गर्भारपण

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अल्ट्रासाऊंड स्कॅन

आतापर्यंत तुम्ही गरोदरपणातील सर्व अडथळे पार केलेले आहेत. तुमच्या शरीरात आणि जीवनशैलीत अनेक बदल झाल्यानंतर आता तुम्ही गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत पोहोचला आहात! तुमची प्रसूतीची तारीख आता जवळ आलेली आहे. तुम्ही लवकरच तुमच्या बाळाला मांडीवर घेणार आहात. तुमच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ कशी होते आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर तुम्हाला स्कॅन करण्यास सांगतील. प्रत्येक स्त्रीला स्कॅन करताना थोडी चिंता वाटते तसेच उत्साह सुद्धा असतो. तिसऱ्या तिमाहीतील स्कॅन बाबत तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे. स्कॅन का केले जाते आणि स्कॅन दरम्यान काय अपेक्षित आहे ह्याबद्दल इथे आपण बोलणार आहोत. चला वाचूयात.

तिसऱ्या तिमाहीत बाळाच्या वाढीसाठी केलेला स्कॅन म्हणजे काय?

ही एक नियमित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बाळाची वाढ आणि विकास तपासण्यासाठी आणि पुढे काही गुंतागुंत तर नाही ना हे पाहण्यासाठी केली जाते. हा स्कॅन तुमच्या बाळाच्या पोटाचा घेर तसेच डोके आणि पायांचा आकार मोजण्यासाठी केला जातो. बाळाची वाढ कशी होते आहे हे समजण्यासाठी तुम्हाला गरोदरपणाच्या २८ व्या आणि ३२ व्या आठवड्यात स्कॅन करण्यास सांगितले जाते.

स्कॅन का केला जातो?

तुमचे डॉक्टर तुम्हाला स्कॅन करून घेण्यास सांगतात. त्यामागची काही कारणे येथे दिलेली आहेत:

  1. एकापेक्षा जास्त बाळे: गर्भाशयात जागा कमी मिळाल्यामुळे जुळी बाळे किंवा तिळे असेल तर बाळांच्या वाढीच्या समस्या निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. डॉक्टरांना सर्व काही ठीक असल्याची खात्री करायची असते. म्हणून स्कॅन करायला सांगितले जाऊ शकते.
  2. बाळाचा आकार आणि आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी: तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असल्यास, तुमच्या बाळाला, वाढ होत असताना काही त्रास होत नाही ना ह्याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला ह्या चाचण्या करण्यास सांगू शकतात. कधीकधी बाळ खूप लहान किंवा खूपच मोठे असते.
  3. गुंतागुंतीची लक्षणे: गुंतागुंतीची लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांना तुमच्या बाळाची स्थिती तपासावी लागेल. गुंतागुंतीच्या लक्षणांमध्ये वेदना, गर्भाची हालचाल कमी होणे किंवा रक्तस्त्राव ह्या समस्यांचा समावेश असू शकतो.
  4. ऍनॉटॉमी रिव्हियू: सुमारे १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन दरम्यान कुठल्याही विकृतीचा संशय आल्यास तुमच्या डॉक्टरांना पुन्हा तपासणी करावी लागेल.
  5. प्लासेंटल रिव्हियू: कधीकधी, १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान प्लेसेंटा खूप खाली असल्याचे दिसू शकते. तिसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यावर तो पुन्हा पूर्ववत होऊन सुधारणा होते. वाढत्या गर्भाशयामुळे गर्भाशय ग्रीवापासून दूर खेचले गेल्याने प्लॅसेंटा खाली सरकू शकतो.
  6. बाळाच्या स्थितीचे मूल्यांकन करणे: जेव्हा तुम्ही तुमच्या प्रसूती तारखेच्या जवळ जाता तेव्हा बाळाची स्थिती योग्य असणे अधिक महत्वाचे असते. कारण बाळाचा जन्म होण्यासाठी बाळ योग्य स्थितीत असल्याची खात्री डॉक्टरांना करावी लागेल. म्हणून डॉक्टर स्कॅन करण्यास सांगू शकतात.

स्कॅन करताना डॉक्टर काय तपासतील?

तिसऱ्या तिमाहीतील स्कॅन नेहमी तुमच्या स्वत:च्या वैद्यकीय इतिहासावर आणि तुमच्या मागील अल्ट्रासाऊंडच्या रिझल्ट्स वर आधारित असतील. अल्ट्रासाऊंड दरम्यान डॉक्टर तपासू शकतात अशा काही गोष्टी येथे दिलेल्या आहेत:

. बाळाच्या अवयवांचे मोजमाप

सहसा, बाळाचे मोजमाप पालकांवर अवलंबून असते. बाळाचे डोके, ओटीपोटाचे स्नायू आणि पायाची लांबी मोजली जाईल.

. गर्भजल

गरोदरपणाच्या टप्प्यानुसार गर्भजलाचे प्रमाण बदलत असले तरी, तुमच्या बाळाची चांगली वाढ होण्यासाठी ठराविक प्रमाणात द्रव असणे आवश्यक आहे. स्कॅन केल्यास द्रवपदार्थाच्या पातळीचे मूल्यांकन करण्यास मदत होते.

. बाळाच्या हृदयाची गती आणि ताल

बाळाच्या हृदयाचे ठोके सरासरी १२० ते १८० प्रतिमिनिट इतके पडतात. तुमच्या बाळाच्या हृदयाची गती प्रौढांप्रमाणेच बदलू शकते.

. प्लेसेंटाची स्थिती

स्कॅन मध्ये प्लेसेंटाची स्थिती समजण्यास मदत होते. प्लेसेंटा प्रेव्हिया ह्या सारख्या समस्येमध्ये प्लेसेंटा आईच्या गर्भाशयामध्ये पूर्णपणे किंवा अंशतः झाकलेला असतो. स्कॅन दरम्यान ह्या स्थितीचे निदान केले जाऊ शकते. तसेच, प्लेसेंटाचा खालचा भाग गर्भाशयाच्या मुखाच्या खूप जवळ नसावा.

. गर्भाशय मुखाची लांबी

जर तुम्हाला अकाली प्रसूतीकळा सुरु झालेल्या असतील , योनीतून रक्तस्त्राव होत असेल आणि वेदना होत असतील तर स्कॅन करणे सर्वात महत्वाचे आहे. काही वेळा, समस्या नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जाईल.

. बाळाच्या थ्री डी प्रतिमा

काही पालक, डॉक्टरांना गर्भाशयातील बाळ बघण्याची विनंती करता, आता गर्भाशयात असलेले बाळ बघणे सोपे आणि अधिक चांगले झाले आहे कारण गर्भातील बाळाची थ्री डी प्रतिमा घेण्याचे अनेक मार्ग आहेत.

. बाळाचा आकार

गर्भाचे अंदाजे वजन (EFW) समजण्यासाठी सामान्यतः त्याच वयातील इतर गर्भांशी तुलना केली जाते. ५० पर्सेंटाइलवर दाखवले जाणारे वजन सरासरी वजन मानले जाते. १० पेर्सेन्टाइल पेक्षा वजन कमी असेल तर बाळ लहान आहे आणि ९० पेर्सेन्टाइल पेक्षा वजन जास्त असेल तर बाळ मोठे आहे असे समजावे.

. नाळेतून होणारा रक्तप्रवाह

बाळाच्या नाळेतून होणाऱ्या रक्तप्रवाहाचे मोजमाप डॉपलर स्टडीज द्वारे केले जाते. तुमच्या बाळाचे आरोग्य ठीक असल्याचे ह्याद्वारे निश्चित केले जाते. ज्या बाळांचा योग्य विकास होत नाही त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह ठीक होत नाही. डॉक्टर ह्या गोष्टीचे निरीक्षण करतात. आणि त्यानुसार प्रसूती लवकर होणे आवश्यक आहे कि नाही हे ठरवतात.

. बाळाची स्थिती

बाळ आईच्या पोटात असताना ३ स्थितींमध्ये असते. ह्या स्थिती पुढीलप्रमाणे: सेफॅलिक पोझिशन (डोके खाली), ब्रीच पोझिशन (गर्भाशयाच्या मुखाशी बाळाचे नितंब असतात) आणि ट्रान्सव्हर्स पोझिशन (गर्भाशयात बाळ आडवे असणे). तुमचा गर्भावस्थेचा कालावधी संपत आला असल्यास डॉक्टर ह्याकडे जास्त लक्ष देतील.

१०. गर्भाशय

कोणत्याही समस्या असल्यास त्यांचे निदान करण्यासाठी गर्भाशयाची तपासणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला गर्भाशयात फायब्रॉइड्स असतील तर स्कॅन केल्यास ते दिसतील आणि गर्भाशयात ते नक्की कुठे आहेत हे सुद्धा डॉक्टरांना समजेल. फायब्रॉइडमुळे वेदना होऊ शकतात, नाळेमध्ये अडथळे येऊ शकतात आणि मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. म्हणून, तिसर्‍या तिमाहीत फायब्रॉइडचे स्थान आणि आकार जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसेच, जर एखाद्या रुग्णाला सिझेरिअनची गरज असेल तर स्त्रीरोगतज्ञासाठी ही माहिती महत्त्वाची असते कारण फायब्रॉइड्स असल्यास रक्तस्त्राव सरासरीपेक्षा जास्त होऊ शकतो.

स्कॅनमध्ये बाळ कसे दिसेल?

बाळ जितके मोठे तितके ते स्कॅनमध्ये चांगले दिसेल असे बहुतेकांना वाटते. परंतु हे खरे नाही. स्कॅन मध्ये बाळ दिसणे खूप कठीण होते. बहुतेकदा बाळाचे फक्त काही भाग दिसतात. गर्भाशयातील बाळाची काही सुंदर आणि स्पष्ट छायाचित्रे दिसणे खूप शक्य आहे.

बाळाचे कोणते भाग दृश्यमान आहेत ह्यावर बाळ किती चांगले आणि स्पष्ट दिसू शकते हे अवलंबून आहे. बाळाची स्थिती, आईचे ओटीपोट आणि गर्भाशयातील गर्भजलाचे प्रमाण ह्या घटकांवर तुमच्या बाळाचे छायाचित्र कसे दिसते हे अवलंबून असते. तुम्ही वाट पाहत असलेली बाळाची प्रतिमा तुम्हाला तिसऱ्या तिमाहीत दिसू शकेल.

तिसऱ्या तिमाहीचे स्कॅन मध्ये काय दिसत नाही?

बाळाचे पालक जेव्हा तिसऱ्या तिमाहीचे स्कॅन करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना खूप अपेक्षा असतात. परंतु स्कॅनला सुद्धा मर्यादा असतात. स्कॅन द्वारे तुम्हाला प्रसूतीची अचूक तारीख समजत नाही. गर्भधारणा झाल्याची पुष्टी झाल्यानंतर प्रसूतीची अंदाजे तारीख काढली जाऊ शकते. तिसऱ्या तिमाहीतील स्कॅन द्वारे तुमच्या प्रसूतीच्या तारखेला पुष्टी मिळत नाही.

तिसऱ्या तिमाहीतील स्कॅन सुरक्षित आहे का?

हा स्कॅन पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नसतात. काहीतरी समस्या असल्याचा संशय असल्यासच डॉक्टर तुम्हाला स्कॅन करण्यास सांगू शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ज्या गर्भवती स्त्रियांना तिसऱ्या तिमाहीमध्ये अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सांगितलं जातो त्यांना ट्रान्सबॅडोमिनल अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यावा लागतो. ओटीपोटाला जेल लावून आणि त्यावरून प्रोब फिरवून स्कॅन केला जातो. पण, एवढेच नाही. अल्ट्रासाऊंड विषयी आणखी काही गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. खाली वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. त्याची तुम्हाला मदत होऊ शकते.

. तिसऱ्या तिमाहीतील अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी मूत्राशय पूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे का?

अर्धवट भरलेले मूत्राशय ट्रान्सबॅडोमिनल अल्ट्रासाऊंडसाठी आदर्श आहे कारण त्यामुळे बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळेल. वेदनादायक होईल इतके मूत्राशय भरलेले नसावे. तसे असल्यास, अल्ट्रासाऊंड करण्यापूर्वी तुम्हाला मूत्राशय थोडेसे रिकामे करण्यास सांगितले जाऊ शकते.

. तिसऱ्या तिमाहीतील अल्ट्रासाऊंड दरम्यान स्त्रियांना कधी कधी अशक्त का वाटते?

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या पोटाच्या मागच्या बाजूचा भाग (व्हेना कावा) बाळाच्या वजनामुळे संकुचित होतो. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा किंवा मळमळ जाणवते. विशेषत: जर तुमचे बाळ आकाराने मोठे असेल किंवा एकापेक्षा जास्त बाळे तुमच्या पोटात असतील तर असे होऊ शकते. अल्ट्रासाऊंडसाठी झोपताना तुम्हाला हा अनुभव येत असल्यास, तुमच्या सोनोग्राफरला सांगणे केव्हाही चांगले आहे. तसे केल्यास तुम्हाला खूप त्रास होण्याआधी तुम्ही कुशीवर वळू शकता किंवा थोडेसे उठून बसू शकता.

जसजशी बाळाची वाढ होते तसे, डॉक्टर अनेकदा गरोदर स्त्रियांना स्कॅन करून घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे डॉक्टरांना बाळाच्या आरोग्याविषयी अचूक माहिती संकलित करण्यास मदत होते. जेव्हा तुम्हाला ह्या स्कॅनसाठी जाण्यास सांगितले जाते तेव्हा ते तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. परंतु नेहमीच काही समस्या आहे म्हणून स्कॅन करण्यास सांगितले जाते असे नाही हे लक्षात ठेवा. बहुतेकदा सर्वकाही ठीक आहे ह्याची खात्री करण्यासाठी स्कॅन केले जाते. काळजी करण्यासारखे काहीतरी असले तरीही, शक्य तितक्या लवकर समस्यांना सामोरे जाणे नेहमीच चांगले असते. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे भविष्य उज्ज्वल असेल.

आणखी वाचा:

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात? गरोदरपणातील अल्ट्रासाऊंड स्कॅन – प्रकार, तयारी कशी करावी आणि बरेच काही

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved