In this Article
जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हटलेले समजू लागते आणि जेव्हा तुम्ही बाळाला नावाने हाक मारता तेव्हा ते तुमच्याकडे बघत राहते. जसजसे दिवस जातात तसे तुम्हाला बाळाची वाढ होताना आणि विकासाचे टप्पे पार पडताना बघताना आनंद होतो. तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ बघताना काय अपेक्षित आहे हे ह्या लेखात दिले आहे.
बाळाची वाढ
७ व्या महिन्यात तुमचे बाळ संक्रमणावस्थेत असते. रांगताना पायावर थोडेसे वजन पेलणे, आजूबाजूच्या नवीननवीन गोष्टींचा शोध घेणे इथपासून तुमचे बाळ विविध अनुभवातून पुढे जात असते. तसेच बाळाला वेगवेगळ्या भावना सुद्धा आता समजू लागतील. जेव्हा बाळाला हवे ते खेळणे मिळत नाही किंवा नक्की काय हवंय हे त्याला बोबड्या बोलांमधून सांगता येत नाही तेव्हा बाळ वेगवेगळ्या भावनांमधून जात असते. बाळाच्या डोक्याचा आणि शरीराचा आकार बदलतो, ७ महिन्यांच्या बाळाचे वजन दुप्पट होते. तुमच्या लक्षात येईल की ह्या वयात मुलींचे पाय हे मुलांच्या पायांपेक्षा लांब असतात आणि तसेच बाळाला आता थोड्या मोठ्या आकाराचे कपडे लागतील.
बाळाचा विकास
७ महिन्यांचे तुमचे बाळ हे ह्या आठवड्यांमध्ये विकासाच्या टप्प्यावर असते. तुमचे बाळ सर्व प्रकारच्या युक्त्या वापरेल आणि काहीवेळाने स्वतःचे स्वतः जमिनीवर बसेल. बाळाला आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करा आणि जेव्हा बाळाला तुमची गरज लागेल तेव्हा त्याच्या सोबत रहा. तुमचे बाळ आता त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना ओळखू लागेल आणि वेगवेगळ्या लोकांचे आवाज त्याला समजू लागतील. तुम्ही त्याला कुशीत घ्यावे, मिठी मारावी असे बाळाला वाटेल. कधी कधी ते काही न करता नुसतेच बसून राहील. काही वेळा नवीन गोष्टी शिकण्याविषयी सुद्धा त्याला ओढ वाटणार नाही. परंतु असे झाल्यास काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण हे अगदी नॉर्मल आहे आणि तुम्ही पालक म्हणून तुमचे काम अगदी चोख करीत आहात त्यामुळे तुम्ही निश्चित रहा.
२८ आठवड्यांच्या बाळाचा विकास
नॅपी रॅश: तुम्ही बाळाच्या आहारात घन पदार्थांचा समावेश सुरु केला असल्याने हा काळ तुमच्या बाळाच्या पचनसंस्थेस अगदी नाजूक काळ आहे. तुमच्या बाळाला नॅपी रॅश होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला बाळाचे कुल्ले पुसून घ्यावे लागतील आणि रॅश होऊ नये म्हणून नॅपी सतत बदलावी लागेल. काही वेळा बाळाच्या कुल्ल्यावर लाल रंगाची पुरळ उठलेली दिसते ती उष्णतेमुळे असते त्यामुळे बाळाला सतत सजलीत ठेवून बाळाची नॅपी स्वच्छ ठेवा.
दात येणे: तुमच्या बाळाची वाढ होत आहे. बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुद्धा ह्या काळात सुरु होईल. दात येताना खूप दुखते त्यामुळे बाळाशी खेळ खेळा, मजा करा त्यामुळे बाळाचे दुखण्याकडे दुर्लक्ष होईल.
२९ आठवड्याच्या बाळाचा विकास
दिनक्रम: बाळाचे हळूहळू रुटीन सुरु होईल, बाळ तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत वेळ घालवेल. ह्या कालावधीत बाळाला नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत उदा: ब्रेडस्टीक्स, केळं आणि बेबी स्टिक्स ह्यासारखे फिंगर फूड खाण्यास शिकवले पाहिजे. बाळ आता जास्त वेळ झोपू लागेल कारण बाळ दररोज घनपदार्थ खात आहे.
बाळाला स्वच्छ ठेवणे आणि भरवणे: तुमच्या बाळाला स्वतःच्या हाताने खायला आवडेल आणि त्यामुळे बाळाच्या कपड्यांवर अन्नपदार्थांचे डाग पडतील. बाळाला स्वतःचे स्वतः खाण्यास प्रोत्साहित करा कारण ह्या कालावधीत बाळाचे दूध सुटण्याची प्रक्रिया सुरु होत असते. परंतु बाळाच्या कपड्यांवर पडलेले डाग स्वच्छ करण्यास विसरू नका आणि बाळाची नॅपी वारंवार बदला.
३० आठवड्यांच्या बाळाचा विकास
खट्याळपणा: ह्या वयात तुमचे बाळ दिवसेंदिवस जास्त खट्याळ होत जाईल. बाळ चावा घेईल, कोलांट्या उड्या घेईल आणि आजूबाजूचे विश्व जाणून घेण्यासाठी सगळं काही करेल. तसेच स्तनपानादरम्यान सुद्धा तुम्हाला चावू शकेल. तुम्ही ओरडल्यास त्याला तुमची ही प्रतिक्रिया मजेदार वाटेल आणि बाळ आणखी तसे करू लागेल.
शिष्टाचार शिकणे: तुमचे बाळ वेगवेगळ्या गोष्टी करून पाहत आहे आणि आजूबाजूच्या विश्वाविषयी जाणून घेत आहे. बाळाला सगळ्याच गोष्टी लक्षात रहात नाहीत. तथापि, तुम्ही तुमच्या बाळाला अगदी सौम्यपणे बाळाने ज्या गोष्टी करू नयेत असे तुम्हाला वाटते त्या गोष्टी सांगून शिष्टाचार शिकवू शकता. उदा: खेळणी फेकू नयेत, लोकांचा चावा घेऊ नये किंवा कुणाचे ही केस ओढू नयेत इत्यादी.
रांगणे: तुमच्या बाळासाठी हा खूप रोमांचक काळ आहे कारण घरात खेळू लागते आणि आता रांगण्याची चिन्हे सुद्धा दिसू लागली आहेत. तुम्ही घर स्वच्छ ठेवत आहात आणि घरातील धूळ नीट स्वच्छ करीत आहात ह्याची खात्री करा कारण अस्वच्छतेमुळे तुमचे बाळ आजारी पडलेले तुम्हाला आवडणार नाही आणि तसेच असुरक्षित गोष्टी तोंडात घालून त्यामुळे बाळाला अपचन होऊ शकते आणि बाळ गंभीररीत्या रडू शकते.
३१ आठवड्यांच्या बाळाचा विकास
अन्नपदार्थ: तुमचे बाळ आता वेगवेगळ्या चवीचे आणि पोत असलेले अन्न खाऊ लागेल. बाळाला त्याचा फायदा घेऊन बाळाच्या पचनसंस्थेला वेगवेगळ्या अन्नपदार्थांची ओळख करून द्या.
दात येणे: जर बाळाला अजून दात येण्याची प्रक्रिया सुरु झाली नसेल तर आता बाळाचा एखादा दात बाहेर येताना दिसू लागेल. आता बाळाचे खालचे मधले दात दिसू लागतील.
अंगाई गीताची वेळ: बाळाला बागेत न्या आणि बाळाला वेगवेगळ्या वातावरणाची ओळख करून द्या. रात्री झोपवताना बाळासाठी बालगीत म्हणा किंवा सौम्य संगीत लावा ज्यामुळे बाळाला आराम मिळेल. बाळाला आजूबाजूच्या वातावरणात मग्न होऊन जाऊ द्या आणि बाळाला इतर मुलांशी मैत्री करू द्या आणि पाळीव प्राणी बघू द्या.
बाळाची तब्येत
बाळ ७ महिन्यांचे झाल्यावर तुम्हाला लसीकरणाची किंवा डॉक्टरांच्या नियमित भेटीची काळजी नसते. फक्त प्रत्येक जेवणाच्या आधी तुम्ही बाळाचे हात स्वच्छ धूत आहात ना ह्याची काळजी घ्या आणि बाळाला जमिनीवर रांगू द्या. तुमच्या बाळाची प्रतिकार यंत्रणा विकसित होत आहे नि वेगवेगळ्या संसर्गाशी लढा देण्यासाठी ती तयार होत आहे. त्यामुळे घरातील फरशी खूप जास्त स्वच्छ ठेवण्याचा हट्ट धरू नका. फक्त तुमचे घर स्वच्छ आहे ना ह्याची खात्री करा.
बाळाच्या विकासाचे टप्पे – ७ महिने
वयाच्या ७ व्या महिन्यात बाळाच्या काही विकासाच्या टप्प्यांवर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या बाळामधील खालील काही लक्षणांवर लक्ष ठेवा
- वाढलेली भूक: तुमच्या बाळाला वेगवेगळ्या चवीचे आणि पोत असलेले अन्नपदार्थ खावेसे वाटतील
- वस्तू लक्षात राहतील: आता वस्तू लपवून तुम्ही बाळाला फसवू शकत नाही. तुमच्या बाळाला त्या वस्तू लगेच सापडतील
- खोली आणि अंतराची समज: तुमच्या बाळाला अंतराची समज येईल आणि कुठल्या गोष्टी दूर आहेत ह्याचा अंदाज येईल
- रंगांची समज: तुमचे बाळ तुम्हाला आणि भोवतालच्या वातावरणाला ओळखू लागेल. तसेच आजूबाजूच्या वातावरणाचा शोध घेईल आणि निरीक्षण करू लागेल.
- नीट झोप लागणे: झोपेचे तास वाढतील आणि तुमचे बाळ आता जास्त वेळ झोपू लागेल. वाढ आणि विकासाचा हा एक चांगला निर्देशक आहे.
- भावनिक आणि सामाजिक विकास: तुमचे बाळ आता तुम्हाला आणि कुटूंबातील सदस्यांना ओळखू लागेल. बाळ वेगवेगळ्या आवाजाला वेगवेगळा प्रतिसाद देईल आणि तुम्ही ‘नाही‘ म्हणाल्यावर बाळ शांत बसेल.
- बडबड: बाळाच्या बडबडीमध्ये व्यंजनांवर आधारित आवाज बाळ करीत असते आणि बाळ काही शब्द सुद्धा आता बोलू लागेल. बाळ आता ‘मामा‘ आणि ‘पापा‘ अशी अक्षरे बोलू लागेल आणि बाळाचा शब्दसंच आता वाढेल. बाळ आता वस्तूंशी शब्दांचा संबंध जोडू लागेल.
वर्तणूक
तुमचे बाळ आता कामासाठी खोलीच्या बाहेर गेल्यावर बाळाला तुम्ही परत येणार आहात हे समजू लागेल आणि बाळाला आता वेळेचा सुद्धा अंदाज येईल. तसेच, दात येताना बाळ दुर्मुखलेले आणि चिडचिडे होईल आणि अनोळखी व्यक्ती पाहिल्यावर बाळ रडू लागेल. तुम्हाला बाळाला झोपवणे कठीण होऊन जाईल. बाळाची वर्तणूक दिवसेंदिवस आव्हानात्मक होऊ लागेल कारण बाळ त्याच्या अवतीभोवतीच्या बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण आणि अभ्यास करत असते.
७ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप
तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप हे बाळाच्या वाढ आणि विकासासाठी मदत करतील. बाळाला व्यस्त ठेवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता
- लपाछपी
एखादी वस्तू अर्धवट लपवून ठेवा आणि तुमच्या बाळाला ती शोधू द्या. जर तुमच्या बाळाला ती अर्धवट लपवलेली वस्तू सापडली तर ती वस्तू आता पूर्णपणे लपवून ठेवा आणि अशापद्धतीने खेळ तयार करा.
- चेहरे ओळखणे
तुमच्या फोटोचा अल्बम आणा आणि मित्र मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांचे फोटो दाखवा. तुमच्या बाळाशी त्यांच्याविषयी बोला आणि नावे सांगा. हे सारखे करत राहा आणि मग बाळाला हळूहळू ते आठवतील आणि बाळ त्यांना ओळखू शकेल.
- ब्लॉक्स रचून ठेवणे
वेगवेगळ्या रंगाचे, सारख्या आकाराचे ब्लॉक्स आणा आणि तुमच्या बाळाला ते कसे रचून ठेवायचे ते दाखवा. बाळाला आता ते स्वतःचे स्वतः करू द्या आणि त्यांना संयम ठेऊन प्रयत्न करण्यास शिकवा. हालचाल कौशल्य वाढवणाऱ्या ह्या क्रियाकालापामुळे बाळाचे वस्तू आणि जागा ह्यांचे समन्वय कौशल्य सुद्धा वाढेल.
- प्युरी गेम
बाळाच्या चवीची परीक्षा घेण्याची वेळ आता आली आहे. वेगवेगळ्या रंगांच्या फळांच्या प्युरी असलेल्या ४ वाट्या घ्या आणि बाळाला त्याची चव घेऊन बघू द्या. बाळाची वासाची आणि चवीची संवेदना तर विकसित होईलच परंतु तुम्हाला बाळाच्या अन्नपदार्थांच्या प्राधान्यक्रमाविषयी सुद्धा समजेल. बाळाच्या चेहऱ्याच्या हावभावांकडे लक्ष द्या आणि बाळाला काय आवडते ते पहा
- बाल गीते
तुमच्या बाळाला मांडीवर घ्या आणि चित्रे असलेले पुस्तक समोर धरून बाळासाठी बडबड गीत म्हणा. चित्रांमुळे बाळाचे मनोरंजन होईल आणि गीतातील शब्दांमुळे, आधी कधीतरी ऐकलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याची बाळाची क्षमता वाढेल. ह्यामुळे बाळाचे बाळाचे बोलण्याचे कौशल्य वाढेल आणि बाळ नवीन शब्द सुद्धा शिकेल.
७ महिन्यांच्या बाळाची काळजी
तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या बाळाच्या काही विशिष्ट गरज आहेत आणि बदलणाऱ्या आवडी आहेत. तुम्हाला सुरुवातीला बाळाच्या वर्तणुकीमुळे झोप मिळणार नाही परंतु हळूहळू बाळाच्या दूध पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा तसेच वर्तणुकीचा नमुना ह्यामुळे तुम्हाला आता बाळाच्या वागण्याचा नेमका अंदाज येऊ शकेल आणि त्यामुळे तुमचे आयुष्य थोडे सोपे जाईल. तुमच्या बाळाचे आता झोपण्याचे सुद्धा एक रुटीन बसेल.
बाळाची झोप
बाळाच्या वयाच्या ६व्या महिन्याच्या आसपास, बाळाच्या आहारात नवीन अन्नपदार्थांचा समावेश केल्यावर बाळ जास्त वेळ झोपू लागेल. बाळाच्या झोपेच्या वेळा आणि नमुना हा प्रत्येक बाळाचा वेगळा असतो परंतु जर तुम्हाला काही कारणाने बाळाचे झोपेचे रुटीन बदलायचे असेल तर तुमच्या स्वतःच्या झोपेच्या सवयीचा विचार करा आणि बाळाला झोपताना तुम्ही त्याच्या जवळ असणे गरजेचे आहे का ह्याचाही अंदाज घ्या. स्तनपान घेणारी बाळे रात्रीची एकदा तरी दुधासाठी उठतात. बाळाला नवीन पदार्थाची ओळख करून देईपर्यंत आणि बाळाचे स्तनपान सुटेपर्यंत हे असेच राहते.
बाळाला भरवणे
तुमचे महत्वाचे काम म्हणजे बाळाला नवीन अन्नपदार्थांची ओळख करून देणे होय आणि ह्यामध्ये घनपदार्थांचा सुद्धा समावेश होतो. तुमचे बाळ आता अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या चवी आणि पोत ह्यांची ओळख करून घेईल आणि ह्या काळात बाळाची भूक बदलत राहील. बाळाच्या आहारात घनपदार्थांचा समावेश केल्यावर बाळ जास्त वेळ झोपू लागेल. बाळाला पोषक खाण्यापिण्याच्या सवयी लावा आणि बाळाला किती प्रमाणात अन्नपदार्थ हवेत ते बाळाचे बाळाला ठरवू द्या. तसेच बाळाला किती वेळा खायचे ते सुद्धा बाळाला ठरवू द्या. बाळाला खूप जास्त नाश्ता देऊ नका आणि दिवसातून ३ वेळा जेवण दिले जात आहे ना ह्या कडे लक्ष असुद्या.
पालकांसाठी टिप्स
पालकांसाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे त्यांचा पालकत्वाचा काळ सोपा होईल
- बाळाला दुसऱ्याकडे द्या: आपल्या बाळाला मित्रमैत्रिणींकडे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडे द्या. जर तुमच्या काकूंना संध्याकाळी तुमच्या बाळाची काळजी घ्यावीशी वाटली तर त्यांना घेऊद्या ! वेगवेगळ्या लोकांकडे राहणे तुमच्या बाळासाठी चांगले आहे.
- बाळाला सांभाळण्यासाठी कुणीतरी मदतीला ठेवा: जर तुम्हाला ऑफिस आणि आईपण निभावणे कठीण जात असेल तर बाळाला संभाळायला कुणीतरी मदतीला घ्या. तुमच्या बाळाला ह्याची मदत तर होईलच पण नंतर सवय झाल्यावर बाळाला त्यांच्यासोबत सुरक्षित सुद्धा वाटेल.
- बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या: जर तुमच्या बाळाला कुठल्याही गोष्टीसाठी ‘नाही‘ म्हटल्यास बाळ खूप आवाज करीत असेल किंवा दंगा करत असेल तर बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी बाळासोबत एखादा मजेदार गेम खेळा. लक्षात असू द्या बाळाचे मन वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असते.
- मर्यादित स्वच्छता: तुमच्या बाळाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊद्या. फक्त पाळण्यात बाळाला पडून राहून देऊ नका. बाळाला वेगवेगळ्या जिवाणूंचा सामना करू द्या कारण बाळाची प्रतिकार प्रणाली अजून विकसित होत आहे.
तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाचे हे सगळे वाढीचे आणि विकासाचे टप्पे आहेत आणि त्याकडे तुमचे लक्ष असणे जरुरीचे आहे. तुमच्या बाळामध्ये ही लक्षणे दिसत आहेत का ह्याकडे लक्ष ठेवा आणि बाळाला वाढीच्या व विकासाच्या ह्या टप्पावर मदत करा म्हणजे तुम्ही आणि तुमचे बाळ आनंदी व्हाल.