापड वापरल्याने अस्वस्थता कमी निर्माण होऊ शकते, परंतु त्याची किंमत जास्त आहे.
प्रसूतीनंतर वापरल्या जाणाऱ्या पट्ट्याविषयी विचारात घेण्यासारख्या गोष्टी
हा बेल्ट घालताना तसेच तुमच्या शरीरासाठी योग्य असा पट्टा खरेदी करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. मोठा निर्णय घेण्यापूर्वी खाली दिलेल्या काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
1. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असल्याने, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील. आणि पट्टा वापरण्याचा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे की नाही हे सांगू शकतील.
2. काही आठवडे पट्टा वापरणे सुरु ठेवा
पोटाचा पट्टा वापरण्याचे परिणाम त्वरित मिळत नाहीत आणि तुम्हाला फरक दिसण्यासाठी हा पट्टा कमीतकमी ५-६ आठवडे घालणे आवश्यक आहे. परंतु, हा पट्टा दिवसभर वापरू नका. आणि मध्यम प्रमाणात वापरा. जर तुम्ही प्रसूतीनंतरचा पट्टा घालण्याचा निर्णय घेतला असेल, तर परिणाम दिसण्यासाठी संयम ठेवा.
3.पट्टा समायोजित करता येतो ना ते पहा
योग्य पट्टा खरेदी करताना, समायोजित करता येणारा पट्टा निवडा. अशाप्रकारे तुमचा प्रसूतीनंतरचा पट्टा तुम्हाला आवश्यक तितकाच घट्ट होईल आणि कोणतीही जखम होणार नाही.
प्रसूती नंतर पोट कमी करण्याचे इतर पर्याय
पौष्टिक आहार घेतल्यास आणि मध्यम प्रमाणात व्यायाम केल्याने तुमचे शरीर पूर्ववत होण्यास मदत होऊ शकते. तुमच्यावर जास्त ताण येणार नाही असा सोपा व्यायाम करण्यास सुरुवात करा. आणि हळूहळू प्रगती करा. अधिक कठोर व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जायचे असल्यास त्याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दररोज योगा केल्यास आणि वेगाने चालल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
प्रसूतीनंतरचा पट्टा वापरल्यास तुमच्या शरीराचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. परंतु, चांगला आहार आणि व्यायामाला पर्याय नाही. बेल्टचा वापर केल्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे फिरता येते आणि व्यायाम सुद्धा करता येतो. परंतु प्रसूतीनंतरचे हे पट्टे झटपट वजन कमी करण्याचे साधन मानले जाऊ नये. पत्त्याचा वापर कमी प्रमाणात करा आणि दिवसभर तुमच्या ओटीपोटावर सतत दबाव टाकणे टाळा. तसेच, चांगल्या परिणामासाठी प्रसूतीनंतरचा पट्टा कसा वापरावा ह्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी
प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका