Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (पी. आय. डी.): कारणे, लक्षणे आणि उपचार

पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (पी. आय. डी.): कारणे, लक्षणे आणि उपचार

पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (पी. आय. डी.): कारणे, लक्षणे आणि उपचार

स्त्रीचे प्रजनन अवयव जसे की अंडाशय, बीजवाहिन्या, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख, योनी आणि  स्त्रीच्या जननेंद्रियाचा बाहेरील भाग हे खूप संवेदनाक्षम असतात त्यामुळे त्यांना संसर्ग लवकर होतो आणि वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. संसर्ग, शारीरिक हानी किंवा संप्रेरकांच्या पातळीतील बदलांमुळे ह्या काही समस्या निर्माण होतात. त्याचे निदान लवकर झाल्यास आणि त्यावर उपचार झाल्यास अतिशय मदत होते आणि  होणारे पुढील परिणाम टाळले जातात. ह्या पैकी एक समस्या म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (पी.आय.डी.) होय.

पी. आय. डी. म्हणजे काय?

पी.आय.डी. म्हणजे गर्भाशय, अंडाशय आणि बीजवाहिन्यांमध्ये झालेला संसर्ग होय. जर ह्या संसर्गावर बराच काळ उपचार झाले नाहीत तर ज्या भागाला संसर्ग झालेला आहे  त्या भागात अडथळा निर्माण होतो. हे अडथळे बीजवाहिन्यांमध्ये  सुद्धा तयार होऊ शकतात आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. पी. आय. डी. हे वेगवेगळ्या जिवाणूंमुळे सुद्धा होऊ शकतात.

पेल्व्हिक इन्फ्लमेटरी डिसीज होण्याची कारणे

लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग हे पी.आय.डी. होण्याचे कारण आहे. हा संसर्ग गर्भाशयाच्या मुखातून गर्भाशयाकडे, नंतर बीजवाहिन्यांकडे आणि मग अंडाशयापर्यंत पसरतो. ही प्रक्रिया होण्यासाठी आणि तुम्ही आजारी पडून तुम्हाला लक्षणे जाणवण्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागतात. त्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत  शारीरिक संबंध आल्यानंतर पी.आय.डी.होण्यास खूप वेळ लागतो. chlamydia आणि gonorrhoea हे काही सामान्यपणे आढळणारे लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग आहेत आणि त्यामुळे पी.आय.डी.होतात. काही वेळा पी.आय.डी.लैंगिक संबंधातून होणाऱ्या संसर्गातून होत नाही. कुठल्यातरी वेगळ्याच विषाणूमुळे ज्यापासून कुठलीच हानी नाही असे आपल्याला वाटते, त्यामुळे सुद्धा पी.आय.डी. होऊ शकतो. हा संसर्ग बाळाच्या जन्मानंतर किंवा गर्भनिरोधक साधने घालताना होऊ शकतो.

कुणाला पी.आय.डी. होण्याची जास्त शक्यता असते?

ही स्थिती खूप सामान्य आहे, परंतु ज्यांना chlamydia किंवा gonorrhoea होतो त्यांना पी.आय.डी. होण्याची शक्यता जास्त असते. परंतु लैंगिक संबंधांतून पसरणारे संसर्ग हे पी.आय.डी. चे एकमेव कारण नाही. जर खालीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त जोखीम घटक असतील तर  पी.आय.डी.होण्याची खूप जास्त शक्यता असते.

  • शारीरिक संबंधांच्या वेळेला कॉन्डोम न वापरणे
  • २५ पेक्षा कमी वय असणे, कारण chlamydia तरुण लोकांमध्ये खूप जास्त झालेला आढळतो
  • खूप कमी वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणे
  • एका पेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असणे
  • लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गाचा इतिहास असणे किंवा तुमच्या लैंगिक साथीदाराचा तसा इतिहास असणे
  • गर्भाशयात गर्भनिरोधनासाठी किंवा गर्भाशयाच्या तपासणीसाठी साधन बसवलेले असणे
  • असुरक्षित गर्भपात
  • बाळाच्या जन्मानंतर
  • douching
  • पी.आय.डी. चा इतिहास असणे

पी.आय.डी. ची लक्षणे कुठली आहेत?

तुम्हाला पी.आय.डी.ची लक्षणे दिसण्याआधी संसर्गास कारणीभूत असलेले जिवाणू तुमच्या शरीरात खूप दीर्घ काळासाठी राहू शकतात.

  • पोटात किंवा श्रोणी मध्ये वेदना जाणवणे
  • ताप आणि थंडी वाजून येणे
  • असामान्य वास, पोत आणि रंग असलेला योनीमार्गातील स्त्राव
  • संभोगानंतर रक्तस्त्राव होणे
  • थकवा
  • वारंवार लघवीला होणे
  • भूक न लागणे
  • पाळी चुकणे
  • मळमळ आणि उलट्या
  • मासिक पाळी दरम्यान किंवा दोन मासिक पाळी चक्रदरम्यान योनीमार्गातून असामान्य रक्तस्त्राव

जर पी.आय.डी. वर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात जसे की गर्भवती राहण्यास समस्या येणे किंवा बेशुद्ध पडणे इत्यादी. ही लक्षणे ‘एक्टॉपिक प्रेग्नन्सी’ किंवा ‘अपेंडिसायटिस’ ची सुद्धा असू शकतात.

निदान कसे केले जाते?

जर तुम्हाला पी.आय.डी. चे कुठलेही लक्षण आढळले किंवा इतर काही कारणे असतील ज्यामुळे तुम्हाला पी.आय.डी. असल्याची शंका आली  तर तुम्ही तुमचे प्रश्न आणि चिंता डॉक्टरांना सांगा आणि त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करा. जर लक्षणे सौम्य असतील तर पी.आय.डी.चे निदान होण्यास वेळ लागेल. खालील गोष्टींमुळे तुमच्या डॉक्टरांना योग्य निदान होण्यास मदत होईल.

  •  ‘एक्टॉपिक प्रेग्नन्सी’ ची शक्यता तपासून पाहण्यासाठी चाचणी करून बघितली जाऊ शकते.
  •  गर्भाशयाच्या मुखातून नमुना घेऊन जिवाणू तपासून पहिले पाहिजेत.
  •  जिवाणूंचा संसर्ग झाला आहे किंवा कसे हे तपासून पाहण्यासाठी रक्त आणि लघवीच्या चाचण्या डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाऊ शकतात.
  • जर चाचणीच्या परिणामांनंतर पी.आय.डी. चे निदान होईल असा भक्कम पुरावा मिळाला नाही तर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करायला सांगू शकतात त्यामुळे बीजवाहिन्यांना सूज आली आहे का ह्याचे निदान होते.
  •  जर तुमच्या डॉक्टरांना तुमची उदरपोकळी नीट तपासून पाहायची असेल तर लॅप्रोस्कोपीची गरज भासू शकते.

नुकसान विश्लेषण

पी.आय.डी. झाले असल्याचे निदान झाल्यास, तुमचे डॉक्टर्स तुम्हाला श्रोणीच्या भागाला किती हानी पोहोचली आहे हे तपासून पाहण्यासाठी आणखी काही चाचण्या करायला सांगू शकतात. तुमच्या बीजवाहिन्यांना जखमा होऊ शकतात तर तुमच्या प्रजनन प्रणालीच्या अवयवांना कायमचे नुकसान होऊ शकते. श्रोणीच्या भागाचे अल्ट्रासाऊंड स्कॅन, एन्डोमेट्रिअल बायोप्सी आणि लॅप्रोस्कोपी ह्या अजून काही चाचण्या आणि तपासण्या आहेत ज्या केल्या पाहिजेत.

स्त्रियांमधील पी.आय.डी. उपचारपद्धती

पी.आय.डी. साठी प्रतिजैविके ही उपचारपद्धती आहे, विशेषकरून जेव्हा स्पष्ट निदान झालेले नसते तेव्हा हा सुरक्षित उपाय असतो. ज्या जिवाणूंमुळे संसर्ग होतो त्यांना नष्ट करण्यासाठी वेगवेळ्या प्रतिजैविकांचे कॉम्बिनेशन लिहून दिले जाते. त्याच्या जोडीने वेदनाशामक औषधे सुद्धा घेतली पाहिजेत. पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून औषधांचा कोर्स संपेपर्यंत तुमचे डॉक्टर्स तुम्हाला शारीरिक संबंध न ठेवण्याचे सुचवतील. संसर्ग पूर्णपणे नाहीसा झाला आहे ना हे तपासून पाहण्यासाठी तुम्हाला नंतर सुद्धा डॉक्टरांच्या भेटी घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला सांगितलेला औषधांचा कोर्स अर्धा संपल्यावर तुम्हाला जरी बरे वाटू लागले तरी औषधांचा कोर्स पूर्ण करा. काही प्रकरणांमध्ये पी.आय.डी.च्या उपचार पद्धतीत शस्त्रक्रियेची सुद्धा गरज भासू शकते. जेव्हा तुमच्या श्रोणीच्या भागातील  फोड फुटतात किंवा डॉक्टरांना असे वाटत असेल की तिथे काही फोड आहेत  जे फुटणार आहेत तेव्हा शस्त्रक्रियेची गरज भासते. अशा परिस्थितीत तुम्हाला काही काळासाठी हॉस्पिटल मध्ये राहावे लागू शकते.

पी.आय.डी. कसा प्रतिबंधित कराल?

पी.आय.डी. संपूर्णपणे टाळण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे संयम, बोलणं सोपं आहे पण त्याची अंमलबजावणी करणे अवघड. लैंगिक संबंधांतून संसर्ग पसरतो त्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास काही अंशी धोका कमी होतो. काँडोम्स वापरणे हा एक उपाय आहे तसेच तुमच्या लैंगिक जोडीदारांची संख्या कमी केल्यास सुद्धा चांगला परिणाम मिळतो. जर तुमचे एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असतील तर लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गाची चाचणी नियमितपणे केली पाहिजे. Douching टाळा आणि बाथरूम चा वापर केल्यानंतर मागून पुढे पुसणे टाळा.

पी.आय.डी. मधील संभाव्य गुंतागुंत

जर लवकर निदान झाले तर पी.आय.डी. मध्ये काही गुंतागुंत आढळत नाही आणि लगेच उपचार केले जातात. पी.आय.डी.च्या गंभीर प्रकरणांमध्ये किंवा दुर्लक्षित प्रकरणांमध्ये खालील गुंतागुंतीची शक्यता असते.

  • पी.आय.डी. मुळे बीजवाहिन्यांचे झालेले नुकसान आणि बीजवाहिन्यांना झालेल्या जखमांमुळे गर्भधारणेची समस्या निर्माण होते. पी.आय.डी. साठीच्या उपचारांनंतर जर गर्भधारणा राहिली तर ‘एक्टॉपिक प्रेग्नन्सी’ (गर्भाशयाच्या बाहेर गर्भ वाढणे) ची शक्यता असते. अशी शक्यता  १० पैकी एका प्रकरणात असते.
  • बीजवाहिन्यांना झालेल्या नुकसानीमुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी ची शक्यता जास्त असते.
  • गरोदरपणातील गुंतागुंत जसे की गर्भपात, अकाली जन्म होणे आणि पोटातच मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
  • वेदना कायम राहणे तसेच संभोगादरम्यान वेदना होणे
  • Reiter’s syndrome  होण्याची शक्यता ज्यामुळे  संधिवात होतो आणि डोळे सुजतात.
  • पी.आय.डी. च्या गंभीर प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या जवळ फोड येणे.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

वेदना सौम्य किंवा मध्यम प्रमाणात असतात आणि जर हा संसर्ग रक्तात किंवा शरीराच्या इतर भागात पसरला तर लवकरच जीवघेणी परिस्थिती येऊ शकते. खूप गंभीर लक्षणे लक्षात आल्यावर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे किंवा जवळच्या हॉस्पिटल मधील तात्काळ विभागाकडे धाव घेतली पाहिजे. जर तुम्हाला असे वाटले की तुम्हाला लैंगिक संबंधातून संसर्ग झाला आहे तर तपासणीसाठी तुम्ही डॉक्टरकडे गेले पाहिजे तसेच लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गावरील उपचार परिणामकारक होत नसतील तरीसुद्धा तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

तुमच्या जोडीदारास उपचारांची गरज आहे का?

हो, तुमचा/तुमचे लैंगिक जोडीदार ज्याच्याशी तुमचे ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लैंगिक संबंध आले असतील तर त्यांची सुद्धा संसर्गासाठी तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले पाहिजेत. जरी तुमच्या जोडीदाराची संसर्गाची चाचणी नकारात्मक आली तरीसुद्धा त्यांना प्रतिजैविके घेण्याचा सल्ला दिला जातो. ह्याचे कारण chlamydia हे पी.आय.डी. होण्याचे कारण असते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये संभोगादरम्यान ते पसरते. chlamydia ची चाचणी १००% अचूक नसते, त्यामुळे प्रतिजैविकांचा कोर्स केल्यास चाचणीत दर्शवले नसलेले विषाणू सुद्धा नष्ट होतील. शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुमच्या लैंगिक जोडीदाराला संसर्ग झाला असेल तर उपचारांनंतर तुम्हाला तो पुन्हा होऊ शकतो.

ते पुन्हा उद्भवू शकते का?

असे निदर्शनास आले आहे की ५ पैकी एका स्त्रीला दोन वर्षांनंतर पुन्हा पी.आय.डी. होऊ शकतो. हे होण्यामागे काही कारणे आहेत जसे की, जोडीदाराच्या उपचारात अपयश, काँडोम्स वापरून सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यात अपयश किंवा दिलेल्या औषधांचा कोर्स नीट पूर्ण न केल्याने संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचा अंश तसाच शरीरात राहणे आणि त्यामुळे संसर्ग पुन्हा उद्भवणे. पी.आय.डी. मुळे झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा संसर्ग होण्याच्या दृष्टीने स्त्रिया खूप असुरक्षित असतात.

पी.आय.डी. ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी स्थिती आहे, खूपशा स्त्रियांना ह्याचा अनुभव येतो आणि त्या त्यातून पूर्णपणे बऱ्या होतात. ही वस्तुस्थिती आहे की जवळजवळ १० ते १५% पी. आय. डी. ने ग्रस्त झालेल्या स्त्रियांना गर्भधारणा होणे कठीण असते आणि जरी गर्भधारणा झाली तरी एक्टॉपिक गर्भधारणा होते,आणि संसर्गामुळे श्रोणीच्या भागात वेदना जाणवतात. परंतु संसर्गावर उपचार झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होऊ शकते, आणि ते रक्तात मिसळल्यामुळे जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असते.

अस्वीकरण: ही माहिती केवळ एक मार्गदर्शक आहे आणि योग्य व्यावसायिकांकडून वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी पर्याय नाही.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article