जर तुम्हाला गरोदरपणात तपकिरी स्त्राव दिसला तर त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. जरी हे सामान्य असले आणि बहुतेक वेळा तो गर्भारपणाचा एक भाग असला तरी सुद्धा, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे खूप सामान्य आहे. त्यामुळे खाज सुटत नसेल आणि दुर्गंधी येत नसेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही.
गरोदरपणात होणारा तपकिरी स्त्राव म्हणजे काय?
गरोदरपणात सुमारे 20% स्त्रियांना तपकिरी स्त्रावाचा त्रास होतो. हा खरं तर योनीतून होणारा लाल-तपकिरी स्त्राव असतो आणि तो गरोदरपणात होऊ शकतो. तपकिरी स्त्राव म्हणजे गर्भाशयातून बाहेर पडलेले जुने रक्त असते. गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीपासून हा त्रास होऊ शकतो आणि 37 व्या आठवड्यापर्यंत, म्हणजे प्रसूती होईपर्यंत चालू राहू शकतो. स्त्राव होण्याच्या कारणानुसार त्याचे प्रमाण आणि रंग अवलंबून असतो. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि गर्भपातामध्ये होणारा रक्तस्त्राव ह्यापेक्षा हा स्त्राव रंग आणि त्याचे प्रमाण ह्यानुसार वेगळा असू शकतो.
गरोदरपणात होणाऱ्या तपकिरी रंगाच्या स्रावाचे विविध प्रकार
तपकिरी स्रावाच्या वेगवेगळ्या छटा असू शकतात. प्रत्येक प्रकारचा तपकिरी स्त्राव वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या दर्शवू शकतो. योनिमार्गाच्या स्त्रावाच्या रंगावर आधारित तपकिरी स्त्रावचे विविध प्रकार खाली दिले आहेत:
- हलका-तपकिरी - भ्रूणाचे रोपण होतानाचा रक्तस्त्राव किंवा STDs
- गुलाबी-तपकिरी - गर्भाशयाच्या मुखाजवळ जळजळ, एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भपात
- गडद-तपकिरी - गर्भपात किंवा एक्टोपिक गर्भधारणेचे प्रारंभिक टप्पे
- जाड, तपकिरी - यीस्ट संसर्ग
- काळसर -तपकिरी - गर्भपात, योनी, गर्भाशयाच्या मुखाचे संक्रमण
- पाणीदार तपकिरी - मोलर प्रेग्नन्सी
- पिवळसर-तपकिरी - यीस्ट किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात होणारा तपकिरी स्त्राव
ओव्हुलेशनच्या 6व्या दिवसांपासून गरोदरपणाच्या पहिल्या काही आठवड्यांपर्यंत रोपण होताना हलके डाग किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. कधीकधी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात, गर्भाशय जुने रक्त बाहेर टाकते त्यामुळे डाग पडतात किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव होतो. गर्भाशयाचे मुख आणि योनिमार्गाच्या संवेदनशीलतेमुळे गर्भधारणेच्या वेळी थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव किंवा तपकिरी स्त्राव देखील होऊ शकतो. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात योनीतून रक्तस्त्राव होणे खूप सामान्य आहे आणि 25% गर्भधारणेमध्ये असे झालेले आढळते.
गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होणारा तपकिरी स्त्राव
गरोदरपणाच्या शेवटी होणारा तपकिरी स्त्राव हे देखील गरोदरपणाचे लक्षण असू शकते. प्रसूतीच्या काही आठवडे किंवा काही दिवस आधी,गर्भाशयाच्या मुखाजवळील श्लेष्माचा प्लग तुटतो. त्यानंतर तपकिरी स्त्राव किंवा गुलाबी रंगाची छटा असलेला स्त्राव होतो. सर्वसाधारणपणे स्त्राव होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु, गरोदरपणात रक्तस्त्राव होणे हे गर्भपाताशी संबंधित असल्याने, तपकिरी स्त्राव आणि रक्तस्त्राव यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. तसेच कुठल्याही समस्येची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना फोन करणे महत्वाचे आहे.
गर्भवती स्त्रियांमध्ये तपकिरी रंगाचा स्त्राव कशामुळे होतो?
तपकिरी स्त्राव खालील कारणांमुळे होऊ शकतो:
1. रोपण रक्तस्त्राव
फलित अंड्याचे गर्भाशयाच्या भित्तिकांवर रोपण होते आणि त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. बीजारोपण रक्तस्त्राव ओव्हुलेशन नंतर 6 दिवसांपासून गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांपर्यंत होऊ शकतो. असा स्त्राव कधीकधी मासिक पाळीच्या अपेक्षित तारखेच्या काही दिवस आधी हलक्या-गुलाबी रंगाचे स्पॉटिंग म्हणून देखील होते. ओव्हुलेशननंतर 14 दिवसांनी मासिक पाळी येत असल्याने, लवकर इम्प्लांटेशन रक्तस्राव झाल्यास तो कधीकधी हलका किंवा उशीरा आलेल्या मासिक पाळीचा रक्तस्त्राव म्हणून समजला जातो.
2. प्रसूती सुरु होण्याआधीचा स्त्राव
प्रसूतीच्या आधी होणारा तपकिरी स्त्राव हे प्रसूतीचे लक्षण असू शकते. जेव्हा हा स्त्राव प्रसूतीच्या 36 ते 40 आठवड्यांच्या दरम्यान होतो आणि श्लेष्माचा प्लग नष्ट होतो, तेव्हा हा स्त्राव एक राखाडी, श्लेष्मल आणि जेलीसारखा असू शकतो. आणि तो रक्ताने माखलेला असतो किंवा जुन्या, तपकिरी रक्ताने चिकटलेला असतो. हा रक्तस्त्राव होतो तेव्हा गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि स्त्रीचे शरीर प्रसूतीसाठी तयार होते. गर्भाशयात संसर्ग होऊ नये म्हणून असलेल्या श्लेष्माच्या प्लगची यापुढे आवश्यकता नसते. प्लग आणि हा स्त्राव एकाच वेळी किंवा आठवडाभरात लहान तुकड्यांमध्ये बाहेर फेकला जाऊ शकतो.
3. लैंगिक संबंध
गरोदरपणात गर्भाशयाच्या मुखाकडे रक्तप्रवाह जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे गर्भाशयाचे मुख संवेदनशील बनते. लैंगिक संबंध ठेवल्यामुळे किंवा वैद्यकीय तपासणीदरम्यान तपकिरी रंगाचा रक्तस्त्राव किंवा वेदना होऊ शकतात.
4. मोलर गर्भधारणा
तपकिरी स्त्राव कधीकधी मोलर गर्भधारणेमुळे होतो ज्यामध्ये प्लेसेंटाची असामान्यता आढळते. फलनादरम्यानच्या समस्यांमुळे असे होते. गर्भाधान प्रक्रियेदरम्यान अनुवांशिक त्रुटीमुळे गर्भाशयाच्या आत असामान्य ऊतकांची वाढ होते. मोलर गर्भधारणा दुर्मिळ आहे. प्रत्येक 1,000 गर्भधारणेपैकी 1 गर्भधारणा ही मोलर गर्भधारणा असते. अश्या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये सामान्य गर्भ नसतो. त्याऐवजी ह्यामध्ये उतींची असामान्य आणि जलद वाढ होते असते. मोलर गर्भधारणेच्या शेवटी तपकिरी स्त्राव आणि द्राक्षासारखे ऊतक बाहेर टाकले जातात.
5. गर्भाशयाच्या मुखाजवळील पॉलीप्स
गर्भाशयाच्या मुखाजवळील पॉलीप्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाजवळ होणारी ऊतकांची निरुपद्रवी सौम्य वाढ आहे. गरोदरपणात होणारा तपकिरी स्त्राव हा कधीकधी गर्भाशयाच्या पॉलीप्स मधून होतो. ऊतींमधील रक्तवहिन्यासंबंधीच्या वाढीमुळे हा स्त्राव होतो.
6. एक्टोपिक गर्भधारणा
तपकिरी स्त्राव होणे हे कधीकधी एक्टोपिक गर्भधारणेचे लक्षण असते. अश्या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये फलित अंड्याचे गर्भाशयाच्या बाहेर, मुख्यतः फॅलोपियन ट्यूबमध्ये रोपण होते. सामान्यत: चक्कर येणे, डोके हलके होणे आणि अधूनमधून मूर्च्छा येणे, ओटीपोटाच्या आणि श्रोणीच्या एका बाजूला वेदना होणे अश्या प्रकारची लक्षणे आढळतात.
एक्टोपिक गर्भधारणा ही एक गंभीर समस्या आहे आणि ह्यामध्ये बीजवाहिनी फुटून गंभीर अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. जर तुमहाला सुद्धा तपकिरी स्त्राव होत असेल आणि अशी लक्षणे आढळत असतील तर त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता आहे.
7. चुकलेला गर्भपात
तपकिरी स्त्राव होणे हे कधीकधी चुकलेल्या गर्भपाताचे लक्षण असू शकते. अशा प्रकरणांमध्ये गर्भधारणा विकसित होणे थांबते परंतु विकसित गर्भाचे ऊतक गर्भाशयाच्या बाहेर जात नाही. जेव्हा हे 4 आठवड्यांपर्यंत होत नाही, तेव्हा गडद तपकिरी हलके डाग किंवा रक्तस्त्राव होतो. हा स्त्राव कधीकधी दुर्गंधीयुक्त आणि मेदयुक्त असतो. अशा वेळी डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणे चांगले. तसेच गर्भाशयातून भ्रूणाचे सर्व अवशेष निघून गेले आहेत ना ह्याची खात्री करून घ्यावी.
8. गर्भपात
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तपकिरी किंवा कधी कधी लाल रंगाचा रक्तस्त्राव होणे हे गर्भपाताचे लक्षण असू शकते. त्यासोबत पोटदुखी, पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि मासिक पाळीत तीव्र क्रॅम्प्स येणे ही लक्षणे सुद्धा आढळतात. रक्तस्त्राव काही वेळा हलका तर काही वेळा तीव्र असू शकतो. तसेच रक्ताच्या गुठळ्या पण आढळू शकतात. बहुतेक वेळा स्त्रीचे शरीर गर्भपातातून बरे होण्यासाठी एक आठवडा ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर, पुढील उपचारांची आवश्यकता नाही.
9. असामान्य प्लेसेंटा
काही प्लॅसेंटाच्या समस्या किंवा प्लेसेंटा प्रिव्हिया आणि प्लेसेंटल अप्रेशन सारख्या विकृती तपकिरी स्रावाचे कारण असू शकतात. प्लेसेंटा प्रिव्हियामध्ये, गर्भाशय मुख नाळेने झाकलेले असते. त्यामुळे तपकिरी स्त्राव होतो परंतु वेदना होत नाही. तर प्लेसेंटा बंद झाल्यास, गर्भाशय नाळेपासून वेगळे होते आणि त्यामुळे तपकिरी स्त्राव आणि वेदना दोन्ही होतात.
10. जननेंद्रियाचा एचपीव्ही
ह्या स्थितीमध्ये इस्ट्रोजेन पातळी वाढलेली असते आणि रक्त प्रवाह सुद्धा वाढतो. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे हे त्याचे लक्षण आहे.
11. योनिमार्गात संसर्ग
योनिमार्गातील संसर्ग आणि लैंगिक संक्रमित रोगांमुळे देखील तपकिरी स्त्राव होऊ शकतो.
गर्भवती असताना तपकिरी स्त्राव कसा कमी करावा?
गरोदरपणात तपकिरी स्त्राव कसा थांबवायचा याबद्दल तुम्ही टिप्स शोधत असाल, तर तुम्ही काय करू शकता ते खाली दिलेले आहे:
1. स्वतःचे निरीक्षण करा
तुमच्या वैद्यकीय भेटी चुकवू नका आणि सर्व शिफारस केलेल्या तपासण्या वेळेवर पूर्ण करा जेणेकरुन खूप उशीर होण्यापूर्वी कोणत्याही समस्येचे निदान आणि व्यवस्थापन करता येईल.
2. ताण घेऊ नका
गरोदरपणात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तुमचा कामाचा भार कमी करण्यासाठी मदतनीस ठेवा किंवा कुटुंबातील विश्वासू सदस्याची मदत घ्या.
3. जास्त व्यायाम करू नका
गरोदरपणात व्यायाम करणे आणि सक्रिय राहणे महत्वाचे आहे, परंतु व्यायाम खूप जास्त प्रमाणात करू नका.
4. थोडी विश्रांती घ्या
झोप घेणे ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ती करू शकता. तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे तास झोपा. दिवसा सुद्धा थोडीशी विश्रांती घ्या.
5. तुमचे पाय उंचावर ठेवा
तुमचे पाय उंचावर ठेवल्याने रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते आणि गरोदरपणात तपकिरी स्त्रावचे प्रमाण कमी करते.
6. जड वस्तू उचलू नका
जड वस्तू उचलून स्वतःला ताण देणे हे चांगले नाही.
7. शिफारस केलेल्या चाचण्या करून घ्या
ह्या चाचण्यांमध्ये योनी आणि ग्रीवाची तपासणी, रक्ताच्या चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन, तुमच्या गर्भाशयाचा आकार तपासण्यासाठीच्या चाचण्या, तुमच्या रक्तातील गर्भारपणातील हार्मोन्सची पातळी, रक्तस्त्रावाचे प्रमाण तसेच स्त्राव आणि रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत असलेल्या कोणत्याही घटकांची उपस्थिती तपासणे इत्यादींचा समावेश होतो.
8. औषधे
गरोदरपणात तपकिरी स्रावावर उपचार करण्यासाठीची औषधे समस्येच्या स्वरूपावर अवलंबून असतात. काही स्त्रियांना औषधांची गरज नसते तर काहींना असते.
तपकिरी स्त्राव होणे हे चिंतेचे कारण कधी आहे?
बहुतेक वेळा घाबरण्याची गरज नसली तरी, तपकिरी स्त्रावचे स्वरूप, प्रमाण आणि गंध यांचा मागोवा ठेवणे महत्त्वाचे आहे.
खाली काही लक्षणे दिलेली आहेत. ही लक्षणे काही आरोग्यविषयक समस्या असल्याचे दर्शवते.
1. मोठ्या प्रमाणात स्त्राव - सर्वसाधारणपणे, गरोदरपणात कोणताही स्त्राव होऊन, सॅनिटरी पॅडची आवश्यकता असेल तर ते धोक्याचे लक्षण असू शकते
2. अस्वस्थता - वेदना आणि पेटके ह्यासह दुर्गंधी युक्त स्त्राव होत असेल तर ते योनीला संसर्ग झाल्याचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला यापैकी कोणताही अनुभव आला तर तुम्ही ताबडतोब स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.
3. पाणीदार स्त्राव - पाणीदार द्रव किंवा ऊतक असलेला स्त्राव गर्भपात आणि D & C ची गरज दर्शवू शकतात.
4. स्त्रावाचा कालावधी - लैंगिक संबंधांनंतर किंवा वैद्यकीय तपासणीनंतर एक आठवड्यापेक्षा जास्त काळ स्त्राव टिकून राहणे हे संसर्गाचे लक्षण असू शकते.
5. स्रावासोबत ताप – ताप येऊन आणि थंडी वाजून येणे हे गर्भाशयाचे किंवा मूत्रपिंडाचे गंभीर संक्रमण असू शकते आणि त्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत.
6. स्रावासह सह तीव्र वेदना - चक्कर येणे, तीव्र वेदना आणि ओटीपोटात पेटके येणे हे एक्टोपिक गर्भधारणेमुळे असू शकतो. यामुळे आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भधारणा संपुष्टात आणणे गरजेचे असते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. गरोदरपणात किती प्रमाणात तपकिरी स्त्राव होणे ठीक आहे?
गरोदरपणात तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य असते. हा स्त्राव होत असल्यास तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही समस्या आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. गरोदरपणात वाढलेला रक्त प्रवाह आणि संप्रेरकांची झालेली वाढ ह्यामुळे गर्भाशयाचे मुख अत्यंत संवेदनशील होऊ शकते. गरोदरपणातील लैंगिक संबंध किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या तपासणीमुळे हा स्त्राव वाढू शकतो. आणि तपकिरी स्त्राव किंवा हलके डाग दिसू शकतात.
2. गरोदरपणातील तपकिरी डाग किती काळ टिकतात?
योनीतील पीएचच्या चढउतारांमुळे किरकोळ प्रमाणात तपकिरी स्त्राव होऊ शकतो. हे सहसा चिंतेचे कारण नसते कारण हा स्त्राव फक्त दोन ते तीन दिवस टिकतो आणि आपोआप नाहीसा होतो.
3. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे हे गर्भपाताचे लक्षण आहे का?
योनीतून होणारा हा स्त्राव गर्भपाताच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. काहीवेळा फक्त हलके डाग दिसतात किंवा तपकिरी स्त्राव होतो अथवा तीव्र रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणाच्या 12 आठवड्यांपूर्वी (तुमच्या पहिल्या तिमाहीत) हलका रक्तस्त्राव होणे सामान्य आहे आणि ते नेहमीच गर्भपाताचे लक्षण नसते.
4. तणावामुळे तपकिरी स्त्राव होऊ शकतो का?
गरोदरपणात योनीतून स्त्राव होणे सामान्य असते कारण तुमचे शरीर जास्त प्रमाणात एस्ट्रोजेन तयार करते आणि ते योनीतून अधिक स्त्राव निर्माण करण्याचे संकेत देते. जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा जास्त प्रमाणात किंवा हलका तपकिरी स्त्राव होण्याची शक्यता असते. बर्याच वेळा, काळजी करण्यासारखे काहीही नसते, परंतु जर तुम्हाला काही शंका असतील किंवा चिंता वाटत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जरी तपकिरी रक्तस्त्राव होत असला तरी त्यामागे नेहमीच कुठलीतरी आरोग्यविषयक समस्या असते असा त्याचा अर्थ होत नाही. गरोदरपणात तुम्हाला रक्तस्त्राव होत असल्याचे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांना फोन करा. तुम्हाला जाणवत असलेल्या लक्षणांकडे लक्ष द्या आणि तुम्हाला काही चुकीचे होते आहे असा संशय आल्यास डॉक्टरांना भेटा. आधी काळजी घेऊन सुरक्षित राहणे केव्हाही चांगले.
आणखी वाचा:
गरोदरपणातील पिवळा स्त्राव
गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव – कारणे आणि लक्षणे