गर्भारपण

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कसे झोपावे – झोपेच्या स्थिती आणि सुरक्षिततेसाठी टिप्स

नवजात बाळाची काळजी घेताना तुमची रात्रीची झोप होत नाही. परंतु बाळाच्या जन्माच्या आधीच म्हणजेच तिसऱ्या तिमाहीच्या आसपास तुम्हाला रात्रीची झोप नीट लागेनाशी होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ वेगाने होते आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार सुद्धा वाढतो. म्हणजेच तुमच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात आणि त्या झोपताना सुद्धा जाणवतात.

व्हिडिओ:गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे - स्थिती आणि सुरक्षिततेविषयक टिप्स

https://youtu.be/xdKDw8E6LSs

गरोदरपणात, तुमच्या शरीराची काळजी तुम्ही घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी चांगली विश्रांती घेणे जरुरीचे असते. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी झोप अत्यावश्यक आहे. म्हणूनच तुम्ही गरोदरपणात झोपेचे महत्त्व जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला झोपण्याच्या विविध स्थितींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, त्याबद्दल आपण ह्या लेखामध्ये चर्चा करून अधिक जाणून घेऊयात.

गरोदरपणात झोपताना स्त्रियांना जाणवणाऱ्या समस्या

गरोदरपण काही सोपे नाही. विशेष करून जेव्हा तुमचे पहिले गर्भारपण असते तेव्हा ते विशेषकरून जास्त जाणवते. आधी नमूद केल्याप्रमाणे, झोप अत्यावश्यक आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या झोपण्याच्या रुटीनवर परिणाम करते, तेव्हा त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. गरोदरपणात स्त्रियांना झोपेच्या काही समस्या येतात त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  1. तिसऱ्या तिमाहीतील स्त्रियांच्या पोटाचा आकार वाढलेला असतो आणि त्यामुळे त्यांना झोपताना अस्वस्थता जाणवते
  2. बहुतेक स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखी होते. पोटाचा आकार लक्षणीय प्रमाणात वाढल्यामुळे तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर दबाव येतो त्यामुळे पाठदुखी होते. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या तक्रारींपैकी ही एक समस्या आहे
  3. ह्या टप्प्यावर तुमची घोरण्याची प्रवृत्ती वाढते
  4. बऱ्याच स्त्रिया गरोदरपणात 'रेस्टलेस लेग सिंड्रोम'ची तक्रार करतात. येथे, पाय (आणि काहीवेळा आपल्या शरीराचे इतर भाग) अस्वस्थ संवेदना अनुभवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे पाय किंवा तुमच्या शरीराचा प्रभावित भाग हलवत राहता. म्हणून, तुम्हाला झोप लागणे कठीण होते
  5. छातीत जळजळ होणे ही आणखी एक समस्या आहे त्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होतो

गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांना घाबरावणारी स्वप्ने पडतात. झोपेत व्यत्यय आणणारा हा आणखी एक सामान्य घटक आहे

गरोदरपणातील तिसऱ्या तिमाहीत जेव्हा तुमच्या पोटाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा चांगली झोप येणे कठीण होऊ लागते. अशा वेळी अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी तुम्ही खालील स्थितीचा विचार करू शकता.

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये स्त्रियांसाठी झोपण्याच्या स्थिती

आधी सांगितल्याप्रमाणे, तुमच्या बाळाची वाढ होत असल्याने पोटाचा आकार वाढू लागतो त्यामुळे गरोदरपणाची तिसरी तिमाही कठीण वाटू शकते. ह्या काळात अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही तुमची झोपेची स्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. आपण काय लक्षात ठेवले पाहिजे ते येथे दिलेले आहे.

  1. आपल्या डाव्या कुशीवर झोपणे ही झोपण्याची स्थिती सर्वोत्तम आहे कारण अशा स्थितीत झोपल्याने तुमच्या बाळाला रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा योग्य पुरवठा होतो. उजव्या कुशीवर झोपणे देखील चांगले आहे, परंतु तुम्ही एकदा तरी डाव्या कुशीवर झोपून पहिले पाहिजे
  2. पाठीवर झोपणे हा सर्वोत्तम पर्याय नाही, कारण बाळाच्या वाढत्या वजनामुळे तुमच्या गर्भाशयाला होणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे बाळाला पोषक तत्वे आणि ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही. कुशीवर झोपल्याने संभाव्य हानी टाळली जाऊ शकते
  3. कोणत्याही परिस्थितीत, पोटावर झोपायचे टाळा. तुम्हाला त्यामुळे अस्वस्थ वाटेल तसेच ते बाळासाठी हानिकारक असू शकते

जर तुम्हाला पोटावर किंवा पाठीवर झोपण्याची सवय असेल तर तुम्ही कुशीवर झोपण्याची सवय करा. तुमच्यासाठी आणि बाळासाठी सुद्धा ते चांगले आहे. जर झोपेत तुम्ही तुमच्या पाठीवर झोपलेले आहात असे लक्षात आले तर तुम्ही कुशीवर वळा. झोपेत स्थिती बदलू नये म्हणून तुम्ही उशांचा वापर सुद्धा करू शकता.

आमच्याकडे आणखी काही टिप्स आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला नीट विश्रांती मिळेल आणि तुमच्या गर्भातील बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहील. तसेच ह्या टिप्स तुम्हाला योग्य रित्या झोप लागण्यास मदत करू शकतात.

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील स्त्रियांच्या झोपेविषयी काही टिप्स

तुम्हाला चांगली विश्रांती मिळणे अत्यावश्यक आहे, म्हणून येथे काही टिप्स दिलेल्या आहे ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्हाला आवश्यक असलेली विश्रांती तुम्हाला मिळते आहे ना ह्याकडे लक्ष द्या.

1. आपल्यापैकी बरेच जण झोपेपर्यंत फोन सोबत घेऊन झोपतात, त्यावर काम करतात किंवा सर्फ करत असतात. हे शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा. बिछाना हा झोपी जाण्यासाठी आहे हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा फोन घेऊन अंथरुणावर पडून राहणे आणि तासनतास जागे राहिल्याने तुम्हाला झोप लागण्यास मदत होणार नाही. बिछान्यावर पडल्यावर लगेच फोन बाजूला ठेवा.

2. हलका व्यायाम करा. व्यायाम केल्यास तुमचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. तुमचे रक्ताभिसरण सुधारेल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.

3. तुम्हाला इंग्रजी म्हण माहितीच आहे "Have breakfast like a king, lunch like a prince, and dinner like a pauper". रात्रीचे जेवण हलके घ्या. त्यामुळे पचन सुरळीत होईल आणि तुम्हाला आरामशीर झोप लागेल

4. कुशीवर झोपा, शक्यतो तुमच्या डाव्या कुशीवर पायांमध्ये उशी घालून झोपा जेणेकरून तुम्हाला अधिक चांगली विश्रांती मिळेल. खास गरोदरपणासाठी डिझाईन केलेली उशी तुम्ही वापरू शकता

5. तुमची कपड्यांची निवड देखील तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत करू शकते. सैल आणि आरामदायी कपडे घाला. तसेच, तुमच्या त्वचेसाठी योग्य असलेल्या कपड्यांची निवड करा

6. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध किंवा कोमट पाणी प्या. ह्याचा एक शांत प्रभाव पडतो आणि त्यामुळे मज्जातंतूवर चांगला परिणाम होतो.

7. खूप मसालेदार पदार्थ टाळा. जास्त मसालेदार पदार्थांमुळे तुम्हाला छातीत जळजळ होऊ शकते, त्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो

8. तुमच्या बाळाची वाढ होत असल्यामुळे, तुमच्या गर्भाचा दाब मूत्राशयावर पडतो आणि तुम्ही सारखे बाथरूमला जाल. दिवसभर स्वत:ला सजलीत ठेवणे महत्त्वाचे असले तरी, रात्री पाणी कमी प्या तसेच, झोपायला जाण्यापूर्वी बाथरूमला जाऊन या. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी मध्यरात्री उठायची गरज भासणार नाही

9. कॉफी टाळा. कॉफी प्यायल्याने जागे राहण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीची झोप उडवणारी उत्तेजक द्रव्ये टाळा

10. झोपेची एक दिनचर्या ठेवा. दररोज रात्री एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा

11. छान कोमट पाण्याने अंघोळ केल्यास तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास मज्जातंतू शांत होण्यास आणि कोणत्याही घट्ट स्नायूंना सैल करण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला स्वच्छ आणि ताजेतवानेही वाटेल

12. नकारात्मक विचार तुम्हाला रात्रभर जागे ठेवू शकतात. त्याचा तुमच्या सकारात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. आराम करण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही एखादे चांगले पुस्तक वाचू शकता किंवा शांत संगीत ऐकू शकता

13. मद्यपान बंद करा - तुम्ही गरोदर असल्याचे कळल्यानंतर तुमची मद्यपानाची सवय सोडा. गरोदरपणात मद्यपान केल्याने गर्भपात, मृत बाळाचा जन्म आणि आयुष्यभर शारीरिक, वर्तणूक विषयक आणि बौद्धिक अपंगत्व येऊ शकते. बरेच लोक झोप चांगली लागण्यासाठी मद्यपान करतात. परंतु गर्भवती स्त्रीने असा विचार करू नये. त्यामुळे तुम्ही नकळतपणे बाळावर परिणाम होईल अशा स्थितीमध्ये झोपण्याची शक्यता असते

14. तुमच्या सभोवतालचे वातावरण शांत ठेवा. खूप जास्त आवाजामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रकाश सुद्धा तुम्हाला हवा तेवढा आहे ना ते पहा. तुम्ही ज्या खोलीत झोपता ती खोली हवेशीर, शांत आणि हवा तेवढा उजेड येईल अशी हवी

15. जर तुम्हाला झोप येत नसेल तर मन रमवण्यासाठी लेखन, वाचन, विणकाम असे काहीतरी करा. जेव्हा तुम्हाला झोप येऊ लागेल तेव्हा बिछाना स्वच्छ आणि नीट करून मगच झोपा

गरोदरपण भावनिक वादळ निर्माण करू शकते. तुमच्या मध्ये होत असलेल्या शारीरिक बदलांमुळे तुम्ही घाबरून जाऊ शकता. परंतु तुम्ही हे बदल नक्कीच हाताळू शकाल आणि बाळाला पाहिल्यानंतर तुम्ही सगळं काही विसरून सुद्धा जाल. तुम्हाला विश्रांती मिळण्यासाठी वर दिलेल्या टिप्स वापरून पहा कारण आता तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला झोप लागण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते.

आणखी वाचा:

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद तिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved