In this Article
- कोरोनाविषाणू म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?
- गरोदरपणात कोविड–१९ कोरोनाविषाणूंचा संसर्ग झालेला असल्यास त्याची लक्षणे कोणती?
- कोविड –१९ कोरोनाविषाणू चा धोका गरोदर स्त्रियांना जास्त असतो का?
- जर गर्भवती स्त्रीची कोविड–१९ कोरोनाविषाणूची चाचणी सकारात्मक आली तर गर्भपाताची किती शक्यता आहे?
- ज्या गर्भवती स्त्रीला कोविड –१९ चा संसर्ग झाला आहे तिच्या पोटातील बाळाला सुद्धा हा संसर्ग होऊ शकतो का?
- कोविड –१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्भवती स्त्री काय करू शकते?
- कोविड –१९ चा संसर्ग झालेला असताना प्रसूती होणे
- कायम विचारले जाणारे प्रश्न
- लॉकडाऊन
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की, सगळं आयुष्याच थांबले आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील ह्या बदलाचे कारण म्हणजे कोविड–१९ हा विषाणू होय. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही ह्या कोरोनाविषाणू चा संसर्ग होऊ शकतो, गरोदर स्त्रियांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता असते. गर्भारपण हा तसाही खूप नाजूक काळ असतो आणि कोविड–१९ कोरोनाविषाणूच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही जर गर्भवती असाल किंवा लवकरच बाळाला जन्म देणार असाल, तर तुमच्या मनात ह्या कोरोनाविषाणूच्या साथीमुळे तुमच्यावर किंवा बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना अशी काळजी असेल.
कोविड–१९ कोरोनाविषाणू हा नवीन असल्यामुळे, त्याचा गर्भारपणावर काय परिणाम होतो ह्याविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. ह्या लेखामध्ये आम्ही, गर्भारपणाविषयी आणि नॉवेल कोरोनाविषाणू विषयी सामान्यपणे पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता ह्यासंबंधी सुद्धा इथे माहिती दिली आहे. सर्वात आधी, कोरोनाविषाणूचा संसर्ग कसा पसरतो ह्याबाबत माहिती घेऊयात.
कोरोनाविषाणू म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?
कोविड–१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग होणे हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे आणि त्याचा संसर्ग एका माणसाकडून दुसऱ्याला होतो. ह्या विषाणूंचा संसर्ग झालेली व्यक्ती जेव्हा खोकते किंवा शिंकते तेव्हा श्वसन प्रणाली मधून निघालेल्या ह्या थेंबांद्वारे विषाणूचा प्रसार होतो. कोरोनाविषाणू बाधित व्यक्तीने एखाद्या पृष्ठभागास किंवा वस्तूस स्पर्श केल्यास त्याद्वारे सुद्धा ह्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
गरोदरपणात कोविड–१९ कोरोनाविषाणूंचा संसर्ग झालेला असल्यास त्याची लक्षणे कोणती?
कोरोनाविषाणू (कोविड–१९) चा संसर्ग झालेला असल्यास त्याची लक्षणे सर्दी आणि फ्लू व श्वसनसंस्थेशी संबंधित इतर आजारांप्रमाणेच असतात. संसर्ग झाल्यावर कमीत कमी २ दिवसांनी आणि जास्तीत जास्त १४ दिवसांच्या आत लक्षणे दिसण्यास सुरुवात होते आणि ही लक्षणे सौम्य, मध्यम ते गंभीर प्रमाणात असू शकतात. सौम्य ते मध्यम प्रमाणात दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे
- खोकला
- ताप
- श्वास घेण्यास त्रास होणे
- इतर सर्दी/फ्लू सारखी लक्षणे
न्यूमोनिया आणि हायपोक्सीया ही कोविड –१९ ची गंभीर लक्षणे आहेत आणि ती ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळतात. गरोदर स्त्रिया आणि मधुमेह, फुप्फुसांचे आजार आणि कॅन्सर असलेल्या लोकांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसून येतात.
कोविड –१९ कोरोनाविषाणू चा धोका गरोदर स्त्रियांना जास्त असतो का?
ह्या विषाणूच्या नावातच ‘नॉव्हेल‘ शब्द आहे त्यामुळेच त्याचा गर्भवती स्त्रियांवर होण्याऱ्या परिणामांबाबत खूप कमी माहिती आहे. सीडीसी मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार फ्लू किंवा इतर श्वसन प्रणाली संबंधित आजारांप्रमाणेच कोविड –१९ कोरोनाविषाणू चा धोका गरोदर स्त्रियांना असतो. ज्या स्त्रिया गर्भवती नाहीत अशा स्त्रियांपेक्षा गर्भवती स्त्रियांना हा धोका जास्त असतो. परंतु, प्रतिकार शक्ती वाढवून योग्य ती काळजी घेणे चांगले.
जर गर्भवती स्त्रीची कोविड–१९ कोरोनाविषाणूची चाचणी सकारात्मक आली तर गर्भपाताची किती शक्यता आहे?
जी काही थोडी माहिती उपलब्ध आहे त्यावरून, कोविड–१९ चा संसर्ग झाल्यामुळे गर्भवती स्त्रीला गर्भपाताचा जास्त धोका आहे किंवा नाही ह्याविषयी निष्कर्ष काढणे अवघड आहे. परंतु,ज्या स्त्रियांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे त्यांच्या बाबतीत अकाली प्रसूतीच्या नोंदी आहेत. परंतु अकाली प्रसूतीचे कारण फक्त कोरोनाविषाणू होते कि गरोदरपणात इतर काही समस्या आल्यामुळे अकाली प्रसूती झाली हे नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर गर्भवती असाल तर घाबरून जाऊ नका. सकारात्मक रहा आणि काळजी करू नका. सर्वात महत्वाचे, घरी राहून निरोगी जीवनशैली अंगिकारा म्हणजे तुम्ही आणि तुमचे बाळ सुरक्षित राहू शकाल.
ज्या गर्भवती स्त्रीला कोविड –१९ चा संसर्ग झाला आहे तिच्या पोटातील बाळाला सुद्धा हा संसर्ग होऊ शकतो का?
गरोदर स्त्रीला जर कोविड –१९ ह्या विषाणूचा संसर्ग झाला असेल तर तो गर्भारपणात बाळाला सुद्धा होत असल्याचा आतापर्यंत कोणताही पुरावा नाही. चीनमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, फ्रॉन्टिएर्स इन पेडियाट्रिक्स ह्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जर आईला कोविड–१९ चा संसर्ग झाला असेल तर तो बाळाला होत नाही. परंतु हा अभ्यास संसर्ग झालेल्या फक्त चार गर्भवती महिलांविषयीच आहे. ह्या महिलांना झालेली बाळे वेगळी ठेवली गेली होती आणि त्यांच्या मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. चार मधल्या तीन बाळांची कोरोनाविषाणूची चाचणी नकारात्मक आली आणि चौथ्या बाळाच्या पालकांनी बाळाची चाचणी करण्यास नकार दिला.
लंडन मध्ये नवजात बाळाची कोरोनाविषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचा एक रिपोर्ट आहे. बाळाच्या आईला न्यूमोनिया झाल्याचा संशय होता परंतु तिला सुद्धा कोरोनाविषाणूची लागण झाली होती. परंतु, बाळाला गर्भारपणात विषाणूची लागण झाली होती कि जन्मानंतर हे समजले नाही. निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी आणखी संशोधन झाले पाहिजे. निरोगी गर्भारपणासाठी घरी राहणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे संसर्ग टाळता येतो.
कोविड –१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्भवती स्त्री काय करू शकते?
जरी कोविड–१९ विषाणूची लस विकसित झालेली नसली तरी गर्भवती स्त्री संसर्ग होऊ नये म्हणून इतर लोकांप्रमाणेच प्रतिबंधात्मक उपाय करू शकते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हूणून तुम्ही खालील गोष्टी करू शकता.
- सर्वात आधी साबण लावून २० सेकंद हात स्वच्छ धुवा. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर, बाहेरून घरात आपल्यावर, जेवणाच्या आधी आणि नंतर, शिंका आल्यानंतर आणि नाक शिंकारल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
- अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर जवळ ठेवा आणि जसे लागेल तसे वापरा
- जे लोक आजारी आहेत त्यांच्याशी जवळून संपर्क टाळा
- डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे शक्यतोवर टाळा
- जर तुम्ही डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केलात तर मुद्धा क्रमांक १ आणि नंतर ४ पाळा
- सोशल डिस्टंसिंग नियमितपणे पाळा – ते अत्यंत गरजेचे आहे. ते माहिती करून घेण्यासाठी इथे क्लिक करा
- शिंकताना आणि खोकताना तुमचे तोंड टिश्युने झाका आणि टिश्यू लगेच टाकून द्या
- जरी तुम्हाला कुठलेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी जाणवले तरी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा
कोविड –१९ चा संसर्ग झालेला असताना प्रसूती होणे
कोवीड–१९ संसर्ग झालेल्या स्त्रीला प्रसूती कळा सुरु होऊन ती बाळाला जन्म देऊन संसर्गातून बरी होऊ शकते, परंतु ते संसर्ग किती प्रमाणात आहे ह्यावर अवलंबून असते. नवजात बाळाचा विचार करता त्याला संसर्ग न होण्याची शक्यता असते. काही बाळांना संसर्ग होऊ शकतो काहींना नाही. जरी बाळाच्या चाचणीचा निकाल सकारात्मक आला तरीसुद्धा संसर्ग पोटात असताना झाला कि जन्माच्या वेळी हे मात्र खात्रीशीरपणे सांगता येत नाही.
परंतु, बाळाचा संसर्गापासून बचाव होण्यासाठी डॉक्टर बाळाला आईपासून दूर निओनेटल युनिट मध्ये ठेवायला सांगू शकतील आणि आई पूर्णपणे बरी होईपर्यंत बाळाला फॉर्मुला दूध दिले जाऊ शकते.
कायम विचारले जाणारे प्रश्न
१. मी गरोदर असताना कोविड–१९ ची चाचणी सकारात्मक आली तर मी काय केले पाहिजे?
जर कोविड–१९ ची चाचणी सकारात्मक आली तर तुम्ही त्याविषयी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. जर तुमची लक्षणे सौम्य असतील तर तुम्हाला घरातच विलगीकरण करण्यास सांगू शकतात. परंतु जर लक्षणे तीव्र असतील तर तुम्हाला रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे.
२. माझ्या बाळाची सुद्धा कोरोनाविषाणूची चाचणी केली जाईल का?
हो, जर तुमची कोविड –१९ ची चाचणी गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्माच्या वेळी सकारात्मक आली तर बाळाच्या जन्मानंतर त्याची सुद्धा कोरोनाविषाणुचा संसर्ग झाला आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी चाचणी केली जाते.
लॉकडाऊन
कोविड –१९ कोरोनाविषाणूसाठी अद्याप कोणतीही लस विकसित केली गेलेली नाही, म्हणून गर्भवती महिलेला या संसर्गापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी सर्वात चांगल्या गोष्टी म्हणजे स्वच्छता राखणे, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे, सामाजिक अंतर राखणे आणि चिंता कमी करणे ह्या आहेत. आम्ही समजू शकतो की कोरोनाविषाणूच्या उद्रेका दरम्यान गर्भवती राहणे आपल्याला चिंताग्रस्त बनवते, परंतु स्वत: ची चांगली काळजी घेणे आणि विशेषत: कोरोनाविषाणूच्या उद्रेका दरम्यान घरामध्येच राहणे, या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करते आणि स्वस्थ गर्भधारणेची शक्यता वाढवते.
आणखी वाचा: सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय? कोरोनाविषाणूच्या उद्रेकाच्या काळात ते का आवश्यक आहे?