In this Article
- गर्भनिरोधक वापरत असताना तुम्ही गर्भवती होऊ शकता?
- जन्म नियंत्रण गोळ्यांच्या प्रभावीतेवर कशामुळे परिणाम होतो?
- जन्म नियंत्रण अयशस्वी न होण्यासाठी काही टिप्स
- जन्म नियंत्रण पद्धती वापरत असताना तुम्ही गर्भवती असू शकता ह्याची काही लक्षणे
- जन्म नियंत्रण गोळ्या घेताना आपण गर्भवती असल्यास काय करावे?
- तुमच्या बाळासाठी जन्म नियंत्रण हानिकारक असू शकते?
अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा सर्वात लोकप्रिय आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. ठरवल्याप्रमाणे योग्यरित्या ह्या गोळ्या घेतल्यास, गर्भधारणा रोखण्यासाठी त्या ९९% प्रभावी आहेत. त्यासाठी दररोज एक गोळी ठरलेल्या वेळेला घेतली पाहिजे. तथापि, जर आपण एखादा डोस चुकविला तर गर्भवती होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या १००० मध्ये १ वरून २० मध्ये १ पर्यंत वाढते.
गर्भनिरोधक वापरत असताना तुम्ही गर्भवती होऊ शकता?
गर्भनिरोधक गोळ्या घेताना गर्भवती होणे शक्य आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या गोळ्या घेतल्यास गर्भधारणा रोखण्यासाठी त्या अत्यंत प्रभावी आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारची गोळी निवडता ह्यावर ती कशी घ्यावी हे अवलंबून आहे.
गर्भनिरोधक गोळ्या २ प्रकारच्या असतात त्या म्हणजे एकत्रित गर्भनिरोधक गोळी (कम्बाइन्ड पिल) आणि प्रोजेस्टेरॉन फक्त (प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल) होय. एकत्रित गर्भनिरोधक गोळी २१ दिवसांसाठी घेतली जाते आणि नंतर ७ दिवस थांबविली जाते. या ७ दिवसांमध्ये, तुम्हाला मासिक पाळी येईल. एकत्रित गोळ्या दररोज समान वेळी योग्य क्रमाने घ्याव्यात. तुम्ही गोळी घेणे विसरल्यास, तुमच्याकडे २४ तासांचा कालावधी असतो आणि गर्भधारणा होण्यापासून तुम्ही सुरक्षित राहता. तुम्ही २ किंवा अधिक गोळ्या घेण्याचे विसरल्यास प्रभावीता कमी होते.
प्रोजेस्टेरॉन–ओन्ली पिल पॅकवर निर्दिष्ट केलेल्या क्रमाने घ्यावी. दररोज ठरलेल्या वेळेच्या ३ तासांच्या आत गोळी घेणे अपेक्षित आहेत. तुम्ही गोळी घेणे विसरल्यास तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळणार नाही.
जन्म नियंत्रण गोळ्यांच्या प्रभावीतेवर कशामुळे परिणाम होतो?
जन्म नियंत्रण गोळ्यांची प्रभावीता कमी करू शकणारी कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. दररोज ठरलेल्या वेळी गोळी न घेणे
गर्भ निरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हार्मोन्सची कमी मात्रा असते आणि गर्भधारणा रोखण्यासाठी ते एकत्र काम करतात. प्रभावी होण्यासाठी दररोज एकाच वेळी गोळी घ्यावी लागते. डोस गमावल्यास गोळी अकार्यक्षम होऊ शकते.
२. औषध
काही औषधे जन्म नियंत्रण गोळी शोषून घेण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करतात. ह्यामध्ये अँटीबायोटिक्स, न्यूरोलॉजिकल औषधे, हर्बल सप्लीमेंट्स आणि अँटीडिप्रेससन्ट्स यांचा समावेश आहे.
३. उलट्या आणि अतिसार
जर आपल्याला गर्भ निरोधक गोळी घेतल्याच्या २ तासाच्या आत उलट्या झाल्यास, तर गोळीचा डोस चुकला असे मानले पाहिजे आणि आपल्याला दुसरी गोळी घ्यावी लागेल. तसे न केल्यास तुम्ही गर्भवती होऊ शकता. जर तुम्हाला २४ तास अतिसार किंवा जुलाब होत असल्यास गोळी शोषली जात नाही आणि जन्म नियंत्रण कुचकामी ठरते.
४. उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे
जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या उष्मा आणि थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवल्या तर, गोळ्या क्षीण होऊ लागतात आणि कुचकामी ठरतात. गोळ्या २५ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
५. गोळी घेणे विसरणे
गोळीचा एक डोस गमावल्यामुळे गर्भधारणा रोखण्याची क्षमता कमी होते. तुम्ही दोनपेक्षा अधिक गोळ्या घेणे विसरल्यास, तुम्ही शुक्राणूनाशक किंवा कंडोम सारख्या जन्म नियंत्रणाची बॅकअप पद्धत वापरली पाहिजे तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
६. अल्कोहोल
यकृत द्वारे अल्कोहोलचे चयापचय होतो. यकृतावर परिणाम करणारी कोणतीही गोष्ट, गोळी शरीरात शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. तुम्ही जितके जास्त मद्यपान करता तितके जास्त गर्भ निरोधक गोळीची प्रभाविता कमी होईल.
जन्म नियंत्रण अयशस्वी न होण्यासाठी काही टिप्स
जन्म नियंत्रण अयशस्वी होऊ नये म्हणून इथे काही टिप्स दिलेल्या आहेत.
- तुम्ही दररोज एकाच वेळी न विसरता गोळी घ्या. त्यासाठी गोळी घेण्याची वेळ तुम्ही दररोज करता अशा गोष्टींशी संयोजित करा जसे की दात घासणे किंवा नाश्ता करणे इत्यादी. असे केल्याने तुम्ही दररोज एका विशिष्ट वेळेला गोळी घेणे विसरणार नाही.
- जन्म नियंत्रणाच्या बॅकअप पद्धतींचा वापर करा: जर तुमची एखादी गोळी चुकली असेल तर लक्षात आल्याबरोबर ती लगेच घ्या, परंतु सुरक्षित राहण्यासाठी शुक्राणूनाशकांसारख्या बॅकअपचा वापर करा. तुम्ही २ किंवा अधिक गोळ्या घेण्याचे विसरल्यास चुकलेल्या डोसबद्दल सल्ला घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि कमीतकमी एका आठवड्यासाठी बॅकअप वापरा.
- जर आपण गोळी नुकतीच सुरू केली असेल तर काय करावे: तुम्ही नुकतेच गर्भ निरोधक गोळ्या घेणे सुरू केले असेल तर बरेच डॉक्टर गोळ्या सुरू केल्यावर एका आठवड्यापासून एका महिन्यापर्यंत बॅकअप गर्भनिरोधक वापरण्याची शिफारस करतात.
- प्लेसबो गोळ्या घ्या: बर्थ कंट्रोल पिल पॅकमध्ये ३ आठवड्याच्या सक्रिय गोळ्या आणि १ आठवड्याच्या प्लेसबो किंवा निष्क्रिय गोळ्या असतात. जर आपण प्लेसबो गोळ्या घेतल्या नाहीत किंवा कदाचित विसरलात तर पुढच्या पॅकची सुरुवात करण्यास उशीर होऊ शकतो. यामुळे गोळ्या कमी प्रभावी होऊ शकतात.
- औषधे एकत्र करू नका: गोळ्या घेताना ओव्हर–द–काउंटर आणि प्रिस्क्रिप्शनची औषधे एकत्र करू नका. आपल्याला इतर कोणतीही औषधे लिहून दिलेली असल्यास आणि बॅकअप गर्भनिरोधक आवश्यक असल्यास नेहमी डॉक्टरांना विचारा. गोळ्या घेताना हर्बल पूरक औषधे घेऊ नका. ह्या सर्व गोळ्या गर्भधारणा रोखण्यात अडथळा आणू शकतात.
जन्म नियंत्रण पद्धती वापरत असताना तुम्ही गर्भवती असू शकता ह्याची काही लक्षणे
कधीकधी, गोष्टी चुकीच्या होऊ शकतात आणि आपण गर्भ निरोधक गोळ्या घेत असताना गर्भवती होऊ शकता. तुम्ही गर्भवती असल्याचा तुम्हाला संशय असल्यास, घरगुती गर्भधारणा चाचणी करून पहा आणि याची खात्री करण्यासाठी रक्त तपासणी करुन त्याची पुष्टी करा. जन्म नियंत्रणादरम्यान खालील गर्भधारणेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
१. हळुवार स्तन
हळुवार किंवा सूजलेले स्तन हे गर्भारपणाच्या प्रारंभिक लक्षण आहे. हे लक्षण संप्रेरक बदलांमुळे दिसू लागते.
२. मॉर्नींग सिकनेस
मॉर्निंग सिकनेस हे गर्भधारणेचे लक्षण आहे ज्यामुळे मळमळ, उलट्या होतात आणि थकवा येतो.
३. विशिष्ट खाद्यपदार्थांचा तिटकारा
तुम्हाला अचानक अन्नाची तीव्र इच्छा झाल्यास किंवा अनपेक्षितपणे विशिष्ट खाद्यपदार्थांबद्दल तिटकारा जाणवत असल्यास, तुम्ही गर्भवती असल्याचे ते लक्षण असू शकते.
४. मासिक पाळी चुकणे
मासिक पाळी चुकणे किंवा उशिरा येणे हे बहुतेक स्त्रियांसाठी गर्भधारणेचे पहिले निर्देशक असते . तथापि, काही स्त्रियांना गर्भ नियंत्रणादरम्यान मासिक पाळी येत नाही. तर, त्यांच्यासाठी हे गर्भधारणेचे एक चांगले सूचक लक्षण नाही.
जन्म नियंत्रण गोळ्या घेताना आपण गर्भवती असल्यास काय करावे?
गर्भ निरोधक गोळ्या घेत असताना गर्भवती होणे हे अत्यंत अनपेक्षित असू शकते. तुम्ही गर्भ निरोधक गोळ्या घेत असताना गर्भवती असल्याचे आढळल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ताबडतोब गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबवावे. तुम्ही गर्भधारणा ठेवण्याचे ठरविल्यास, आपल्याला ताबडतोब निरोगी खाणे आणि फोलेट सप्लीमेंट्स आणि जन्मपूर्व जीवनसत्त्वे घेणे सुरू करावे लागेल.
आपण अनियोजित गर्भधारणा संपविण्याचा निर्णय घेतल्यास, शक्य तितक्या लवकर त्यानुसार कार्य करणे महत्वाचे आहे कारण आपल्या शहरातील कायदे आपण कोठे राहता यावर ते अवलंबून असते आणि ते एखाद्या विशिष्ट कालावधीनंतर गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीस प्रतिबंध करू शकतात.
तुमच्या बाळासाठी जन्म नियंत्रण हानिकारक असू शकते?
तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना गर्भवती होऊ शकता. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जन्म नियंत्रण घेतल्याने असामान्य मूत्र मार्ग, अकाली प्रसूती आणि जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे यांच्यात संशोधनाद्वारे दुवा दर्शविला गेला आहे. तथापि, हे सिद्ध झालेले नाही. तुम्ही गर्भवती असल्याचे समजल्यानंतर लगेचच गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबविणे फार महत्वाचे आहे.
गर्भनिरोधक गोळ्या योग्यरित्या घेतल्यास अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा तो एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. ह्या गोळ्या वेदनादायक मासिक पाळी आणि मुरुमांसारख्या इतर समस्यांवर उपचार म्हणून देखील मदत करतात. योग्यरित्या न घेतल्यास गोळ्या कुचकामी ठरतात. गर्भनिरोधक अयशस्वी होऊ नये म्हणून त्यामागच्या कारणांबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
आणखी वाचा :
संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक
सर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत