Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील मधुमेह

गरोदरपणातील मधुमेह

गरोदरपणातील मधुमेह

In this Article

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. संप्रेरक पातळीत अचानक बदल होण्याव्यतिरिक्त, शरीरातील इतरही जैविक घटक बदलत असतात आणि त्यापैकीच एक घटक म्हणजे रक्तातील साखरेची पातळी होय. सोप्या भाषेत सांगायचे तर, गर्भावस्थेत मधुमेह होणे हे काही असामान्य नाही.

व्हिडिओ: गरोदरपणातील मधुमेह

गरोदरपणातील मधुमेह म्हणजे काय?

नावाप्रमाणेच हा मधुमेहाचा प्रकार गरोदरपणात होतो. गरोदरपणात काही स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे त्यांना गरोदरपणात मधुमेह होतो. काही स्त्रियांमध्ये, गरोदरपणात इन्सुलिनची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यतः शरीरातील नैसर्गिक इन्सुलिनच्या पातळीमुळे नियंत्रणात असते.

आधी मधुमेह नसलेल्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह होऊ शकतो आणि प्रसूतीनंतर त्याचे निराकरण होऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत महिलांना गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता असते.

गरोदरपणातील मधुमेहाची कारणे

शरीरातील इन्सुलिनच्या पातळीतील चढउतार हे गरोदरपणात होण्याऱ्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे. पचन प्रक्रियेदरम्यान, खाल्लेल्या अन्नातील कर्बोदकांचे ग्लुकोज मध्ये विघटन होते. ही ऊर्जा मानवी शरीर दैनंदिन कामे करण्यासाठी वापरते. सामान्य परिस्थितीत, स्वादुपिंडात तयार होणारे इन्सुलिन, ही साखर, पेशींमध्ये हलविण्यास मदत करते आणि शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते.

गरोदरपणात,प्लॅसेंटा नावाचा एक पडदा तयार होतो आणि त्यामार्फत वाढत्या बाळाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवली जातात आणि बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकले जातात. तथापि, प्लॅसेंटा त्याचे नेहमीचे कार्य करत असताना,शरीरात अनेक हार्मोन्स देखील सोडते आणि ही संप्रेरके आईच्या शरीराच्या नैसर्गिक हार्मोनल यंत्रणेमध्ये व्यत्यय आणतात. ह्यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनात सुद्धा व्यत्यय येतो. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि ती खंडित करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन नसते. अश्या परिस्थितीत आईला गरोदरपणातील मधुमेह होऊ शकतो.

गरोदरपणातील मधुमेहाशी संबंधित आणखी एक घटक म्हणजे वजन. हे लक्षात आले आहे की लठ्ठपणाचा शरीर इन्सुलिन प्रतिरोधक असण्याशी जवळचा संबंध आहे. गर्भधारणेपूर्वी आईचे वजन जास्त असल्यास, तिला गरोदरपणातील मधुमेहाचा उच्च धोका असू शकतो. तसेच,गरोदरपणात वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.

तुम्हाला गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका आहे का?

भारतातील सातपैकी एका महिलेला गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका असतो. परंतु, काही स्त्रियांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो. येथे काही घटक आहेत ज्यामुळे गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

तुम्हाला गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका आहे का?

  • उच्च बीएमआय: गर्भधारणेपूर्वी ज्यांचे वजन जास्त असते त्यांना हा धोका जास्त असतो.गरोदरपणात महिलांचे वजन जास्त वाढते आणि आधीच जास्त वजन असल्यामुळे शरीराला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे कठीण होते.
  • गरोदरपणात जलद वजन वाढणे: वजन वाढणे आणि गर्भावस्थेतील मधुमेह यांच्यातील नेमका संबंध स्पष्ट नसला तरी, इन्सुलिन निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या स्वादुपिंडातील बीटा पेशींवर परिणाम होऊन इन्सुलिन प्रतिरोधक वाढीमुळे असे घडते हे तज्ञांचे मत आहे. बीटा पेशींची इन्सुलिन स्राव करण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे गरोदरपणातील मधुमेह होतो.
  • कौटुंबिक वैद्यकीय इतिहास: टाईप २ ह्या मधुमेहाच्या प्रकारचा कौटुंबिक इतिहास असेल, विशेषत: जर एखाद्या भावंडाला किंवा आईला असा मधुमेह झालेला असेल तर, आईला तिच्या गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
  • मागील गर्भधारणेचा इतिहास: जर तुम्हाला तुमच्या मागील गरोदरपणात मधुमेह झाला असेल, तर डॉक्टर तुम्हाला कठोर दक्षतेखाली ठेवतात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित करतात, कारण ती पुन्हा वाढण्याची शक्यता असते.
  • वय: २५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका जास्त असतो. किंबहुना, वय जितके जास्त तितके गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
  • इतर वैद्यकीय परिस्थिती: पीसीओएस असलेल्या किंवा पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) चा इतिहास असलेल्या महिलांना गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता असते, कारण या विकाराच्या लक्षणांपैकी एक म्हणजे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढणे हे होय.

मी गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता कमी करू शकते का?

मधुमेहाचा धोका असणाऱ्या स्त्रियांमध्ये तुमचा समावेश असो अथवा नसो, तुम्ही निश्चितपणे तो होण्याचा धोका कमी करू शकता. तुमचा आहार आणि व्यायाम ह्या नित्यक्रमांवर काम केल्याने मदत होऊ शकते. इथे त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत.

  1. तुमच्या जेवणात अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा: संपूर्ण धान्य, ताज्या भाज्या आणि फळे यांचे सेवन वाढवून हे करता येते. दररोज तंतुमय पदार्थांचे सेवन १० ग्रॅमने वाढवल्यास गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका सुमारे २६% कमी होऊ शकतो.
  2. अस्वास्थ्यकर अन्नाला नाही म्हणा: गोड पदार्थ आणि कर्बोदकांनी युक्त पदार्थांचे सेवन कमी करा. भूक भागवण्यासाठी जंक फूड खाऊ नका.
  3. वारंवार खा: एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा वारंवार थोडे थोडे खाणे हा आरोग्यदायी पर्याय असेल.
  4. अन्नपदार्थांची हुशारीने निवड करा: विविध खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आहारातील सर्व आवश्यक दैनंदिन पोषक तत्वांचा योग्य भाग मिळेल.
  5. तुमच्या दिनचर्येत शारीरिक हालचालींचा समावेश करा: सक्रिय राहिल्याने तुमचा मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. गर्भवती महिलांसाठी पोहणे आणि चालणे हे दोन सर्वात शिफारस केलेले व्यायामाचे पर्याय आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट यांच्या मते, पोहणे हा गरोदरपणात करता येणारा व्यायामाचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे. तुमच्या प्रकृतीनुसार आणि गरोदरपणाचे तुमचे किती दिवस भरले आहेत ह्यावर आधारित सौम्य व्यायाम निवडले जाऊ शकतात. तुमचा व्यायाम नित्यक्रम ठरवण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  6. वजनावर नियंत्रण ठेवा: रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य ठेवण्यासाठी गरोदरपणापूर्वी आणि नंतर निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे.

सामान्य चिन्हे आणि लक्षणे

गर्भावस्थेतील मधुमेह दर्शवू शकणारी फारशी स्पष्ट लक्षणे नाहीत, आणि म्हणून तुमचे डॉक्टर तुमच्या गरोदरपणाच्या २४२८व्या आठवड्यात संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याचे सुचवतील, कारण ह्याच कालावधीत स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. वर सूचीबद्ध केलेल्या घटकांमुळे तुम्हाला आधीच धोका असल्यास, हे स्क्रीनिंग खूप आधी करून घेण्यास सांगितले जाते. परंतु, येथे काही चिन्हे दिलेली आहेत जी तुम्हाला सावध करू शकतात आणि जर तुम्हाला ही चिन्हे आढळली तर ताबडतोब वैद्यकीय हस्तक्षेप करा:

  • पुरेशा प्रमाणात पाणी आणि इतर द्रवपदार्थ सेवन केल्यानंतरही अनेकदा तहान लागणे
  • वारंवार मूत्रविसर्जन
  • जास्त थकल्यासारखे वाटणे (गरोदरपणातील सर्वसाधारणपणे तिसऱ्या महिन्यात गरोदर स्त्रियांना थकवा येऊ शकतो परंतु कारण नसताना थकवा येत असल्यास आणि दिवसभरात क्रियाशीलता कमी असल्यास गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता असू शकते.)
  • तोंडाला कोरडेपणा येणे
  • दृष्टी अस्पष्ट होणे
  • वारंवार संक्रमण

गरोदरपणात सामान्य असलेल्या अनेक परिस्थिती गर्भावस्थेच्या मधुमेहाची चिन्हे असू शकतात. गरोदरपणा आणि मधुमेह ह्या दोन्हीमुळे गरोदर माता खचून जाऊ शकते. सहसा, गर्भावस्थेतील मधुमेहाची तपासणी दुसऱ्या तिमाहीत केली जाते. तथापि, वरीलपैकी कोणतीही लक्षणे अधिक स्पष्ट असल्यास, तुम्हाला मधुमेहाची तपासणी करायची आहे का हे ठरवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करू शकता.

गरोदरपणातील मधुमेहाचा गरोदरपणावर कसा परिणाम होतो?

प्रसूतीनंतर आईच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यतः सामान्य होते. परंतु गरोदरपणातील वाढलेल्या साखरेच्या पातळीमुळे काही धोके निर्माण होऊ शकतात आणि ते खालीलप्रमाणे आहेत

  • प्रीक्लॅम्पसिया: गरोदरपणातील मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर मधुमेहाचा परिणाम आई आणि बाळ दोघांवर सुद्धा होतो. उपचार न केलेल्या गर्भावस्थेतील मधुमेहाच्या दुष्परिणामांपैकी एक म्हणजे प्रीक्लेम्पसिया. ही अशी स्थिती बहुतेकदा तिसऱ्या तिमाहीमध्ये उद्भवते. प्रीक्लॅम्पसियाची दोन मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे लघवीतील प्रथिनांची पातळी वाढणे आणि रक्तदाब वाढणे होय. वेळेवर उपचार न केल्यास स्थिती बिघडते. हानिकारक परिणामांमध्ये मुदतपूर्व प्रसूती आणि काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भपात इत्यादींचा समावेश होतो.
  • मृत बाळाचा जन्म: गरोदरपणात मधुमेहाचे निदान झालेल्या गर्भवती मातेची ४० आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा प्रसूती झाली नाही तर मृत बाळाचा जन्म होण्याचा धोका वाढतो.
  • टाईप २ मधुमेह होणे: ह्या मातांना म्हातारपणी टाईप २ मधुमेह होण्याचा धोका असतो

गरोदरपणातील मधुमेहावर उपचार केले नाहीत तर वरील समस्या उद्भवतात. गर्भावस्थेतील मधुमेहामुळे अनेक अटींची असुरक्षा वाढते. परंतु, योग्य आहार आणि व्यायामाची दिनचर्या ठेवल्यास मदत होऊ शकते.

गर्भावस्थेतील मधुमेहाचा बाळावर कसा परिणाम होतो?

काहीवेळा, गर्भावस्थेतील मधुमेहाचा बाळावर होणारा परिणाम आईवर होणाऱ्या परिणामापेक्षा किंचित जास्त गंभीर असू शकतो. प्लेसेंटा इन्सुलिनच्या पातळीमध्ये व्यत्यय आणते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. बहुतेक वेळा, गरोदरपणातील मधुमेह झालेल्या ज्या स्त्रिया वेळेवर उपचार घेतात त्यांना निरोगी बाळे होतात. परंतु उपचार न करता स्थिती तशीच राहू दिल्यास बाळावर काही परिणाम होऊ शकतो.

गर्भावस्थेतील मधुमेहाचा बाळावर कसा परिणाम होतो?

  • मॅक्रोसोमिया: आईच्या रक्तातील साखरेची वाढलेली पातळी बाळाला दिली जाते. बाळाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने बाळाचे स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करून प्रतिक्रिया देते. त्यामुळे कधीकधी मॅक्रोसोमिया होतो ह्या स्थितीमध्ये बाळाचे वजन ९ पौंड किंवा त्याहून अधिक असते. अशा वेळी सीसेक्शनची मागणी होऊ शकते. सामान्यपणे प्रसूती झाल्यास, बाळाला किरकोळ दुखापत, जन्मतःच आघात किंवा खांद्याच्या डायस्टोसियाचा त्रास होऊ शकतो.
  • हायपोग्लायसेमिक बाळ: इन्सुलिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी कमी असलेले बाळ जन्माला येऊ शकते, ज्याला हायपोग्लाइसेमिया देखील म्हणतात.ही समस्या उद्भवते तेव्हा नवजात बाळाची ग्लुकोज पातळी बाळाच्या वयासाठी सुरक्षित मानल्या गेलेल्या श्रेणीपेक्षा कमी असते.
  • श्वासोच्छवासाच्या समस्या: गरोदरपणातील मधुमेह असलेल्या आईच्या पोटी जन्मलेल्या काही बाळांना श्वास घेण्यास थोडा त्रास होतो. काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा सिंड्रोम देखील होतो. ह्यामध्ये बाळाला जन्मानंतर अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो.
  • पोषक तत्वांची कमतरता: बाळामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची पातळी कमी असू शकते, त्यामुळे उबळ, पेटके येणे असा त्रास होऊ शकतो. योग्य पूरक आहार देऊन ह्या समस्या टाळल्या जाऊ शकतात.
  • काविळीचा धोका: या बाळांना जन्मानंतर कावीळ होण्याचा धोका जास्त असतो. यावर सहज उपचार केले जाऊ शकतात, परंतु बाळाला अशक्त वाटू शकते. बाळाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते.
  • टाईप २ मधुमेह: लहान मुले मोठी झाल्यावर त्यांना टाईप २ मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

लक्षात ठेवा की हे ह्या स्थितीचे अत्यंत टोकाचे परिणाम आहेत. बऱ्याच वेळेला, बाळांवर आईच्या मधुमेहाचा परिणाम होत नाही. समस्या लवकरात लवकर ओळखून आईच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे हा एक सुरक्षित पर्याय आहे ह्यामुळे केवळ तुमचेच नव्हे तर तुमच्या बाळाचेही आरोग्य सुनिश्चित करणे.

गरोदरपणातील मधुमेहासाठी मार्गदर्शक तत्त्वे

बहुतेक वेळेला गरोदरपणातील मधुमेहाची चाचणी गरोदरपणाच्या २४ ते २८ आठवड्यांदरम्यान केली जाते. येथे दोन मुख्य चाचण्या केल्या जातात. ह्या चाचण्यांद्वारे गरोदरपणात आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे की कमी आहे हे शोधण्यात मदत होते. परिणामांच्या आधारे आवश्यकतेनुसार फॉलोअप चाचण्या आणि अतिरिक्त स्क्रीनिंग केले जाऊ शकते.

स्क्रीनिंग ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (GCT) – नॉनफास्टिंग टेस्ट

या चाचणीसाठी आलेल्या रुग्णाला तोंडावाटे ग्लुकोजचे द्रावण दिले जाते. एका तासानंतर, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्ताचा नमुना काढला जातो.

रक्तामध्ये साखरेची उच्च पातळी असल्यास शरीरातील ग्लुकोजवर प्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवते आणि रुग्णाला ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टिंग करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टिंग (OGTT) – फास्टिंग टेस्ट

या चाचणीसाठी रुग्णाचे पोट रिकामे असणे आवश्यक आहे. रक्ताचा नमुना काढला जातो आणि रुग्णाला तोंडी ग्लुकोजचे द्रावण दिले जाते. दुसरा रक्त नमुना एका तासानंतर आणि तिसरा आणखी एक तासानंतर काढला जातो. चाचणी पूर्ण करण्यासाठी २ तास लागतात आणि रुग्णाला मध्यांतरात काहीही खाऊ किंवा पिऊ नये असा सल्ला दिला जातो. ह्यामुळे चाचणीचे अचूक परिणाम मिळतात. जर रक्तातील ग्लुकोजची पातळी गर्भावस्थेतील मधुमेहाच्या श्रेणीमध्ये कमी झाली तर रुग्णाला औषधे लिहून दिली जाऊ शकतात किंवा विशेष आहारावर ठेवले जाऊ शकते.

गरोदरपणातील मधुमेहाचे निदान

गरोदरपणाच्या सुरुवातीस, डॉक्टर गरोदरपणातील मधुमेहाचा धोका नाकारण्यासाठी वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहासासंबंधी काही प्रश्न विचारतात. संपूर्ण गरोदरपणात धोक्याच्या चिन्हांवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांचे मूल्यांकन केले जाते. जर काहीही असामान्य दिसत नसेल, तर नियमित जीसिटी योग्य वेळी निर्धारित केले जाते. चाचणीचे परिणाम गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान करण्यात मदत करतात.

गरोदरपणातील मधुमेहावर उपचार

गरोदरपणातील मधुमेहावर उपचार

जीवनशैलीत साधे बदल करून गर्भावस्थेतील मधुमेहावर सहज नियंत्रण मिळवता येते. भरपूर तंतुमय पदार्थ असलेला, कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतला पाहिजे. वारंवार आणि थोडे थोडे खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते.ओजीटीटी च्या परिणामांवर आधारित, डॉक्टर सौम्य व्यायाम देखील सुचवू शकतात. काही फरक तपासण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी काही अंतरानंतर पुन्हा तपासली जाईल. जर पातळी सामान्य झाली, तर तुम्हाला तुमचा आहार आणि व्यायाम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जाईल. डॉक्टर वेळोवेळी बाळाच्या आरोग्याची तपासणी करू शकतात. जर रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाली नाही, तर ती कमी करण्यासाठी तुम्हाला औषधे किंवा इन्सुलिन शॉट्स लिहून दिले जाऊ शकतात.

गरोदरपणात साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी?

तुमची साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या आहारावर लक्ष ठेवणे. तुमच्या आहारात बदल केल्यास गरोदरपणात तुमचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत होऊ शकते.

गरोदरपणातील मधुमेहआहार योजना

तुमची आहार योजना आदर्शपणे कशी असावी याचा नमुना येथे दिलेला आहे:

नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण
२ ते ३ कर्बोदके पर्याय (३० ते ४५ ग्रॅम) ३ ते ४ कर्बोदके पर्याय (४५ ते ६० ग्रॅम)
३ ते ४ कर्बोदके पर्याय (४५ ते ६० ग्रॅम)
प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर) प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर)
प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर)
भाजी किंवा चांगल्या चरबीयुक्त पदार्थ, इच्छेनुसार भाजी किंवा चांगले चरबीयुक्त पदार्थ, इच्छेनुसार
भाजी किंवा चांगली चरबीयुक्त पदार्थ, इच्छेनुसार
सकाळचा नाश्ता: दुपारचा नाश्ता: संध्याकाळचा नाश्ता:
१ ते २ कर्बोदकांचे पर्याय (१५ ते ३० ग्रॅम) १ ते २ कर्बोदकांचे पर्याय (१५ ते ३० ग्रॅम)
१ ते २ कर्बोदकांचे पर्याय (१५ ते ३० ग्रॅम)
प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर) प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर)
प्रथिने (मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, चीज, पीनट बटर)
भाजी किंवा चांगल्या चरबीयुक्त पदार्थ, इच्छेनुसार भाजी किंवा चांगल्या चरबी युक्त पदार्थ, इच्छेनुसार
भाजी किंवा चांगल्या चरबी युक्त पदार्थ, इच्छेनुसार

स्रोत: https://www.allinahealth.org/health-conditions-and-treatments/health-library/patient-education/gestational-diabetes/healthy-eating-physical-activity-stress-management/basic-meal-planning/

आहारतज्ञ तुमच्या चाचणी परिणामांवर आधारित तुमच्यासाठी आहार तक्ता लिहून देऊ शकतात

गर्भवती स्त्रियांसाठी रक्तातील ग्लुकोजची पातळी

गर्भधारणा होण्यापूर्वी मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांसाठी आणि गरोदरपणातील मधुमेह असलेल्या स्त्रियांसाठी रक्तातील आदर्श साखरेची पातळी भिन्न असते. गरोदरपणात रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल येथे काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत. लक्षात ठेवा की प्रत्येक गरोदरपण वेगळे असते आणि तुमच्या आरोग्याविषयी निर्णय घेण्यासाठी तुमचे डॉक्टर ही सर्वोत्तम व्यक्ती आहे.

स्रोत: http://www.webmd.com/diabetes/gestational-diabetes-guide/normal-blood-sugar-levels-chart-pregnant-women.

गरोदरपणातील मधुमेह कसा टाळता येईल?

जागरूक असणे आणि सर्व माहिती तुमच्याजवळ असणे ही गरोदरपणातील मधुमेह टाळण्यासाठी पहिली पायरी आहे. ही माहिती तुमच्या जवळ असल्याने तुम्हाला सर्व जोखीम घटक समजून घेण्यास मदत होईलच परंतु पुढे त्यासाठी तुम्हाला तयार करेल. जोखीम टाळण्यासाठी तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि आवश्यक असल्यास सुरुवातीच्या टप्प्यावर मधुमेहाची तपासणी करा. गरोदरपणात साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी ठरवून दिलेला आहार आणि व्यायामाच्या सवयी नियमित पाळा. काही स्त्रियांना गोड खावेसे वाटणे खूप सामान्य आहे, परंतु पौष्टिक नसलेले स्नॅक्स आणि जास्त साखरयुक्त आहार जास्त नुकसान करतात.

प्रसूतीनंतर आई आणि बाळाचे काय होते?

बहुतेक वेळा, काहीही नाही! आई पुन्हा तिच्या निरोगी स्थितीमध्ये येते आणि रक्तातील साखरेची पातळी पुन्हा सामान्य होते. बाळ निरोगी आणि आनंदी होते. परंतु, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच उशीरा निदान झाल्यामुळे किंवा आईच्या शरीराने औषधांना चांगला प्रतिसाद न दिल्याने, त्याचे परिणाम आईवर आणि बाळावर दिसू शकतात. आईमध्ये टाईप २ मधुमेह आणि बाळामध्ये हायपोग्लाइसेमियाची शक्यता नाकारण्यासाठी त्यानंतरच्या चाचण्या निश्चित केल्या जाऊ शकतात.

निरोगी वजन राखण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रसूतीनंतरही निरोगी आहार आणि व्यायामाच्या सवयी चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात आणि पुढील गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यास ह्याची मदत होते. प्रसूतीनंतर स्वतःसाठी तसेच बाळासाठी डॉक्टरांकडे फॉलो अप साठी जाणे टाळू नका. स्तनपान चालू ठेवा, तसेच तुम्ही पोषक तत्वांनी युक्त आहार घ्या . असे केल्याने तुमचे वजन योग्य होण्यास मदत होईल आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहील.

आणखी वाचा:

गरोदरपणातील थायरॉइडची समस्या
गरोदरपणातील मूळव्याधीवर सर्वोत्तम घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article