Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १३वा आठवडा

गर्भधारणा: १३वा आठवडा

गर्भधारणा: १३वा आठवडा

कुणी तरी म्हटलंय की “आयुष्यात बाळाच्या येण्याने हृदयातला कप्पा आनंदाने भरून जातो,जो रिकामा होता हे कधी लक्षातच येत नाही ”

गर्भधारणेनंतरचा प्रत्येक क्षण हा मौल्यवान असतो. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला नवीन काहीतरी समजतं त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बाळामधील बंध अधिक दृढ होत जातो. १३वा आठवडाही काही वेगळा नाही. किंबहुना ज्या क्षणी तुम्ही गर्भारपणाच्या १३व्या आठवड्यात पदार्पण करता, तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण तुम्ही पहिली तिमाही लवकरच पूर्ण करणार आहात आणि दुसऱ्या तिमाहीला सुरुवात होण्यास फक्त एक आठवडा बाकी आहे.

मॉर्निंग सिकनेस आता नाहीसा झालेला आहे! मग तुम्ही विचाराल आता पुढे काय? चला तर मग जाणून घेऊयात!

गर्भारपणाच्या १३व्या आठवड्यातील तुमचे बाळ

१३ व्या आठवड्यात जर तुम्ही तुमच्या बाळाला पाहू शकलात तर ते परग्रहावरून कुणीतरी आल्यासारखे भासेल! परंतु काळजीचे काही कारण नाही. फक्त बाळाचे डोके तुमच्या संपूर्ण शरीराच्या लांबीपेक्षा निम्मे आहे, त्यामुळे तुमचं छोटं बाळ तुम्हाला वेगळं भासेल. जेव्हा गर्भाची वाढ होते तेव्हा बाळाचे डोक्याची आधी वाढ होते आणि नंतर शरीराची वाढ होते.

गर्भारपणाच्या १३व्या आठवड्यात अजून रोमांचक गोष्ट म्हणजे बाळाच्या आतड्याचा आणि स्वरतंतूंचा (vocal cord) विकास होतो.

गर्भधारणेच्या १३व्या आठवड्यात, बाळाच्या हातापायांमध्ये छोटी हाडे तयार होऊ लागतात. आता बाळ नियमित हालचाल करू लागते, त्यामुळे तुम्हाला आतून थोड्या गुदगुल्या झाल्यासारखे वाटेल.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भधारणेच्या १३व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा आकार डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ३ इंच इतका असतो आणि वजन २८ ग्रॅम्स असते. तुमच्या बाळाचा विकास सातत्याने होत आहे आणि बाळाचा आकार जो आधी लिंबाएवढा होता तो आता पीच एवढा झाला आहे. आता तुमचे बाळ डोके वळवायला शिकले आहे तसेच जांभई देणे, गिळणे,उचक्या देणे ह्या सारख्या क्रिया सुद्धा करू लागले आहे.

शरीरात होणारे बदल

बऱ्याच स्त्रियांमध्ये पहिल्या तिमाही दरम्यान येणारा थकवा आणि मळमळणे बंद झालेले असते आणि गर्भारपणाचा पुढचा काळ सुसह्य झालेला असतो.

गर्भारपणाच्या १३व्या आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज दिसू लागेल. पहिल्या तिमाहीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वात लक्षात येण्याजोगा बदल म्हणजे तुम्हाला तुमच्या सध्याच्या कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटेल कारण तुमच्या पोटाचा आकार अजून थोडा वाढला आहे, म्हणजेच तुम्ही नवीन कपड्यांच्या खरेदीस सुरवात करू शकता.

तथापि, काही प्रकरणांमध्ये, विशेषकरून जर जुळी बाळे असतील तर पहिल्या तिमाहीतील काही लक्षणे जसे की बद्धकोष्ठता, डोकेदुखी, हळुवार आणि दुखरे स्तन इत्यादी गर्भारपणाच्या संपूर्ण काळात तशीच राहतात.

१३ व्या आठवड्यात आढळणारा आणखी एक ठळक बदल म्हणजे योनीमार्गातील पांढरा स्त्राव. पातळ, दुधासारखा आणि सौम्य वास असलेला स्त्राव सामान्य आहे आणि गर्भारपण जसजसे पुढे सरकते तशी त्यात वाढ होते. ह्या स्त्रावामुळे योनीमार्गाचा संसर्गापासून बचाव होतो आणि योनीमध्ये चांगल्या जिवाणूंचे संतुलन राखले जाते.

१३व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणाच्या १३ व्या आठवड्यात सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे खालील प्रमाणे:

  • थकवा कमी होणे: तुमचे शरीर आता गर्भारपणाशी समायोजित झाले आहे, तुम्हाला आता पूर्वीसारखेच उत्साही वाटणार आहे. तुम्ही आता सोपे आणि साधे व्यायाम करू शकता.
  • अन्नाची लालसा: जरी तुम्हाला जंक फूड खावेसे वाटत असले तरी तुम्ही विचारपूर्वक आरोग्यपूर्ण आणि पोषक आहार घेतला पाहिजे. तुमच्या गरोदरपणाच्या संपूर्ण काळात जे जंक फूड खावेसे वाटेल ते थोड्या प्रमाणात खा. तुमच्या इच्छा एकदम बंद करण्याची गरज नाही.
  • छातीत जळजळ होणे: जस जसे दिवस जातात तसे पोटाचे स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे पित्त अन्ननलिकेमध्ये सरकते. ह्या कारणामुळे छातीत जळजळ जाणवते. पण ह्यासाठी तुम्ही जास्त काही करू शकत नाही परंतु जळजळ होण्यास कारणीभूत असलेल्या पदार्थांपासून उदा: चॉकलेट्स, तिखट अन्नपदार्थ, मद्यपान ह्यापासून दूर राहू शकता.
  • कामवासनेत बदल: ह्या काळात ओटीपोटाकडे वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे लैंगिक इच्छेमध्ये बदल होतो. एकतर तुम्हाला अजिबात इच्छा होणार नाही किंवा उच्च कामेच्छेचा अनुभव तुम्ही घ्याल. जननेंद्रियांकडे वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे नैसर्गिकरित्या स्नेहन (lubrication) वाढेल आणि त्यामुळे शारीरिक संबंधांच्या वेळेला आनंद मिळू शकेल.

वर दिलेल्या लक्षणांव्यतिरिक काही सौम्य लक्षणे आढळतात आणि ती म्हणजे बद्धकोष्ठता, चक्कर येणे आणि रक्तपुरवठा वाढल्यामुळे रक्तवाहिन्या ठळ्क दिसणे.

गर्भधारणेच्या १३व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भधारणेच्या १३व्या आठवड्यात पोटाचा आकार

 

हा गर्भारपणाच्या १३ वा आठवडा आहे आणि तुमचे गर्भाशय विस्तारित झाल्यामुळे तुमच्या पोटाचा आकार वाढलेला दिसेल. ज्यांना तुम्ही ही गोड़ बातमी आत्तापर्यंत सांगितलेली नसेल त्यांना तुम्ही गरोदर आहात हे लक्षात येईल. तुमची आधीची जीन्स तुम्हाला पोटाच्या भागात घट्ट होऊ लागेल आणि तुम्हाला अगदी घट्ट बसणाऱ्या टॉप्समुळे तुमचं गोड गुपित सगळ्यांना कळणार आहे.

गर्भधारणेच्या १३व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भाची वाढ आणि विकास जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेतला जातो. पहिल्या तिमाहीच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात, गर्भाच्या विकासदरम्यान खूप बदल होत असतात, तसेच अल्ट्रासाऊंड च्या वेळेला सगळेच बदल तुम्हाला जाणवणार नाहीत किंवा तुम्ही बघूही शकणार नाही. ह्या आठवड्यात तुमच्या बाळाची मूत्रपिंडे मूत्रमार्ग कार्यरत होतील. तुमच्या बाळाचे हात आणि पाय शरीराच्या आकाराच्या योग्य प्रमाणात असलेले तुम्हाला दिसतील . ह्या काळात बाळाच्या शरीराचा आकार वाढेल आणि आता बाळाचे डोके शरीराच्या आकाराच्या १/३ इतके दिसेल. सोनोग्राफीच्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की बाळाची बोटे आणि दंतकळ्या विकसित होण्यास सुरुवात झाली आहे.

आहार कसा असावा?

बाळाची वाढ आणि विकास वेगाने होत असल्याने तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असा आहार घेतला पाहिजे. ताजी फळे आणि भाज्या तसेच प्रथिनांनी समृद्ध असे मांस, बीन्स आणि कमी चरबी असलेले दुग्धजन्य पदार्थ ह्यांचा समावेश तुमच्या आहारात करणे जरुरीचे आहे.

मऊ चीझ खाणे टाळा कारण त्यामध्ये लिस्टेरिया नावाचा जिवाणू असतो त्यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये लिस्टेरिओसिसचा संसर्ग होऊ शकतो. तुम्ही पाश्चराईस केलेल्या दुधापासून बनवलेले चीझ खात आहात ना ह्याची खात्री करा. तसेच उच्च प्रमाणात पारा असलेले मासे उदा: किंग, मॅकेरेल खाणे टाळा. पाऱ्यामुळे बाळाच्या मेंदू आणि मज्जारज्जूवर परिणाम होतो.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही पहिल्या तिमाहीच्या शेवटच्या दिवसांमध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हे करा

  • जास्त प्रमाणात फोलेट, कॅल्शिअम, लोह आणि तंतुमय पदार्थ घ्या.
  • आरोग्यपूर्ण आणि घरचे अन्नपदार्थ खा.
  • दिवसातून १०-१२ ग्लास पाणी प्या आणि इतर द्रवपदार्थ घ्या.
  • ओमेगा ३ फॅटी ऍसिड घ्या.
  • पुरेशी झोप घ्या.
  • पुरेसा व्यायाम करा.

हे करू नका

  • दोघांसाठी म्हणून खूप खाण्यास सुरुवात करू नका.
  • अन्नाच्या सुरक्षितता दुर्लक्षित करू नका.
  • जंतुनाशकांच्या सानिध्यात जाणे टाळा.
  • जंक फूड टाळा.
  • खूप जास्त जड व्यायामप्रकार टाळा.
  • जर आधी गर्भपात झाला असेल तर गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध टाळा.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

शॉपिंग करणे हा नेहमीच रोमांचकारी अनुभव असतो, पण ह्या वेळेला तुमच्या खरेदी करण्यामागचे कारणही तितकेच गोड़ आहे. गर्भधारणेचा १३ वा आठवडा म्हणजे खूप काही खरेदी करावी असे नाही कारण आत्ता तुमच्या पोटाचा आकार थोडा वाढला आहे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांमध्ये घालण्यासाठी आरामदायी कपड्यांची खरेदी करा, तुम्हाला कपडे खरेदी साठी पुन्हा एकदा जावे लागणारच आहे.

पहिली तिमाही संपल्यानंतर, गर्भारपणाचा सुरवातीचा अस्वस्थतेचा काळ संपणार आहे. तुम्ही आई होण्याच्या प्रवासातील सर्वात आरामदायी काळात प्रवेश करीत आहात. ही ऊर्जा साठवून ठेवा, पुढच्या काळासाठी ती उपयोगी पडणार आहे.

मागील आठवडा: गर्भधारणा: १२वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १४वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article