ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा जगभरात साजरा होणारा एक मोठा सण आहे. ह्या सणादरम्यान केली जाणारी मजा, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि वातावरणातील उत्साह ह्यामुळे सगळ्या लहान मुलांना हा सण आवडतो. नाताळ ह्या सणावर निबंध लिहा असा प्रश्न लहान मुलांना अनेकदा परीक्षेत विचारला जातो. सणाविषयी काही महत्त्वाच्या तथ्यांसह नाताळ वर मराठीमध्ये निबंध कसा लिहावा याबद्दल मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या लेखामध्ये निबंधाचे काही नमुने दिलेले आहेत.
इयत्ता 1, 2 आणि 3 साठी नाताळ ह्या विषयावर निबंध लिहिताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे
लेखन कौशल्य वाढण्यासाठी निबंध लेखनाचा सराव केल्याने मदत होते. खाली दिलेले मुद्दे तुम्हाला नातळ ह्या विषयावर निबंध लिहिण्यास मदत करतील
- लेखाची रचना चांगली आहे का ते पहा. निबंधाची सुरुवात आणि शेवट चांगला करा.त्याचे वेगळे परिच्छेद करा.
- या विषयावरील लहान निबंधांसाठी, नाताळ विषयीची माहिती घ्या आणि आपल्या आवडत्या पैलूंबद्दल लिहा.
- जेव्हा तुम्हाला दीर्घ निबंध लिहिण्यास सांगितले जाते, तेव्हा त्यातील आवश्यक असलेल्या मुद्द्यांचा विचार करा.
- सुरुवात साधी आणि सुटसुटीत करा आणि निबंधाच्या मुख्य भागातील आवश्यक मुद्दे स्पष्ट करा. प्रत्येकासाठी नाताळ हा सण कसा आनंददायी आहे ह्या बाबत निष्कर्ष काढून निबंधाचा शेवट करा.
१ली, २री आणि ३ री च्या मुलांसाठी नाताळ वर 10 ओळी
सोप्या ओळींमध्ये निबंध लिहिणे हा छोट्या वर्गातील मुलांसाठी निबंधाचा सर्वात सोपा प्रकार आहे. येथे नाताळ वर लहान मुलांसाठी 10 ओळींचा निबंध दिलेला आहे.
- ख्रिसमस हा जगभरात साजरा केला जाणारा एक लोकप्रिय सण आहे.
- दरवर्षी 25डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
- ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटून खूप मजा करतो.
- मी आणि माझा भाऊ नेहमी ख्रिसमसच्या सुट्टीची वाट पाहतो.
- ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, कॅरोलर गाणे म्हटले जाते.
- ख्रिसमसच्या दिवशी, आम्ही आमच्या सर्व मित्रांना 'मेरी ख्रिसमस!' अश्या शुभेच्छा देतो.
- ख्रिसमससाठी स्वादिष्ट केक आणि कुकीज बनवतो.
- घरी ख्रिसमस ट्री, दिवे आणि खेळण्यांनी सजवला जातो.
- मी आणि माझे मित्र ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो आणि सण एकत्र साजरा करतो.
- आम्ही ख्रिसमस पार्टीचे आयोजन देखील करतो आणि सण साजरा करण्यासाठी नवीन कपडे घालतो.
नाताळ ह्या विषयावर छोटा निबंध
नाताळ ह्या विषयावर एक छोटा निबंध लिहिण्यासाठी, मुलांनी ह्या विषयावर आधी विचार करणे आवश्यक आहे. हा निबंध कसा लिहावा ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी येथे 150 शब्दांमध्ये नाताळ ह्या विषयावरील एक छोटा निबंध दिलेला आहे.
नाताळ हा सण जगभरात साजरा होतो. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जातो. बेथलेहेममध्ये याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते. लहान मुलांना नाताळ निमित्त शाळेला सुट्ट्या देखील असतात. आपण सणाच्या वेळी कुटुंबांसोबत जमतो आणि हा सण आनंदाने साजरा करतो. प्रत्येकाला वर्षाच्या शेवटी नाताळचा उत्साह जाणवत असतो. हा सण सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो.
शेजारी आणि मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देऊन नाताळचा सण साजरा केला जातो. घरी एक सुंदर ख्रिसमस ट्री ठेवून त्याची सजावट केली जाते. बरेच लोक सांताक्लॉजची वेशभूषा करून लहान मुलांना मिठाई आणि भेटवस्तू देत असतात. मी नाताळच्या सणाची आतुरतेने वाट बघत असतो.
लहान मुलांसाठी नाताळ वर दीर्घ निबंध
25डिसेंबर म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस किंवा नाताळचा सण म्हणून जगभरात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे लोक ह्या दिवशी चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात. ख्रिश्चन धर्मियांचा हा सर्वात मोठा सण आहे. हा सण थंडीच्या हंगामात येतो. लोक एकेमकांना भेटवस्तू देऊन ह्या सणाच्या शुभेच्छा देतात. घर सजवले जाते आणि संपूर्ण घराला रोषणाई केली जाते.
ख्रिश्चन धर्मियांमधील लहान थोर सगळे जण हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. ह्या दिवशी कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात. येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण म्हणून गोशाळेचा देखावा करण्याची प्रथा आहे. नाताळच्या दिवशी घर व दुकाने सजवलेली असतात. बाजारात ख्रिसमस ट्री, केक, सॅन्टाक्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी सामान मिळायला लागते. 25 डिसेंबर च्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी लोक आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात.
ख्रिसमसच्या दिवशी लहान मुले सांताक्लॉजची खूप वाट बघत असतात. सांताक्लॉज म्हणजे लांब केस, पांढरी दाढी व लाल पांढरे कपडे घातलेली एक व्यक्ती असते. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. सांताक्लॉज ख्रिसमसच्या दिवशी येऊन लहान मुलांना छान छान गिफ्ट घेऊन येतो. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही त्याच्या सोबत असते. लहान मुलांना आनंदित करण्यासाठी बरेच लोक ह्या दिवशी सांताक्लॉजचे कपडे घालून येतात. एका गावात 'निकुलस' नावाचा श्रीमंत माणूस रहात होता. हा माणूस पैशाने श्रीमंत होता. तसेच त्याचे मनसुद्धा मोठे होते. त्याच्या हृदयात सगळ्यांसाठी दया आणि करूणा होती. तो गरीबांना मदत करत असे. लहान मुलांना गिफ्ट देऊन आनंद देत असे. मात्र हे काम करताना त्यांना ओळख उघड करायची नव्हती. आपल्याला कोणी बघू नये, म्हणून रात्रीच्या वेळी मुलांना ते भेटवस्तू देत असत.
हा सण लोकांना एक दुसऱ्याशी जोडतो. ख्रिसमसचा सण लोकांना एकमेकांसोबत मिळून-मिसळून राहण्याचा संदेश देतो. परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकवल्या गेलेल्या शिकवणी क्षमा, बंधुत्व आणि त्याग यासारख्या गोष्टी आत्मसात करण्याची शिकवण देतो.
येशू ख्रिस्त हे करुणा आणि सहनशीलता ह्यांचे प्रतीक आहे. येशूचा जन्म गोठ्यात झाला. 'आपल्याला परमेश्वराने विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठविले आहे' असे येशूला जाणवले. त्यानंतर मानवतेवर आधारित असा नवा धर्म येशूने लोकांना सांगण्यास सुरुवात केली. 'देव एकच आहे. तो निराकार आहे. दया, क्षमा, शांती, प्रेम, परोपकार, सत्य हे परमेश्वराचे गुण आहेत. सर्वांशी समानतेने वागावे तसेच उच्च नीच असा भेदभाव न करता मानवाने आपले आयुष्य जगावे अशी शिकवण येशू ख्रिस्तांनी दिली.
भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या कमी असली तरी सुद्धा ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आणि भारतात देखील हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
नाताळ वरील ह्या निबंधांमधून १ली, २ री आणि ३ री तील मुले काय शिकतील?
नाताळ म्हणजे मजा करण्याचा आणि सुट्ट्यांचा काळ आहे. त्यामुळे लहान मुलांना हा सण आवडतो. मुलांना या सणाबद्दल लिहायला सुद्धा आवडू शकते. ह्या विषयावर लिहिण्यासाठी मुले त्यांची कल्पनाशक्ती वापरू शकतात आणि त्यांचे सर्व आवडते मुद्दे लिहू शकतात. ह्या विषयावर लिहिण्यासाठी मुले स्वतः माहिती काढून लिहू शकतात.
येथे नाताळ ह्या विषयावरील निबंधाचे नमुने दिलेले आहेत. मुले त्यामध्ये आणखी तपशील देखील जोडू शकतात. मुले त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून निबंध लिहू शकतात. निबंध लेखन म्हणजे एखाद्या विषयाबद्दल आपले विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. येथे दिलेल्या निबंधांचे नमुने वाचून मुले निबंध लेखनाची चांगली सुरुवात करू शकतात.