गर्भधारणा होताना

चाळीशीत गर्भवती होताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

दशकापूर्वी, चाळिशीनंतर बाळ होणे ही कल्पनाच अशक्य आणि धोकादायक वाटत असे. पण आता तसे राहिलेले नाही. हो, आताही धोका नक्कीच आहे, परंतु वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे बाळ व्हावे म्हणून खूपशा उपचारपद्धती उपलब्ध आहेत, त्यामुळेच आता चाळीशीत गर्भार राहणे तसे सोपे झाले आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली आणि डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेतल्यास, वयाच्या ४० व्या वर्षी गर्भवती होणे हे सहज शक्य आहे.

तुमच्या चाळीशीत गर्भधारणा

स्त्रीच्या शरीरातील जीवशास्त्रीय यंत्रणा, विशेषकरून प्रजनन प्रणाली, वयाच्या २० ते ३० ह्या कालावधीत चांगली कार्यरत असते. परंतु  वयाच्या चाळीशीत, शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो.

 ४०-४४ वर्षे वय असताना:

तुमच्या तरुण वयात स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि संख्या खूप चांगली असते. वाढत्या वयात दोन्हींमध्ये बदल होतात.  वयाच्या चाळीशीच्या  सुरुवातीला, नैसर्गिकरित्या गरोदर राहणे अवघड वाटेल. ह्या वयात तयार झालेल्या स्त्रीबीजांमध्ये सुद्धा जनुकीय व्यंग असतात. तथापि, प्रजननाच्या तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास गर्भधारणा राहू शकते. जर स्त्रीबीजांमध्ये काही दोष आढळले तर दात्याकडून स्त्रीबीज घेऊन आय. व्ही. एफ. ची प्रक्रिया केली जाऊ शकते. दुसरा प्रश्न गर्भाशयाचा असतो. गर्भाशयाचे आवरण जाड होत जाते त्यामुळे गर्भाशयाला रक्ताचा कमी पुरवठा होतो, त्यामुळे स्त्रीबीजाचे रोपण अवघड होते.
ह्या काळात रजोनिवृत्ती सुद्धा येते त्यामुळे मासिकपाळी चक्र कमी दिवसांचे असते. ह्याचा अर्थ ओव्युलेशन १५व्या दिवसाच्याऐवजी ९व्या दिवशीच होते. तुम्ही ओव्युलेशन किटद्वारे ओव्युलेशनचे नक्की कुठले दिवस आहेत हे जाणून  घेऊ शकता आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी ओव्युलेशनच्या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेऊ शकता.

वय वर्षे ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असताना:

नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता ४५ नंतर आणखी कमी होते, परंतु तरीही आशा सोडण्याचे अजिबात कारण नाही, गर्भधारणेसाठी आय. व्ही. एफ. सारख्या उपचारपद्धती करता येतात. ह्या उपचारपद्धतीमध्ये चांगली स्त्रीबीजे निवडली जातात आणि त्यांचे  रोपण केले जाते त्यामुळे निरोगी गर्भ राहण्याची शक्यता जास्त असते. जर स्त्रीच्या शरीरात निरोगी स्त्रीबीज नसेल तर दाता शोधला जातो. आरोग्यपूर्ण गर्भधारणेसाठी हा उत्तम मार्ग आहे कारण चाळिशीनंतर ह्या पद्धतीमुळे गर्भधारणेच्या यशस्वितेचा  दर जास्त आहे.

चाळिशीनंतर बाळ होण्याचे फायदे

अर्थात, चाळिशीनंतर बाळ होण्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही पैशाच्या दृष्टीने सुरक्षित असता तसेच भावनिकरीत्या सुद्धा तुम्ही ह्या वयात तयार असता. तुम्ही कदाचित तुमच्या करिअरच्या खूप चांगल्या टप्प्यावर असता आणि त्यामुळे आरामात असता. ह्या वयात तुम्ही जास्त ताणविरहित असता कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असतात. तसेच तुमचे आणि तुमच्या पतीचे नाते हे सुद्धा अगदी घट्ट झालेले असते कारण तुम्हा दोघांना एकत्र राहून बराच काळ लोटलेला असतो. त्यामुळे नात्याच्या बाबतीत तुम्ही खूप निश्चिन्त असता. तुम्ही ज्याच्यावर खूप जास्त प्रेम करता अशा व्यक्ती कडून तुम्हाला बाळ होणार म्हणजे तुमच्या बाळासाठी हा घट्ट कौटुंबिक पाया तयार होत असतो. त्याचप्रमाणे, आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात तुम्ही हुशार, प्रौढ आणि समजूतदार आहात. म्हणून, तुमचं वय आणि अनुभव जास्त असल्याने तुम्ही प्रॅक्टिकल आणि चातुर्याने निर्णय घ्याल, आणि म्हणूनच तुम्ही एक चांगली आई होऊ शकता.
असं लक्षात आले आहे की ह्या वयाच्या मातांना खूप आत्मविश्वास असतो आणि स्तनपानास त्या तयार असतात आणि हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असते. वयाच्या चाळीशीत, दोन्ही पालक हे आर्थिकदृष्ट्या चांगल्या टप्प्यावर असतात ज्यामुळे चांगल्या पालकत्वास मदत होते कारण तुम्ही तुमच्या मुलास सर्वोत्तम गोष्टी देऊ शकता. तुम्ही ह्या वयात तसे निवांत असता कारण तुम्ही जगाचा पुरेसा अनुभव घेतलेला असतो. म्हणून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू शकता आणि बाळाला चांगला वेळ देऊ शकता. वयाच्या चाळीशीतला अजून एक फायदा म्हणजे एका पेक्षा अधिक बाळे होण्याची सुद्धा शक्यता असते. जर तुम्ही नैसर्गिक गर्भधारणेचा विचार करीत असाल तर, तुमच्या संप्रेरकांना जास्त वेळ काम करावे लागते ज्यामुळे एकापेक्षा जास्त स्त्रीबीजांचे रोपण होते. आणि त्यामुळे, ह्या वयात जुळी बाळे होण्याची खूप जास्त शक्यता असते. जर तुम्हाला गर्भधारणेसाठी बाहेरच्या घटकांची मदत घ्यावी लागली जसे की स्त्रीबीजे, आय.व्ही.एफ वगैरे तर एकापेक्षा जास्त बाळे होण्याची शक्यता खूप जास्त असते.

चाळीशीत गर्भधारणा होण्याचे तोटे

चाळीशीत गर्भधारणा होण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम  म्हणजे जन्मतःच बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हे वय म्हणजे गर्भधारणेसाठी सर्वात जास्त धोका असलेले वय समजले जाते. सुदैवाने, वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे बाळामध्ये काही व्यंग असेल तर तुम्हाला ते आधीच समजू शकेल. चाळिशीतील गरोदर महिलांना, गर्भामध्ये काही दोष आहेत किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी चाचण्या करून घ्याव्या लागतात. असे आढळून आले आहे की जास्त वय असलेल्या महिलांच्या बाळांमध्ये डाऊन सिंड्रोम सारखी धोकादायक स्थिती आढळून येते. चाळीस वर्षांवरील महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान जनुकीय दोष सुद्धा आढळतात. जास्त वय असलेल्या गर्भवती महिलांमध्ये आढळणारा अजून एक प्रश्न म्हणजे गर्भपात. ४० वयाच्या वरच्या महिलांमध्ये गर्भपाताचा धोका खूप जास्त असतो, आणि ४५ च्या वर तर ही शक्यता खूप जास्त असते.
जरी गर्भधारणा राहिली आणि सगळ्या चाचण्यांचा निकाल सामान्य आढळला, तरी गर्भधारणा होण्यासाठी आणि प्रसूतीनंतर खूप काळजी घेतली पाहिजे. काही वेळा डॉक्टर्स सुद्धा बेडरेस्टचा सल्ला देतात. जास्त वयाच्या महिलांना नाळेशी संबंधित प्रश्न, उच्च रक्तदाब, गर्भारपणातील मधुमेह, प्री-एकलम्प्सिया आणि बरेच काही प्रश्न येऊ शकतात. त्यांना प्रसूतीदरम्यान सुद्धा समस्या येऊ शकतात आणि नॉर्मल प्रसूती पेक्षा सिझेरिअनची  शक्यता खूप जास्त असते. अकाली प्रसूती झाल्याने कमी वजनाची बाळे असतात. प्रसूती दरम्यान बाळाची स्थिती सुद्धा अवघड असू शकते. हो, चाळीशीच्या वरच्या महिलांमध्ये खूप गुंतागुंत असते. परंतु चांगली गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांना ह्या वयात सुद्धा आरोग्यपूर्ण नॉर्मल आणि चांगली गर्भधारणा राहू शकते. लक्षात ठेवा, तुम्हाला कुठल्याही समस्येला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आधुनिक औषधे तुमची मदत करू शकतात.

चाळिशीनंतर गर्भधारणेची शक्यता

अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे, चाळीशीच्या वरील महिला वंध्यत्वाच्या प्रश्नाशी सामना करत असतात. चाळिशीनंतर  गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी होते. वय वर्षे ४० आणि त्यावरील महिलांसाठी गर्भधारणेची शक्यता ५-२०% इतकी असते. तिशीतील स्त्रीची गर्भधारणेची शक्यता ७५% असते तर चाळीशीत ती शक्यता झपाट्याने कमी होते. ह्याचे कारण म्हणजे जसजसे वय वाढते तसे तयार होणाऱ्या स्त्रीबीजांची संख्या झपाट्याने कमी होते. तरुणवयात तयार होणाऱ्या स्त्रीबीजांची संख्या ३०००००-४००००० असते परंतु ३७ वर्षे वयानंतर निर्मित झालेली स्त्रीबीजे फक्त २५००० इतकी असते. वय वाढले की स्त्रीबीजांची गुणवत्ता सुद्धा कमी होते. चाळिशीनंतर गर्भपाताची शक्यता सुद्धा जास्त असते. चाळीशीच्या सुरुवातीला गर्भपाताची शक्यता ही ३४% च्या आसपास असते तर ४५ वयात ती ५३ % पर्यंत पोहोचते. इतर गुंतागुंत जसे की जनुकीय दोष, गुणसूत्रीय समस्या आणि बरेचश्या अशा समस्याही निर्माण होतात. तरीही, हल्ली तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे बाळ होण्यासाठी अनेक सुविधा आहेत ज्याला इंगजीमध्ये 'असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ए .आर.टी.)' असे म्हणतात. त्यामुळे चाळिशीनंतर कधीही नव्हती इतकी  गर्भधारणेची शक्यता वाढते. म्हणून सध्याचा काळ चाळिशीनंतर गर्भधारणेसाठी उत्तम आहे. जरी स्त्रीबीज जिवंत नसेल तरी दात्याकडून स्त्रीबीज  मिळवता येते  आणि आय. व्ही. एफ. च्या साह्याने चाळीशीच्या वरील स्त्रिया गरोदर राहून त्यांना निरोगी बाळे होऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आता ४५ व्या वर्षी बाळ होणे शक्य झाले आहे.

चाळीशीत नैसर्गिक रित्या गर्भधारणा राहण्याची किती शक्यता आहे?

चाळीशीत गर्भधारणेची शक्यता वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. ते म्हणजे आईचे आरोग्य, पालकांची जीवनशैली वगैरे. चाळीशीच्या सुरुवातीला गर्भधारणेची शक्यता २०% असते तर ४५ नंतर हे प्रमाण कमी होते आणि ते ५% पेक्षाही खाली येते. परंतु तुम्ही चाळिशीनंतर तुमच्या जीवनशैलीमध्ये आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून नैसर्गिक गर्भधारणेचा प्रयत्न करू शकता. किंबहुना, अशा काही केसेस आहेत जिथे आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारल्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होण्यास मदत झाली आहे. बी. एम. आय. नियंत्रित ठेवा: शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य बी.एम. आय. असणे महत्वाचे आहे. म्हणजेच तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन योग्य असले पाहिजे. त्याचाच अर्थ तुम्ही तुमचे वजन योग्य राखले पाहिजे. स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे कारण म्हणजे लठ्ठपणा. जर वजन योग्य प्रमाणात असेल तर संप्रेरके नीट कार्यरत राहतात. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर तुम्ही नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी मिळणारी पूरक औषधे घेऊ नका कारण त्यामुळे संप्रेरकांच्या कार्यात अडथळे येतात. योग्य आहार घेणे: ह्यास 'प्रजनन आहार' असे सुद्धा म्हणतात, कारण ह्यामध्ये चाळीशीत गर्भवती राहण्याच्या दृष्टीने योग्य पोषणाचा समावेश असतो. गर्भारपणाच्या काळात जास्तीत जास्त पोषणमूल्यांचा गरज असते कारण आईने खाल्लेल्या अन्नपदार्थांवर गर्भाशयाकडे पोहोचणारी पोषणमूल्ये अवलंबून असतात. तुमच्या अन्नामध्ये पुरेशा कॅलरीज, प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये  आणि इतर आवश्यक घटक असले पाहिजेत. ज्यामुळे सामान्य आणि आरोग्यपूर्ण गर्भधारणेस मदत होईल. भरपूर भाज्या आणि फळे खा. कॅफिन असलेले द्रवपदार्थ तसेच मद्य टाळा. धुम्रपानाला आळा घाला. शीतपेये किंवा मद्य घेण्याऐवजी सूप घ्या. ब्रोकोली, पालक, कॉलीफ्लॉवर, घेवडा ह्यासारख्या भाज्यांचा आणि पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. गर्भधारणेसाठी फॉलीक ऍसिड अतिशय महत्वाचे आहे. मासे जास्त खा त्यामुळे शरीरास फॉलीक ऍसिडचा  पुरवठा होईल. लाल मांस खाणे टाळा. प्रथिनांसाठी अंडी खाण्याचा खूप फायदा होतो. आरोग्यपूर्ण गर्भधारणेसाठी शरीराला अमिनो ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मिळण्यासाठी तुम्ही खूप सलाड आणि स्मूदीज घेतले पाहिजेत. टिप्स: ओव्युलेशन  किटचा वापर करून तुम्ही ओव्यूलेशनचा काळाचा अचूक अंदाज लावू शकता. ओव्युलेशन दरम्यान शरीराचे मूलभूत तापमान वाढते. तुमच्या गर्भाशयाच्या  मुखाचा श्लेष्मा तपासून पहा त्यामुळे सुद्धा गर्भधारणेस योग्य स्थितीचा अंदाज येईल. एका दिवसाआड शारीरिक संबंध ठेवा. खोल प्रवेश होण्यासाठी संभोगादरम्यान योग्य स्थिती निवडा. पूरक औषधे: चाळीशीच्या स्त्रिया गर्भधारणेसाठी वेवेगळी पूरक औषधे घेऊ शकतात. व्हिटॅमिन इ, फोलेट, कॅल्शिअम आणि इतर काही पूरक औषधे घेतल्याने शरीराला लागणारी पोषणमूल्ये मिळतील आणि त्यामुळे संप्रेरकांचे कार्य सुरळीत होईल.

प्रजनन उपचार घेतल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता किती असते?

आजच्या काळात वय वर्षे चाळीसवरील महिला गर्भवती राहण्यासाठी खूप मदत उपलब्ध आहे, त्यामुळे वंध्यत्वरील उपचारांद्वारे आधीपेक्षा आता गर्भवती राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. समस्या आहे ह्याचा अर्थ त्यावर उपाय नाही असे नाही. उदा: ४० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रीमध्ये, स्त्रीबीजे  कमी गुणवत्तेची असतात आणि स्त्रीबीजांची संख्या सुद्धा कमी असते, अशावेळी ती स्त्री, स्त्रीबीज दात्याकडून स्त्रीबीजे घेऊ शकते आणि तिला गर्भधारणा होऊ शकते. आय.व्ही. एफ. किंवा 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन'  ह्या उपचारपद्धतीमध्ये भ्रूण गर्भाशयाच्या बाहेर सुद्धा तयार करून नंतर त्याचे रोपण होऊ शकते. ह्या प्रक्रियेमुळे गर्भधारणेची शक्यता वाढत नाही तर त्यामुळे निरोगी बाळाच्या जन्माची खात्री सुद्धा होते. आय.सी.एस.आय. किंवा इंट्रासायटोप्लास्मीक स्पर्म इंजेक्शन  हे चाळिशीत गर्भधारणेसाठी सर्रास वापरले जाते. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून आणि वैद्यकीय तपासणी करून तुमच्या गर्भधारणेच्या शक्यतेवर कशाचा परिणाम होते हे जाणून घ्या. त्यानुसार, तुमचे डॉक्टर उपाय आणि उपचारपद्धती ठरवतील. आरोग्यपूर्ण जीवनशैली जगा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. चाळीशीवरील महिलांमध्ये गर्भधारणेची आणि उपचारांद्वारे निरोगी बाळांची शक्यता वाढलेली आहे.

चाळिशीनंतर गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

जर तुमचे वय ४० पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत करीत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारली  पाहिजे. स्वतःला तयार करा. तुमचे योग्य वजन किती असले पाहिजे हे जाणून घ्या आणि त्यावर काम करा. व्यायाम करा आणि नीट आहार घ्या आणि तुमच्यासाठी जे योग्य वजन आहे ते नियंत्रित ठेवा. खूप उपाशी राहू नका किंवा खूप टोकाचे डायटिंग करू नका कारण ह्या काळात तुमच्या शरीरास जास्त पोषणाची गरज असते.
डॉक्टरांशी किंवा तज्ञांशी संपर्क साधून तुमची प्रजननक्षमाता ४० नंतर कशी वाढेल हे पहा. नैसर्गिक  मार्गानी किंवा तुम्ही प्रजननासाठी योग्य असलेल्या उपचारपद्धती निवडून किंवा असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह प्रॅक्टिसेसच्या माध्यमाने स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि तुमच्या आरोग्यानुसार  ते तुम्हाला मार्गदर्शन करतील.

निष्कर्ष

ही वस्तुस्थिती आहे की वयाच्या चाळीशीत किंवा चाळीशीनंतर गर्भधारणेची शक्यता कमी होते, त्याचबरोबर हे नमूद करण्यास आनंद होतो की चाळीशीच्या वरील स्त्रियांना सुद्धा गर्भधारणा होऊन सुदृढ बाळे होत आहेत. जर तुम्ही तयार असाल तर शास्त्रात झालेली प्रगती तुमच्या मदतीला आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवा, लवकरच तुम्हाला 'गुड न्यूज' मिळेल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved