In this Article
- स्तनपानास कशी सुरुवात करावी?
- बाळाचे तोंड स्तनाग्रांना कसे लावावे?
- स्तनाग्रांवर पकड घट्ट करण्याच्या पद्धती
- बाळाच्या तोंडाची स्तनाग्रांवरील पकड चांगली आहे हे कसे ओळखावे?
- स्तनपानासाठी योग्य स्थिती
- तुमच्या ‘टॉडलर‘ला स्तनपान देण्यासाठी सर्वोत्तम टिप्स
- नवजात बाळाला किती वेळ स्तनपान द्यावे?
- मी किती काळापर्यंत स्तनपान द्यावे ?
- किती वेळा बाळाला स्तनपान दिले पाहिजे?
स्तनपान दिल्याने बाळाचे उत्तमरीत्या पोषण होते त्यामुळे पहिले सहा महिने डॉक्टर प्रत्येक नवजात बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, स्तनपान दिल्याने जी संप्रेरके तयार होतात त्यामुळे बाळाच्या आईची रिकव्हरी जलद होते. तथापि बऱ्याच मातांना स्तनपान देणे वेगवेगळ्या कारणांमुळे अवघड वाटते. काहींना योग्य रित्या स्तनपान कसे द्यावे ह्याचे ज्ञान नसते. त्यामुळे स्तनपान योग्य रित्या कसे करावे ह्याची माहिती असणे आवश्यक आहे, त्यामुळे स्तनपान करताना काही समस्या असल्या असतील तर त्या हाताळता येतील.
स्तनपानास कशी सुरुवात करावी?
ऐकून तुम्हाला वेगळे वाटेल, परंतु आई आणि बाळासाठी स्तनपान सुरु करण्याआधी योग्य मार्गदर्शन मिळणे चांगले. स्तनपान सुरु करण्याआधी तुम्हाला मदत होईल अशा काही टिप्स इथे देत आहोत
कसे बसावे?
तुम्ही स्वतःला जितके शक्य होईल तितके आरामदायक स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे केल्यास तुम्ही बाळावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. आधारासाठी उशीचा वापर करा आणि तुमचे शरीर नैसर्गिक आणि आरामदायक स्थितीत ठेवा. जर तुम्ही सी–सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असाल तर डॉक्टर तुम्हाला कुशीवर झोपण्याचा सल्ला देतील आणि बाळाला शेजारी ठेवण्यास सांगतील. तुम्ही स्तनपानासाठी कुठलीही स्थिती निवडलीत तरी एक लक्षात ठेवा की तुमच्या पाठीत कसेही वाकू नका ह्यामुळे तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता जाणवेल.
एकदा तुम्ही तयार झालात तर आता बाळाला स्तनपान देण्याची वेळ झाली आहे आणि पहिली पायरी म्हणजे बाळाचे ओठ स्तनाग्रांना लावणे ही होय. बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लागणे ही महत्वाची पायरी आहे कारण त्यामुळे दूध नीट ओढले जाते आणि दुधाचा प्रवाह एकसारखा राहतो. तसेच बाळाच्या अन्ननलिकेत हवा जाऊ न देणे हे सुद्धा महत्वाचे आहे कारण त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात आणि बाळाला पोटशूळ होऊ शकतो.
बाळाचे तोंड स्तनाग्रांना कसे लावावे?
पहिली स्टेप म्हणजे बाळाला कुशीवर घ्या आणि बाळाचे तोंड तुमच्याकडे करा. बाळाचे पोट तुमच्या पोटाजवळ आहे ना ह्याची खात्री करा. बाळाला थोडे वर घेण्यासाठी गरज भासल्यास उशीचा वापर करा.
- तुमचे स्तन हातात घेऊन अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने स्तनाग्रांच्या भोवतालचा वर्तुळाकार भाग धरा
- तुमचे स्तनाग्र बाळाचे नाक आणि वरचा ओठ ह्यामध्ये ठेवा. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या बाळाच्या गालांना हळूच स्तनाग्रांनी स्पर्श करा. त्यामुळे बाळ आपण होऊन तिकडे वळून तोंड उघडेल आणि स्तनाग्रांच्या जवळ जाण्यास बाळाला मदत होईल
- तुमच्या बाळाचे डोके मागे घ्या आणि हळूच तुमच्या स्तनाग्रांनी बाळाच्या ओठांना स्पर्श करा जेणेकरून बाळ तोंड उघडेल
- बाळाचा खालचा जबडा आधी स्तनाग्रांना लावून बाळाला स्तनाग्रे तोंडात घेण्यास मदत करा. बाळाचे तोंड नीट स्तनाग्रांच्या खाली लागले आहे ना ह्याची खात्री करा.
- बाळाचे डोके आता थोडे वर धरा. त्यामुळे आपोआप बाळाचा वरचा जबडा स्तनांना लावला जाईल.
- संपूर्ण स्तनाग्र आणि कमीत कमी १ १/२ इंच स्तनाग्रांभोवतीचा भाग बाळाच्या तोंडात जाईल ह्याची खात्री करा
बाळाची स्तनपान घेण्याची नैसर्गिक इच्छा खूप तीव्र असते आणि तुम्ही बाळास प्रोत्साहन दिल्यास बाळ नक्की त्यास प्रतिसाद देईल. तथापि, जर बाळ प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही खालील तंत्रज्ञान वापरू शकता
स्तनाग्रांवर पकड घट्ट करण्याच्या पद्धती
सुरुवातीला, बाळ योग्य स्थितीत येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बाळाचे तोंड स्तनाग्रांना लावण्यासाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत.
- जर तुमचे बाळ तोंड उघडून प्रतिसाद देत नसेल, तुमच्या स्तनांमधील दूध पिळून थोडेसे थेंब बाळाच्या ओठांवर टाका
- जर बाळ स्तनाग्रांपासून तोंड फिरवत असेल तर हळूच बाळाच्या गालावर हलकेच चापटी द्या
- त्यामुळे बाळ तोंड स्तनाकडे करून दूध ओढू लागते. ह्यास इंग्रजीमध्ये रुटिंग रिफ्लेक्स असे म्हणतात आणि त्यामुळे बाळ स्तनांकडे तोंड फिरवते आणि स्तनपानाच्या प्रक्रियेस मदत होते.
- जेव्हा बाळ त्याचे तोंड उघडून स्तनांकडे बघत असते, तेव्हा लक्षात ठेवा की बाळाचे डोके वर उचला बाळाच्या तोंडाजवळ वाकू नका.
- बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लागले आहे आणि बाळाच्या तोंडाने स्तनाग्रे आणि त्याभोवतालचा वर्तुळाकार भाग नीट आच्छादला गेला आहे ते पहा
- बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लागलेले असल्यास दुधाचा प्रवाह नीट होतो, जर तोंड नीट लागलेले नसल्यास बाळ फक्त स्तनाग्रे चोखत बसते त्यामुळे स्तनाग्रांना भेगा पडून सूज येते आणि दुधाचा प्रवाह नीट होत नाही.
- जर बाळाची हनुवटी आणि नाकाचा शेंडा तुमच्या स्तनांना चिकटला तर बाळाचे तोंड स्तनाना नीट बसले आहे असे समजावे. तपासून पहा आणि बाळाचे ओठ हे बाहेरच्या बाजूस आहेत ना ते सुद्धा पहा.
- सुरुवातीच्या दिवसात स्तनपान देताना बाळाचे तोंड स्तनाला नीट लागले आहे की नाही हे मध्ये मध्ये तपासून पहा त्यामुळे बाळ फक्त खालच्या ओठाने आणि जिभेने दूध ओढत नाही ना ह्याची खात्री होईल.
- जसजसे बाळ दूध ओढू लागते तसे तुम्ही बाळावर लक्ष ठेवून बाळ दूध ओढणे– पिणे – श्वास घेणे ह्या पॅटर्न मध्ये स्तनपानाची क्रिया करत आहे ना ह्यावर लक्ष ठेवा. बाळाच्या जबड्याच्या आणि गालांच्या लयबद्ध हालचालीवरून ते दिसू शकते. बाळ दूध पीत असल्याचा आवाजही तुम्हाला ऐकू येईल
- जर बाळाने स्तनाग्रांना तोंड लावल्यावर ते दुखत असेल किंवा बाळाला त्याचा त्रास होत असेल तर थांबा. बाळाच्या तोंडाची स्तनाग्रांवरील पकड खूप घट्ट असते आणि त्यामुळे आईच्या स्तनापासून बाळाला जबरदस्तीने मागे खेचू नये. त्याऐवजी बाळाच्या हिरड्या आणि तुमचे स्तन ह्यांच्यामध्ये बोट ठेवून हळूच तुम्ही बाळाला दूर करू शकता. असे केल्यावर दूध येत नाही म्हणून बाळ रडू लागेल परंतु काळजी करू नका, बाळाचे तोंड स्तनाग्रांना पुन्हा नीट लावा.
बाळाच्या तोंडाची स्तनाग्रांवरील पकड चांगली आहे हे कसे ओळखावे?
वरील तंत्र वापरून सराव केल्यानंतर, पकड चांगली बसली आहे किंवा नाही व तुमचे बाळ आरामदायक स्थितीत आहे ना हे तपासून पाहणे चांगले. खाली काही लक्षणे दिली आहेत जी तुम्ही तपासून पाहू शकता
- तुमचे बाळ दूध पीत आहे हे अगदी सहजपणे तुम्ही ऐकू शकता
- तुमच्या बाळाचा खालचा ओठ हलकेच ओढून तुम्ही बाळाची जीभ बघू शकत असाल तर बाळाच्या तोंडाची पकड घट्ट बसली आहे हे निर्देशित करते.
- किट– किट असा आवाज येत नसेल तर बाळाची पकड घट्ट बसली आहे असे समजावे
- तुमच्या बाळाच्या हनुवटीच्या स्पर्श स्तनांना होत असेल तर
- बाळाचे दूध पिऊन झाल्यावर आणि बाळाची स्तनाग्रांवरची पकड सुटल्यानंतर स्तनाग्रे सपाट किंवा वेडीवाकडी नसतील तर
- बाळाचे स्तनपान घेऊन झाल्यावर बाळ समाधानाचा एक विशिष्ट आवाज काढत असेल तर
स्तनपानासाठी योग्य स्थिती
बाळाची स्तनांवर योग्य पकड महत्वाची आहेच, परंतु स्तनपान देताना आई आणि बाळ दोघांची स्थिती बरोबर असणे सुद्धा महत्वाचे आहे. दोघेही आरामदायक स्थितीमध्ये असले पाहिजेत
१. क्रॉस क्रेडल होल्ड: सुरुवातीच्या काळात स्तनपानासाठी ही स्थिती वापरा
हि स्थिती खूप कॉमन आहे आणि नवीन मातांसाठी त्याची खूप मदत होते कारण ह्या स्थितीत प्रसूतीनंतर लगेच बाळाची स्तनांवरील पकड योग्य असते. सुरुवातीला थोडे ओशाळल्यासारखे होऊ शकते, तथापि ह्या स्थितीचा सराव केल्यास ह्या स्तनपानाच्या स्थितीची आई आणि बाळासाठी खूप मदत आणि फायदा होतो.
- हात असलेल्या खुर्चीवर ताठ बसा
- तुमच्या बाळाला पोटाशी धरा
- तुम्ही पाजत असलेल्या स्तनाच्या विरुद्ध बाजूच्या खुर्चीच्या हाताचा वापर बाळाला टेकवण्याची करा आणि तुमच्या हाताच्या तळव्याने बाळाच्या डोक्याला आधार द्या
- मोकळा हात स्तनाला खालून आधार देण्यासाठी आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांपर्यंत येण्यासाठी मार्गदर्शनासाठी वापरा
२. क्रेडल होल्ड
तुमचे बाळ काही आठवड्यांचे झाल्यावर आणि तुम्हाला बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यावर स्तनपानासाठी तुम्ही क्रेडल होल्ड ही स्थिती वापरू शकता
- ताठ बसा आणि बाळाला तुमच्या मांडीवर घेऊन एका कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवताना बाळाचा चेहरा आणि शरीर तुमच्या बाजूला ठेवा
- तुमच्या हातानी बाळाचे डोके, पाठ आणि नितंबाकडील भागाला आधार द्या
- दुसऱ्या हाताने तुमचे स्तन धरा आणि हळूच दाबा जेणेकरून ते बाळाच्या नाकाजवळ जाईल
३. फ़ुटबाँल होल्ड
ही स्थिती अमेरीकन फ़ुटबाँल पासून प्रेरित होऊन तयार झाली आहे. जर तुमचे सी–सेक्शन झाले असेल किंवा तुम्हाला जुळ्या बाळांना स्तनपान करायचे असेल तर ही स्थिती चांगली आहे
- तुमच्या बाळाला खाली आधार देऊन धरा
- बाळाचे डोके आणि मान तुमच्या हातात धरा
- तुम्ही ज्या बाजूने बाळाला पाजत आहात त्याच बाजूला मागे बाळाला त्याचे पाय नेऊद्या
- तुमच्या हाताला आधार देण्यासाठी तुम्ही उशीचा आधार घेऊ शकता आणि तुमचा जो हात रिकामा आहे त्या हाताने बाळाचे तोंड तुम्ही स्तनापर्यंत नेऊ शकता
४. साईड लाईंग
ही स्थिती ज्यांची सिझेरिअन प्रसूती झाली आहे किंवा प्रसूती नंतर शरीर नाजूक झाले असेल तर त्यांच्यासाठी चांगली आहे
- कुशीवर झोपा आणि बाळाचे तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने बाळाला कुशीवर झोपवा
- तुमच्या खालच्या स्तनाजवळ बाळाचे डोके येईल असे बाळाला ठेवा
- हाताने बाळाच्या डोक्याला आधार द्या आणि जरूर भासल्यास मोकळ्या हाताने स्तन तोंडाजवळ न्या
५. रिक्लायनिंग होल्ड
ज्या स्त्रिया सी–सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असतात किंवा ज्यांना बसण्यास त्रास होत असेल त्यांच्यासाठी ही स्थिती उपयोगी आहे. ज्या स्त्रिया बाळाला बेड वर पाजतात त्यांनी ह्या स्थितीचा सराव करा
- बेड किंवा सोफ्यावर आरामदायक स्थितीत बसा. उशीचा आधार घ्या आणि तुमच्या पाठीचा वरचा भाग, मान आणि डोके आरामदायक स्थितीत आहे ना ह्याची खात्री करा
- तुमच्या बाळाला पोटावर झोपवा आणि तुमच्या छातीजवळ घ्या आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांजवळ न्या
- बाळ अगदी नैसर्गिकरित्या स्तनाग्रे शोधेल. जर गरज भासली तर तुम्ही स्तन हातात घेऊन बाळाच्या तोंडाजवळ नेऊ शकता.
तुमच्या ‘टॉडलर‘ला स्तनपान देण्यासाठी सर्वोत्तम टिप्स
तुमचे बाळ टॉडलर झाल्यावर स्तनपान घेण्यासाठी विशिष्ट स्थितीची सवय त्यास आतापर्यंत झाली असेल. ह्या टप्प्यावर बरीच बाळे डोंबाऱ्यासारखे विविध अंगविक्षेप करत स्तनपान घेत असतात. कधी त्यांचे पाय हवेत असतात, तर कधी एक पाय वर एक खाली, कधी संपूर्ण शरीराची वळवळ सुरु असते तर कधी इकडून तिकडून फिरत असतात. तर ह्या बाळांना स्तनपान करतानाच्या काही टिप्स खालीलप्रमाणे
- बाळाला शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करू देण्यापेक्षा तुम्ही बाळाला स्तनपानाच्या वेळी काहीतरी हातात धरायला देऊ शकता. स्तनपान करताना तुम्ही गळ्यात माळ घालू शकता जेणेकरून बाळाचे सगळे लक्ष त्याकडे वेधले जाईल आणि शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करण्यापासून त्याचे दुर्लक्ष होईल.
- तुम्ही बाळाशी बोलत राहू शकता किंवा बाळासाठी एखादे पुस्तक वाचू शकता. गाणी लावल्यास सुद्धा मदत होऊ शकते.
- जर तुमच्या बाळाने वारंवार स्थिती बदलू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाळाला तसे सांगा फक्त सांगताना हळू आवाजात बोला. बाळाला घट्ट मिठी मारल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तसे केल्यास दूध देणार नाही अशी सूचना सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता आणि बाळाला खाली ठेऊ शकता.
- सार्वजनिक ठिकाणी जाण्याआधी घरीच बाळाला स्तनपान दिलेले चांगले. नेहमी बाळासाठी नाश्ता किंवा ज्यूस सोबत घ्या, बाळ रडू किंवा ओरडू लागल्यास तुम्ही बाळाला ते देऊ शकता.
नवजात बाळाला किती वेळ स्तनपान द्यावे?
तुम्ही नवजात बाळाला स्तनपान करीत असता तेव्हा साधारणपणे एका वेळेला २०–३० मिनिटे लागतात, परंतु ते ६० मिनिटांपर्यंत वाढू शकते. लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ वेगळे असते आणि तुम्ही एका वेळच्या स्तनपानास किती वेळ लागेल हे ठरवू शकत नाही. सामान्यपणे, सुरुवातीला आणि वाढीच्या काळात जास्त वेळ स्तनपान देण्याची गरज असते. स्तनपानाचे विशिष्ट वेळापत्रक करण्याऐवजी बाळाच्या मागणीनुसार स्तनपान देणे चांगले.
तुमच्या बाळाने स्तनपान घेण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर बाळाला फक्त पाच मिनिटे लागू शकतात. बाळाचे पोट नीट भरले आहे किंवा नाही हे समजण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.
- बाळाला स्तनपान दिल्यानंतर तुमचे स्तन मऊ झाले असतील आणि तुमचे बाळ समाधानी आणि निवांत असेल तर बाळाचे पोट भरले आहे असे समजावे
- काही वेळा, आई पाजत असतानाच बाळ झोपी जाते. जर असे झाले तर बाळाच्या हाताला, पायांना, मानेला आणि कानांना थोड्या गुदगुल्या करा. आणि बाळाला उठवा. दुसऱ्या स्तनावर पाजायला घ्या आणि ढेकर काढा त्यामुळे बाळाची झोप उडेल.
मी किती काळापर्यंत स्तनपान द्यावे ?
असे म्हटले जाते की तुम्ही तुमचे बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला स्तनपान दिले पाहिजे आणि अन्नपदार्थ आणि पाण्यापासून दूर ठेवले पाहिजे. त्यानंतर, घनपदार्थ बाळाला सुरु केल्यानंतर सुद्धा बाळ जोपर्यंत स्तनपान घेत आहे तोपर्यंत ते सुरु ठेवा. स्तनपान देणे म्हणजे फक्त बाळाला दूध देणे नव्हे तर त्याद्वारे आई आणि बाळामध्ये बंध निर्माण होतो आणि बाळाला सुरक्षित वाटते. जोपर्यंत बाळाला आणि तुम्हाला आरामदायक वाटते तोपर्यंत स्तनपान देत रहा.
किती वेळा बाळाला स्तनपान दिले पाहिजे?
जन्मानंतर बाळाला भूक लागलेली असते आणि बाळाची भूक तिसऱ्या दिवसाच्या आसपास वाढते. म्हणून सुरुवातीला, मागणी कमी असते आणि तुम्हाला स्तनपान देण्याच्या प्रक्रियेसाठी सुरुवात आणि प्रयत्न करावे लागतील.
पहिल्या काही आठवड्यात, तुमच्या बाळाला प्रत्येक दोन ते तीन तासांनंतर स्तनपानाची गरज असते. म्हणजे २४ तासांमध्ये तुम्हाला कमीत कमी ८–१२ वेळा बाळाला स्तनपान दिले पाहिजे. तथापि, बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की बाळाला मागणीनुसार स्तनपान दिले पाहिजे. एक विशिष्ट वेळापत्रक करण्यापेक्षा बाळाला भूक लागलेली असेल तेव्हा स्तनपान दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा लॅक्टेशन तज्ञांशी ह्याविषयी संपर्क साधून ते काय म्हणतात ते जाणून घेतले पाहिजे.
बाळ जसे वाढते तसे बाळाचे पोट सुद्धा वाढते. काही काळानंतर बाळ जास्त वेळ स्तनपान घेऊ लागेल आणि त्याची वारंवारिता कमी होईल.
ह्या टिप्सचा योग्य वापर करून तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि स्तनपानाचा अमूल्य अनुभव घ्या. तुम्हाला शुभेच्छा!
आणखी वाचा: स्तनपानाविषयी नेहमी विचारल्या जाणाऱ्या २० प्रश्नांची उत्तरे