In this Article
तुमच्या नवजात बाळाची वाढ वेगाने होत असते. तुमच्या छोट्याशा बाळाची वाढ इतक्या वेगाने कशी होऊ शकते ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाळाच्या वाढीचा आणि विकासाचा वेग हा बाळ कुठला आहार घेते ह्यावर अवलंबून असतो. बाळांना काही काळ स्तनपान करणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याच्या आहारात सुधारणा करणे आवश्यक आहे. होय, ह्याच कालावधीदरम्यान बाळाला घन पदार्थांची ओळख करून देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या 6 महिन्यांच्या बाळासाठी खाद्यपदार्थांचे पर्याय शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला कुठल्या पोषक घटकांची गरज आहे हे समजून घेऊन सुरुवात करूया.
6 महिन्यांच्या बाळासाठी आवश्यक पोषक घटक
पहिल्या सहा महिन्यांसाठी आईचे दूध हे कोणत्याही बाळासाठी सर्वात आरोग्यदायी अन्न आहे. परंतु फक्त ते पुरेसे नाही, तुमचे बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत, इतर पौष्टिक पदार्थांचा सुद्धा बाळाच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
- बाळाला आवश्यक असलेला पहिला पोषक घटक म्हणजे प्रथिने. प्रथिनांना आपल्या शरीराचे ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ म्हणून ओळखले जाते. प्रथिने हा शरीरासाठी आवश्यक असा महत्वाचा पोषक घटक मानला जातो. प्रथिने शरीराच्या वाढीस मदत करतात तसेच स्नायू आणि ऊतकांची दुरुस्ती करतात. बाळांना प्रथिनांची खूप गरज असते, कारण या टप्प्यावर, वाढ वेगाने होत असते.
- लोह हा सर्वात महत्वाचा पोषक घटक आहे. मेंदूचे कार्य चांगले चालण्यासाठी आणि हिमोग्लोबिनसाठी लोहाची गरज असते. नवजात बाळांमध्ये पुरेसे लोह असते आणि ते सुमारे चार महिने टिकून राहते, त्यानंतर तुम्हाला बाळाच्या आहारात लोहाचा समावेश करावा लागेल.
- ओमेगा 3फॅटी ऍसिड्ससुद्धा तुमच्या बाळाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत कारण तुमच्या बाळाची दृष्टी विकसित होण्यासाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि संज्ञानात्मक कौशल्यांसाठी ते मदत करतात.
- सहा महिन्यांच्या बाळासाठी कॅल्शियम हा सर्वात महत्वाचा पोषक घटक आहे. कॅल्शिअम हाडे आणि दातांच्या विकासात मदत करते. बाळाला दररोज किमान 500मिग्रॅ कॅल्शिअमची गरज असते. बाळाच्या फॉर्म्युलाप्रमाणे आईच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. बाळाची हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाला पुरेसे कॅल्शियम देत असल्याची खात्री करा.
- बाळासाठी जीवनसत्त्वांची देखील गरज असते.
- व्हिटॅमिन ए आणि सी तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी आणि दृष्टीसाठी उत्तम आहेत.
- तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती आणि पचन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी आवश्यक आहे.
- निरोगी हाडांसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते.
- मज्जासंस्थेच्या विकासासाठी व्हिटॅमिन ई ची गरज असते.
- व्हिटॅमिन के रक्ताच्या गुठळ्या रोखण्यास मदत करते.
- बाळाला कमीतकमी 3मिलिग्रॅम झिंकची गरज असते, कारण ते पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
- कर्बोदकांमधे ऊर्जेची गरज असते, त्यामुळे ते तुमच्या बाळाला आवश्यक असलेले आणखी एक पोषक तत्व आहे.
तुम्ही तुमच्या बाळाला घन पदार्थांची ओळख करून देऊ शकता का?
सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळ घन पदार्थ पचवण्यास सक्षम नसते, म्हणून तुमचे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही हळूहळू अर्ध-घन आणि घनपदार्थ देण्यास सुरुवात करू शकता.
तुमचे बाळ घन पदार्थांसाठी केव्हा तयार आहे हे जाणून घेण्यासाठी बाळाच्या वाढीच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. सर्वात आधी तुमची बाळ मान धरू लागले आहे का ते पहा. दुसरे म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला बसलेल्या स्थितीत ठेवता तेव्हा तुमच्या बाळाला आधाराशिवाय तसंच बसून राहता आलं पाहिजे. जर तुमच्या बाळाचे वजन जन्माच्या वजनाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असेल, तर ते सुद्धा बाळाला घन पदार्थ सुरु करण्यासाठीचे चांगले चिन्ह आहे. जेव्हा बाळ अन्न थुंकून न टाकता गिळू लागते तेव्हा बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यास हरकत नसते.
6 महिन्यांच्या बाळासाठी खाद्यपदार्थ
तुमचे बाळ लहान आहे तसेच त्याचे पोट सुद्धा लहान आहे. त्यामुळे बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना ती हळू हळू केली पाहिजे. खाली दिलेल्या अन्नपदार्थांचे छोटे छोटे घास लहान बाळाला भागवण्यास सुरुवात करा. खाली ६ महिन्यांच्या बाळासाठी खाद्यपदार्थांची यादी दिलेली आहे.
- केळी – केळी चविष्ट असतात तसेच केळी एक सर्वोत्कृष्ट बेबी फूड देखील आहे. हे फळ मऊ आणि मॅश करण्यायोग्य आहे. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, आणि ते तुमच्या बाळासाठी एक उत्तम खनिज आहे.
- भात – तुमच्या लहान बाळासाठी भात हा अन्नपदार्थाचा एक चांगला पर्याय आहे. मऊ भात आईच्या दुधात मिसळून बाळाला भरवा.
- ओट्स – तुम्ही तुमच्या बाळाला आईच्या दुधात घालून ओट्स देऊ शकता. ओट्समध्ये फायबर आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते.
- एवोकॅडो – केळ्यांप्रमाणेच हे फळ मऊ आहे आणि ते देखील मॅश केले जाऊ शकते. एवोकॅडो मध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
- सफरचंद – तुम्ही तुमच्या बाळाला सफरचंद देखील देऊ शकता. फक्त ते सोलून घ्या. बिया काढून टाकल्याची खात्री करा. जर तुम्हाला फळाची साल ठेवायची असेल, तर तुम्ही फळ मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्या.
- गाजर -एक गाजर उकडून मॅश करून घ्या. तुमच्या बाळाला कदाचित गाजराची चव फारशी आवडणार नाही, पण बाळासाठी अन्नपदार्थांचा तो एक उत्तम पर्याय आहे.
- मटार – हिरवे मटार उकडून मॅश करून घ्या. तुम्ही मॅश केलेल्या मटारमध्ये थोडे मीठ घालून बाळाला खायला घालू शकता.
- बटाटे – मॅश केलेल्या बटाट्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून बाळाला द्या. तुमच्या बाळाला ते आवडेल.
यापैकी काही फळे आणि भाज्या मिक्स करून तुम्ही तुमच्या 6 महिन्यांच्या बाळासाठी आणखी काही छान छान खाद्यपदार्थ बनवू शकता.
6 महिन्यांच्या बाळासाठी आहारविषयक टिप्स
खालील टिप्स बाळाला घनपदार्थ भरवताना काही समस्या निर्माण झाल्यास तुम्हाला उपयोगी पडतील.
- तुमचे बाळ लगेच नवीन अन्नपदार्थ खाणार नाही. म्हणून, थोडा धीर धरा.
- तुमच्या बाळाला पदार्थांची चव कळेपर्यंत खेळण्यांनी त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा.
- तुमच्या बाळाला जबरदस्तीने किंवा जास्त खायला देऊ नका.
- घनपदार्थ भरवताना बाळाला पाण्याचे छोटे घोट देत रहा.
- बाळाला भरवल्यानंतर ढेकर काढा.
- तुमचे बाळ रडत असेल तर त्याला कधीही खायला देऊ नका. बाळाला गुदमरले जाऊ शकते.
तुमच्या बाळाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा खूप मोठा आहे. तुमच्या बाळाला घन पदार्थांची ओळख करून देणे हा त्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. योग्य प्रकारचे अन्न पदार्थांची निवड आणि वर दिलेल्या टिप्सचे पालन केल्यास तुमचे बाळ घनपदार्थांचे चांगले सेवन करू लागेल.
आणखी वाचा:
७ महिन्यांच्या बाळासाठी पाककृतींसह अन्नपदार्थांचा तक्ता
नवजात बाळ ते ४ महिन्यांपर्यंतच्या बाळाचा आहार आणि टिप्स