In this Article
नवजात बाळाप्रमाणेच गर्भाशयातील गर्भ बराच काळ झोपलेला असतो. नवजात बाळामध्ये आणि पोटातील गर्भामध्ये असलेल्या अनेक साम्यांपैकी हे एक साम्य आहे. ३२ आठवड्यांच्या गर्भाला आता आवाज ऐकू येऊ लागतो, विचार करण्याची क्षमता येते, स्मरणशक्ती असते आणि तसेच पोटात फिरण्यास सक्षम होण्यासाठी तो पुरेसा विकसित झालेला असतो. पोटातील बाळ जवळपास ९० ते ९५ % वेळ झोपण्यात घालवतात. गर्भ झोपण्याचा आरईएम (रॅपिड आय मोमेन्ट ) टप्पा गाठू शकतात, ह्याला जैविक जीवनात गाढ झोपेचा टप्पा मानला जातो. ह्या काळात, गर्भ एका प्रौढ व्यक्तीच्या आरईएम पॅटर्नची नक्कल करतो आणि त्याचे डोळे वेगाने पुढे–मागे हलवतो. रात्रीच्या वेळी बाळांनी पाय मारणे किंवा हालचाल करणे याबद्दल तुम्हाला आवश्यक असणारी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
गर्भाच्या सामान्य हालचाली कोणत्या आहेत?
असा अंदाज आहे कि सातव्या महिन्यात ९५% झोपणारा गर्भ दर तासाला ५० वेळा हालचाल करतो. ह्या हालचालीमध्ये बाळाने तुम्हाला पाय मारणे आणि स्ट्रेच करणे, तसेच डोळे मिचकावणे ह्या सारख्या हालचालींचा समावेश होतो. असा अंदाज आहे की या कालावधीत प्रत्येक बाळाच्या हालचाली अद्वितीय असतात. ह्यामुळे एखाद्या प्रकारची हालचाल वाईट किंवा चांगली आहे हे सांगणे कठीण होते.
बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी, डॉक्टर सामान्यतः अल्ट्रासाऊंडद्वारे गर्भाची प्रतिक्रिया आणि हृदयाची गती तपासतात. गर्भवती महिलेची प्रसूतीची तारीख जितकी जवळ येते, तितके हालचालींचे वेगवेगळे प्रकार असतात. गर्भाच्या हालचालींची सामान्य व्याख्या करणे कठीण असते, परंतु एक वाजवी अंदाज असा आहे की प्रत्येक गर्भ त्याचे सांधे स्ट्रेच करतात, त्यांना उचक्या लागतात, डोळे मिचकावतात, ढेकर काढतात आणि पाय मारतात. जर तुम्हाला ह्याव्यतिरिक्त असामान्य हालचाल जाणवली, तर बाळाच्या हालचालींबद्दल अधिक तपशीलवार स्पष्टीकरणासाठी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या आणि ज्या विशिष्ट हालचालीमुळे तुम्हाला काळजी वाटली असेल त्याबद्दल त्यांचे मत घ्या.
गरोदरपणात पोटातील बाळाने रात्रीची हालचाल करणे सामान्य आहे का?
अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही बाळे निशाचर असतात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. जर बाळाला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला असेल तर तुम्हाला जोरात पाय मारू शकते. बाळ अस्वस्थ असल्यामुळे किंवा बाळाला स्ट्रेचिंग साठी जागा नसल्यामुळे असे होऊ शकते. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जसजशी गर्भाची वाढ होते तसे तो त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अधिक जागरूक होतो आणि नंतर तो शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या नवजात बाळासारखा दिसायला लागतो. रात्रीच्या वेळी गर्भाशयात बाळाने हालचाल केल्यास ते धोकादायक मानले जात नाही.
रात्रीच्या वेळी गर्भाशयातील बाळे पाय का मारतात किंवा पोटात हालचाल का करतात?
तुमची हालचाल कमी झाली की रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल वाढते. दिवसा जेव्हा तुम्ही हालचाल करत असता तेव्हा बाळाला पाळण्यात असल्यासारखे वाटते आणि ते झोपून जाते. जर तुमची हालचाल नसेल तर बाळाची सतर्क राहण्याची भावना जागृत होते.
आईने रात्रीच्या वेळी उशिरा नाश्ता किंवा जेवण घेतलेले असल्यास बाळ सतर्क होऊन हालचाल करू लागते किंवा बाळाला आईचे बोलणे ऐकायचे असते त्यामुळे बाळ हालचाल करते असा सायकॉलॉजी टुडेचा अंदाज आहे. त्याच संस्थेच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गरोदरपणाच्या ७ महिन्यांच्या काळात गर्भ सकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागतो आणि आईचा आवाज ऐकून शांत होतो.
रात्रीच्या वेळी पोटातील गर्भाच्या हालचालींविषयी आईसाठी टिप्स
रात्रीच्या वेळी पोटातील बाळाने पाय मारणे किंवा जास्त हालचाल करणे ह्यामुळे आई खूप अस्वस्थ होऊ शकते. ह्याविषयी तुम्हाला मदत व्हावी म्हणून काही टिप्स खाली देत आहोत.
- गर्भासाठी गाणे – गर्भासाठी संगीत वाजवण्यापेक्षा, त्याच्यासाठी गाणे म्हणा. आईचा आवाज गर्भाला शांत करण्यास मदत करतो असे अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशन द्वारे सिद्ध झाले आहे. म्हणूनच अंगाई गायल्याने बाळाला शांत होण्यास आणि झोप लागण्यास मदत होते.
- दिवसा रात्रीच्या दिनचर्येची नक्कल करा – दिवसाच्या मध्यभागी आपल्या रात्रीच्या दिनचर्येची नक्कल केल्याने बाळाला त्याच्या सभोवतालची परिस्थिती ओळखण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे बाळाच्या पोटातील हालचाली रात्रीच्या वेळी कमी होतात. टीव्ही पहा, झोपा किंवा पुस्तक वाचा. काही तासांसाठीही नुसते बसून राहिल्याने सुद्धा फायदा होतो.
- निरीक्षण करा – तुमच्या बाळाचे नुसते निरीक्षण करण्यासाठी दिवसभरात काही तास घालवा. बाळाचा नित्यकर्म समजून घेतल्याने तुम्हाला त्यांचे वर्तन समजण्यास मदत होऊ शकते. बाळाची दिवसभरात किती हालचाल होते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हालचाल करणारेबाळ हे निरोगी बाळ असते.
जर तुमचे बाळ रात्रीची हालचाल करत असेल तर ते काळजीचे कारण नाही. बहुतेक बाळे दिवसभरात समान प्रमाणात हालचाल करतात. जर बाळ दिवसा हालचाल करत नसेल, परंतु रात्री हालचाल करत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचे बाळ निशाचर असल्यामुळे असे होऊ शकते. तुमच्या बालरोगतज्ञांशी मोकळेपणाने बोला आणि तुमचे मन शांत होण्यासाठी तुम्हाला असलेले सर्व प्रश्न त्यांना विचारा. तुमच्या तपासण्या आणि डॉक्टरांच्या भेटींचे वेळापत्रक पाळा. डॉक्टरांचा सल्ला ऐका. शांत रहा – तुमच्या बाळाला तुमची चिंता जाणवू शकते, आणि ते अस्वस्थ होऊ शकते.
आणखी वाचा:
गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे
बाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का?