अन्न आणि पोषण

मुलांची उंची वाढविण्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. अर्थातच, मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. बऱ्याच वेळा, ज्या मुलांची उंची इतर मुलांपेक्षा कमी असते त्यांची शाळेत चेष्टा केली जाते, त्यामुळे कमी उंची असलेले मूल घाबरट होते आणि त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की उंची तुमच्या जनुकांवर अवलंबून असते. तथापि संशोधनानुसार उंचीसाठी इतरही बाह्य घटक अवलंबून असतात, जी मुले त्यांच्या वाढीच्या वयात योग्य गोष्टी खातात त्यांच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो. उंचीसाठी मुख्यतः तीन घटक कारणीभूत असतात जनुके, आहार आणि जीवनशैली. तुम्ही तुमची जनुके बदलू शकत नाही परंतु दुसऱ्या दोन्ही घटकांची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि ते म्हणजे - पोषक आहार आणि वाढ होण्यासाठी योग्य जीवनशैली. जरी उंचीसाठी योग्य जनुके असली तर अपुऱ्या पोषणाने मुलांची वाढ होत नाही.

अन्नपदार्थ आणि तुमच्या मुलाच्या वाढीचा संबंध

  जर तुम्ही आणि तुमचे पती उंच असाल तर, तुमचे मूल उंच होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच, जर तुम्ही दोघेही बुटके असाल तर तुमच्या मुलाची उंची कमी राहण्याची शक्यता असते. परंतु बऱ्याच पालकांना ह्याची कल्पना नसते की त्यांच्या मुलांची उंची जास्तीत जास्त वाढवणे त्यांच्या हातात असते. योग्य आहार घेतल्यास जनुकीय उंचीपेक्षा ही उंची वाढू शकते. उंची मध्ये खूप काही जादुई फरक पडणार नसला तरी दोन इंचाचा फरक नक्कीच पडू शकतो. बाळाची वाढ जन्मानंतर लगेच सुरु होते. परंतु हे माहित करून घेणे महत्वाचे आहे की स्त्रियांची उंची वयाच्या १९ पर्यंत वाढते आणि पुरुषांची उंची २५ पर्यंत वाढते. आपल्या शरीरात असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथींचा उंची वाढवण्यात मोठा सहभाग असतो. पिट्युटरी ग्रंथी ह्युमन ग्रोथ हॉर्मोन तयार करते (HGH) आणि ते उंची वाढण्यास कारणीभूत असते. ह्यूमन ग्रोथ हॉर्मोनचे कार्य प्रेरित करण्यासाठी बऱ्याच अन्नपदार्थांची मदत होऊ शकते त्यामुळे वाढीच्या वयात जास्तीत जास्त उंची वाढण्याची शक्यता असते. अन्नपदार्थ आणि मुलांची उंची ह्यांचा संबंधांचा विचार करताना तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की उंची वाढण्यासाठी कुठल्या पोषणमूल्यांची आणि कशी मदत होते. तुमच्या मुलाची उंची वाढण्यासाठी कुठल्या अन्नपदार्थांची मदत होते ह्याची यादी खालीलप्रमाणे

नैर्सर्गिकरित्या जास्तीत जास्त उंची वाढण्यासाठी लागणारी पोषणमूल्ये

. प्रथिने

मुलांची उंची वाढण्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. प्रथिने हे स्नायू आणि टिश्यू ह्यांच्या बांधणी साठी तसेच विकासासाठी मदत करते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे मुलांची वाढ होत नाही आणि स्नायूंचे प्रमाण सुद्धा कमी असते. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचा आहार संतुलित ठेवला पाहिजे आणि त्यामध्ये पुरेश्या प्रथिनांचा समावेश असला पाहिजे.

. खनिजद्रव्ये

अन्नपदार्थांमधील काही खनिजे ही उंचीच्या स्वरूपातील बाळाची वाढ होण्यास मदत करतात. लोह, मॅग्नेशियम, फॉस्फेरस, आयोडीन, मँगेनीज, फ्लुराईड तुमच्या मुलांच्या वाढीस मदत करतात. कॅल्शिअम सुद्धा महत्वाचे आहे आणि ते फक्त वाढीस मदत करत नाही तर हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत करते.

. व्हिटॅमिन्स

हाडांचे आरोग्य आणि उंची साठी व्हिटॅमिन डी फार महत्वाची भूमिका पार पडते. म्हणून ते शरीरात कॅल्शिअमचे शोषण करण्यास मदत करते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि त्याचा उंचीवर नकारात्मक परिणाम होतो. ह्याव्यतिरिक्त मुलांच्या वाढीसाठी लागणारी इतर जीवनसत्वे जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लॅविन, अस्कोर्बीक ऍसिड आणि व्हिटॅमिन एफ ह्याची गरज असते. व्हिटॅमिन समृद्ध भाज्या आणि फळे पोषक आणि संतुलित आहारास मदत करतात.

. कर्बोदके

कर्बोदके ही हानिकारक समजली जातात परंतु मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांची गरज असते. कर्बोदकांमुळे शरीरास ऊर्जा मिळते. विशेषकरून मुलांच्या बाबतीत हे जास्त लागू होते. संपूर्ण धान्यांपासून मिळणारी कर्बोदके घेतली पाहिजे जसे की गहू, सीरिअल्स इत्यादी. पिझ्झा, बर्गर, व्हाईट ब्रेड हे कर्बोदकांनी समृद्ध असतात आणि ते हानिकारक असतात. कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये ह्या व्यतिरिक्त तुमच्या मुलाला ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड्सची गरज असते. त्यामुळे तबयेत आणि उंची चांगली होते. तुमच्या मुलाला हे पदार्थ खाण्यास सांगा.

उंची वाढण्यास मदत करणारे अन्नपदार्थ

तुमच्या मुलाला वर नमूद केलेली पोषणमूल्ये खालील अन्नपदार्थातून मिळतात

. दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, कॉटेज चीझ, दही हे कॅल्शिअम, व्हिटॅमिन अ, ,, , इत्यादी घटकांनी समृद्ध असतात. दूध सुद्धा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींची वाढ होते. दुधाच्या मोठ्या ग्लास चा समावेश असल्याशिवाय तुमच्या मुलाचा दररोजचा आहार पूर्ण होत नाही.

. अंडी

जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची वाढवायची असेल तर प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी १२ आणि रिबोफ्लाविन ह्यांनी समृद्ध अशा अंड्यांचा समावेश तुमच्या मुलाच्या आहारात असला पाहिजे. अंड्याच्या पांढरा भाग (किंवा अल्बुमेन) हा १००% प्रथिनांचा बनलेला असतो. म्हणून जर तुम्हाला चरबीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही बाळाला पिवळा भाग सोडून फक्त पांढरा भाग देऊ शकता. अंड्यांच्या बाबतीत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अंडी वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येऊ शकतात त्यामुळे मुलांना कंटाळा येत नाही! उकडलेल्या अंड्यापासून चविष्ट ऑम्लेट पर्यंत अंडी शिजवण्याची वेगवेगळे प्रकार आहेत.

. चिकन

चिकन, अंड्यांप्रमाणेच प्रथिनांनी समृद्ध असते, किंबहुना प्राणिजन्य अन्नपदार्थांमध्ये चिकन मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. चिकन मुळे स्नायू आणि टिश्यू बांधणी साठी मदत होते आणि मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

. सोयाबीन

तुमच्या बाळाची तब्येत चांगली राहण्यासाठी तसेच उंची वाढण्यासाठी हा एक चांगला अन्नपदार्थ आहे. ह्यामध्ये प्रथिने, फोलेट, व्हिटॅमिन्स, कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिनांसाठी उत्तम शाकाहारी पर्याय आहे.

. केळी

पोटँशियम, मँगेनीज आणि कॅल्शिअम ह्यासाठी केळी हे साधे फळ आहे त्यामुळे तुमच्या मुलाची तब्येत सुधारण्यास मदत होते.

. सुकामेवा आणि बिया

सुकामेवा आणि बिया तुमच्या वाढत्या वयाच्या मुलांना देण्यासाठी एक चांगले अन्न आहे. सुकामेवा आणि बिया ह्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजद्रव्ये आणि व्हिटॅमिन्स असतात तसेच त्यामध्ये लागणारी चरबी आणि अमिनो ऍसिड्स असतात जे वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. तुम्ही ते नाश्त्याच्या सीरिअल्स मध्ये किंवा नाश्त्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये घालू शकता किंवा तुमच्या मुलाला नाश्ता म्हणून ते देऊ शकता.

. हिरव्या पालेभाज्या

तुमच्या मुलाला जरी हिरव्या पालेभाज्या आवडत नसतील तरी तुम्हाला त्याचे महत्व माहिती आहे! ब्रोकोली, पालक, मटार, भेंडी, ब्रुसेल स्प्राऊट हे व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध असतात. हे सगळे घटक बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतात. जरी तुमच्या मुलाने पालेभाज्या खाण्यास कितीही आढेवेढे घेतले तरी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे.

. फळे

तुमच्या मुलासाठी ताजी हंगामी फळे भेटल्याने ते त्याच्यासाठी चांगले असते. त्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे तुमच्या मुलाचा आहार त्याच्याशिवाय अपूर्ण आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला सर्वप्रकारची फळे विशेषकरून व्हिटॅमिन क आणि अ ह्यांनी समृद्ध फळे जसे की पपई, कलिंगड, आंबे, सफरचंद आणि ऍप्रिकॉट दिली पाहिजेत.

. मासे

आणखी एक मांसाहारी पर्याय म्हणजे मासे. हे प्रथिने आणि व्हिटॅमिन डी ह्यांनी समृद्ध असतात जे बाळाची हाडे आणि स्नायू ह्यांच्या विकासासाठी आवश्यक असतात.

१०. गाजर

गाजर हे व्हिटॅमिन अ आणि क ह्यांनी समृद्ध असते. ही जीवनसत्वे हाडांमध्ये कॅल्शिअम जतन करून ठेवण्यास आवश्यक असतात तसेच हाडे निरोगी ठेवण्यास सुद्धा त्यांची मदत होते.

११. संपूर्ण धान्य

संपूर्ण तृणधान्ये खूप पोषक असतात आणि मुलांसाठी खूप गरजेची असतात. संपूर्ण धान्य हे ऊर्जेचे उत्तम स्रोत असून ते तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशिअम आणि सेलेनियम ह्यांनी समृद्ध असतात. संपूर्ण धान्य ब्रेड आणि पास्ता हे तुमच्या बाळाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी चांगले पर्याय आहेत आणि त्यामुळे उंची वाढण्यास सुद्धा मदत होते.

१२. लाल मांस

थोड्या प्रमाणात घेतल्यास लाल मांस सुद्धा प्रथिनांसाठी एक चांगला मांसाहारी पर्याय आहे. तथापि, खूप जास्त लाल मांसाचे प्रमाण तुमच्या शरीरासाठी चांगले नसते म्हणून ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे.

टाळावेत असे अन्नपदार्थ

वर नमूद केलेले सर्व अन्नपदार्थ तुमच्या बाळाची उंची वाढण्यास मदत करतात, परंतु काही अन्नपदार्थ बाळाची वाढ खुंटण्यास सुद्धा कारणीभूत असतात. खूप जास्त प्रमाणात साखर, मीठ, कॉफी, चरबी आणि शीतपेये ह्यांचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण हे अन्नपदार्थ कॅल्शिअमच्या शरीरातील शोषणावर, नकारात्मकरीत्या परिणाम करतात. धूम्रपान आणि अमली पदार्थांचे ह्यांचे बाळाच्या वाढीच्या वयात सेवन केल्यास बाळाची वाढ खुंटते आणि तब्येतीवर नकारात्मक परिणाम होतो. ज्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसतात त्यांच्या बाबतील पुढे जाऊन लठ्ठपणा, हृदयाच्या समस्या, मधुमेह प्रकार १ तसेच संधिवात, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी समस्या आढळतात. तुमच्या बाळाला पोषक आहार देण्याव्यतिरिक्त इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमच्या बाळाची वाढ होण्यास मदत होईल.
  1. तुमच्या बाळाचे झोपेचे रुटीन नियमित असल्याची खात्री करा. आपण जेव्हा आराम करतो तेव्हा शरीर वाढीच्या संप्रेरकांची निर्मित करते म्हणून तुमच्या बाळाने पुरेशी झोप घेतली पाहिजे. बाळाच्या वयानुसार आवश्यक झोपेचे तास बदलतात. नवजात बाळांसाठी रात्रीची १४-१७ तास झोप आवश्यक असते तसेच ३-११ महिन्यांच्या बाळासाठी दररोज रात्री १२-१७ तास झोप आवश्यक असते. जसजसे बाळ मोठे होते झोपेचे तास कमी होतात आणि ते मुलाच्या ३-५ वर्षे वयापर्यंत १०-१३ तास इतके कमी होतात. योग्य वेळेला झोपून उठल्याने त्याचे फायदे तर होतातच परंतु शिस्त सुद्धा लागते.
  1. तुमच्या मुलाला एका जागी बसून राहण्याऐवजी दररोज व्यायाम करायला तसेच खेळायला सांगा. काही क्रियाकलाप किंवा खेळ दररोज बाहेर खेळल्याने त्यास उन्हातून व्हिटॅमिन डी सुद्धा मिळेल तसेच व्यायामुळे स्नायू शुद्ध बळकट होतील. जर शक्य असेल तर तुमच्या मुलासोबत काही मजेशीर खेळ खेळा त्यामुळे तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल आणि बाळासोबत तुमचा चांगला बंध तयार होईल.
  1. तुमच्या मुलाचा शरीराचा पवित्रा योग्य आहे की नाही ह्याची खात्री करा. त्यामुळे त्याच्या पाठीचे आणि मानेचे स्नायू निरोगी राहतील तसेच ते उंच दिसण्यास सुद्धा मदत होईल. कुबड काढून किंवा खाली मान घालून चालण्याने मूल बुटके दिसते आणि पाठीचे आणि मानेचे स्नायू सुद्धा दुखू लागतात .
  1. पोहणे, तसेच ज्या खेळांमध्ये (जसे की बास्केटबॉल) उड्या मारणे असते किंवा सूर्यनमस्कार, स्ट्रेचेस, दोरीवरच्या उद्या किंवा जॉगिंग ह्या सारख्या व्यायामप्रकारांमुळे तुमच्या मुलाची वाढत्या वयात उंची वाढते. लक्षात ठेवा ह्यासोबतच संतुलित आहेत आणि जीवनशैली अंगिकारल्यास त्याचा नक्की फायदा होतो.
  1. जर मुलाची जीवनशैली निरोगी ठेवा. तुमच्या कुटूंबाची जीवनशैली चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या मुलाची तब्येत आणि उंची चांगली होईल. तुमच्या मुलाला जंक फूड पासून दूर ठेवा आणि ते घरी केलेले अन्न खात आहे ना ते पहा. घरी अन्नपदार्थ तयार केल्यास तुमचा आहार संतुलित राहतो.
  1. तुमच्या मुलाची तब्येत चांगली राहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना काही चांगली पूरक औषधे लिहून द्यायला सांगा. व्हिटॅमिन आणि खनिजद्रव्यांची पूरक औषधे घेतल्याने तुमच्या मुलाला चांगले संतुलित पोषण मिळेल. परंतु हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. बाजारात मिळणारी 'उंची वाढवणारी' औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कुठलीही औषधे देणे टाळा.
तुमच्या मुलाची उंची जनुकांवर अवलंबून असते, तसेच एका रात्रीत उंची वाढेल अशी कुठलीही जादू नाही. चांगला आहार, जीवनशैली ह्यांचा अवलंब केल्यास तुमचे मूल उंच होण्यास मदत होईल. तसेच, पोषक आणि संतुलित आहार घेतल्यास तब्येत चांगली राहणे किंवा विकासास गती मिळणे ह्यासारखे इतरही फायदे होतील. आणखी वाचा: मुलांनी दूध प्यावे म्हणून काही उपयुक्त टिप्स बाळांच्या सर्दी-खोकल्यादरम्यान आवर्जून खाल्ले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्न-पदार्थ
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved