In this Article
आई होणे ही सर्वोच्च भावना आहे आणि गर्भधारणा होणे हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. जर तुम्ही बाळासाठी बराच काळ प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला यश येत नसेल तर ‘ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट’ तुम्ही वापरू शकता आणि त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
ओव्यूलेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेदरम्यान अंडाशयातून स्त्रीबीजे सोडली जातात. प्रत्येक महिन्याला, अंडाशयामध्ये बरीच स्त्रीबीजे परिपक्व होतात. त्यापैकी सर्वात जास्त निरोगी स्त्रीबीजाचे श्रोणीच्या पोकळीकडे आणि नंतर बीजवाहिनीकडे वहन होते.
जर फलन (स्त्रीबीज आणि शुक्रजंतूंचा संयोग) झाले नाही तर स्त्रीबीज २४ तासापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही.
शुक्रजंतू ७ दिवसांपेक्षा जास्त काळ बीजवाहिनी मध्ये जगू शकत नाही. त्यामुळे हा अगदी छोटा काळ आहे ज्यादरम्यान तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते.
ज्या शुक्रजंतूचे सरळ रेषेत वहन होते तो शुक्रजंतू सर्वात निरोगी समजला जातो आणि फलनासाठी ते जरुरीचे असते. जेव्हा तुम्ही बाळासाठी प्रयत्न करीत असता तेव्हा अशा शुक्रजंतूच्या निर्मितीसाठी तुमच्या जोडीदाराने दर ३-४ दिवसांनी वीर्यपतन केले पाहिजे.
ओव्यूलेशनच्या दोन दिवस आधी जर संभोग झाला तर गर्भधारणेची जास्तीत जास्त शक्यता असते.
त्यामुळे बऱ्याच स्त्रिया शारीरिक संबंधांचे दिवस ठरवण्यासाठी ओव्यूलेशन प्रेडिक्टर किटचा वापर करतात. ओव्यूलेशन किटची कशी मदत होते तसेच ओव्यूलेशन किटविषयी तुम्हाला लागणारी सगळी माहिती इथे आहे.
ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट नक्की काय आहे?
तुमचा उपजाऊ काळ केव्हा आहे हे ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट सांगते. ओव्यूलेशनच्या आधी ल्युटिनायझिंग हॉर्मोन(LH) ची निर्मिती वाढते. ही निर्मिती ओव्यूलेशनच्या काही दिवस आधी होते. ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि ओव्यूलेशन ह्यांचा खूप जवळून संबंध आहे. ह्या संप्रेरकाच्या निर्मितीत वाढ झाल्यामुळे ओव्यूलेशनची प्रक्रिया सुरु होते.
ह्या संप्रेरकाच्या निर्मितीत वाढ झाल्यानंतर काही दिवसांनी शारीरिक संबंध आल्यास गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते कारण ह्या काळात शुक्रजंतू आणि स्त्रीबीज एकमेकांच्या जवळ असतात. जी जोडपी कुटुंबाची सुरुवात करू इच्छित असतात ती सर्वात जास्त उपजाऊ काळ ओळखण्यासाठी ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट वापरतात.
ओव्यूलेशन चाचणी कधी करावी?
ओव्यूलेशन प्रेडिक्टर किटमुळे तुम्हाला तुमचा उपजाऊ काळ (fertile time) केव्हा आहे हे लक्षात येईल, हा काळ तुमच्या मासिक पाळीच्या चक्राच्या एकूण दिवसांमधून १७ दिवस कमी केल्यावर सुरु होतो. म्हणजेच जर तुमचे मासिक पाळी चक्र २८ दिवसांचे असेल तर ओव्यूलेशन चाचणी घेण्यास ११व्या दिवशी सुरुवात करा आणि पुढचे ६ दिवस ती चाचणी करत रहा.
ओव्यूलेशन चाचण्यांचे प्रकार
ओव्यूलेशन चाचण्यांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यांचे कार्य खालील पद्धतीने चालते:
१. टेस्ट स्ट्रीप पद्धती
ओव्यूलेशनचा काळ जाणून घेण्यासाठी ही पद्धती सर्वात उत्तम आहे. ह्यामध्ये लघवीच्या धारेखाली स्ट्रीप धरावी लागते किंवा लघवीचा नमुना गोळा करून तुम्ही त्यात पट्टी (स्ट्रीप) बुडवू शकता.
२. मिड-स्ट्रीम पद्धती
घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणी किट सारखीच ही किट असते आणि करून पाहण्याची पद्धती पण काहीशी तशीच आहे. तुम्हाला लघवीच्या नमुन्याचे काही थेम्ब चाचणीच्या पट्टीवर टाकावे लागतात आणि रंगात काही बदल होतो आहे का ह्याचे निरीक्षण करावे लागते आणि ह्या चाचणीनुसार तुमचे ओव्यूलेशन होऊन गेले आहे का किंवा त्यास अजून काही दिवस आहेत का हे तुम्ही सांगू शकाल. जितका ह्या स्ट्रीपचा रंग गडद असतो तितके तुम्ही ओव्यूलेशनच्या जवळ असता.
ल्युटिनाइझिंग हॉर्मोन मध्ये वाढ झाली आहे का हे लघवीच्या चाचणीवर आधारित ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट तपासून पाहते आणि हे ओव्यूलेशनच्या १-२ दिवस आधी होते.
हे महत्वाचे आहे की कमी प्रमाणात एल.एच. हे तुमच्या लघवीमध्ये असते. तथापि, ओव्यूलेशनच्या आधी त्याचे प्रमाण ४-५ पट वाढते त्यामुळे ओव्यूलेशनची प्रक्रिया सुरु होते. ओव्यूलेशनच्या काळात तुमची गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते.
३. सलायवरी फरनिंग किट
ओव्यूलेशन तपासून बघण्याचा अजून एक मार्ग म्हणजे सलायवरी फरनिंग किटचा वापर होय. ह्यामध्ये अगदी छोटासा मायक्रोस्कोप असतो जो वापरून तुम्हाला लाळेमध्ये मिठाचे किती प्रमाण आहे हे तपासून पहावे लागते. जेव्हा जास्त इस्ट्रोजेनची निर्मिती होते तेव्हा लाळेमध्ये मिठाचे प्रमाण वाढते. वाळलेलं मीठ हे फर्नच्या आकाराच्या स्फटिकाप्रमाणे दिसते. ह्या प्रक्रियेला ‘फ्रर्निग’ असे म्हणतात.
हे फर्नसारखे स्फटिक ओव्यूलेशनच्या आधी एक किंवा दोन दिवस दिसतात किंवा ओव्यूलेशन नंतर दोन दिवस दिसतात. ह्यामुळे तुम्हाला तुमचा सर्वात जास्त उपजाऊ (fertile) काळ लक्षात येईल. ओव्यूलेशन व्यतिरिक्तच्या काळात मीठ वाळल्यावर सुद्धा त्याला असा विशेष आकार येत नाही.
४. ओव्यूलेशन कॅल्कुलेटर
ओव्यूलेशन कॅल्कुलेटर हे अजून एक साधन आहे जे तुम्ही वापरू शकता. हे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला त्यासाठी तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस आणि तुमचे मासिक पाळी चक्र किती दिवसांचे आहे हे तपशील द्यावे लागतील. जेव्हा तुम्ही हे तपशील द्याल तेव्हा कॅल्कुलेटर मधून गर्भधारणेस उपजाऊ (fertile) दिवस तुम्हाला दिसतील.
काय निवडावे?
मूत्रावर आधारित चाचण्या ९९% अचूक निकाल देतात आणि तुमच्यासाठी घरी वापरण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तथापि, ह्या चाचण्या तुम्ही गर्भनिरोधक म्हणून वापरू नका कारण चाचणीचे परिणाम खात्रीलायक असतीलच असे नाही. किंबहुना ओव्यूलेशन नंतर तुम्ही २४ तासात गर्भार राहू शकता. स्त्रीबीज सोडले गेले नसले तरी एल.एच. च्या पातळीत वाढ होऊ शकते. ही धोक्याची घंटा असू शकते.
लघवीच्या चाचण्या जसे अचूक निकाल देतात तसे फरनिंग च्या चाचणीत मिळत नाहीत. किंबहुना जर तुम्ही तुमच्या मासिक पाळी दरम्यान गर्भधारणेसाठी क्लोमीड किंवा तत्सम औषधे घेत असाल तर फरनिंग होऊ शकते.
कुठलीही पद्धत वापरण्याआधी तुमचे ओव्यूलेशन कॅलेंडर तयार ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचा सर्वात जास्त प्रजननक्षम काळ केव्हा आहे ह्याचा अचूक अंदाज येईल.
ओव्यूलेशन किट कसे वापराल?
मूत्रावर आधारित ओव्यूलेशन चाचणी करताना, तुमच्या लघवीचा नमुना कप किंवा वाटीत काढून घ्या किंवा लघवी करताना ती पट्टी खाली धरा. पट्टीवरच्या रंगातील बदलाचे निरीक्षण करा, ज्यामुळे तुम्हाला एल.एच. च्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे का ते कळेल.
तुम्ही डिजिटल ओव्यूलेशन प्रेग्नन्सी किट सुद्धा वापरू शकता त्यावरील चिन्हांनी सुद्धा तुम्ही सर्वात जास्त केव्हा उपजाऊ (fertile) आहात ते कळेल. डिजिटल ओव्यूलेशन चाचणी ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
सर्वसाधारण सूचना थोड्या वेगवेगळ्या असू शकतात तथापि एक महत्वाचा नियम सगळीकडे सारखाच आहे तो म्हणजे तुम्ही सकाळी ८.०० ते रात्री १०. ०० पर्यंत ह्या कालावधीच तुम्ही लघवीचा नमुना घेतला पाहिजे. सर्वात सुयोग्य कालावधी हा दुपारी २ ते २. ३० च्या दरम्यान घेतला पाहिजे.
ओव्यूलेशन चाचणीचे निकाल कसे पाहावेत?
चाचणीचे निकाल जाणून घेण्याआधी, चाचणी योग्य पद्धतीने कशी करावी हे जाणून घेतले पाहिजे.
दररोज एका ठराविक वेळेला तुमच्या लघवीचा नमुना गोळा करा. त्यामुळे तुम्ही अचूकरीत्या बदलांवर लक्ष ठेऊ शकाल. तसेच, उठल्या उठल्या लघवीचा नमुना घेऊ नका. असं केल्याने एल.एच.ची पातळी वाढल्याचा पहिला दिवस तुमचा चुकू शकतो. चाचणीच्या आधी द्रव पदार्थ कमी घेतल्यास चाचणीचे निकाल अचूक मिळतील.
चाचणी केल्यानंतर १० मिनिटात चाचणीचे निकाल वाचत आहात ना ह्याची खात्री करा. सकारात्मक निकाल बदलणार नसला तरी, दुसऱ्या रंगाचे पट्टे दिसू लागतात. चाचणीचे निकाल वाचून झाल्यावर ओव्यूलेशन चाचणीच्या पट्ट्या किंवा कार्ड्स टाकून द्या.
जर तुम्ही सलायवरी फर्निंग किट (Salivary Ferning Kit) निवडलेत तर काही खाण्यापिण्याआधी तुम्हाला उठल्या उठल्या चाचणी करावी लागेल. फक्त ज्या लाळेची तुम्ही चाचणी करणार आहात त्यामध्ये बुडबुडे नसल्याची खात्री करा. स्लाईडवर लाळेचा नमुना ठेवा किंवा स्लाईड चाटून घ्या. लाळ सुकेपर्यंत वाट बघा आणि सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने फर्नच्या आकाराचे स्फटिक तयार झाले आहेत का ते तपासून पहा.
ओव्यूलेशन किटचे फायदे
ओ.पी.के. वापरण्याचे खूप फायदे आहेत आणि त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- ओव्यूलेशन किट्स ओव्यूलेशनचा कालावधी ओळखण्यासाठी इतर पद्धतींपेक्षा चांगले आणि अचूक निकाल देते. जर तुम्ही चाचणी नीट केली तर ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट हे एल.एच.ची वाढलेली पातळी ही ओव्यूलेशन होत असल्याची निशाणी आहे आणि ती पातळी शोधण्यासाठी ते ९७% परिणामकारक असतात.
- ओव्यूलेशन किट्स हे वापरण्यासाठी सोपे आणि सोईचे आहेत. वापरण्यासाठी सोयीचे तर ते आहेतच, पण तुम्ही मासिक पाळी चक्राच्या मध्यावर चाचणी केली पाहिजे म्हणजेच ओव्यूलेशनचा काळ जवळ असताना ही चाचणी तुम्ही करू शकता, दररोज करण्याची गरज नाही. दुसऱ्या चाचण्यांच्या बाबतीत जसे की शरीराचे मूलभूत तापमान तपासण्याची चाचणी करताना तुम्हाला दररोज ती चाचणी करणे भाग पडते. इथे मात्र तुम्हाला लघवीचे काही थेम्ब चाचणीच्या पट्टीवर घालावे लागतात.
- ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट हे सहजगत्या उपलब्ध असतात. हे किट तुम्ही तुमच्या जवळच्या औषधांच्या दुकानातून आणि सुपरमार्केट मधून विकत आणू शकता. तुम्हाला हे किट विकत घेण्यासाठी कुठलेही प्रिस्क्रिप्शन लागत नाही.
तुमचा सर्वात जास्त प्रजननक्षम काळ तुम्हाला माहित असल्यास गर्भधारणा होणे सर्वात सोपे असते. जेव्हा तुमचे वेळापत्रक खूप व्यस्त असते आणि तुम्हाला शारीरिक संबंधांसाठी वेळ मिळत नाही तेव्हा हे जास्त महत्वाचे असते. तुमचा उपजाऊ (fertile) काळ जेव्हा सर्वात जास्त असतो तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेऊ शकता.
ओव्यूलेशन किट वापण्याचे तोटे
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओव्यूलेशन किट्सचे काही फायदे सुद्धा आहेत ते असे:
- ओव्यूलेशन प्रेग्नन्सी किट तुम्हाला ओव्यूलेशन होते आहे की नाही किंवा होणार आहे की नाही हे सांगत नाही, तर ह्या किट्स एल.एच. च्या निर्मितीत वाढ झाली आहे किंवा कसे हे सांगतात. ह्या काळात स्त्रीबीज हे फॉलिकल मधून बाहेर पडत नाही आणि ह्या स्थितीला “ल्युटिनाइज्ड अनरपचर्ड फॉलिकल सिंड्रोम” असे म्हणतात.
- ओ.पी.के. तुमच्या गर्भाशयाचा श्लेष्मा शुक्रजंतूंचे वाहन होण्यासाठी योग्य आहे का हे सांगत नाही. मासिक पाळीच्या मध्यावर, योनीमार्गातून स्त्रावाचा अनुभव तुम्ही घ्याल, ह्या स्रावाची निर्मिती गर्भाशयाच्या मुखातून होते. त्यामुळे शुक्रजंतूंसाठी पोषक वातावरण तयार होते. ओ.पी.के. ना हा चिकट स्त्राव गर्भधारणेसाठी पुरेसा आहे की नाही हे समजत नाही.
- जर तुम्ही गर्भधारणेसाठी काही औषधे घेत असाल तर ओव्यूलेशन किट काम करत नाही. जेव्हा तुमच्या शरीरात पेरगोनल (pergonal) सारखी औषधे असतात तेव्हा ओ.पी.के. नीट परिणाम देत नाहीत.
- ओव्यूलेशन किट्स स्वस्त नसतात. ब्रँडेड किट्स (जे तुम्ही अचूक निकालांसाठी वापरले पाहिजेत) फार महाग असतात आणि एक किट पुरेशी नसते.
- ज्या स्त्रियांचे वय ४० पेक्षा जास्त असते अशा स्त्रियांच्या बाबतीत हे काम करत नाही. ज्या स्त्रिया रजोनिवृत्तीच्या जवळ असतात अशा स्त्रियांच्या बाबतीत एल.एच. चे प्रमाण हे जास्तच असते. त्यामुळे ओ.पी.के. योग्य निकाल देत नाहीत.
- संप्रेरकांमधील बदल, सिस्ट्स आणि वंध्यत्वावरील औषधांमुळे जरी तुमचे ओव्यूलेशन होत नसेल तरी फरनिंग होऊ शकते. तसेच तुम्हाला फरनिंगची चाचणी दिवसातून अनेक वेळा घ्यावी लागते आणि तुमच्या जेवणाच्या वेळेनुसार चाचणी कधी करायची ह्याचे व्यवस्थापन करावे लागेल.
त्यामुळे ओव्यूलेशन प्रेडिक्टर किटचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे तोट्यांपेक्षा फायदे जास्त आहेत. त्यामुळे करोडो आई होणाऱ्या स्त्रिया गर्भधारणेसाठी ह्या किटचा वापर करतात. योग्य औषधांचा वापर केल्यास ओ.पी.के. चांगल्या प्रकारे कार्य करते.
तुमचे वय ४० वर्षांखाली असेल तर तुम्ही हे किट अगदी सहजतेने तुमचा उपजाऊ काळ ओळखण्यासाठी करू शकता.
अजून काय जाणून घेणे गरजेचे आहे?
पॅरासिटॅमॉल सारख्या औषधांचा चाचणीवर परिणाम होत नाही. तथापि आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही एल.एच. किंवा एच.सी.जी. (Human Chorinic Gonadotrophin) संप्रेरक असलेली औषधे घेत असाल तर ही चाचणी काम करत नाही.
बऱ्याच ब्रॅण्ड्सचे ओव्यूलेशन किट्स असतात आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा ही किट्स ऑर्डर करू शकता. तुम्ही विश्वासार्ह किट घेत आहात ह्याची खात्री करा, तुमच्या मैत्रिणीशी किंवा नातेवाईकांशी, ज्यांनी आधी ह्या किटचा वापर केला आहे आणि ज्यांना गर्भधारणा झाली आहे त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्हाला गर्भधारणेसाठी अनेक शुभेच्छा!