In this Article
तुमचे बाळ आता एक वर्षांचे झाले आहे आणि गेले काही महिने घन पदार्थ खात आहे. काही वेळा बाळ एखादे विशिष्ठ फळ किंवा भाजी खाण्यास नाकारते आणि काही वेळा तुम्ही सुद्धा बाळाला काय भरवावे ह्या विचाराने गोंधळात पडता . ही परिस्थिती हाताळण्यासाठी इथे १३–१६ महिन्यांच्या बाळांसाठी काही आहाराच्या योजना, टिप्स आणि अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत.
१३–१६ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ
तुमचे नुकतेच चालायला शिकलेले बाळ आता घनपदार्थ खाण्याच्या बाबतीत प्रगती करू लागले आहे. त्यामुळे पोषक आणि समृद्ध आहार निवडा, त्यामुळे बाळाची वाढ होण्यास आणि बाळ निरोगी राहण्यास मदत होईल. तथापि, बाळाला खूप जास्त भरवू नका. खाली काही पोषक अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत.
१. फळे
फळांचे छोटे तुकडे करा, त्यामुळे तुमचे बाळ ते सहज उचलून खाऊ शकेल. फळांचे हे तुकडे छोटे आणि चावता येण्याजोगे असावेत. नाहीतर, ते तुमच्या बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता असते. उदा, तुम्ही बाळाला अख्खे द्राक्ष देण्याऐवजी त्याचे तुकडे करून देऊ शकता.
२. दूध
प्रत्येक बाळाने दूध हे घेतलेच पाहिजे.
दूध खूप पोषक असून त्यामुळे बाळ शारीरिक दृष्ट्या मजबूत आणि मनाने चाणाक्ष होण्यास मदत होते. जरी तुम्ही बाळास स्तनपान करीत असाल किंवा बाळाला गाईचे दूध देत असाल तरीही ते खूप जास्त देऊ नका. जर बाळाचे पोट दुधाने भरले तर बाळाला घन पदार्थ खावेसे वाटणार नाहीत.
३. भाज्या
आता तुमचे बाळ ब्रोकोली आणि कॉलीफ्लॉवरसह सगळ्या भाज्या खाऊ शकेल. तुम्ही ह्या भाज्या बाळाला उकडून आणि कुस्करून देऊ शकता. दुसरे पोषक पर्याय म्हणजे कुस्करलेला बटाटा आणि गाजर होय आणि ते तुम्ही बाळाला नाश्त्यासाठी देऊ शकता. तुम्ही गाजराचे मोठे तुकडे करून बाळाला फिंगर फूड म्हणून देऊ शकता.
४. मांस
तुमच्या बाळासाठी मांस हा प्रथिनांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही मांस शिजवून ते बारीक करून बाळाला देऊ शकता. मांस हे १५ महिन्यांच्या बाळासाठी चांगला अन्नपदार्थ आहे कारण त्यामुळे बाळाची ऊर्जा वाढते आणि बाळ दिवसभर उत्साही राहते.
५. योगर्ट
बाळांसाठी योगर्ट हा अगदी पोषक पर्याय आहे. हा पर्याय ६ महिने आणि त्याहून मोठ्या वयाच्या बाळांसाठी योग्य समजला जातो. हा दुग्धजन्य पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध असतो आणि बाळासाठी एक चविष्ट पदार्थाचा पर्याय असतो.
६. सुकामेवा
बरेचदा, पालक ऍलर्जी किंवा घशात अडकण्याच्या भीतीने बाळाला सुकामेवा देत नाहीत. परंतु जर तुमच्या बाळाला सुक्यामेव्याची ऍलर्जी नसेल तर तुम्ही बाळाला घनपदार्थांची सुरुवात जेव्हा करून देता तेव्हा पासून सुकामेवा देऊ शकता. घशात अडकू नये म्हणून तुम्ही त्याचे छोटे तुकडे करू शकता जेणेकरून बाळ ते सहज चावू शकते तसेच गिळू शकते.
७. धान्य
बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी धान्य अतिशय गरजेचे आहे. तुम्ही बाळाला थोड्या प्रमाणात नाचणी, राजगिऱ्याचे पीठ तसेच बारीक गहू आणि बाजरी अशा धान्यांची ओळख करून देऊ शकता.
८. बीन्स
१४ महिन्यांच्या बाळासाठी बीन्स हा देखील पोषक अन्नपदार्थ आहे. जर तुमच्या बाळाला राजमा आवडत असेल तर दिवसाला ३ टेबल स्पून राजमा द्यायला हरकत नाही. राजम्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज आणि चरबी असते त्यामुळे तुमच्या बाळासाठी तो पोषणमूल्यांचा एक उत्तम स्रोत असतो.
१३–१६ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता/ बाळाला भरवण्याचे वेळापत्रक
बाळाला भरवण्याच्या पदार्थांचा तक्ता तयार करणे ही काही सोपी गोष्ट नाही. इथे एक तक्ता दिला आहे ज्याची तुम्हाला मदत होईल. तुमच्या बाळाच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या बाळासाठी असा तक्ता करू शकता.
न्याहारी |
नाश्ता |
सकाळी |
दुपारचे जेवण |
दुपारी |
रात्री |
१/२ किंवा १ कप दूध |
ओट्स/सफरचंदाची लापशी किंवा अंडाभुर्जी/ सफरचंदाची लापशी किंवा संपूर्ण धान्य मफिन |
भाज्यांचे काप
किंवा कलिंगडाचे तुकडे किंवा पॅनकेक |
वरण भात
किंवा नाचणी इडली |
फ्रुट योगर्ट किंवा राजमा किंवा भाज्यांचे काप किंवा फळे |
दही भात
किंवा कुस्करलेला बटाटा |
१३ ते १६ महिन्यांच्या बाळासाठी घरी करता येण्याजोग्या काही पाककृती
घरी करता येणाऱ्या पाककृती ह्या पोषक आणि आरोग्यकारक असतात. इथे काही पोषक पाककृती दिल्या आहेत त्या तुम्ही करून बघू शकता.
१. नाचणी इडली
१६ महिन्यांच्या बाळासाठी ही पोषक पाककृती आहे. आणि ती करायला पण सोप्पी आहे.
घटक:
१० इडल्यांसाठी
- आंबवलेले इडली पीठ – २ कप
- नाचणी पीठ – १/२ कप
- तेल – १ टी स्पून
- कोमट पाणी – १/४ कप + २ टी स्पून
- चवीपुरते मीठ
कृती
- एका भांड्यात कोमट पाण्यात पीठ मिक्स करा आणि घट्टसर पेस्ट तयार करा
- पेस्ट घट्ट झाल्यावर, इडलीच्या पिठामध्ये ती मिक्स करा आणि थोडे मीठ टाकून हळू हळू ढवळा
- २० मिनिटे तसेच बाजूला ठेवा
- एकीकडे इडलीपात्रामध्ये मध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि इडलीच्या भांड्यांना तेल लावून घ्या
- इडलीच्या साच्यांमध्ये इडली पीठ घाला
- इडली स्टॅन्ड इडलीपात्रामध्ये ठेवा आणि १० मिनिटे वाफ येऊ द्या
- गरम गरम खायला द्या.
२. चिकू प्युरी
चिकू चवीला गोड असतो आणि त्याचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे असतात. तुमचे बाळ चिकू प्युरी अगदी चाटून पुसून खाईल.
घटक:
२१/२ कप प्युरीसाठी
- चिकू – १
कृती
- चिकूचे २ भाग करून बिया काढून टाका
- काटा चमच्यांनी ते कुस्करा
- थोडेसे स्तनपानाचे दूध किंवा गाईचे दूध घाला
३. ओट्सची धिरडी
६ धिरड्यांसाठी लागणारे घटक (बाळासाठी)
- ओट्स – १ कप, पूड केलेले
- छोलेपीठ – १/४ कप
- जिरेपूड – १ टी स्पून
- हळद – १ चिमूट
- गाजर – १/४ किसलेले
- कांदा –१
- हिरव्या मिरच्या – २ बारीक केलेल्या
- पाणी गरजेपुरते
- तूप/ तेल
कृती:
- एका भांड्यात ओट्सची पावडर आणि इतर घटक घाला आणि गरजेप्रमाणे पाणी घाला आणि बॅटर सारखे होईपर्यंत ढवळा.
- तवा चांगला गरम करून घ्या आणि त्याला तेल लावा
- तव्यावर पीठ पसरावा आणि थोड्या वेळासाठी शिजू द्या
- थोडे शिजल्यावर डोसा उलटवा म्हणजे तो दोन्ही बाजूने सारखा भाजला जाईल
४. पास्ता खीर
घटक
- दूध: २ कप
- पास्ता – ३/४ कप
- गुळाचा पाक –१/४ कप
- हिरवी वेलची –२
- तांदळाचे पीठ – ११/२ कप पाण्यात किंवा दुधात मिसळलेले – १/४ कप
- तूप
- काजू
कृती
- पास्ता पाण्यात उकळून घ्या आणि काही मिनिटे शिजू द्या
- पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा
- तव्यावर तूप टाकून काजू तुपावर भाजून घ्या आणि भाजून झाल्यावर एका वाटीत काढून ठेवा
- एका भांड्यात दूध घेऊन त्यात शिजवलेला पास्ता घाला आणि थोडा वेळ शिजू द्या
- दुसऱ्या भांड्यात तांदळाचे पीठ, दूध आणि पाणी घालून नीट मिक्स करा
- हळूच हे भांड्यात काढून घ्या. मिश्रण चांगले शिजेपर्यंत ढवळत रहा.
- खीर घट्ट होऊ द्या आणि त्यावर वेलची पूड घाला
- गुळाचा पाक घालून शिजू द्या
५. ओव्हन मध्ये भाजून केलेले हिरवे बीन्स
घटक
- हिरवे बीन्स (चिरलेले) – १ कप
- ऑलिव्ह ऑईल – २ टी स्पून
- चवीपुरते मीठ
कृती
- ओव्हन ४२५ डिग्रीला चांगला गरम करून घ्या
- ओव्हन मध्ये जेली रोल पॅन ठेवा
- वाटीमध्ये असलेल्या बीन्स मध्ये एक चिमूट भर मीठ घाला आणि थोडे तेल घाला
- हे बीन्सचे मिश्रण बेकिंग शीट वर पसरावा. ८ मिनिटे कुरकुरीत होई पर्यंत बेक करा
बाळाला भरवण्याच्या टिप्स (१३–१६ महिने)
कालांतराने, तुम्हाला लक्षात येईल की तुमचे बाळ खाण्यास त्रास देते आहे. परंतु काळजी करू नका फक्त तुमचे बाळ
ह्यास अपवाद नाही. बऱ्याचशा मुलांना खायच्या बाबतीत आवडी निवडी येऊ लागतात. खालील टिप्स मुळे लक्षणीय फरक पडणार नाही परंतु खाण्याच्या सवयी निश्चितच सुधारतील.
- जर खाद्यपदार्थ आकर्षक असेल तर तुमचे बाळ लगेच जेवण संपवेल. छोटी बाळे ही आपल्यासारखीच असतात, छान दिसणाऱ्या गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात. म्हणून जर तुम्ही सँडविचेस करत असाल तर कटर्स वापरून त्यास चांगला आकार द्या.
- बाळाला खूप जास्त किंवा खूप कमी खाद्यपदार्थ भरवू नका.
- बाळाच्या तोंडांत बळेच घास भरवू नका, किंबहुना बाळाला स्वतःचे स्वतः खाऊ द्या.
- बाळाला खूप गोड पदार्थ किंवा खूप साखर असलेल्या गोष्टी देऊ नका.
- जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी आहाराची योजना तयार करता तेव्हा त्यामध्ये खुप पाककृतींचा समावेश करा त्यामुळे ते आकर्षक होईल. जेव्हा तुमच्या बाळाला दुपारच्या जेवणात काय अपेक्षित आहे हे माहित असेल तेव्हा त्याचा जेवणातील रस वाढेल.
- १३ ते १६ महिन्यांच्या बाळांना फक्त समृद्ध आणि पोषक आहार दिला पाहिजे. ताजी फळे आणि कच्च्या पालेभाज्यांचा समावेश आहारात करा. बाळाला सुरुवातीपासूनच पोषक आहाराच्या सवयी तुम्ही लावू शकता.
तुमच्या बाळाच्या शरीराची सतत वाढ होत असते आणि त्यानुसार बाळाच्या शरीरात बदल होत असतात, त्यामुळे योग्य आहार घेणे हे बाळासाठी जरुरीचे आहे. बाळाला पोषक आहार दिल्याने तसेच त्याला त्याच्या जेवणाचा आनंद घेऊ दिल्याने बाळाला पोषक आहार घेण्याची सवय लागेल आणि ते त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी मदत करेल.