Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता स्त्रीच्या वयाचा तिच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

स्त्रीच्या वयाचा तिच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

स्त्रीच्या वयाचा तिच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

स्त्रीची प्रजननक्षमता तिच्या वयाशी निगडित असते. स्त्रीच्या  प्रजनन क्षमतेवर वयाचा काय परिणाम होतो, तसेच वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेऊयात.

वय आणि स्त्रीची प्रजननक्षमता

वयाचा स्त्रीच्या प्रजननक्षमतेशी संबंध असतो. काळ कुणासाठीच थांबत नसतो, त्यामुळे वय वाढत राहते आणि वयाच्या विशीत गरोदर राहणे जितके सोपे असते तितके ते नंतर रहात नाही. वय वाढते तसे गर्भार राहणे अवघड होऊन बसते परंतु अर्थातच ते अशक्य नसते. वयाच्या ३५ नंतर सुद्धा स्त्रिया यशस्वीरीत्या गरोदर राहू शकतात. जर तुम्ही २ मुलांचा विचार करीत असाल तर तुम्ही त्यानुसार लवकर सुरुवात केली पाहिजे. चला तर मग स्त्रीच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या दशकांमध्ये गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे बघूयात.

तुमच्या वयाच्या विशीतली प्रजननक्षमता

विशीत गरोदर राहण्याचे फायदे

  • तज्ञांच्या मते, गरोदर राहण्यासाठी हा सर्वात चांगला काळ आहे. २४व्या वर्षी स्त्रीमध्ये सर्वात जास्त प्रजनन क्षमता असते.
  • विशीमध्ये स्त्रीबीजामध्ये जनुकीय दोष नसतात, त्यामुळे बाळामध्ये जन्मतःच काही व्यंग नसते.
  • गर्भपाताची शक्यता कमी असते तसेच सिस्ट, फायब्रॉइड्स इत्यादींचा त्रास नसतो.
  • गर्भारपण आईसाठी सोपे जाते कारण विशीत ती निरोगी, सुदृढ आणि तरुण असते त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार नसण्याची शक्यता असते.

विशीत गरोदर राहण्याचे तोटे

  • बाळाची जबाबदारी घेण्याइतपत पैशाचे स्वावलंबन नसते.
  • जबाबदारी लवकर येऊन पडते आणि त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर (ज्यासाठी खूप वेळ आणि ऊर्जा लागते) परिणाम होतो कारण पालक म्हणून तुमच्या बाळाची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते आणि आधार द्यावा लागतो.
  • तुम्ही पालक होण्यासाठी कदाचित तयार नसता, तुम्हाला स्वातंत्र्य हवे असते, तसेच तुमच्या साथीदारासोबत तुम्हाला आयुष्याचा आनंद घ्यावासा वाटतो.
  • तुम्हाला  तुम्ही पालक होणे हे खूप लवकर वाटू शकते, तुम्ही खूप तरुण आहात आणि बाळाची जबाबदारी घेण्यास अजून सक्षम नाही असे तुम्हाला वाटू शकते.

तुमच्या वयाच्या तिशीतील प्रजननक्षमता

तिशीत गरोदर राहण्याचे फायदे

  • आर्थिकदृष्ट्या पालक होण्यासाठी ही योग्य वेळ आहे कारण तुम्ही दोघेही आपापल्या करिअरमध्ये स्थिरावलेले असता आणि त्यामुळे तुम्ही बाळासाठी खर्च करू शकता.
  • प्रसूती कळांमधून जाण्यासाठी तुमच्याकडे भरपूर ऊर्जा आणि ताकद असते.
  • तुम्ही तुमच्या विशीत मजा करून आता आई/बाबा होण्यासाठी तयार आहात.

तिशीत गरोदर राहण्याचे तोटे

  • ३५ नंतर गरोदर राहिल्यास बाळामध्ये डाऊन सिंड्रोम सारखे दोष आढळतात (डाऊन सिंड्रोम असलेले बाळ जन्माला येण्याचे प्रमाण १२०० मध्ये १ असे आहे; त्यासाठीची स्क्रिनिंग टेस्ट करून घेऊ शकता)
  • तुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी असते, कारण ह्या कालावधीत प्रजननक्षमता झपाट्याने कमी होते.
  • वयाच्या तिशीत गर्भपाताची शक्यता सुद्धा वाढते.

तुमच्या वयाच्या चाळिशीतील प्रजननक्षमता

चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे

  • तुम्ही आर्थिकदृष्टया सुरक्षित असता आणि चांगले करिअर झालेले असते.
  • पालक म्हणून तुम्ही आरामात राहू शकता आणि तुमचा आत्मविश्वास जास्त असतो आणि आर्थिकदृष्टया सुरक्षित असता.

चाळीशीत गरोदर राहण्याचे तोटे

  • नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कठीण जाते.
  • तुमच्या स्त्रीबीजांची गुणवत्ता घसरते आणि त्यामुळे बाळामध्ये जन्मतः व्यंग असण्याची शक्यता वाढते.
  • तुमच्या तब्येतीला  धोका असण्याची शक्यता वाढते जसे की गरोदरपणातील मधुमेह, उच्च रक्तदाब, नाळेचे प्रश्न इत्यादी.
  • जास्त वय असलेल्या स्त्रियांमध्ये पोटातच बाळाचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • चाळीशीत तुमची ऊर्जा पातळी कमी होते आणि बाळाला वाढवण्याचे काम खूप कठीण असते!

वय आणि एकाधिक (Multiple) मुले होणे

वयानुसार जुळी किंवा तिळी मुले होण्याची शक्यता वाढते. तज्ञांच्या मते ३५ पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये तरुण मुलींपेक्षा जास्त प्रमाणात FSH हे संप्रेरक असते. ह्या संप्रेरकांमुळे एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे सोडली जातात, शुक्रजंतूंनी ती फलित होतात आणि जुळी किंवा तिळी मुले होतात. जुळी मुले होणे हे अन्य घटकांवर सुद्धा अवलंबून असते जसे की, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना जुळी किंवा तिळी मुले होण्याची पार्श्वभूमी असणे. थोड्यात म्हणजे, तुम्ही आणि तुमच्या साथीदाराने कुटुंबाची सुरुवात करण्याविषयी विषयी ठरवले पाहिजे. बाळासाठी तुमची भावनिक, शारीरिक आणि आर्थिक तयारी असणे हा महत्वाचा घटक आहे. तुम्हाला अनेक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article